Monday, April 28, 2008

बासुदांचे 'अनुभव'

बासू भट्टाचार्य एक बिनधास्त व्यक्तिमत्त्व होऊन गेलं. मानवी नातेसंबंध विशेषतः स्त्री-पुरूष संबंध हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. त्यावरच अनुभव, आविष्कार आणि गृहप्रवेश ही चित्रत्रयी त्यांनी दिली. काही वर्षांपूर्वी आलेला आस्था हा चित्रपटही त्याच साखळीतला होता, असे म्हणायला हरकत नाही. नुकतंच बासूदांचं 'अनुभव' हे आत्मकथनपर पुस्तक वाचलं. 'सकाळ'मध्ये काही वर्षांपूर्वी हे आत्मकथन सदरातून प्रसिद्ध होत होतं. पण एकत्रितरीत्या पुस्तकातून वाचताना त्याचा आनंद काही औरच.

फिल्मी मंडळींच्या आत्मचरित्रातून अनेक गोष्टी समजतात. याच वर्तुळात राहणारी मंडळी कशी कचकड्याची असतात, हेही त्यातून दिसून येत असते. बासूदांच्या या पुस्तकातूनही काही लोकांविषयीची अशी माहिती मिळते, पण हे पुस्तक मुख्यता बासुदांचे स्वतःकडे बघणे आहे. स्वतःविषयी सांगण्याच्या ओघात इतरांविषयी सांगून जाते. पण उगाचच एखाद्याविषयी आपल्याला असलेली खाजगी माहिती फोडावी अशा पद्धतीने ते सांगत नाहीत. पण त्यांनी यात सांगितलेले अनेक किस्से मस्त आहेत.

पश्चिम बंगालमधून मुंबईत चित्रपट हे करियर करण्यासाठी आलेल्या बासूदांना मुंबईत साहजिकच संघर्ष करावा लागला. या काळात मुंबईतल्या बंगाली मंडळींनी त्यांना चांगलाच हात दिला. त्यातला एक किस्सा फार मस्त आहे. बासूदा मुळात बिनधास्त माणूस. कधी काय करतील काही नेम नाही. सलील चौधरींच्या संगीत दिग्दर्शनाखाली लताबाईंनी एक बंगाली गाणं गायलं. सगळ्यांचं म्हणणं गाणं छान झालं असं होतं. पण बासूदांनी स्पष्टपणे सांगितलं, बाईंनी बंगाली गाणं जे गायलंय त्यातून हिंदी उच्चार दिसून येतात. त्यामुळे ते खटकतं. झालं. बासूदांच्या अशा आगाऊपणाने सगळेच गोरेमोरे झाले. मग लताबाई पुढे आल्या आणि कोणते उच्चार खटकले असे विचारून त्या त्या ठिकाणी सुधारणा केली. या घटनेनंतर लताबाईंनी बासूदांना विचारलं की मला बंगाली शिकवशील का? बासूदांनी हो म्हणून सांगितलं आणि घसघशीत रकमेची मागणी केली. लताबाईंनी त्याहीपेक्षा जास्त रक्कम देऊ केली. पण त्यानंतर बासूदांनी आणखी एक अट घातली.''मला घ्यायला तुमची गाडी येईल.'' बाईंनी तीही अट मान्य केली. हे महाशय भाड्याच्या खोलीत राहत होते. तिथून गाडीने लताबाईंना बंगाली शिकवायला जायचे.

बंगाली लोकांना स्वतःच्या साहित्याचा खूप अभिमान असतो. पण इतरांकडेही त्या दर्जाचे काही असते याची मात्र जाण नसते. बासूदाही सुरवातीला तसेच होते. पण नंतर त्यांच्या एका मित्राने हिंदीतल्या चांगल्या साहित्याची ओळख करून दिली. त्यानंतर मग त्यांनी भाषक साहित्य वाचायला सुरवात केली. बासुदा मराठी साहित्यही मराठीतूनच वाचत होते. मराठी त्यांना बोलता येत नसलं तरी अतिशय चांगलं कळत होतं.

बासूदांचा तिसरी कसम हा चित्रपट सुरवातीला पडला. पण त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर मात्र तो गाजला. पण त्याची हाय खाऊन त्याचा निर्माता व गीतकार शैलेंद्रने मात्र आधीच मरणाला कवटाळले. अतिशय रखडलेल्या या चित्रपटाच्या काळात राज कपूर यांनी सुरवातीला 'शोमनशिप' दाखवून अडवणूकही केली. पण रडत खडत पूर्ण होऊनही चित्रपट बरा चालला.

