Showing posts with label गुदगुल्या. Show all posts
Showing posts with label गुदगुल्या. Show all posts

Tuesday, March 30, 2010

पुस्तकं 'खाण्याचं' खूळ !

पुस्तकांनी आयुष्य बदलून जातं असं थोर लोक म्हणतात. अस्मादिकांना हा अनुभव वयाच्या फार लवकर आला. कारण आयुष्याच्या या गाफील क्षणी पुस्तके हातात आली नि दुकानात बसून पिढीजात व्यवहार करण्याऐवजी अस्मादिक शब्दव्यवहारात गढून गेले. 'हे द्या ते द्या' या ग्राहकी आरोळ्यात आम्ही मात्र हातीमताई, विक्रम-वेताळ, गुलबकावली, ठकसेन यांच्या जगात वावरत होतो. वाचनानंदी लागलेली ही टाळी गिर्‍हाईकाच्या टाळीनेच भंग पावायची हा भाग अलाहिदा. शिवाय ग्राहकाने मागितले एक की द्यायचे भलतेच, पैशाच्या देण्याघेण्यात होणारी चूकभूल, वस्तुमापनात होणारा गोंधळ हा भाग तर नित्याचा. विद्याभाराने जड झालेले (नि व्यवहारीक काम न करणारे) डोके मग जन्मदात्याच्या जड हातांनीच एका फटक्यातच रिते व्हायचे. दुकानाच्या अलीकडे न उभे रहाता पलीकडेच कायम उभे रहायचे हा धडा घेतला तो त्याचवेळी. आयुष्य बदलाचा आलेला हा पहिल्या (वाचन)धारेचा अनुभव म्हणायला हरकत नाही.

आयुष्याची पाने फडफडत असताना एकीकडे पुस्तकाची पानेही फडफडत होतीच. कॉलेजात जाण्याच्या वाढत्या वयात तर त्याला मुळी घरबंध उरला नाही. आयुष्याला कोणत्याच एका रंगाने रंगवायचे नाही, हा धडा पुस्तकांनीच शिकवला. त्यामुळेच पिवळ्यापासून लालपर्यंत कोणत्याही रंगाची पुस्तके हातातून सुटली नाहीत. भगवे, लाल, निळे हिरवे असे सर्व रंगी साहित्य मनसोक्त वाचले. पण ही पुस्तके वाचूनही नजर कोणत्याच एका रंगाची झाली नाही.

खाणे हा वाचणे या शब्दाचा पर्यायवाची शब्द बनला. त्यामुळे पुस्तके ही 'खाल्ली' गेली नि त्यासोबत पोटातही भर पडतच होती. दोन्हीची गती सारखीच असल्यामुळे हा विद्येचा भार डोक्यावर दिसत नसला तरी पोटावर मात्र अंमळ दिसू लागला तो तेव्हापासून. शिवाय अंतिमतः डोक्यालाही तो भार सहन न होऊन केसांनी शरणागती पत्करली. 'डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा' असा प्रश्न त्याच काळात पडला नि चष्मा नावाचा नवीन अवयव आपल्या कान आणि नाक या दोन अवयवांवर बांडगूळासारखा नांदणार असे निदानही झाले. वाचनाने 'हार्डवेअर'मध्ये असा बदल घडवून आणल्यावर तोंडातल्या भाषेनेही सॉफ्टवेअरमध्ये राहिलेला बदल पूर्ण केला.

वाचन आता तोंडावर नाचायला लागलं नि पुस्तके तोंडात येऊन बोलू लागली. म्हणूनच एकदा ज्येष्ठ भगिनींबरोबर एका चित्रपटाला जाऊन आल्यानंतर त्याच्या स्तुतीपर 'छायाचित्रण छान होते नाही? आणि अभिनयही वाखाणण्याजोगा होता', या अस्मादिकांच्या स्तुतीसुमनांबरोबर एक जोरदार धपाटा पाठीत पडला आणि वर 'छापखान्याचे खिळे तोंडात बसविल्यासारखा पुस्तकी बोलू नकोस', असा 'गटणे' टोलाही भगिनीभावाने हाणला. लोक शिव्या घालतात तेव्हा त्यांच्यावर संस्कार नाही असे बोलले जाते, इथे वाचनसंस्कार बोलण्यातून येऊनही शेवटी आम्ही धपाट्याचेच धनी ठरलो. अर्थात, पुढील आयुष्यात असेच शाब्दिक धपाटे पाठीत बसत गेले नि त्याचीही सवय झाली.

वाचनाने शब्द जिभेपुढे आणून ठेवले नि त्यांना उच्चारण्याचा आगाऊपणाही देऊ केला. त्यामुळे आगीतून फुफाट्यात, उचलली जीभ लावली टाळ्याला, भोगा कर्माची फळे वगैरे वाक्प्रचारांचा नेमका अर्थ काय याचीही जाणीव झाली. एकदा कुठल्याशा धार्मिक कर्मकांडाप्रसंगी 'यात काही 'राम' नाही, असे वाक्य उच्चारले नि त्या समर्थनार्थ कुठल्याशा पुस्तकातला संदर्भ दिला. त्यावर जमलेल्या ज्येष्ठांनी एकमताने याला फार शिंगे फुटली आहेत, असे जाहिर करून टाकले. जिभेच्या या आगाऊपणापायी 'अतिशहाणा, दीडशहाणा, विद्वान, पंडित, साडेतीन शहाणे आदी विशेषणे जोडली गेली आहेत. बरं यातून पापक्षालनासाठी जिभेला आवर घातला की हा पहा 'माणूसघाणा', घुम्या आदी नवी विशेषणे न बोलता लागली गेली. या विशेषणांचे ध्वनी पाठमोर्‍या अवस्थेतच आजही अगदी विशेषत्वाने ऐकू येतात.

तिकडे घरच्यांनाही आपला तो बाब्या वाटण्याऐवजी 'कारटे' वाटावे ही या वाचनवेडाचीच परिणती म्हणावी. कारण कुठलेही काम सांगितल्यानंतर पुस्तकातून मान वर काढून ते होणार याची कोणतीही स्पष्ट ग्यॉरंटी त्यांना कधीच मिळाली नाही. शिवाय ते काम लादल्यानंतर त्याचे झालेले परिणामही 'एक गोष्ट सांगितली की भलतीच आणणे, यात व्हायला लागल्याने ते करणेही त्यांनी टाळले. अशा या मोकळीकीने आमचे वाचनाचे वारू बेफाम वेगाने दौडू लागले यात काय नवल. किमान पोरगा उगाचच उंडारत बसत नाही, वाचतच बसतो, यातच आमच्या मायबापाने समाधान शोधले. वाचनात मान खाली बसल्याच्या या सवयीमुळे अनेकांना अस्मादिकांची मानच तशी आहे की काय असा प्रश्न पडायचा, पण अतिताणामुळे डोळे वर करून पाहण्याच्या नादात नजर गुंतवून टाकणार्‍या कुण्या आकृतीत नजर अडकल्यावर त्यांचा हा समजही आपोआपच फोल ठरायचा.

'वाचेल तोच वाचेल' या उक्तीवर असलेल्या ठाम विश्वासापायी पुढे 'कलमी मनसबदारी' मिळाली. ही मनसबदारी निभावण्यापोटी अनेक रात्री जागवाव्या लागल्या. त्यातूनच रात्री 'वाचनाचे प्रयोग' सुरू झाले. मध्यरात्र ते कधी कधी पहाटेपर्यंत वाचन सुरू राहिल्याने या संबंध काळात सकाळचा सूर्य 'कसा दिसतो तो आननी' हे कधीच कळले नाही. परंतु,  दुपारच्या प्रकाशावरून सूर्य हा पीतरंगी आहे हा ठाम समज रूढ झाला. शिवाय तांबारलेले आणि सुजलेले डोळे घेऊन ऑफिसात जाऊ लागल्यामुळे 'जागत्या' पत्रकाराच्या जातीत नांदणारा अशी ओळख दृढ झाली आहे ती वेगळीच.

