Sunday, September 20, 2009

माझ्या हिंदीचा बोलु कवतिके

आपल्याला हिंदी चांगलं कळतं असं मराठी माणसाला उगाचच वाटत असतं. म्हणजे त्यात थोडं तथ्य नक्कीच आहे. अहिंदी भाषिकांमध्ये मराठी लोकांनाच हिंदी जास्त चांगली कळते आणि बोलताही येते. पण म्हणून आपण आपली संपूर्ण अभिव्यक्ती त्या भाषेत करू शकतो असं नाही. आता हा अनुभव महाराष्ट्रात तितका येणार नाही. पण उत्तरेकडे गेल्यानंतर अनेकदा हिंदी चांगली समजत असूनही अनेकदा आपला 'मोरू' होतो.

इंदूरमध्ये सुरवातीला आल्यानंतर हिंदीत संवाद साधणं काही कठीण नाही, अशीच भावना होती. पण काही दिवसात आपोआपच विकेट पडायला सुरवात झाली. बायकोने एकदा तूप आणायला लावलं. इथे दुध-दुभतं भरपूर. त्यामुळे त्याची दुकानही बरीच. ऑफिसातून घरी परतताना एका दुकानासमोर गेलो आणि एकदम बोललो 'एक किलो तूप देना'. त्याला काही कळेचना. बरं तो माझ्याकडे विचित्र नजरेने पहायला लागला. मला कळेचना काय झालं. मग माझ्या लक्षात आलं. तुपाला हिंदी दुसरंच काही तरी म्हणतात. मग मी काय म्हणतात ते आठवायला लागलो. जाम आठवेचना. मग त्याच्या दुकानावर नजर फिरवायला लागलो. तेव्हा 'घी' असं नाव दिसलं. तेव्हा जीवात जीव आला आणि त्याला 'घी' द्यायला सांगितलं. त्या माणसाची विचित्र नजर त्यानंतरही कायम होती.

एकदा असंच बायकोने मिरे आणायला (वाटायला नव्हे) लावले. दुकानात गेलो. त्याला सांगितलं, 'मिरे द्या'. तीच गत. त्याला काही कळेचना. मग मी त्याला त्या मिर्‍यांचं वर्णन करायला लागलो. 'वो नहीं क्या काले काले होते है. गोल गोल दाने होते है'. माझ्या या वर्णनावरून त्याला बहुधा अदमास आला असावा. मग त्याने समोरच्या कपाटातून एक छोटा खोका काढून दिला. त्यावर लिहिलं होतं, 'काली मिर्च'. खाली चित्रही होतं. मी मनातल्या मनात 'हुश्श' म्हटलं. आणि त्याला 'यहीच देना' असं म्हणून घाम पुसला.

संक्रांतीच्या वेळीही असंच झालं. हलवा किंवा साखरफुटाणे हे घ्यायला दुकानात गेलो. तर त्याला नेमकं काय म्हणतात ते माहित नव्हतं. दुकानात एका टोपलीत हलवा ठेवलेला होता. त्यामुळे माझा जीव भांड्यात पडला. मग दुकानदारालाच विचारलं याला काय म्हणतात? त्यानं सांगितलं, 'चिरोंजी के दाने.' हा शब्दच मी पहिल्यांदा ऐकला. त्यामुळे हलवा समोर दिसला नसता तर कितीही डोकं खाजवलं असतं तरी त्याला हिंदीत काय म्हणतात ते आठवण्याचा प्रश्नच नव्हता.

अशाच एका सणाच्या दिवशी म्हणजे मराठमोळ्या गुढीपाडव्याच्या दिवशी म्हटलं बासुंदी आणूया. दुकानात गेल्यानंतर त्याला बासुंदी सांगिल्यानंतर ठार काही कळेना. म्हटलं 'वो दूध की होती है. उसको नहीं क्या आटाते है' ( आता आटवणेला हिंदीत काय म्हणतात हे पार 'आटवेना') त्याचा चेहर्‍यावरचा मख्खपणा कायम. मग मी दृश्य माध्यमाचा आधार घेऊन त्याच्या दुकानातली प्रत्येक मिठाई पहायला लागलो. एका ठिकाणी बासुंदीसारखं दिसंल. त्यावर तो म्हणाला ही रबडी आहे. म्हटलं ठिक आहे. चालेल दे बाबा. बासुंदी आटीव असली तरी ती घट्ट नसते. इथे रबडीचे 'लच्छे' असतात. आम्ही बासुंदीची तहान रबडीवर भागवली.

