Monday, January 18, 2010

पिंडीभोवतीचं 'ब्रह्मांड'! (2)


पहिला भाग


उज्जैनला महांकालेश्वराच्या दर्शनासाठी मुख्य मंदिरात प्रवेश केल्यानंतर पुढे....

पुढे गेल्यानंतर उंच घुमट असलेली वास्तु लागली. इथेही रेलिंग होते. पण एका क्षणी पंधरा ते वीस फुटांवरून महंकालेश्वराचे दर्शन घेता येत होते. या रेलिंगच्या पलीकडे थोडी मोकळी जागा. तिथे नंदी आणि त्याच्यासमोर असलेल्या खोलीत महंकालेश्वराची पिंड असा मामला होता. एरवी गर्दी नसताना थेट तिथपर्यंत जाऊन दर्शन घेण्याची सोय असते. पण आज गर्दी असल्याने थेट पिंडीपर्यंत प्रवेश वर्ज्य होता. त्यामुळे लांबूनच दर्शन घेणे क्रमप्राप्त होते. नेहमीप्रमाणे भाविकांनी इथे रांग मोडून देवाच्या जास्तीत जास्त जवळ कसे जाता येईल, याची काळजी घेतली. त्यामुळे ढकलाढकली, खेचाखेची, धक्काबुक्की, आरडाओरडी, गोंधळ नि कोलाहल अशा अवस्था क्रमशः गाठल्या गेल्या.

समोरच्या रिकाम्या चौकात असलेले पिवळी वस्त्रे परिधान केलेले पुजारी या गोंधळाला आवर घालण्यसाठी 'आरडाओरडी'चे हुकमी अस्त्र वापरत होते. भाविकांकडून आणल्या गेलेल्या थाळ्यांवरील हार, नारळादी वस्तू उचलून घेऊन त्या महादेवचरणी वाहण्याची व्यवस्था पाहणारी पुजारी मंडळी अर्थातच तोर्‍यात होती. बाजू हटो, आगे बढो, आहिस्ते, सबको दर्शन लेने दो या त्यांच्या प्रचलित वाक्यसमुहांचा मुबलक वापर होत होता. इकडे पुजार्‍यांनी भाविकांचा हार-फुलादी 'भक्तीभाव' पिंडीवर वाहिल्यानंतर तो तत्परतेने उचलून दुसरीकडे टाकण्याचा व्यवहार्यभाव पाहणारी पुजार्‍यांची दुसरी फळी मंदिराच्या मुख्य खोलीत कार्यरत होती.

मंदिरात इतरांसाठी प्रवेश निषिद्ध असला तरी काही मंडळी मात्र आत दिसत होती. त्यांची 'उंची' कपड्यांतून, आचरणातून, व्यवहारातून नि अनेक बाबींतून कळत होती. आमच्या जत्थ्यातल्या काकूंचा भलताच हिरमोड झाला होता. त्यांना आत जाऊन देवदर्शन करायचे होते. पण ते शक्य नव्हते. आम्ही इतर अनेकांप्रमाणे आत शिरता येईल काय याची चाचपणी केली परंतु, त्यातून दुर्लक्ष करणे, धुत्कारणे, झिडकारणे या वृत्तींची नवी उदाहरणे कळाली.

तेवढ्यात देवाची आरती झाल्याची वार्ता कापराच्या वासाने दिली. सहाजिकच ती आरती घ्यायला लोकांची गर्दी झाली. दुसर्‍या थाळीत प्रसादही होता. जत्थ्यातल्या आमच्या एका सौभाग्यवतीच्या चिमुकल्या चिरंजीवाने त्या थाळीतील वाटपासाठीच चालवलेला प्रसाद स्वहस्ते उचलला नि मग कपाळावरची उजवी शिर तडतडून पुजार्‍याने 'देवाघरची फुले' असलेल्या त्या मुलाच्या मातेला 'पुत्रसंस्काराचे' धडे दिले. तेवढ्याशा त्या शाब्दिक माराने त्या मातेला अश्रू आवरेनासे झाले.