वाचनाने 'फुटलेल्या शिंगांनी' इतरांना अंगावर घेतले नि स्वतःलाही जखमी करवून घेतले. त्यातल्या काही तर सुगंधी जखमा होत्या. या जखमेवर फुंकर घालता घालता 'तिने लाजून हो म्हटले नि मनात गाणे नाचत सुटले' हा साक्षात अनुभवही आला. 'व्यसनी नवर्‍यापेक्षा 'वाचनी' नवरा केव्हाही चांगला, हा वाक्प्रचारही तिने त्याच भरात जन्माला घातला असावा. पण हे विधान करण्याची वेळ कोणती होती, याचा आजही ती शोध घेते आहे. कारण जळालेली दुधाची भांडी, करपलेल्या भाज्या, उतू गेलेला चहा, कुकरचे झाकण उडून छताला लागलेले अन्न या सार्‍या माझ्या वाचनानंदी लागलेल्या समाधीतून घडलेल्या बायप्रॉडक्टच्या जिवंत खाणाखुणा आजही घरात नांदत आहेत. शिवाय पुस्तके वाचता वाचता टळून गेलेली अनुक्रमे, फिरायला जाण्याची, शॉपिंगची, चित्रपटाची, कुठल्याशा कार्यक्रमाची नि हो तिच्या बहिणीच्या साखरपुड्याची वेळ याची भरपाई मी अजूनही करू शकलेलो नाही. त्यामुळे दर नव्या पुस्तकामागे यातली प्रत्येक वाक्य अदलाबदलीने वापरण्याची वेळ काही चुकत नाही. आता तर आईचीच मुलगी असलेल्या कन्येनेही हा धडा गिरवायला घेतला आहे. तिच्या कोणत्याही कामात मदत करण्याचे धुत्कारल्यानंतर 'बाबा वाचत बसलाय' हे एकच ब्लॅकमेलिंगचे वाक्य फेकून ती मला काहीही करायला भाग पाडू शकते. कारण ती मदत अव्हेरल्यानंतर घरात किती प्रकारचे आवाज ऐकू येऊ शकतात, याची कल्पना नुसत्या वाचनातून येणार नाही. तो अनुभवाचा भाग आहे.

समृद्ध झालेल्या वाचनाने या सगळ्या अनुभवाकडे पाहण्याचा विशिष्ट डोळा दिला आहे. कुठल्याही घटनेकडे त्रयस्थपणे पाहण्याची नवी दृष्टी विकसित झाली आहे. पण त्याचवेळी लौकीकापलीकडे जाऊन सहवेदना अनुभवण्याची संवेदनशीलताही दिली आहे. म्हणूनच या सांसारीक अनुभवानंतरही अस्मादिकांचे वाचन काही सुटलेले नाही. रात्री अंथरूणात पडल्या पडल्या, बाथरूमात विधी करत असताना, बसमध्ये प्रवास करत असताना किंवा कुठे फिरायला गेल्यानंतर हळूचकन पुस्तक बाहेर निघते नि शब्दांचे ते अद्भुत विश्व माझ्यापुढे उभे ठाकते. आजूबाजूचे विश्व हरपून टाकण्याचे 'भान' ती पुस्तकेच मला देतात. फक्त 'बाबा पुस्तक वाचतोय' या तेवढ्या हाकेकडे माझी नजर असते, बस्स!

साहित्य संमेलनानिमित्त लोकमतच्या मैत्र व ऑक्सिजन या पुरवण्यात हा लेख पूर्वप्रकाशित झाला आहे. छायाचित्रही त्याच पुरवणीतून साभार.  

Friday, March 26, 2010

सावध ऐका (मागल्या) हाका!

पदार्थाची चव लिहून सांगता येत नाही, तो अनुभवाचा भाग आहे, तद्वतः इंदूरी हाकांचे विश्व हा खास अनुभवाचाच भाग आहे. आता लेखाची सुरवातच खाद्यपदार्थाच्या शब्दाने व्हावी हा खास इंदुरी असल्याचा अपरिहार्य नि अटळ परिणाम आहे. पण तो अट्टल खवय्या असल्याची साक्षही आहे. इंदुरात आल्यावरही इथल्या हाकांमध्ये भिजले नाहीत नि त्या हाका तुमच्या जिभेत भिजल्या नाहीत, तर तुम्ही 'इंदौरकर' कधीच होऊ शकणार नाही. इथल्या भय्याचा उच्चार तुम्ही कोणत्या वेळी, कोणासमोर नि कसा करता यावरही तुम्ही इंदौरी आहात की नाही हे ठरते. सबब, यापुढे कधीही इंदूरला आल्यास हा दिलेला गृहपाठ केल्याशिवाय येऊ नये असा खास सल्ला दिल्याशिवाय रहावत नाही.

आता हेच पहा ना. एरवी भाऊ असा सरळ सोपा नि साधा अर्थ असलेल्या भय्या या हिंदीभाषक शब्दाचे 'नवनिर्माण' झाल्याचे आपण पहातो आहोतच. भय्या या संबोधनात 'बिहार' नि 'उत्तर प्रदेश'च सामावल्याचे दिसते. पण मध्य देशी आल्यानंतर मात्र भय्यात किती विश्व सामावले आहे, याचा अंदाज येतो.

एरवी आपल्याकडे अपरिचित, अल्पपरिचित मंडळींना हाक मारण्यासाठी काका, मामा, दादा, भाऊ, अप्पा, अण्णा, ताई, काकू, मावशी, मामी या शब्दांची रास आहे. अगदीच गेला बाजार 'अहो, शूक शूक तुम्ही तुम्ही' यानेही काम भागते. पण भय्यासारखा सर्वव्यापी शब्द मात्र आपल्याकडे नाही. दादा, भाऊमध्ये ती सर नाही. याउलट भय्यांत किती छटा लपल्यात म्हणून सांगू? नुसती हाक म्हणून, आदर म्हणून, नातं आड आलं म्हणून, नातं आड यावं म्हणून, नुसता 'आड' आला म्हणून हा शब्द बाहेर पडतोच. पण राग-चीड-द्वेष- हिणविणे या आणि अशा अनेक भावनांत बुडूनही हा शब्द तोंडातून 'फुटतो'. पण या शब्दांतल्या भावनांचा अदमास त्याचे उच्चारण समजून कळल्याशिवाय तुम्ही इंदौरात रूळलात असे म्हणताच येणार नाही, महाराजा.