भाजीच्या बाबतीतही तेच. आलू, बैंगन, प्याज, गाजर इथपर्यंत आपल्याला माहिती असतं. (थॅंक्स टू बॉलीवूड) पण त्यापुढे जायचं असेल तर मात्र आपला 'भाजीपाला' होतो. भाजीसाठी 'सब्जी' हा शब्द असला तरी तो साधारणपणे तयार केलेल्या भाजीसाठी वापरतात. बाजारात भाजी आणायला गेल्यास 'तरकारी' शब्द प्रचलित आहे. मी तर हल्ली भाजी आणायला गेलो की समोर 'वो देना' असंच म्हणतो. कारण अनेकदा नावच माहित नसतं. दुधी भोपळ्याला इथे 'लौकी' म्हणतात हे कळल्यामुळे मला अगदी 'लकी' असल्याचं वाटलं. त्याचवेळी मटारला 'बटला' आणि डांगराला कद्दू म्हणतात हे ज्ञानही काही काळानंतर झालं. कोथींबिरीला 'कोथमीर' असाही हिंदी शब्द असला तरी इथे तिला तिच्या मातृकुलाच्या नावाने म्हणजे 'धनिया' म्हणून ओळखले जाते. फळांच्या बाबतीतही तेच. सफरचंदाला सेब, आंब्याला आम हे माहित असलं तरी पेरूला इथेही 'जांब' असे म्हणतात हे नव्यानेच कळलं. जांब हा उच्चार ग्रामीण महाराष्ट्रात मी ऐकला होता.

खाद्यपदार्थांच्या बाबतीतही ती अडचण येते. आपल्याकडे बाराखडीत 'व्यंजन' असते, इथे पदार्थांनाच 'व्यंजन' म्हणतात. आपल्याकडचा वडापाव इथे 'बडापाव' होतो. इथे बिना तला समोसा म्हणजे आपल्याकडचं बटाट्याची भाजी असलेलं पॅटीस त्रिकोणी आकारात दिलं जातं. एरवी पॅटीस म्हणून आपण जे खातो त्याला इथे 'टिकीया' म्हणतात. ती आलूपासून बटल्यापर्यंत कशाचीही असते. साखरेच्या पाकाला इथे 'शक्कर की चाशनी' म्हणतात. उडाली की नाही विकेट? आणि बिटाला काय म्हणतात माहितेय? 'चुकंदर'...

सगळ्यात पंचाईत डॉक्टरकडे गेल्यानंतर होते. एखादी भावना त्या हिंदी भाषक डॉक्टरला कशी समजून सांगावी ते कळत नाही. डोकं भिरभिरतंय ला 'सर चकराता है' हे सांगू पण डोक्यात घण घातल्यासारखं दुखतंय हे 'सरदर्द' या शब्दातून नेमकं कसं व्यक्त होणार? 'पेटदर्द' सांगू शकतो, पण 'पोटात ढवळून येतंय' हे कसं सांगणार? तोंड आल्याला 'मूह आया' असाच भाषांतरीत शब्द आहे हे कळल्यानंतर आश्चर्यच वाटलं होतं. अवयवांच्या बाबतीत तीच स्थिती. टाच, कोपर, गुडघा, पोटर्‍या या अवयवांच्या बाबतीत काही सांगायचं तर प्रत्यक्ष तो अवयव दाखवून सांगावं लागतंय. काही भावना इंग्रजीचा आधार घेऊन किंवा काही जवळपास जाईल असा हिंदी शब्द शोधून सांगत आम्ही निभावून नेतोय.

हिंदीच्या अशा अनेक गमती जमती नंतर हळूहळू कळत गेल्या. इथे वाहतुकीची 'यातायात' कशी असते ते वर्षभरात कळून चुकले आणि नियमात चुकल्यानंतर 'यातायात पोलिस' इथे 'चालान' करतात याचा अनुभवही आला. आपल्याला चांगल्या गोष्टीचं समाधान मिळतं, इथे प्रश्नाचं 'समाधान' असतं. आपल्याकडे एखादी गोष्ट करण्यासाठी 'अवकाश' असतो. इथे सुटीच्या दिवशी 'अवकाश' असतो. आपल्याकडे 'भोग' भोगावे लागतात इथे देवाला चढवतात. आपल्याकडे संकष्टीपासून सोमवारचे 'व्रत' असते. इथे उपास असला की 'व्रत' असतं. आपण कुठल्याही गोष्टीची 'चिकित्सा' करतो, इथे डॉक्टर करतो ती 'चिकित्सा' असते आणि खुद्द त्याला 'चिकित्सक' म्हणतात. आपल्याकडे दोषींना 'शिक्षा' होते इथे मुलांना 'शिक्षा' दिली जाते.

थोडक्यात काय आम्ही अशा अनेक गमती जमतीतून हिंदी शिकत आहोत. महाराष्ट्रातल्या हिंदी भाषकांना मराठी येवो न येवो पण आम्ही मात्र हिंदी नक्की शिकणार.

No comments: