Saturday, January 9, 2010

पाव मार्काचा धडा !


एरवी उत्साहाने फसफसत शाळेतून परतणारी माझी लेक त्या दिवशी तिला घेऊन येणार्‍या वाहनामधून उतरली तेव्हाच तिच्या डोळ्यात आभाळ दाटलं होतं. ते ओळखूनच तिच्या आईने तिला उचलून जवळ घेतलं नि तोपर्यंत तिच्या डोळ्यातलं आभाळ वाहू लागलं. साथीला छातीचा भाताही वाजू लागला. तिच्या आईने थोपटतच तिला आधी शांत केलं, पण तरीही ते रोखता येणं तिच्यासाठी अशक्य बनलं होतं.
हमसून हमसून रडता रडता ती म्हणाली, 'टीचर'ने कमी मार्क दिले.
कशाबद्दल? आईचा प्रश्न.
'औ' चुकीचा लिहिला म्हणून- लेक उत्तरली.
मग ठीक आहे. त्यात काय एवढं?
एवढं बोलेपर्यंत मायलेकी घरात पोहोचल्या होत्या. लेकीने रडत रडतच तिच्या दप्तरातून तिची 'बुक' काढली. वर्गपाठाच्या त्या वहीत शाळेत तिच्या 'टीचर' सराव घेतात. मुलांकडून हा सराव करून घेतला जातो. त्यानुसार त्या दिवशी हिंदीतली स्वराक्षरे लिहिण्याचा सराव होता.
त्यानुसार लेकीने 'अ आ इ ई.... ' अशी सगळी अक्षरे नीट लिहिली होती. पण तिच्या शिक्षिकेने तिचा दहापैकी पाव मार्क कापला होता. बाकी सगळ्यांना दहा मार्क मिळाले असताना माझ्या लेकीला मात्र  ९. ७५ मार्क्स मिळाले होते.
तिच्या आईने पाव मार्क कापण्याचं कारण काय? असं विचारल्यानंतर मुलीने तिला वही दाखवली.
हिंदीमध्ये 'औ'वरच्या दोन्ही मात्रा शेवटच्या कान्यातून निघणार्‍या असाव्यात अशी तिच्या शिक्षिकेची अपेक्षा होती. पण घरी अभ्यास घेताना आपण मराठीत लिहितो, त्याप्रमाणे लेकीने 'अ'च्या दांडीतून एक आणि दुसर्‍या कानातून एक अशा दोन मात्रा दिल्या होत्या. पण त्या चुकीच्या असे सांगून तिच्या शिक्षिकेने हा पाव मार्क कापला. त्यांच्या मते दोन्ही मात्र शेवटच्या कान्यातूनच वर जायला हव्यात.

कशीबशी समजूत घालून नि तिचं लक्ष दुसरीकडे वेधून तिचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न तिच्या आईने केला. चार तासांनंतर मी घरी आल्यानंतर त्या पाव मार्काचे माझ्या पुढेही आवर्तन झाले. तोपर्यंत ते तिच्या डोक्यात धुमसत होतेच.

'औ'ची मात्रा पहिल्या काय किंवा शेवटच्या काय कुठल्याही कान्यातून निघाल्याने अक्षराचा, शब्दाचा अर्थ बदलला नक्कीच नसता. पण अचूकतेच्या नादात किंवा ती चूक मार्कांतून दाखविण्याच्या नादात त्या कोवळ्या मनावर किती परिणाम झाला या भावनेनेच मी हेलावलो. दहापैकी पाव मार्क मिळाला नाही आणि इतरांना तो मिळाला याचं दुःख तिला सहन होत नव्हतं. वास्तविक तिला अमुक मार्क्स मिळावेत या अट्टहासाचे आम्ही नव्हतो नि नाहीत. पण स्पर्धेचा भाव तिच्या मनात मात्र नक्कीच होता. व्यवस्थेने चार वर्षाच्या वयातच तिच्यात निर्माण केला होता.

ज्युनियर केजीमध्ये जाणार्‍या माझ्या मुलीला कमी मार्क मिळाल्याचे दुःख नि त्यामुळे येणारा ताण एवढा असेल तर गेल्या काही दिवसांत आत्महत्या केलेल्या त्या उमलत्या कळ्यांवरचा ताण किती असेल याची कल्पनाच केलेली बरी. तो सहन न झाल्यामुळे या कळ्या फुलण्याच्या मार्गावर असतानाच कोमेजल्या. हुशारी मोजण्याची मार्काधारीत मोजपट्टी या ताणाला जन्म घालते. ही पद्धती बदलून एखाद्याची सृजनशीलता, हुशारी मोजण्याचा नवा निकष आपण तयार करू शकणार नाही काय? या मुलांना आपण असेच ताणाखाली राहायला लावणार काय? शिक्षण हे पुढच्या जीवनाला आधार देणारे, बळ देणारे असावे ते बलहीन करणारे नसावे यासाठी काय करता येईल? हे आणि असंख्य विचार आमच्या डोक्यात पिंगा घालू लागले.

तिकडे आई-बाबांपाशी रिती होऊन माझी मुलगी झोपी गेली पण, तिचा तो पाव मार्काचा धडा आम्हाला मात्र खूप काही शिकवून गेला...

9 comments:

Mandar Joshi said...

एकदम मनाच्या आरपार गेली तुमची भावना... आणि तुमच्या लहानगी चिंगी ची सुद्धा !!!

Anonymous said...

A poor woman who earns money by doing heavy manual labour returns to work 4-5 days after a child is born. The mother cannot afford a longer break. The small baby may cry as much as it wants, but its education begins at the age of 5 days that the life is going to be tough, and that no help is going to be forthcoming until the mother returns home after 2-3 hours. These children grow up being less demanding. Is the current crop of young middle class Indians prepared to raise their children in this manner?

On the one hand, it is true that children cry with such intensity that it becomes difficult to face it. On the other hand, a 5 year old girl crying like crazy for a few hours is no big deal. Learn to live with it. Her plight could have been worse at an even younger age.

Right now, middle class Indians (aged between 20 and 60) have become super-sentimental. They cry easily. Nay, they go around looking for reasons to cry. Perversely this is a result of the sheltered life that they lead.

> शिक्षण हे पुढच्या जीवनाला आधार देणारे, बळ देणारे असावे ते बलहीन करणारे नसावे यासाठी काय करता येईल?
>---

Nobody can have a perfect life. You cannot expect schools to mollycoddle children all the time. Life is not all-sunshine all-the-time. Outshining your peers, getting outshone by them, crying, fighting, bitching are also aspects of the process of growing up.

By the way, the teacher is correct that the two maatraa-like symbols which make an au-kaar should start from the same point. She is doing her job if she points it out.

Anonymous said...

यात काही चुका झाल्या आहेत. त्या पुढीलप्रणाणेः
१)स्पर्धेच्या निर्माण झालेल्या भावाला आपण खतपाणी घातले.
२) शुद्धलेखनाचे नियम वाटेल व सोयीनुसार वाकविता येणार नाही याची जाणीव करूल देण्याचे काम शिक्षिकेचे आहे. ते तिने पार पाडल्याबद्दल तिला दोष देता येणार नाही.

अभिनय कुलकर्णी said...