आता तुम्ही इथल्या कुठल्याही चांगल्या-चुंगल्या दुकानात खरेदीला गेलात तर हाच शब्द 'भय्या, जरा वो कपडा दे ना'. म्हणून सोज्वळ रूप धारण करतो. रस्त्यावरच्या पोहेवाल्याकडे, पाणीपुरीच्या ठेलेवाल्याकडे, गल्लीत आलेल्या तरकारीवाल्याकडे नि पानटपरीत राजेशाही थाटात बसलेल्या पानवाल्याकडे हाच शब्द विठ्ठलाला 'विठू' म्हणावे अशा लयदार पद्धतीने 'भिया' असा प्रेमळ होतो. इथल्या ब्ल्यू लाईन बसमध्ये बसून कुठे चालले असलात की त्यातला 'भय्याही' प्रेमळ असतो. पण बस 'नगरसेवा' (खासगी वाहतुकदाराची) असेल तर मग त्यातल्या तिकीटफाडू पंटरच्या तोंडून आपला उच्चार 'भियाव, जरा खिसको ना' असा भ्यावणारा झाल्यास भिऊन जायचे कारण नाही. ही इंदूरी त्र्यागाची 'भियाव' आवृत्ती असते. पण ती इतक्यावरच थांबत नाही. भर ट्रॅफीकमध्ये कुणी धडक मारल्यानंतर झालेल्या भांडणातही हा 'भिया'च कामी येतो. 'भिया, गाडी चला रिया या क्या कर रिया था? या वाक्यासरशी दोन भियातले भांडण पुढे कितीही काळ रंगू शकते. रस्त्यात चालता-चालता किंवा चालवता चालवता तुमचा 'ओ भिया हटो ना' असा उद्धार झाल्याशिवाय तुम्ही इंदुरात असल्याचा फिल अजिबात येणार नाही. शब्द साधा 'भिया' असला तरी त्याच्या उच्चारणाची न्यारी ढब तो 'फिल' नक्कीच देईल.

नात्या-गोत्यातही भय्या असतोच. पण अनेकदा नाती निर्माण करताना तो गोत्यातही आणतो. समवयस्क मुलाला हाक मारताना नाव घेऊन पुढे भय्या लावण्याची ही प्रथा अनेक पोरीबाळींसाठी सोयीची ठरत असली तरी त्या 'भय्या'चा मात्र 'वडा' होतो. पण वय वाढल्याचं अनुक्रमे तुमचे डोईवरचे केस 'दिसत नसल्यासारखे' झाल्यास वा ते पांढर्‍या रंगाला पर्याय ठरल्याचे वाटताक्षणी तुम्ही 'भाईसाब' म्हणून 'कन्व्हर्ट' होता ते तुमचं तुम्हालाही कधी कळत नाही. भाई या खास हिंदी शब्दाची मुंबई आवृत्ती इथे वापरात नाही, पण त्याचा मूळ अर्थ पकडूनही हा शब्द केवळ नातेनिदर्शक एवढाच उरला आहे. गेला बाजार अगदीच सार्वजनिक कार्यक्रमात आदरार्थी उच्चार म्हणून 'भाई प्रवीणजी', 'भाई दिलीपजी' असे ऐकायला येते. पण तो शब्द जपून ठेवायचा म्हणूनच. बाकी काही नाही.

समवयस्क विवाहित महिला आपल्याकडे वहिनी असतात, इकडे त्यांचे कन्वर्जन 'भाभी' किंवा 'भाभीजीं' मध्ये होत असले तरी त्याहीपेक्षा 'बेहेनजी' ही खास इथली साद ऐकण्यासारखी असते. बायकांचे कपडे विकणार्‍या दुकानात याचा वापर बराच होतो. पण त्यातही गिर्‍हाईक गटवायचे या भावनेने पेटलेला दुकानदार 'दिदी दिदी' म्हणूनही रूंजी घालत बसतो. पण हल्ली त्याही पलीकडे 'मेडम' हा शब्द रूळलाय. विशेषतः सहकारी किंवा अनोळखी महिलांसाठी. सायकलवरून जाणाराही समोर स्कूटी घेऊन जाणार्‍या महिलेला 'मेडम, जरा हटो', किंवा गाडी ठोकल्यास, 'ओ मेडम केसे गाडी चला रही हो', म्हणून पुकारा करेल. काही ठिकाणी या 'मेडम'च्या पुढे 'जी' जोडून भिजलेला आदर दर्शवला जाईल. लिखित भाषेत ही मेडम 'मैडम' अशी अंमळ वाकल्यासारखी दिसते.

आपल्याकडचे 'काका-काकू' इकडे 'अंकल-आंटी' म्हणून उरलेत. त्यामुळे थोड्या मोठ्या पुरूषांना अंकल नि बायकांना आंटी असा सर्रास उच्चार आहे. त्यामुळेच की काय कुणीही 'सोळावं वरिस' ओलांडलेली कन्या अस्मादिकांच्या माथ्यापर्यंत रूंदावलेल्या विस्तीर्ण भालप्रदेशाकडे पाहून 'अंकल' म्हणते तेव्हा तोपर्यंत अभिमानाने उंचावलेले मोजके चार केसही मान टाकतात. पण कधी तरी वाहतुकीच्या भर गर्दीत कॉलेज कन्यकांचा अडसर होत असला की 'आंटी, बाजू हटो' म्हणून कधीचा तरी सूड कुठे तरी नि केव्हा तरी अखेर उगविण्याची संधी मिळते. उगाचच 'आंटी' संबोधून समोरचीच्या चेहर्‍यावरचे बदलते भाव पाहून, त्याला अजिबात भाव न देण्याइतकी इंदौरची नवी पिढी सोकावलीय. पण तरीही 'आंटी मत कहो ना, असा लाडीक स्वर सहसा कुठे ऐकल्याचे आठवत नाही. एकुणात सध्या या अंकल नि आंटीचा आख्ख्या इंदौरमध्ये उच्छाद आहे.

दुकानदारी भाषेतले काही शब्दही खास आहेत. आपला माणूस इथे 'अपना आदमी' होतो, पण त्याहीपेक्षा 'अपना बंदा आएगा, सम्हलके लेना' हा उल्लेख खास इथला आहे. हा 'बंदा रूपया' इथल्या व्यावसायिक कट्ट्यावर टण्णकन आवाजानिशी आदळला नाही, तरच नवल. मग त्याच धरतीवर कधी कधी 'मुलींचा' उल्लेखही चक्क 'बंदी' असाही होऊन जातो. एखाद्या 'चाय'च्या 'गुमटी'वर गेल्यास तिथल्या 'पिंट्या'ला 'बालक' होतो. 'ए बालक, इधर आ' अशी हाक आपसूक निघून जाते.

आणि हो, इकडे आलात तर महाराष्ट्रातली मराठी शब्दांचे हिंदी भाषांतर करून बोलण्याची सवय सोडून दिलेलीच बरी. एरवी मराठी धाटणीचेच भाषांतरीत हिंदी रेटून नेऊन बोलण्याच्या मराठी सवयीला असाच योगायोगाने चाप बसला. आमचा एक मित्र खरेदीसाठी कपडा बाजारात गेला. खरेदी करता करता त्याने 'काका' या मराठी शब्दाचं भाषांतर करून 'चाचा, कुछ किमत कम करो' असं फर्मान सोडलं. झालं. समोरच्या दुकानदाराचं टाळकं सणकलं. चाचा? संतापून तो म्हणाला? मै क्या चाचा दिखता हूँ' इकडे मित्र गार. त्याला कळेचना. हा का चिडला ते? दुकानदाराचा संताप गळणे सुरूच, ' आपने दुकान नहीं देखी? महावीरजी का फोटो नही देखा? बाकी सारे जैन मुनियोंके फोटो नहीं देखें' तरीही मित्राचा डोक्यात काही शिरेचना. त्याने विचारलेच, लेकिन मैने गलत क्या कहा? तोपर्यंत त्या दुकानदाराला अंदाज आलेला की 'बेणं' बाहेरचं दिसतंय. तो म्हणाला, भाईसाब, यहॉं चाचा मतलब मुसलमान आदमी को बोलते है. मै जैन हूँ. समझे? मित्राच्या ज्ञानात भर पडली. शिवाय नको तिथे संबोधनांचे भाषांतर करणे टाळा हा धडा मिळाला.