त्यांच्या दिग्दर्शनाची एक वेगळी पद्धत होती. ते कुणालाच पटकथा द्यायचे नाहीत. त्यांचे म्हणणे एकच होते. मी दिग्दर्शक आहे. पूर्ण चित्रपटाचा विचार मी केला आहे. मला पाहिजे, तसा चित्रपट व्हायला पाहिजे. त्यातील व्यक्तिरेखा कशा असतील काय असतील याचा पूर्ण विचार माझा आहे. तो तसाच पडद्यावर यायला पाहिजे. त्यामुळेच ते दिग्दर्शनात कुणाचीही लुडबूड सहन करत नसत. राज कपूरला तिसरी कसममध्ये घेतानाही त्यांनी याच अटीवर घेतले होते. त्यातही राज कपूरने अडवणूक केल्यानंतरही त्यांनी त्याला उमदा माणूस म्हटले आहे. बंगाली नट उत्तमकुमारनेही त्यांना खूप त्रास दिला.

एकदा एका चित्रपटासाठी रस्त्यावरून चालणार्‍या मुलीला त्यांनी चित्रपटात काम करशील काय म्हणून विचारले होते. तिने होकारही दिला. ही गोष्ट एका हॉटेलात बसून ते शम्मी कपूरला सांगता असताना त्याने त्या मुलीविषयी अतिशय अश्लील कॉमेंट केली आणि त्यांनी तिला त्या चित्रपटातूनच वगळले. ती मुलगी होती सिमी गरेवाल. चित्रपटातील कलावंत निवडीसाठी त्यांनी कुणाकुणाला विचारले नाही? तिसरी कसममधील नायिका नृत्यांगना होती, म्हणून बिहारमध्ये लोकेशन निवडीसाठी गेले असताना एका नाचणार्‍या बाईलाही त्यांनी हिरॉईन होते का म्हणून विचारले होते आता बोला? पण वरकडी म्हणजे त्या बाईने एवढी मोठी संधी मिळत असतानाही त्यांना ठाम नकार दिला.

बासूदांचं लग्न हे एक प्रकरणच आहे. बिमल रॉय यांच्या कन्येसमेवत त्यांचे प्रेम जमले आणि रॉय कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता लग्न केले. हा पूर्ण किस्सा मुळातूनच वाचण्यासारखा आहे. वास्तविक बिमल रॉय हे बासूदांचे या क्षेत्रातील गुरू. त्यामुळे आपल्या मुलीने बासूशी प्रेम करावे हे त्यांना मान्य नव्हते. त्यात त्यांच्या पत्नीचाही बासूदांना तीव्र विरोध. त्यांनी मुलीला कोलकात्यात जवळपास बंदिवासातच नेऊन ठेवले. त्यात एक आवई उठवली. बासूदा व लता मंगेशकरांचे लफडे आहे, म्हणून. बासूदा कोलकात्याला गेल्यानंतर त्यांना हा प्रकार कळला. पुढे या दोघांनी मुंबईतूनच पळून जाऊन लग्न केले.

बासूदांच्या मित्रांपैकी एना व रूमा गांगुली यांच्याविषयीचे व्यक्तिगत किस्सेही यात येतात. यातील रूमा गांगुली म्हणजे किशोरकुमारची बायको. रूमा गांगुलीला बंगालीत एक स्वतंत्र स्थान आहे. ती कवयित्री होती. पण किशोरकुमारबरोबर तिचे खटके उडायचे. किशोर पैशांच्या मागे धावायचा असे तिचे म्हणणे. एकदा म्हणे किशोरला बरेच पैसे मिळाले. त्यावेळी रूमा घरात आल्यानंतर तिने पाहिले तर काय? किशोर घराच्या सर्व भिंतींना शंभराच्या नोटा चिकटवून त्याकडे पाहत बसला होता. त्यातच किशोरचे मधुबालाशी जमल्याचे तिने प्रत्यक्ष पाहिल्यानंतर किशोरला सोडून ती कोलकात्याला गेली. विशेष म्हणजे तीही धुतल्या तांदळासारखी नव्हती. तिचेही एका बंगाली फोटोग्राफरशी लफडे होते. पण तिने त्याच्याशी लग्न केले नाही.

बासूदा स्त्री-पुरूष संबंधांवर भाष्य करताना फार छान लिहितात. रूमा गांगुली व एना दोघींचीही लफडी होती. पण त्यांनी मूळ पतीला सोडून दिल्यानंतर प्रियकराशी लग्न केले नाही. यामागे काहीही तार्किकता दिसत नाही. पतीविषयी त्यांचे मतभेद होते, हे खरे असले तरी त्यावर त्यांचे तितकेच प्रेमही होते. तरीही हे संबंध टिकू शकले नाहीत. त्यांनी दिलेल्या एनाचा किस्सा तर अस्वस्थ करणारा आहे. एनाने पतीला सोडून दुसर्‍याशी घरोबा केला तरी तिने त्याला कधीच सुख दिले नाही. शिवाय पहिल्या पतीपासून झालेली मुलेही वार्‍यावर सोडून दिली. त्या मुलांचे तर फारच वाईट हाल झाले.