मंदार आणि इतर अनामिकांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
अनामिक प्रथम यांच्या मते हे 'मध्यमवर्गीयांचे रडे' असल्याची एकूण भावना दिसते आहे. माझी मुलगी आणि तिच्या आयुष्यात घडणार्‍या घटना या तिच्यासाठी नक्कीच महत्त्वाच्या आहेत. उगाच त्या समस्यांचा गहिवर मी या लेखात आणला नाही. मी तिच्या मनावरचा ताण पाहिला नि लिहावसं वाटलं म्हणून हा लेख लिहिला. आता तिला झोपडपट्टीतील मुलांपेक्षा बरे रहाणीमान आहे आणि त्यात तिला जे दुःख भोगायला मिळते ते त्यांच्या (म्हणजे मजूर आई-बापाच्या तुलनेत) किरकोळ आहे, असा तर्कच लढवायचा असेल तर मग प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या आयुष्याच्या बाबतीत अशीच तुलना करावी लागेल. नि ती निरर्थक ठरेल.
अनामिक दोन- स्पर्धा वगैरे मी वैयक्तिकदृष्ट्या मानत नाही. मुलीला बुद्धी असेल तेवढी ती शिकेल इतकेच माझे म्हणणे आहे. बाकी काही नाही. तिच्या शिक्षिकेने तिच्या शुद्धलेखनाची चूक काढून तिला कमी मार्क दिले याचे मला दुःख नाही, फक्त हे सांगण्याची पद्दत बदलली असती तर बरे झाले असते. उदा. ती घरी आल्यानंतर जी रडली, त्याविषयी तिला शाळेतच शिक्षिकेने योग्य स्पष्टीकरण दिले असते तर तिला कदाचित वाईट वाटले नसते. किंवा तिला तिची चूक दाखवून मग ती तिच्यासमोरच दुरुस्त करून तेवढे मार्क्स दिले असते तरी चालले असते. त्याहीपेक्षा मार्क न देता अन्य काही पद्धतीने मुल्यमापन केले असते तर ते जास्त योग्य ठरले असते असे मला वाटते. अर्थात तरीही तुम्ही व्यक्त केलेल्या मताचा मी आदर राखतो.

Anonymous said...

> माझी मुलगी आणि तिच्या आयुष्यात घडणार्‍या घटना या तिच्यासाठी नक्कीच महत्त्वाच्या आहेत.
>----

एक लहान मुलगी शाळेत घडलेल्या गोष्टीबद्‌दल घरी रडते, ही रोज़ असंख्य घरांत घडणारी गोष्ट आहे. असल्या गोष्टींमुळे त्या मुलीच्या आयुष्यावर मोठा फरक पडण्याची किंवा त्यातून तिच्या स्वभावावर फार मोठा प्रकाश पडण्याची शक्यता खूप थोडी असते. शाळेत लोकमान्य टिळकांपेक्षाही बाणेदार असलेले त्यांचे वर्गमित्र असतील. ते विसरले गेले. उलट टिळकांच्या साधारण गोष्टींचाही पुढे उदो उदो झाला. कारण त्यांनी मोठेपणी पराक्रम केला. आणि मग हौशी मानसतज्ज्ञ (useless amateur psychoanalysts) टिळकांच्या प्रत्येक कथेत मोठेपणाची बीजे शोधू लागले. काही कथा घडल्याही नसतील.

सध्या एक एन डी टी व्ही ची संस्कृती फोफावली आहे. प्रणय रॉयची एखादी पोरगी एखादा विषय हाती घेते. प्रदूषण, वर्णसंघर्ष, भ्रष्टाचार, आत्महत्या. चर्चा करायला हरकत नाही. पण तासातल्या शेवटच्या दोन मिनिटांत ती अत्यंत गोंडस विधाने करून परिस्थितीवर उपाय मांडते. (माणसाने परोपकारी असावे, सहिष्णू असावे, रोज़ उठताच तोंड धुवावे, पक्ष्यांवर दया करावी, वगैरे.) लोक बावळटसारखे टाळ्या वाज़वतात. ज़णू तो प्रश्न सुटलाच. प्रश्न तसाच राहतो. अनेकदा तो ज़ास्त उग्र बनतो.

याचा अर्थ माझ्याज़वळ प्रश्नांची उत्तरे आहेत, असा नाही. पण मी निदान दोन मिनिटांचं सद्‌भावनेनी भरलेलं भाषण देणार नाही.