हे झाले हिंदी बांधवांचे. आपल्या मराठमोळ्या मंडळींही 'सावध ऐका पुढल्या हाका' अशीच आहेत. इथल्या मराठी बांधवांची हिंदीवगुंठीत मराठी नात्यांची संबोधने जणू सराफ्यातल्या रसोत्पादीत जिलेबीचा थाट घेऊन तोंडातून टपकतात. आणि मग 'काका, मावशी के लिए मेसेज है', काकू आपको आईने हल्दीकुंकू के लिए बुलाया है'. 'मामा, तुम मामी को लेकर आओ, मैं आजी के साथ हूँ ही हिंदीच्या पुडीतली मराठी संबोधने ऐकायलाही मजा येते.

आताशा ही संबोधने आमच्याही 'कानवळणी' पडलीत. या संबोधनातली वळणेही आता जाणवू लागली आहेत नि त्याला प्रत्त्युतर करण्याची भाषाही आडवळणाने का होईना समजू लागली आहे. म्हणूनच रस्त्यावर सवयीप्रमाणे मध्येच गाडी घालून रस्ता तयार करण्याची खास इंदौरी प्रथा पाळणारा गाडीस्वार आला, की 'ए भिया, गाडी चला रिया, या हवाई ज्यहाज', अशी इंदौरी भाषा तोंडातून बाहेर पडल्याशिवाय चैन पडत नाही.

आमच्या इंदौरी झाल्याचा आणखी काय पुरावा द्यायला हवा काय? चला भय्या, थांबतो आता, सराफ्यात जाईन म्हणतो.

Sunday, September 20, 2009

भाषा इंदूरी


इंदूरची भाषा खास इंदूरी आहे. म्हणजे आहे ती हिंदीच पण तिच्यातही बरेच प्रादेशिक रंगही मिसळेले आहेत. त्यामुळे इथली हिंदी उत्तरेतल्या हिंदीपेक्षा काहीशी वेगळी वाटणारी आहे. म्हणजे कहॉं से आ रहे हो, कहॉं जा रहे हो हे हिंदी रूप इंदूरमध्ये आल्यानंतर मात्र कहॉंसे आ रीया, कहॉं से जा रीया होतं. इथला सामान्य माणूस याच भाषेत बोलतो. हे ऐकताना आपल्याला वेगळं वाटत असलं तरी त्यांना काहीही वाटत नाही. हिंदी भाषक दुसर्‍या प्रदेशातून आलेल्यांनाही इथलं हिंदी विचित्र वाटतं. कुणीही बोलत असलं की आपण हो किंवा होय असं म्हणतो. इथं 'हाऊ' असं म्हणण्याची प्रथा आहे. स्त्री असो की पुरूष सगळे असंच बोलतात. इथे आल्यानंतर तुम्हाला उद्देशून 'भीय्या' म्हटलं तर 'भ्याव' वाटू देऊ नका. हा भय्या या शब्दाचा इथला खास इंदुरी उच्चार आहे. तेच भौत भूख लगी है असे कुणी म्हटल्यानंतर भूत पाहिल्यासारखे दचकू नका. बहूतला दिलेला हा भौत टच इंदुरी आहे.

इंदुरमध्ये पोहे 'भयानक' फेमस आहेत. आपल्याकडे जसा मिसळपाव यत्र तत्र सर्वत्र मिळतो, तसे इथे पोह्यांचे आहे. हे पोहे मागताना 'एक पोहा देना' असं म्हणावं. आपल्याला कंटाळा येतो तसा इथल्या लोकांना 'कंटाला' येतो. माळवी आणि निमाडी बोलीचाही इंदूरच्या बोलीवर प्रभाव आहे. निमाड हा भाग इंदूरला लागून असलेला त्यामुळे या भाषेचा इथे प्रभाव, तर इंदूर माळव्यातच मोडत असल्याने ती तर इथली स्थानिक भाषा. या सगळ्या मिश्रणाने इथल्या बोलीला एक खास 'टेस्ट' आहे. तुम्हाला शेजारी बसायला जागा पाहिजे असेल तर 'जगो' है क्या असे विचारले गेले तर चमकून पाहू नका. जगहचा 'जगो' हा खास निमाडी बाज आहे.

इथल्या हिंदीची जशी वेगळी चव तशीच मराठीचीही आहे. माळव्यातील मराठी बोली भन्नाट आहे. येथील लोकांच्या मराठी बोलण्यात हिंदी शब्द येणं ही 'आम' बात आहे. येथे लोक छान किंवा मजेत नसतात, तर 'बढिया' असतात. इंदूरमध्ये मराठी भागात पत्ता शोधत असताना 'थोडं पुढे जाऊन डावीकडे 'मुडा' असं ऐकू आलं नाही तर आश्चर्य वाटू देऊ नका. एकारान्ती क्रियापदांची इंदूरी आवृत्ती खाशी आहे. म्हणजे जाईल्ले, करील्ल्ये खाईल्ल्ये, अशी क्रियापदे नीट लक्ष देऊन ऐकली तर ऐकू येतात. जाशील ना, करशील ना या प्रकारच्या अंत्य शब्दांचा वळणदार पण छान वाटणारा उच्चारही येथील लोक करतात. इथल्या मराठी बोलीने हिंदी ताल धरला आहे. म्हणजे नहीं करेंगेच्या तालावर 'नाही करणार' असं म्हटलं जातं. असंच नाही आहेचं, आहे नाही होतं. वास्तविक हे इथे लिहिण्यापेक्षा ते ऐकण्यात मजा आहे.

आणखी एक बाब. इथल्या मराठी घरातील नाती मराठीच आहेत. त्याचे हिंदीकरण वा आंग्लीकरण झालेले मला तरी दिसले नाही. त्यामुळे पप्पा, मम्मी, डॅडीऐवजी शुद्ध, आई, बाबा, काका, काकू, मामा, मामी हेच शब्द येथे वापरात आहेत.


या मराठीला मुंबई, पुण्याचे लोक धेडगुजरी असं म्हणतात. पण ते चुकीचं आहे. इथल्या मराठीवर हिंदीचा प्रभाव अपरिहार्य आहे. उलट माझ्या मते अनेक मराठी कुटुंबाच्या पिढ्या येथे जाऊनही ती मराठी बोलतात, हे विशेष आहे. हिंदीच्या आधाराने का होईना पण मराठी टिकून आहे. इथले मराठी लोक साहित्यातही पुष्कळ आहे. त्यांच्या मराठी लेखनातही हिंदी शब्द असतात. मला त्याचेही कौतुक वाटते. भाषकदृष्ट्या आपल्याला ती चुक दिसेल. पण माझ्या मते हे लोक मराठीत साहित्य निर्मिती करतात हे जास्त महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रात मराठी विविध पदरी असताना इंदूरमध्ये ती वेगळे रूप घेऊन जिवंत आहे. त्यामुळे तिची उपेक्षा करण्यापेक्षा तिला बोलीचा दर्जा दिला तर ते जास्त योग्य ठरेल.

माय, मावशी नि माझी लेक!


जैसी हरळामाजी रत्नकिळा
की रत्नांमजी हिरा निळा
तैसी भाषांमाजी चोखळा
भाषा मराठी
फादर स्टिफन्स या पोर्तुगीज माणसाने लिहिलेले मराठी भाषेचे वर्णन वाचून छाती अभिमानाने फुगली. तोच आमची साडेतीन वर्षाची लेक आली. तिच्या हातात बाहूली होती. तिला तिचे कपडे बदलायचे होते. तिने 'ऑर्डर' सोडली, बाबा, मला जरा बाहूलीचे कपडे 'निकलून' द्या ना ! क्षण दोन क्षण काय बोलली ते कळलंच नाही. मग मेंदूपर्यंत झण्णकन गेल्यासारखं काही तरी झालं. 'कपडे निकालके दे ना' या हिंदी वाक्यातल्या 'निकलके'चा लचका तोडून तिने मराठी वाक्याला जोडून माझ्यासमोर आदळला होता. तिला हवं ते करून देत मी निमूटपणे 'भाषांमाजी साजिरी
मराठिया' च्या हिंदी अवतारावर विचार करत बसलो.