अखेरीस लांबून का होईना दर्शन पार पडल्यानंतर जत्था सभागृह मंडपातून बाहेर पडला. बाहेरही अनेक मंदिरे थाटलेली होती. ही मंदिरे बर्‍यापैकी ऐसपैस जागेत होती. त्यात एक मंदिर विठ्ठलाचेही होती. तिथे आल्यानंतर आजूबाजूला मराठी आवाज तेवढे ऐकू आले. बाकी मंदिरातही बरीच गर्दी होती. इथून सगळी दर्शने करून आमचा जत्था अखेरीस मंदिराच्या बाहेर पडला.

दर्शन करूनही ते जवळून न झाल्याने काकूंचा झालेला हिरमोड चेहर्‍यावर दिसत होताच. सहलसंयोजकाने इच्छामणी गणपतीचे दर्शन आधी घेतले असते तर थेट आतपर्यंत जाऊन दर्शन घेता आले असते. आपण आधी इथे यायला नको होते, अशी पश्चातभावना व्यक्त केली. आणि मग हा सगळा जत्था इच्छामणीच्या दर्शनाला गेला. तिकडून मग मंगलनाथ, भैरवनाथ अशी मंदिरे करत संध्याकाळपर्यंत उज्जयिनी नगरिला प्रदक्षिणा घालत पुन्हा महांकालेश्वराच्या प्रांगणात अवतरला. तिथे गेल्यानंतर मंदिरात गर्दी नसल्याची सुखद वार्ता कळली. तातडीने सगळ्यांनी मंदिराकडे धाव घेतली.

आता सगळी सर्पिलाकार वेटोळी मिटली होती. प्रवेश केल्यानंतर कुठेही न थांबताच सगळी मंडळी थेट मंदिराच्या आत जाऊन पोहोचली. पायीची वाट थेट महांकालेश्वराच्या गाभार्‍यातच पोहोचली. समोर महांकालेश्वराचे शिवलिंग. त्याच्याभोवती योनीपटल. सर्पाने छानपैकी फणा पसरलाय. आणि त्या सगळ्यावर पुजारीवर्ग डोलतोय. असा सारा माहौल होता. आतले दृश्य अगदी रमणीय होते. काही भाविकांनी पिंडीलाच मिठी मारली होती. काहींनी भक्तीभावाने पिंडीजवळ डोके ठेवले होते. हलवल्याशिवाय ते वर उचलण्याची तसदी ते अजिबात उचलत नव्हते. काही जण आणलेल्या वस्तू वाहत होते. काही जण अभिषेकाला बसले होते. काही जप करत होते. प्रत्येकाच्या भक्तीभावनेला तोंड फुटले होते.

गर्भगृहात मोजकीच मंडळी होती. पण पुजारी मंडळी आपले अस्तित्व विसरू देत नव्हती. दक्षिणांच्या नोटेवरून त्यांचे आवाज ठरत होते. काहींचे अभिषेक त्यांच्या मार्फत सुरू होते. त्याच्या मंत्राचे आवाज येत होते. काही जणांनी मध्यस्थाविना पुजा चालवली होती. काही जप करत होते. आमच्या जत्थ्यातल्या काकू महांकालेश्वराचे रूप पाहून हरखून गेल्या होत्या. पुजार्‍यांचे आवाज ऐकल्यानंतर त्यांनी शंभराची नोट काढली नि वाहिली. ती नोट नि हातातली जपाची माळ पाहताच पुजारीबुवांनी त्यांना जपासाठी वेगळी जागा उपलब्ध करून दिली. त्यांचा जप सुरू झाला. आम्ही निवांतपणे दर्शन घेतले. पुजारी बुवांची पुजा चालली होती. लोक येत होते. दर्शन घेत होते.