सगळं सांगून झाल्यानंतर बासूदा स्वतःचा घटस्फोट झाल्याचेही सांगून टाकतात. पण लग्न टिकण्याची गरज असल्याचेही म्हणतात. कुटुंब असणे गरजेचे असे ते म्हणतात. त्याविषयी त्यांनी एक छान किस्सा सांगितलाय. कॅनडाला एकदा ते गेले असताना तिथे त्यांना एका मुलाने त्यांना प्रश्न विचारला. तुमच्या चित्रपटात पती-पत्नी भांड भांड भांडतात. पण शेवटी पुन्हा एकत्र येतात, हे कसे काय? त्यावर त्यांनी उत्तर दिले. तुझी संस्कृती वेगळी आहे, माझी वेगळी. तुमच्याकडे वस्तू गंजली की 'रिप्लेस' करतात आणि आमच्याकडे 'रिपेअर'.

Monday, April 21, 2008

सारे प्रवासी गाडीचे

परशुरामची झोप मोडू नये म्हणून भुंग्याने पार मांडी फोडली तरी कर्णाने हु की चू केले नव्हते, असे म्हणतात. तद्वतच मध्य प्रदेश नामे राज्यात सार्वजनिक प्रवास करण्यासाठी कमीतकमी एवढी तरी सहनशीलता हवीच. सहनशीलतेची परीक्षा वा कसोटी पाहणारे प्रसंग आपल्या आयुष्यात अधून मधून येत असतील, पण या बाबतीत आपल्या लोकांना अधिक मजबूत करणेसाठी मध्य प्रदेश सरकारने कायमस्वरूपी सोय केली आहे, ती वाहतुकीच्या खासगीकरणाच्या रूपाने.

आपल्याकडे 'यष्टी'च्या खासगीकरणाची आरोळी आली की सगळे कर्मचारी एकत्र येऊन शड्डू ठोकून उभे रहातात. आणि त्यांच्या मुजोरीला कंटाळलेले सामान्यजन 'खाजगीकरण व्हायलाच पाहिजे, च्या मायला जरा ताळ्यावर तरी येतील' अशी मताची पिंक टाकून मोकळे होतात. पण हे खाजगीकरण काय प्रकरण आहे, हे मध्य प्रदेशात अनुभवले तर 'गड्या आपुली यष्टी बरी' असं म्हणायची वेळ नक्की येईल.

तर या प्रदेशात फिरायचे झाल्यास आधी 'स्टॅंडावर' जावे लागते. हे स्टॅंड हे आधी समजून घेऊ. आडव्या तिडव्या लावलेल्या 'ट्रेवल्स' कंपनीच्या बस दिसल्या आणि बेंबीच्या देठापासून गावांची नावे घेत ओरडणारी मंडळी दिसली की समजायचं स्टॅंड आलं. स्टॅंडावर आल्यानंतर तिथे उभे राहण्याची इच्छा तुमच्या मनात राहू नये यासाठीची जाणीव तुमच्या नाकाला व्हायला सुरवात होते. तुम्हाला कुठे जायचंय यासाठी चौकशी कक्षात जायची गरज नाही. वेगवेगळ्या गावाची नावे घेत दिसेल त्याला 'येता का जाऊ?' विचारणारे एजंट-कम-कंडक्टर- कम-क्लिनर ही माहिती साद्यंत देतात. हे पाहिल्यावर स्टॅंडावरच्या 'सर्कारी' व्यक्तीला इथे काडीचीही किंमत नसते, ते कळून चुकते. आणि 'खाजगीकरणाची' डबल बेल आपल्याही मनात वाजू लागते.
आता ट्रेवल्सची गाडी नावाचं प्रकरण आधी समजून घ्यायला हवं. सरकारने अवघ्या काही ठिकाणी आपल्या गाड्या पाठविण्याची सोय केली आहे. बाकीचे सगळे मार्ग 'ट्रेवल्स' कंपन्यांना विकले आहेत. त्यामुळे त्या मार्गावर तुम्ही किती प्रवासी न्या, आणा कशाला काही घरबंध नाही. गाडी चेकींग वगैरे 'सिस्टिम' नाही. 'टिक्टं' मिळाली तर मिळतात नाही तर नाही. त्यांना तिकिटांपेक्षा चिटोरी हा शब्द जास्त योग्य आहे. त्यावर काही तरी अगम्य खरडून कंडक्टर ते आपल्याला देतो.