सव्वादोन वर्षाच्या इंदूरी वास्तव्यात आमच्यापेक्षा आमच्या कन्येने मराठीच्या या मावशीला आमच्यापेक्षा जास्त आपलेसे केल्याचे लक्षात आले. सुरवातीला आम्ही महाराष्ट्रातून आलेलो, म्हणजे आमचे मराठी म्हणजे 'नेटिवां'पेक्षा खासच अशी एक उगाचच मिजास स्वभावात होती. कन्येने ती मिजास उतरवून टाकण्याचा पार विडाच उचलला. याची खरी सुरवात झाली ती शाळेत जायला लागल्यावर. तिने हिंदी चांगले बोलावे ही आमची अपेक्षा होतीच, पण मराठीत हिंदी शब्द यायला नको असं आम्हाला आपलं वाटायचं. (इंदुरी मुलांसारखं आपली मुलगी 'हिंमराठी' बोलायला नको अशी खाज उगाचच मनात असावी!) तिच्या आधीच्या नर्सरीत मराठी भाषक लहान मुले होती. पण प्रामुख्याने बोलणे हिंदीतच व्हायचे. मग हेच हिंदी शब्द तिच्या मराठीच्या हद्दीत येऊन घुसखोरी करायला लागले. सुरवातीला भातात खडे लागल्यासारखे लागायचे, पण आता या भाताचीही आम्हाला सवय झालीय. व्हॅनवाल्या 'शंकरभय्या'पासून ते शाळेतल्या 'मॅम'पर्यंत आणि सगळ्या फ्रेंडसोबत आमची कन्यका हिंदीत सराईत संवाद साधते.

त्यांच्याशी बोलताना हिंदी छान बोलणारी आमची कन्या आता आमच्याशीही हिंदाळलेल्या मराठीत बोलायला लागलीय. 'बाबा चिल्लाऊ नकोस' असं एकदा माझ्यावर ओरडल्यानंतर मी गप्प. काय बोलणार? ती शाळेत जाण्यासाठी 'तैय्यार' होते. डिस्नेवरच्या आर्ट एटॅकसारखं ती काही तरी फरशीवर करते नि म्हणते 'बाबा बघ, मी कसं 'शेहर' बनवलं.' 'आई, मला गोदीत घे ना' असं म्हटल्यावर तिच्या आईलाही आपल्याला धरणीने गिळंकृत करावंसं वाटतं. ती आमच्याशी चर्चा नाही 'गोष्टी' करते. मैत्रिणींशी 'बातें' करते. लपाछपीत ती 'छुपून' बसते. तिला 'गर्मी' होऊन 'पसीना' येतो. 'चिडियाघर'मध्ये गेल्यानंतर 'शेर' तिला 'डरावना' वाटतो. 'बंदर' पाहून मजा वाटते. भिंतीवर 'चिपकली' असते. ती शाळेत नाही, 'स्कूल'मध्ये जाते. तिला 'पढायचं' असतं.

या घुसखोरीपर्यंतही ठीक आहे, पण मराठी शब्दांनाही ती हिंदीचा आधार देऊ लागलीय. हिंदीत प्रत्येक शब्द वेगळा असतो, तिथे प्रत्यय नावाची भानगड नाहीये. त्यामुळे कन्येनेही तिच्या मराठी बोलण्यातले बरेचसे प्रत्यय उडवून लावलेत. ती गाय'ला' पोळी घालते, गायीला नाही. 'चोर'ला पकडायला पाहिजे, असं ती म्हणते. हा 'वाला' तो 'वाला' असं म्हणणारी माझी लेक 'लालवाला स्कर्ट पेहनायचाय' असं सहज म्हणून जाते.

खरी गंमत तिचा अभ्यास घेताना होते. तिला गोष्ट तीन भाषांमध्ये सांगावी लागते. मराठी भाषांत शिकलेल्या आम्हाला तिला गोष्ट सांगताना भयंकर शाब्दिक फरफट करावी लागते. ती जाते, इंग्रजी माध्यमात. पण तिथे 'मॅम' समजावून सांगतात, ते हिंदीत. आणि आम्ही घरी बोलतो मराठीत. पण गोष्ट सांगताना तिच्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आम्हाला आमच्या तोडक्यामोडक्या हिंदीचाच आधार घ्यावा लागतो. अनेक शब्द आठवावे लागतात. मराठीला पर्यायी हिंदी शब्दांचा पाठलाग करून त्यांना पकडावे लागते. कोल्हा म्हणजे की 'भेडिया' चमकादड म्हणजे वटवाघूळ, उल्लू म्हणजे घुबड हे लक्षात ठेवावं लागतं. तिला गोष्टीही खरगोश-कछुवा, चुहा- बिल्ली यांची सांगावी लागते.

तिच्या अभ्यासात येणार्‍या शब्दांकडेही नीट लक्ष द्यावं लागतं, नाही तर आमचीच एखाद्या गाफिल क्षणी विकेट उडण्याची शक्यता असते. आम्ही अ अननसाचा शिकलो होतो. आ आईचा होता. पण तिच्या शाळेत अ अनारचा, आ 'आम'चा इ इमलीचा आणि ई 'ईख'चा( उस) असतो. तिची बाराखडीचीही गाणी आहेत. 'अम्मा आई आम लायी..' हे सुरवातीच्या शाळेतलं गाणं आता आणखी वेगळं झालंय. 'अ अनार का मीठा दान आ आम को चूसके खाना' असं झालंय. 'एडी ढोलो ऐनक ले लो, ओखली में मूसल कांड, औरत ने फिर पकडा कान' यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आधी आम्हाला समजून घेऊन तिला सांगायला लागलाय. आमच्या लहानपणीची गाणी तिला आम्ही शिकवलीय, पण ज्या गाण्यांचा पगडा तिच्यावर बसलाय अर्थातच ती हिंदी आहेत. कारण ती शाळेत घोकून घेतली जातात. 'खबडक खबडक घोडोबा घोड्यावर बसले लाडोबा' म्हणणारी माझी कन्या आता 'लकडी की काठी काठी पे घोडा' सहजपणे म्हणून जाते. मराठीतून पोहणारी आमची मासोळी तिच्या तोंडी 'मछली जल की रानी है. जीवन उसका पानी है' अशी झालीय. 'कोरा कागद निळी शाई' म्हणणार्‍या आम्हा आई-बापांची ही लेक खेळातही हिंदी गाण्यांवर 'झुमते'. 'अटकन मटकन दही चटाकन, राजा गया दिल्ली, दिल्ली से लाया बिल्ली, बिल्ली गई लंडन' 'ओ मीनो सुपर सीनो, कच्चा धागा रेस लगाओ' ही सध्या तिची खेळातली गाणी.

एका अरूंद पुलावर दोन बकरे आले आणि भांडता भांडता दोघांनी पलीकडे जाण्याचा उपाय शोधला ही गोष्ट ' एक सकरे पुलपर दो बकरे' अशी हिंदीत आहे. कन्या सांगत असतानाच त्याचा अर्थ कळला, पण दहावीपर्यंत हिंदी विषय असूनही 'सकरे' म्हणजे अरूंद हे समजायला मुलगी हिंदी माध्यमाच्या शाळेत जावी लागली.