आता गर्दी खूपच कमी झाली होती. सगळ्यांची दर्शने आटोपली होती. काकूंचा जप संपला होता. निश्चिंत नि निवांत भावाने त्या जप आटोपून पिंडीसमोरच्या मोकळ्या जागेत बसल्या. दर्शनाने त्या तृप्त झाल्या होत्या. सहल संयोजकाने आठवण करून दिली, 'यह इच्छामणीका प्रसाद है. उसका दर्शन लिया और महांकालेश्वरके अच्छे दर्शन हो गए.' त्याच्या म्हणण्याला उगाचच होकार भरत आम्ही त्याच्या चेहर्‍यावरच्या तृप्त गोलाई वाढवली. दर्शन झाले. दिवसभराची कटकट, तगमग, वसवस, तडतड अशा अनेक द्वि दुरूक्त शब्दांच्या भावनांचा अंत 'याचसाठी केला होता अट्टाहास' या भावनेने झाला ही समाधानानाची बाब.

इत्यलम.

पिंडीभोवतीचं 'ब्रह्मांड'! (1)हे लेखन म्हणजे मला-तुम्हाला येणार्‍या अनुभवाला दिलेला उजाळा आहे. स्थळ महत्त्वाचे नाही. तुमचा `तो` अनुभव पुन्हा एकदा जागा होईल, यासाठीच हा लेखनप्रपंच. बस्स. बाकी काही नाही.

उज्जैनला पोहोचलो तेव्हा दुपारचे दीड-दोन वाजले होते. महांकालेश्वराच्या मंदिराच्या परिसरात असलेल्या पार्किंगमध्ये आमच्या गाड्या पोहोचल्या नि सुटीच्या दिवशी देवाची आठवण होणारे फक्त आपणच नाही, हे जाणवून तोपर्यंत उगाचच जाणवलेला अपराधभाव दूर झाला. गाड्या सुयोग्यजागी पार्क करून आमचा जत्था मंदिराकडे निघाला. मंदिरात देव सापडतो पण चप्पल हरवते, हे अनुभवांती बनलेले सुभाषित आठवून सुरक्षित ठिकाणाचा शोध सुरू असतानाच आमच्या सहल संयोजकाने एका दुकानासमोर आमच्या जत्थ्याला उभे केले. दुकानात चपला ठेवण्याच्या मोबदल्यात 'सजवलेली' थाळी तयार होतीच. पण आमच्या जत्थ्यातल्या बायकांनी निग्रहाने त्यातल्या अनेक वस्तू कमी करून चपला सांभाळायसाठी किमान पैसे खर्च होतील, याची काळजी घेतली. दुकानदारीण बाईचा नाराज चेहरा दिसत होताच. पण तरीही त्यांनी आम्हाला दुकानातून मंदिराच्या परिसरात सोडण्याचा खुष्कीचा मार्ग दाखवला.

अर्थात हा मार्ग थेट मंदिरात जात नव्हताच. प्रसिद्ध मंदिरात दर्शनाची सर्पिलाकार व्यवस्था असतेच. हे तर महादेवाचे मंदिर त्यामुळे त्याच्या गळ्यात पडलेल्या सर्पाने भाविकांसाठीही वेटोळे टाकले होतेच. पण हे सापाचे शेपूट दिसत होते तेवढेच नव्हते. एक टप्पा सहजी पार केल्यानंतर इमारतीत प्रवेश केला नि भल्या मोठ्या सभागृहात रागांची अनेक वेटोळी असल्याचे दिसून आले.

भक्तांचा 'जमावडा' चांगलाच होता. आमचा जत्था भक्तीभावाने हात-पाय धुवून तिथपर्यंत आला. ही गर्दी पाहूनच आज दर्शन लांबूनच घ्यावे लागणार याचा अंदाज आला. उभे रहाण्याच्या निरनिराळ्या तर्‍हा येथे पहायवायस मिळाल्या. काही जण रेलिंगला टेकून उभे राहिले होते. काहींनी त्याच्यावर बसणे पसंत केले. काही जण रेलिंग दोन्ही हातांनी पकडून काय काय व्यायाम तेवढ्या वेळात करता येईल याचा अदमास घेत होते. काहींनी एका पायावर उभे राहू बाई दुसर्‍या पायावर उभे राहू', असला प्रकार चालवला होता. शरीराची जाडी अंमळ जास्त असलेल्या काही बायकांनी 'सरणार कधी रांग, कुठवर साहू भार 'पायी' अशी अवस्था झालेली. त्यातल्या काहींनी सरळ जमिनीवर बसकण मारली होती. त्याच्या जोडीला इतरही बायकांनी पार जमवला. काहींच्या हातातल्या दर्शनासाठी घेतलेल्या थाळ्यांतील साखरफुटाण्याच्या पुड्याही फुटल्या.

तोपर्यंत पुढे असलेली गर्दी इंचाइंचाने मार्गक्रमण करत होती. मंदिराच्या आवारातच असल्याने भाविकांच्या भक्तीला पारावारही उरला नव्हता. परिवार असला की पारावार जास्त येतो असे कुणीसे सांगितल्याचे आठवले. शिवभक्तांचा हा परिवार बराच मोठा असल्याने 'बम बम भोले', भोलेनाथ की जय अशा अनेक महादेवाच्या संबोधनांचे द्वि,त्रि,चतुर्थ शब्दी उच्चार नि जय हे अंत्यशब्द असलेल्या अनेक घोषणांचा जागर होत होता. त्या जोडीला अनेक महिला कसलेसे स्तोत्र किंवा प्रार्थना पुटपुटत होत्या. या सगळ्या कोलाहलातच 'माला हे पायजे' छापाचे हिंदी भाषक आवाजही येऊ लागले होते. त्याला दरडावणारे सूरही ऐकू येत होते नि या दरडावण्याला हमखास गुडघ्यावर टेकायला लावणआरे रूदनाचे विविध पट्टीतले प्रतिसूरही ऐकू येऊ लागले.

या सगळ्यांतून आपले लक्ष त्या महादेवाचरणी नेण्याचा प्रयत्न मंदिर प्रशासनाने भिंतीच्या माध्यमातून कसोशीने केलेला दिसला. भिंतीवर लिहिलेले महांकालेश्वराचे महात्म्य हे काहींच्या दृष्टीने वेळ घालविण्याचा उद्योग होत असला तरी दर्शनास जाईपर्यंत निर्माण होणारा भक्तीभाव द्विगुणित करण्याची व्यवस्थापनाची चतुर युक्तीही जाणवत होती. या भित्तीलेखात तुलसीदासाच्या रामायणातील महादेवाला लागू पडतील अशी वचने सचित्र दिली होती. त्या वचनातील मध्ययुगीन हिंदी ही अंमळ आम्हा मराठीयांसाठी नेहमीप्रमाणे उगाचच विनोदाचा विषय बनली. पण चित्रे नक्कीच वेधक होती. रांगेतल्या मंडळींचा वेळ कारणी लागावा यासाठी त्या चित्रकाराने भलतेच कष्ट घेतले होते. या महांकालेश्वर महात्म्यात अनेक कथा दिल्या होत्या. त्यात मंदिरातचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी 'प्राचीन', एकमात्र हे शब्द वापरण्याची अर्वाचीन परंपरा न चुकता पाळली होती.

महादेवावरची भक्ती सभागृहात ठायी ठायी पेरलेली होती. देवदेवतांच्या तसबीरी, घड्याळे, पाण्याची भांडी, भित्तीचित्रे यातून ती डोकावत होती. या दानी मंडळींची नावेही आवर्जून लिहिली होती. त्यानिमित्ताने महांकालेश्वराचे भक्त देशाच्या कोणकोणत्या भागात आहेत, याची कृतज्ञ जाणीव होत होती.