मुलीवर स्पर्धेचा ताण असेल तर काही हरकत नाही. पुढल्या आयुष्यात कमीज़ास्त होणारच याचं ते शिक्षण समज़ा. घरी पत्त्याचा प्रत्येक डाव मुलीला आई जिंकू देते. हा प्रकार बाहेर न झाल्यावर मुलं रडणारच. मुलीला पाव गुण कमी मिळाला, ती रडली, यांत इतरांशी चर्चा करण्यासारखं माझ्या मते काहीही नाही. आज़काल आत्महत्या करण्याची फॅशनच निघाली आहे. 'आत्महत्या केलेल्या त्या उमलत्या कळ्यांवरचा ताण' वगैरे ठीक आहे. पण शंभर वर्षांपूर्वी गरीबी ज़ास्त होती. अस्पृश्यता होती. तळागाळातल्या लोकांची अवस्था खूपच खराब होती. अगदीच थोडे अपवाद सोडल्यास कोणीही आत्महत्या करत नसे.

मज़ूर पक्षाचे माजी खासदार ब्रायन वॉल्डन (Brian Walden) यांनी अमली पदार्थांच्या सेवनावर लेख लिहिला होता. त्यात श्री वॉल्डन म्हणाले की या विषयावर अभ्यास ज़रूर व्हावा. पण त्यामागची कारणे कळली नाहीत तर ते मान्य करा. फालतू कारणं सांगून त्यांच्यावर योजना आणून त्यात लाखो रुपये, डॉलर्स, पाउंड्‌स उधळू नका. तो पैसा चोरट्यांच्या घशात काय तो जाईल.

थोडक्यात काय तर गोदीच्या पदराचा आणि लॅण्ड विंडस्‌चा ज़सा संबंध नाही तसा तुमच्या मुलीच्या रडण्याचा आणि सध्याच्या आत्महत्यांचा संबंध नाही.

Sharvani Khare - Pethe said...

लहान मुलांच वागणं खरच शिक्षणाचा विषय आहे.

Jr.kg च्या मुलांच्या पाठीवरच ओझ बघितल की वाईट वाटत.

nice blog.

निरंजन said...

अभिनय,
आपल्या मुलीच्या भावना तिच्या वयोमानाप्रमाणेच होत्या आणि आपली शिक्षकांबद्दलची अपेक्षा पण तितकीच रास्त होती. अनामिक क्रमांक १ चे उदाहरण मला तरी योग्य वाटले नाही. त्यांनी जे उदाहरण दिले तशा प्रकारात मुले बरेचदा निर्ढावलेली आणि संवेदना कमी असलेली बनतात असे मला तरी वाटते. पुढील आयुष्याच्या स्पर्धेसाठी मुलांना तयार करणे हे गरजेचे आहे. पण त्यासाठी त्यांनी फुकट शिक्षकांचा ओरडा / जाच सहन करावा हे काय बरोबर आहे?

मला एका गोष्टीची गम्मत वाटते, मध्यमवर्गाच्या मानसिकतेला नावं ठेवणारे हे वाचक स्वतः मात्र, typical मध्यमवर्गीय माणसासारखे लपून शरसंधान का बरं करत आहेत? आपले नाव जाहीर करून करावी न टीका! का आपला पितळ उघडे पडेल ह्याची भीती? असो! देव सर्वांना सद्द्बुद्धी देवो!

निरंजन
sukameva.wordpress.com

Unknown said...

25 julaichya loksattamadhe rajiv khandekar yancha abhinay kulkarni yanchyavarcha man visshnna karnara lekh vachala ani bhochak.blogspot.com ya sitevar janaychi echha zali. eka udayonmukh,harhunnari patrakaracha asa durdeivi ant manala chatka laun gela.Abhinayana bhavpurna shradhangali.

Unknown said...

Abhinay... तू असायला हवा होतास... हा लेख लिहिल्यानंतर इतक्या वर्षांनी तुझी पाव मार्कांमुळे रडणारी मुलगी सर्वार्थाने किती सक्षम झालीय हे तुला समजलं असतं. एकदम तुझी कॉपी. Anonymous ला समजून न समजून त्यांना काय? लोक फक्त सल्ले देतात. सक्षम बनवतात ते पालकांचे विचार आणि संस्कार ज्यासाठी तुझी बायको खंबीर आहे. -स्वप्निल