तिच्या हिंदीतले शब्दच फक्त मराठीत घुसखोरी करतात असं नाही. तर हिंदीची वाक्यरचना तिच्या मराठीत डोकावते. म्हणूनच जाईल्ले, करील्ले, खाईल्ले हे उच्चारही तिने नकळत आत्मसात केले आहेत. शिवाय 'गडबड होऊन जाईल, 'गोष्टी करून घे' 'मी तर तैय्यार झाले', अशी हिंदीच्या चालीवरची मराठी वाक्येही ती बोलून जाते.

पण आता या सगळ्याची आम्हाला सवय झालीय. मराठीचा आग्रह आम्ही सोडलाय. तिला मराठी यायला हवं हे नक्की. पण आम्ही जसं बोलतो तसं ती कसं बोलेल? दोघांची बालपणं वेगळ्या वातावरणात गेली. त्यातला फरक असा मिटवता येणार नाही याचीही कल्पना आलीय. एक मात्र नक्की तिचं हिंदी उच्चारणही अगदी इकडच्यासारखं टिपीकल होतंय. आमची मात्र हिंदीची झटापट अजूनही सुरूच आहे. हिंदी बोलताना येणारा मराठी लहेजा लपवू म्हणता लपत नाही. आणि मुलगी मात्र मावशीच्या कडेवर बसून जगाच्या खिडकीबाहेर नजर टाकतेय.

बदलाबदली!

बदल हा माणसाचा स्थायीभाव आहे. बदलतो तो माणूस. बदलला म्हणून माणूस इथवर पोहोचला. असली बदलाबदलीची वाक्ये ऐकून, वाचून कान आता किटले नि डोळे विटले आहेत. अस्मादिक 'ठेविले अनंते तैसेचि रहावे' या तुकारामी प्रवृत्तीचे. त्यामुळे बदलाचं वारं काही झेपत नाही. मग तो बदल वैयक्तिक असो की सार्वजनिक. वैयक्तिक बाबतीत लिहायचं तर, अगदी हाफिसमधली जागा असो, खुर्ची असो, कम्प्युटर असो की आणखी काही. यातलं काही काही बदललेलं चालत नाही. मालकाने पैसे मोजून ठेवून घेतलं असलं तरी या 'ठेविले अनंते' वृत्तीचा माज मात्र त्याला सहन करावाच लागतो. कारण माझ्याकडून होणार्‍या कामातूनच त्याला 'चित्ती समाधान' लाभत असतं. पण हाफिसातली ही मिजास सगळीकडे चालत नाही. असो.

...तर नमनाला घडाभर तेल घालण्याचं कारण काय ते पहिल्याछूट सांगतो. पण त्यासाठीही आणखी थोडं तेल सांडावंच लागेल.

तर सांगायचा मुद्दा असा की तुम्ही घरात गेलात आणि भिंतीवरचे घड्याळ अचानकपणे दुसर्‍या भिंतीवर पाहुणे म्हणून गेले की त्या दिवशी हमखास मान भूमितीत शिकलेल्या सगळ्या कोनात फिरते की नाही? नाष्ट्याला पोहे देऊन सौभाग्यवती अंघोळीला निघून जातात नि चमचा द्यायाच विसरतात. मग खाण्यासाठी खुणावत असलेल्या पोह्यांसाठी चमचा शोधण्याची शर्यत सुरू होते. नेहमीच्या जागेवर हात घालूनही तो सापडत नाही, पण त्या गाफिल क्षणी संधी साधून तिथे ठेवलेली किसणी हमखास टोचते की नाही? घाईघाईत कपाटात मोजे घालण्याच्या कप्प्यात हात घातला जातो नि तिथे पुजेसाठी ठेवलेल्या टोप्या सापडतात की नाही? अंघोळीला जाण्यासाठी बाथरूममध्ये शिरणार तोच टॉवेल घ्यायचं लक्षात येतं. नि टॉवेलच्या जागेवर हात जातो नि तिथे हातरूमाल सापडतात. हे सारं तुमच्याही आयुष्यात नक्कीच घडत असेल. माझ्याही घडतं. पण माझ्याकडे तुमच्यापेक्षा एक टक्का तरी नक्कीच जास्त घडतं. पण ही टक्केवारी नेमकी किती हे बरीक आता तुम्हीच ठरवा.

तसं आमचं स्वतःचं 'अंग' कोणत्याही बदलाला दाद न देणारं. कारण बदल म्हटला की हालचाल आली. हालचालीसाठी चापल्य हवे ते आमच्या शरीराला नि स्वभावाला शोभत नि सोसवतही नाही. पण आमचं 'अर्धांग' मात्र प्रचंड चपळ. बदबदलीच्या या खेळात प्रचंड तरबेज. चापल्य हा मुल स्वभाव असल्याने इथून तिथे, तिथून इथे हा स्वस्वभाव वस्तूंमध्येही उतरविण्यात तिचा हात मीही (चापल्याअभावी!) धरू शकलेलो नाही. म्हणूनच आमच्या घरात कोणतीही गोष्ट ३६५ काय दिवसभरात एका ठिकाणी राहिल तर शपथ.

म्हणूनच, स्थलांतर, स्थानांतर, निर्वासित, विस्थापित, स्थानभ्रष्ट या शब्दांचा खरा अर्थ लग्न झाल्यानंतरच कळला. कारण हाफिसातून परत येईपर्यंत आमच्या घरातल्या अनेक वस्तूंनी आपली जागा सोडलेली असते. भिंतीला टेकून असलेलं टेबल अवचितपणे दुसर्‍याच कुठल्या भिंतीशी गुलुगुलू बोलू लागतं. दरवाजालगतचा टिव्ही अगदी विरूद्ध दिशेला कुठल्याशा भिंतीच्या आधाराने टेकवला जातो. दिवाणखान्यातल्या भिंती सजवत असणारी चित्रे अचानक तिथून गायब होतात नि भलत्याच भिंतीची शोभा वाढवतात. कुठल्याश्या टेबलाखालची पुस्तके बैठकीच्या खालच्या जागी विराजमान होतात. नि बैठकी खालच्या वस्तू टिव्ही खालच्या कपाटात विस्थापित होतात. संध्याकाळी घरी आल्यानंतर आपण आपल्याच घरात शिरतोय की दुसर्‍याच्या असा प्रश्न पडावा इतकं घराचं रूपडं बदललेलं असतं.

कपाटातले माझे कपडे जागा सोडून भलत्याच कप्प्यात घुसतात. कम्प्युटरखाली सीडी ठेवलेल्या खणात अनेकदा सुईदोरा नि लेकीची खेळणी सापडतात. कपाटातले कपडे भिंतीतल्या कपाटात कोबंले जातात नि इतर वस्तू कपाटात शिरतात. कपबशींची कोणीही वटवट न करता जागा बदलून त्याच मांडणीत जाऊन टेकतात. चमचे, पेले ताटल्या, वाट्या कोणतीही किणकिण न करता गुमान जिथे जातील तिथे सुखी रहायचा प्रयत्न करतात. पाण्याची पंचपात्री खळखळ न करता ओट्यावरून खाली जाते, तर कधी प्रमोशन होऊन ओट्यावर येते. ओट्याच्या खालच्या वस्तू मांडणीत शिरतात, तर मांडणीतल्या वस्तू देवघरातल्या मांडणीत व्याप्त होतात. बाथरूममधल्या साबणाची जागाही अशा शिताफीने बदलली जाते की अंघोळीला गेल्यानंतर तो शोधण्यात अर्धा तास जावा. साधा नेहमी मांडणीत सापडणारा चमचा घ्यायला कधी कधी 'साष्टांग नमस्कार' घालून ओट्याच्या खालून मोठ्या मुश्किलीने काढावा लागतो. वाकण्याची इच्छा\ ताकद\ क्षमता संपलेल्या आमच्या उदरावर वाढलेल्या अंमळशा तनूला तो अतिरिक्त भारही सोसवत नाही. आणि त्यामुळेच कपाळावरची शीर त़डतडून विचारलेल्या 'चमचा इतक्या खाली का ठेवला? या प्रश्नाला 'वाढलेली तुंदीलतनू'ला व्यायाम नको का? असे फणकार्‍याने भरलेले उत्तर आल्यानंतर आपलाच अनमान कोण बापडा पुरूष करून घेईल?