तेवढ्यात बम बम भोलेचा जोरदार गजर जाला नि 'साचलेली' गर्दी अचानक फुटली. लोकांना अडवून बसलेल्या पोलिस मामांनी हिरवा झेंडा दाखवल्याने हा लोट पुढे सरकला. उतारावरून घरंगळत ही गर्दी मंदिराच्या मुख्य इमारतीत झेपावली. तिथे ठेवलेल्या धातूशोधक यंत्रातून पार होत आम्ही पुढे सरकलो. पुढे अनेक कोनाड्यांत विविध देवदेवतांची प्रतिष्ठापना केली होती. त्यावर भरपूर हार-फुले वाहिलेली होती. दानपेटीही अर्थातच होती. त्यात वर दिसतील अशा दहा, पन्नास, शंभराच्या नोटाही दिसल्या. थोडक्यात एका महांकालेश्वराच्या निमित्ताने या बाकीच्या देव मंडळींचे पर्यायाने त्यांच्या ‘पालकां’चे छान चालले होते. ‘तर-तम’ भाव म्हणजे काय हे इथल्या पुजार्‍यांकडून दिल्या जाणार्‍या प्रसादातूनही कळून येत होते.

याच ठिकाणी उजव्या बाजूला पुरोहितही बसले होते. शांती, पूजा, अभिषेकादी कार्ये येथे केली जात होती. पुजारी मंडळी आर्जवाने भाविकांना बोलवत होती. अनेक भाविक मंडळींनी त्यांच्या या आर्जवाला खरोखरच आपली ‘मान’ दिली होती.

आमचा जत्था मात्र निग्रहाने हे आग्रह ओलांडून पुढे गेला......

क्रमशः

Saturday, January 9, 2010

पाव मार्काचा धडा !


एरवी उत्साहाने फसफसत शाळेतून परतणारी माझी लेक त्या दिवशी तिला घेऊन येणार्‍या वाहनामधून उतरली तेव्हाच तिच्या डोळ्यात आभाळ दाटलं होतं. ते ओळखूनच तिच्या आईने तिला उचलून जवळ घेतलं नि तोपर्यंत तिच्या डोळ्यातलं आभाळ वाहू लागलं. साथीला छातीचा भाताही वाजू लागला. तिच्या आईने थोपटतच तिला आधी शांत केलं, पण तरीही ते रोखता येणं तिच्यासाठी अशक्य बनलं होतं.
हमसून हमसून रडता रडता ती म्हणाली, 'टीचर'ने कमी मार्क दिले.
कशाबद्दल? आईचा प्रश्न.
'औ' चुकीचा लिहिला म्हणून- लेक उत्तरली.
मग ठीक आहे. त्यात काय एवढं?
एवढं बोलेपर्यंत मायलेकी घरात पोहोचल्या होत्या. लेकीने रडत रडतच तिच्या दप्तरातून तिची 'बुक' काढली. वर्गपाठाच्या त्या वहीत शाळेत तिच्या 'टीचर' सराव घेतात. मुलांकडून हा सराव करून घेतला जातो. त्यानुसार त्या दिवशी हिंदीतली स्वराक्षरे लिहिण्याचा सराव होता.
त्यानुसार लेकीने 'अ आ इ ई.... ' अशी सगळी अक्षरे नीट लिहिली होती. पण तिच्या शिक्षिकेने तिचा दहापैकी पाव मार्क कापला होता. बाकी सगळ्यांना दहा मार्क मिळाले असताना माझ्या लेकीला मात्र  ९. ७५ मार्क्स मिळाले होते.
तिच्या आईने पाव मार्क कापण्याचं कारण काय? असं विचारल्यानंतर मुलीने तिला वही दाखवली.
हिंदीमध्ये 'औ'वरच्या दोन्ही मात्रा शेवटच्या कान्यातून निघणार्‍या असाव्यात अशी तिच्या शिक्षिकेची अपेक्षा होती. पण घरी अभ्यास घेताना आपण मराठीत लिहितो, त्याप्रमाणे लेकीने 'अ'च्या दांडीतून एक आणि दुसर्‍या कानातून एक अशा दोन मात्रा दिल्या होत्या. पण त्या चुकीच्या असे सांगून तिच्या शिक्षिकेने हा पाव मार्क कापला. त्यांच्या मते दोन्ही मात्र शेवटच्या कान्यातूनच वर जायला हव्यात.

कशीबशी समजूत घालून नि तिचं लक्ष दुसरीकडे वेधून तिचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न तिच्या आईने केला. चार तासांनंतर मी घरी आल्यानंतर त्या पाव मार्काचे माझ्या पुढेही आवर्तन झाले. तोपर्यंत ते तिच्या डोक्यात धुमसत होतेच.

'औ'ची मात्रा पहिल्या काय किंवा शेवटच्या काय कुठल्याही कान्यातून निघाल्याने अक्षराचा, शब्दाचा अर्थ बदलला नक्कीच नसता. पण अचूकतेच्या नादात किंवा ती चूक मार्कांतून दाखविण्याच्या नादात त्या कोवळ्या मनावर किती परिणाम झाला या भावनेनेच मी हेलावलो. दहापैकी पाव मार्क मिळाला नाही आणि इतरांना तो मिळाला याचं दुःख तिला सहन होत नव्हतं. वास्तविक तिला अमुक मार्क्स मिळावेत या अट्टहासाचे आम्ही नव्हतो नि नाहीत. पण स्पर्धेचा भाव तिच्या मनात मात्र नक्कीच होता. व्यवस्थेने चार वर्षाच्या वयातच तिच्यात निर्माण केला होता.

ज्युनियर केजीमध्ये जाणार्‍या माझ्या मुलीला कमी मार्क मिळाल्याचे दुःख नि त्यामुळे येणारा ताण एवढा असेल तर गेल्या काही दिवसांत आत्महत्या केलेल्या त्या उमलत्या कळ्यांवरचा ताण किती असेल याची कल्पनाच केलेली बरी. तो सहन न झाल्यामुळे या कळ्या फुलण्याच्या मार्गावर असतानाच कोमेजल्या. हुशारी मोजण्याची मार्काधारीत मोजपट्टी या ताणाला जन्म घालते. ही पद्धती बदलून एखाद्याची सृजनशीलता, हुशारी मोजण्याचा नवा निकष आपण तयार करू शकणार नाही काय? या मुलांना आपण असेच ताणाखाली राहायला लावणार काय? शिक्षण हे पुढच्या जीवनाला आधार देणारे, बळ देणारे असावे ते बलहीन करणारे नसावे यासाठी काय करता येईल? हे आणि असंख्य विचार आमच्या डोक्यात पिंगा घालू लागले.

तिकडे आई-बाबांपाशी रिती होऊन माझी मुलगी झोपी गेली पण, तिचा तो पाव मार्काचा धडा आम्हाला मात्र खूप काही शिकवून गेला...

Tuesday, January 5, 2010

इक पल तो हमे जीने दे जीने दो


*डोंबिवलीच्या नेहा सावंत या मुलीला नृत्याची विलक्षण आवड होती. अनेक स्पर्धात भाग घेऊन तिने बक्षिसेही मिळवली होती. बुगी वूगी या टिव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रमातही तिचा नाच झाला होता. पण अभ्यासाकडे दुर्लक्ष होते म्हणून तिच्या पालकांनी तिचा क्लास बंद केला आणि त्याचा राग आलेल्या नेहाने गळफास घेऊन जीवन संपवले.

*शेजारच्या दादरमधील शारदाश्रम या प्रसिद्ध शाळेत शिकणार्‍या सुशांत पाटील या सातवीतल्या विद्यार्थ्याने चार विषयात नापास झाल्याची नामुष्की सहन न झाल्याने शाळेतच टॉयलेटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

* नवी मुंबईतील डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयात फिजिओथेरेपीच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या पवई येथील वैजंत्री बुटेंद्रसिंग गुलेर या २० वर्षीय विद्यार्थिनीने रविवारी सकाळी गळफास घेवून आत्महत्या केली. मी ९० टक्के मार्क मिळवू शकले नाही, असे तिने भिंतीवर लिहून ठेवले होते. ती दोन विषयात नापास झाली होती.