कधी कधी या बदलाबदलीच्या खेळाला अस्मादिकांच्या उपस्थितीतच सुरवात होते. रविवारचा दिवस नेमका निवडून त्याच दिवशी काही 'उलथापालथ' करण्याचा बायकोचा जाव असतो. पण 'चला चला आपल्याला बाहेर जायचंय' असं सांगून मी तो अनेकदा उधळून लावतो. पण आमच्या आयुष्यातला सूर्य प्रत्येकवेली पूर्वेलाच उगवतो असे नाही.
'आता कशाला बदला बदली'? मी निषेधाचा क्षीण सुर काढण्याचा प्रयत्न करतो.
'अहो, बदल केल्याने घर नवीन वाटतं. तोच तोच पणा निघून जातो. छान वाटतं.' बायको मुद्दा रेटून नेते.
मी इतर काही निषेध सूर काढण्याचा प्रयत्न करतो. पण बायकोपुढे ते सारे सूर थिजून जातात. नि बदलाबदलीच्या या खेळात मीही 'उचल्या'ची भूमिका पार पाडतो. अशा खास दिवशी छोट्या वस्तूंची बुडे फारशी हलत नाहीत. अस्मादिकांच्या शरीरयष्टीच्या प्रमाणानुसार वस्तूंच्या हालचाली होतात.

त्या दिवशी आमचा पलंग नेहमीची जागा सोडतो नि खिडकीकडशी लगट करायला जातो. ताटकळलेल्या पाठीने उभे असलेले कपाट दुसर्‍या एखाद्या भिंतीला जाऊन टेकते. कम्प्युटर नेहमीच्या टेबलाला सोडचिठ्ठी देतो. घरातल्या तमाम डब्यांना माझा हस्तस्पर्श होऊन ती स्थलांतरीत होतात. माळ्यावरची पुस्तके खाली येतात, खालची पुस्तके माळ्यावर जातात. लेकीची खेळणीची फरफट होत ती कुठल्याशा कोपर्‍यात जाऊन व्यापतात. टिव्हीखालच्या कपाटातल्या वस्तू बाहेर निघतात नि पलंगाखाली जातात. बेडरूममधल्या भिंतीतल्या कपाटावरीच बोचकी खाली येतात नि दिवाणखान्याच्या माळ्यावर चढून बसतात. बेडरूममधल्या कपाटावरच्या बॅगा खाली येतात नि पलंगाखाली जातात. पलंगाखालच्या बॅगांमधल्या वस्तू कपाटात दडवल्या जातात.

बदलाबदलीच्या या खेळाने माळ्यावरची मंडळीही हडबडून जातात. तीही कधी कधी निर्वासित होतात. माळ्यावरची भांडी वापरात येतात किंवा त्यांच्या 'निरूपयोगी' 'राखीव' क्लबमध्ये कुणाची भर पडल्याने आनंदितही होतात. खाली-वर करण्याच्या या नादात मग कुठलीशी घरातल्या घरात हरवलेली वस्तू सापडते नि तिच्या आठवणींचे कढ निघतात. (या कढांना 'सासर', 'माहेर' असे संदर्भ असल्याने हे कढ 'बाय डिफॉल्ट' आपल्यासाठी त्रासदायकच असतात.) बदलाच्या या वार्‍यात घरातल्या रद्दीची पानेही फडफड करतात. कुणाच्या वडापावचा आधार बनणारी आमच्या घरची रद्दीही या घरातली आपली नेमकी किंमत जाणून स्थानभ्रष्ट होते. तिचे स्थान कधी रद्दीवाल्याच्या गाडीवर तर कधी घरातलीच एखादी कोपर्‍याची जागा असते.

बदलाबदलीच्या या सगळ्या गोंधळात विस्थापित झालेल्या त्या वस्तूंना काय वाटत असेल या गोष्टींनी मी उगाचच गहिवरून जातो. सुखासुखी कुणी जागा सोडून जात नाही. स्थलांतरीतही होत नाही. कुठलीशी कारणं अवचित समोर येतात नि स्थानभ्रष्ट व्हायला भाग पाडतात. अध्यात्मिक भाषेतच बोलायचं तर नियतीच्या पटावर कुणी तरी हलविणारा आपल्याला हलवतो, हलायला भाग पाडतो नि आपण आपली जागा सोडतो. इथे तीच नियती बनून आपणही या वस्तूंच्या बाबतीत तेच करतो. इकडे तिकडे हलताना आपणही जागा सोडतो. कधी स्थलांतरीत, कधी निर्वासित, कधी विस्थापित नि मग हळूहळू स्थापितही होत असतो. आपल्या भावनांचा आपण इतका विचार करतो, मग या मुक्या वस्तूंना भावनेचं इंद्रिय फुटलं तर त्यांच्या भावना काय असतील? फार हळहळायला होतं. स्वतःची मुळं उपटून रूजवणं खरोखरंच अवघड. पण बदल हा स्थायीभाव आहे नि तो स्वीकारला पाहिजे म्हणून हे हळवेपण बाजूला ठेवून मी व्यवहारात उतरतो. नि निमूटपणे बायकोच्या हाताला हात लावून या बदलाबदलीच्या मोहिमेस 'मम' म्हणतो.

माझ्या हिंदीचा बोलु कवतिके

आपल्याला हिंदी चांगलं कळतं असं मराठी माणसाला उगाचच वाटत असतं. म्हणजे त्यात थोडं तथ्य नक्कीच आहे. अहिंदी भाषिकांमध्ये मराठी लोकांनाच हिंदी जास्त चांगली कळते आणि बोलताही येते. पण म्हणून आपण आपली संपूर्ण अभिव्यक्ती त्या भाषेत करू शकतो असं नाही. आता हा अनुभव महाराष्ट्रात तितका येणार नाही. पण उत्तरेकडे गेल्यानंतर अनेकदा हिंदी चांगली समजत असूनही अनेकदा आपला 'मोरू' होतो.

इंदूरमध्ये सुरवातीला आल्यानंतर हिंदीत संवाद साधणं काही कठीण नाही, अशीच भावना होती. पण काही दिवसात आपोआपच विकेट पडायला सुरवात झाली. बायकोने एकदा तूप आणायला लावलं. इथे दुध-दुभतं भरपूर. त्यामुळे त्याची दुकानही बरीच. ऑफिसातून घरी परतताना एका दुकानासमोर गेलो आणि एकदम बोललो 'एक किलो तूप देना'. त्याला काही कळेचना. बरं तो माझ्याकडे विचित्र नजरेने पहायला लागला. मला कळेचना काय झालं. मग माझ्या लक्षात आलं. तुपाला हिंदी दुसरंच काही तरी म्हणतात. मग मी काय म्हणतात ते आठवायला लागलो. जाम आठवेचना. मग त्याच्या दुकानावर नजर फिरवायला लागलो. तेव्हा 'घी' असं नाव दिसलं. तेव्हा जीवात जीव आला आणि त्याला 'घी' द्यायला सांगितलं. त्या माणसाची विचित्र नजर त्यानंतरही कायम होती.