जच्या शिक्षण पद्धतीविषयी मार्मिक भाष्य करणारा आमिर खान अभिनित '३ इडियट्स' हा चित्रपट प्रदर्शित झालेला असतानाच मुंबईत तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडावी हा दुर्देवी योगायोग म्हणावा लागेल. खरं तर या चित्रपटात याच विषयावर इतके नेमके भाष्य करण्यात आले आहे की वेगळे काही सांगायची गरज भासू नये. आमिरच्याच 'तारे जमी पर' मध्येही हाच विषय हाताळला होता. हे चित्रपट गाजत असले तरी त्यातून शिकले मात्र काही जात नसावे काय असे वाटण्यासारखी परिस्थिती या आत्महत्यांनी पुढे आणली आहे.

विद्यार्थ्यांना पोटार्थी बनविणार्‍या या शिक्षण व्यवस्थेविषयी यापूर्वीही अनेकदा पुष्कळ लिहिले गेले आहे. पण त्यात बदल होण्याचे अद्यापही घाटत नाही. शिक्षण हे संस्कारीत करणारे, सुबुद्ध करणारे आणि स्वतःच्या पायावर उभे करण्यास सक्षम करणारे असावे. पण ते नाहक स्पर्धा करणारे आणि बळ आणि कल नसतानाही नको त्या दिशेने पळायला लावणारे नको आहे. पण दुर्देवाने तसेच घडते आहे. शिक्षणाचा थेट संबंध करीयरशी जोडल्याने चांगले मार्क्स मिळविणे म्हणजे उत्तम करीयरची खात्री अशी एक समजूत उगाचच तयार झाली आहे.

चांगले मार्क्स म्हणजे चांगल्या कॉलेजात, आणि हव्या त्या (अर्थात, पालकांनाच) कोर्सला प्रवेश आणि अर्थातच हव्या त्या क्षेत्रात (इथेही पालकांनाच) करीयर असा शिक्षणाचा धोपटमार्ग ठरून गेला आहे. मुलगा जन्माला आला की त्याने काय व्हायचे ते पालकांनी ठरवून टाकलेले असते. त्याचा कल नि बुद्धीचा आवाका याचा जराही विचार न करता मग हे 'रोबो' जीवनाच्या लढाईत उतरतात. तिथे अपयश आले आणि ते सहन करण्याची शक्ती नसली की व्यसनाधीन होण्यापासून जीवन संपविण्यापर्यंत काहीही उपाय योजले जातात.

दुर्देवाने या सगळ्यातून पालक, शिक्षण व्यवस्था, राज्यकर्ते काहीही शिकले नाहीत. घोकंपट्टीच्या आधारवर रचलेली परिक्षा पद्धती तर आता जीवघेणी ठरलेली आहे. त्यामुळेच ती आमुलाग्र बदलण्याची गरज आहे. राज्यात चौथीपर्यंत परिक्षा न घेण्याचा निर्णय स्तुत्य आहे. पण त्यापुढेही या परिक्षांची पद्दत बदलायला हवी. परिक्षा तणावाचा केंद्रबिंदू न बनता तो मुलांमधल्या सृजनला वाव देणारा उत्सव ठरायला हवा. त्यात पोपटपंची नको तर त्याच्यातल्या गुणवत्तेला, बुद्धीला खर्‍या अर्थाने धार लावणारी कसोटी हवी. अलगद, सहजपणे मुलांना फुलू द्यायला हवे. एक परिक्षा विद्यार्थ्याचे जीवन हिरावून घेत असेल तर तिची भीती त्याच्या मनात किती बसली असेल याचा विचार करण्याची गरज आहे.

मार्क्स ही हुषारी मोजण्याची मोजपट्टी होता कामा नये. हुषारी इतरही क्षेत्रात असू शकते. संगीत, गाणे, नृत्य या कलांमधील 'हुषार' मंडळींना मार्कांच्या कसोटीत मोजायचे झाल्यास त्यातली बहुतांश नापासच ठरायची. पण म्हणून त्यांची हुषारी कमी ठरत नाही. एखाद्या विशिष्ट विषयातच रस असेल तर त्यातच शिक्षण घेण्याची करीयर करण्याची संधीही उपलब्ध व्हायला हवी.

राज्यकर्त्यांनी या सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्याने पहायची गरज आहे. राज्यातल्या मुलांनी काय व्हायचे हेही सरकारच ठरवते आहे. म्हणूनच भरमसाट इंजिनियरींग कॉलेजेसना परवानगी दिली जाते नि एकीकडे शिक्षक भरती बंद असतानाही डिएड नि बीएडची पिके घेण्याचे कारखाने मात्र सुरूच असतात. त्यातच या शिक्षणाचे उद्दिष्ट काय? त्याचा त्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात उपयोग काय याविषयी सरकारला काहीच व्हिजन नसते. पालकांच्या इच्छेखातर मॅकेनिकल इंजिनयिर झालेली मुले पुढे करीयर मात्र मार्केटिंगमध्ये करतात? मग तिथेच करीयर करायचे होते तर मॅकेनिकलच्या एका लायक मुलाला त्याच्यामुळे जागा मिळाली नाही याविषयीचा अपराधभाव नंतर त्या मुलात रहातो का? पण मॅकेनिकल इंजिनियरींगला प्रवेश न मिळाल्यामुळे एखाद्या मुलाने आत्महत्या केल्याची नोंद मात्र होते. करीयर ठरविण्यासाठी स्वतःचा कलही ओळखू न देऊ शकणारे शिक्षण देऊन आपण काय साध्य करत आहोत?

पालकांनीही या आत्महत्यांतून काही 'शिकण्याची' गरज आहे. पंधरा वर्षाच्या आतल्या वयाच्या या मुलांना मरणाला का कवटाळावेसे वाटले याचा शोध घेतला जावा. मार्कांच्या स्पर्धेत मुलांना दौडविणार्‍या पालकांना त्याचा नेमका कल काय हे जाणून घेण्याचीही गरज भासत नाही. उच्चशिक्षित पालकांना आपली मुले ही आपलीच 'क्लोन' आवृत्ती व्हावी असे वाटते, तर ज्यांची स्वप्ने पूर्ण झाली नाहीत, असे पालकांना ती स्वप्ने आपल्या मुलांनी पूर्ण करावी असे वाटते. यात त्याला काय व्हायचे हा भागच लक्षात घेतला जात नाही.

हे सगळे कमी की काय म्हणून मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली चॅनेल्सही टिआरपीच्या नादात अल्पावधीत यश प्राप्त करण्याच्या सवंग युक्त्या सांगणारे कार्यक्रम सादर करून या सगळ्याला दुजोराच देत आहेत. रियालिटी शोमधून मिळणारी झटपट प्रसिद्धीची चकाकी मुलांसमोर चकाकते. पण त्या पलीकडचा अंधार मात्र दिसत नाही. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत सांगितिक स्पर्धात महागायकापासून सुरों को सरताज ठरलेले आयडॉल आता कुठल्या अंधारात चाचपडताहेत हे मात्र दाखवले गेलेले नाही. त्यामुळे चकाकत्या या विश्वाच्या मागची अंधारलेली बाजू कधी या मुलांसमोर येतच नाही.

आमिरच्या थ्री इडियट्समध्येही अभ्यासाच्या ताणातून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे दाखवले होते. त्याच्या तोंडी एक गाणेही आहे.

सारी उम्रभर मर मर के जी लिए
इक पल तो हमे जीने दे जीने दो

give me sunshine, give me some rays
give one another chance to grow up onece again

नेहा, स्वप्नील आणि त्यांच्याच पिढीतल्या मुलांच्या भावना यापेक्षा वेगळ्या काय आहेत?