एकदा असंच बायकोने मिरे आणायला (वाटायला नव्हे) लावले. दुकानात गेलो. त्याला सांगितलं, 'मिरे द्या'. तीच गत. त्याला काही कळेचना. मग मी त्याला त्या मिर्‍यांचं वर्णन करायला लागलो. 'वो नहीं क्या काले काले होते है. गोल गोल दाने होते है'. माझ्या या वर्णनावरून त्याला बहुधा अदमास आला असावा. मग त्याने समोरच्या कपाटातून एक छोटा खोका काढून दिला. त्यावर लिहिलं होतं, 'काली मिर्च'. खाली चित्रही होतं. मी मनातल्या मनात 'हुश्श' म्हटलं. आणि त्याला 'यहीच देना' असं म्हणून घाम पुसला.

संक्रांतीच्या वेळीही असंच झालं. हलवा किंवा साखरफुटाणे हे घ्यायला दुकानात गेलो. तर त्याला नेमकं काय म्हणतात ते माहित नव्हतं. दुकानात एका टोपलीत हलवा ठेवलेला होता. त्यामुळे माझा जीव भांड्यात पडला. मग दुकानदारालाच विचारलं याला काय म्हणतात? त्यानं सांगितलं, 'चिरोंजी के दाने.' हा शब्दच मी पहिल्यांदा ऐकला. त्यामुळे हलवा समोर दिसला नसता तर कितीही डोकं खाजवलं असतं तरी त्याला हिंदीत काय म्हणतात ते आठवण्याचा प्रश्नच नव्हता.

अशाच एका सणाच्या दिवशी म्हणजे मराठमोळ्या गुढीपाडव्याच्या दिवशी म्हटलं बासुंदी आणूया. दुकानात गेल्यानंतर त्याला बासुंदी सांगिल्यानंतर ठार काही कळेना. म्हटलं 'वो दूध की होती है. उसको नहीं क्या आटाते है' ( आता आटवणेला हिंदीत काय म्हणतात हे पार 'आटवेना') त्याचा चेहर्‍यावरचा मख्खपणा कायम. मग मी दृश्य माध्यमाचा आधार घेऊन त्याच्या दुकानातली प्रत्येक मिठाई पहायला लागलो. एका ठिकाणी बासुंदीसारखं दिसंल. त्यावर तो म्हणाला ही रबडी आहे. म्हटलं ठिक आहे. चालेल दे बाबा. बासुंदी आटीव असली तरी ती घट्ट नसते. इथे रबडीचे 'लच्छे' असतात. आम्ही बासुंदीची तहान रबडीवर भागवली.

भाजीच्या बाबतीतही तेच. आलू, बैंगन, प्याज, गाजर इथपर्यंत आपल्याला माहिती असतं. (थॅंक्स टू बॉलीवूड) पण त्यापुढे जायचं असेल तर मात्र आपला 'भाजीपाला' होतो. भाजीसाठी 'सब्जी' हा शब्द असला तरी तो साधारणपणे तयार केलेल्या भाजीसाठी वापरतात. बाजारात भाजी आणायला गेल्यास 'तरकारी' शब्द प्रचलित आहे. मी तर हल्ली भाजी आणायला गेलो की समोर 'वो देना' असंच म्हणतो. कारण अनेकदा नावच माहित नसतं. दुधी भोपळ्याला इथे 'लौकी' म्हणतात हे कळल्यामुळे मला अगदी 'लकी' असल्याचं वाटलं. त्याचवेळी मटारला 'बटला' आणि डांगराला कद्दू म्हणतात हे ज्ञानही काही काळानंतर झालं. कोथींबिरीला 'कोथमीर' असाही हिंदी शब्द असला तरी इथे तिला तिच्या मातृकुलाच्या नावाने म्हणजे 'धनिया' म्हणून ओळखले जाते. फळांच्या बाबतीतही तेच. सफरचंदाला सेब, आंब्याला आम हे माहित असलं तरी पेरूला इथेही 'जांब' असे म्हणतात हे नव्यानेच कळलं. जांब हा उच्चार ग्रामीण महाराष्ट्रात मी ऐकला होता.

खाद्यपदार्थांच्या बाबतीतही ती अडचण येते. आपल्याकडे बाराखडीत 'व्यंजन' असते, इथे पदार्थांनाच 'व्यंजन' म्हणतात. आपल्याकडचा वडापाव इथे 'बडापाव' होतो. इथे बिना तला समोसा म्हणजे आपल्याकडचं बटाट्याची भाजी असलेलं पॅटीस त्रिकोणी आकारात दिलं जातं. एरवी पॅटीस म्हणून आपण जे खातो त्याला इथे 'टिकीया' म्हणतात. ती आलूपासून बटल्यापर्यंत कशाचीही असते. साखरेच्या पाकाला इथे 'शक्कर की चाशनी' म्हणतात. उडाली की नाही विकेट? आणि बिटाला काय म्हणतात माहितेय? 'चुकंदर'...

सगळ्यात पंचाईत डॉक्टरकडे गेल्यानंतर होते. एखादी भावना त्या हिंदी भाषक डॉक्टरला कशी समजून सांगावी ते कळत नाही. डोकं भिरभिरतंय ला 'सर चकराता है' हे सांगू पण डोक्यात घण घातल्यासारखं दुखतंय हे 'सरदर्द' या शब्दातून नेमकं कसं व्यक्त होणार? 'पेटदर्द' सांगू शकतो, पण 'पोटात ढवळून येतंय' हे कसं सांगणार? तोंड आल्याला 'मूह आया' असाच भाषांतरीत शब्द आहे हे कळल्यानंतर आश्चर्यच वाटलं होतं. अवयवांच्या बाबतीत तीच स्थिती. टाच, कोपर, गुडघा, पोटर्‍या या अवयवांच्या बाबतीत काही सांगायचं तर प्रत्यक्ष तो अवयव दाखवून सांगावं लागतंय. काही भावना इंग्रजीचा आधार घेऊन किंवा काही जवळपास जाईल असा हिंदी शब्द शोधून सांगत आम्ही निभावून नेतोय.

हिंदीच्या अशा अनेक गमती जमती नंतर हळूहळू कळत गेल्या. इथे वाहतुकीची 'यातायात' कशी असते ते वर्षभरात कळून चुकले आणि नियमात चुकल्यानंतर 'यातायात पोलिस' इथे 'चालान' करतात याचा अनुभवही आला. आपल्याला चांगल्या गोष्टीचं समाधान मिळतं, इथे प्रश्नाचं 'समाधान' असतं. आपल्याकडे एखादी गोष्ट करण्यासाठी 'अवकाश' असतो. इथे सुटीच्या दिवशी 'अवकाश' असतो. आपल्याकडे 'भोग' भोगावे लागतात इथे देवाला चढवतात. आपल्याकडे संकष्टीपासून सोमवारचे 'व्रत' असते. इथे उपास असला की 'व्रत' असतं. आपण कुठल्याही गोष्टीची 'चिकित्सा' करतो, इथे डॉक्टर करतो ती 'चिकित्सा' असते आणि खुद्द त्याला 'चिकित्सक' म्हणतात. आपल्याकडे दोषींना 'शिक्षा' होते इथे मुलांना 'शिक्षा' दिली जाते.

थोडक्यात काय आम्ही अशा अनेक गमती जमतीतून हिंदी शिकत आहोत. महाराष्ट्रातल्या हिंदी भाषकांना मराठी येवो न येवो पण आम्ही मात्र हिंदी नक्की शिकणार.