साधारण तासा दोन तास- ते पाच एक तासापर्यंतच्या प्रवासासाठी इथं छोट्या गाड्या आहेत. छोट्या म्हणजे साधारणपणे गाडीच्या दोन्ही 'शीटां'दरम्यान उभं राहून दोन्ही हाताची 'वाव' गाडीत फैलावली की दोन्ही बाजूचा हाताचा पत्रा हाताला लागलाच पायजे. गाडीच्या दोन बाजूला प्रत्येकी दोन 'शीटां'ची रचना असते. (आणि या शीटांच्या बाजूलाच विविध रंगद्रव्याची शिटं बिल्कुल फ्री.) हे सीट म्हणजे साधारणपणे 'बूड' टेकवण्याची जागा अशी त्याची व्याख्या करता येईल. कारण या सीटांवर बसणे जगातील दोन अत्यंत सडपातळ माणसे आली तरी शक्य नाही. अशा साधारणपणे तीस-बत्तीस जागा असतात. डायवरच्या मागे आणि बाजूलाही सीटं बसतात. ही संख्या बहुतेकदा गर्दीवर अवलंबून असते. ती साधारणपणे वीस-पंचवीस जणांपर्यंतही जाऊ शकते. याशिवाय गाडीत दोन सीटांच्या मधल्या भागात उभे राहून प्रवास करण्याची 'मेहरबानी'ही प्रवाशांवर केली जाते. ही संख्याही अर्थात आत किती जास्तीत जास्त येऊ शकतील आणि त्याहीपेक्षा गाडीचा कंडक्टर- ड्रायव्हर- क्लिनर अशा 'कम' लोकांवर अवलंबून असते. त्यामुळे बसलेल्या लोकांना आपल्याला जागा मिळाल्याचा आनंद लोकांचे पार्श्वभाग चेहर्‍याच्या आजूबाजूला लागतात त्यावेळी उडून गेलेला असतो.

या गाडीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हाफ तिकीट असलेल्यांना इथे स्वतंत्र सीट दिली जात नाही. म्हणजे दहा वर्षाचा मुलगा असला तरी त्याने आपल्या आई-वडिलांच्या मांडीवरच बसायचे. त्याच्यासाठी स्वतंत्र सीट नाही. इथल्या गाड्यांमधली दोन व्यक्तींसाठीचे सीट प्रत्यक्ष पाहिल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा व्हायचा नाही.

तर आता या व्यवस्थेसाठी लागणार्‍या पदांचा आणि त्यांच्या पात्रतेचा विचार करू.

एजंट- साधारणपणे 'पोर्‍या' वगैरे असणारी मंडळी या पदासाठी आवश्यक असतात. त्याला 'ते कू-मेकू' , जा रीया, आ रिया वगैरे बोलता यायला हवे. गाडी लावली असेल त्याच्या जवळपास फर्लांगभर पुढे जाऊन नेमकी कोणती 'सवारी' आपण ज्या गाडीसाठी काम करतो, त्या गाडीत जाण्यासाठी आली आहे, हे ओळखता आले पाहिजे. मग या 'सवारी भीय्याला गाडीपर्यंत दुसर्‍या स्पर्धक कंपनीच्या हाती जाऊ न देता सुखरूपपणे आपल्या गाडीपर्यंत पोहचविता आले पाहिजे. ही याची मुख्य 'जवाबदारी'.

कंडक्टर-कम- ड्रायव्हर-कम- क्लिनर- यासाठी कोणत्याही शिक्षणाची 'अजाबात' गरज नाही. हिशेब जमतो एवढ्या पात्रतेवरूनही हे पद मिळवता येते. मुख्यतः हा माणूस सडपातळ हवा. म्हणजे गाडीत कितीही गर्दी असली तरी इकडे तिकडे हलायला अडचण नको. 'टिक्टं' फाडायला गर्दी भेदून शेवटपर्यंत आणि तिथून सहिसलामत 'दरूजा'पर्यंत येता यायला हवे. याबरोबरच चेहर्‍यावर एक विशिष्ट प्रकारची छानपैकी मग्रुरी वगैरे हवी. पण त्याचवेळी दयाभाव, कनवाळूपण हेही दाखवता यायला हवे. गाडी फुल्ल भरलेली असतानाही गाडीत जागा कशी आहे आणि मी तुम्हीला उभे नव्हे तर बसायला कशी जागा देतो हे खालच्या प्रवाशाला पटवून त्याला गाडीत घेऊन आणण्याची 'कॅपॅसिटी' याच्यात पाहिजे. आधीच्या बसलेल्या प्रवाशाला उठवून दुसर्‍याला जागा देणे, नंतर त्याला उठवून तिसर्‍याला जागा देणे असा जागांचा 'खो' त्याला खेळता यायला हवा. त्याचबरोर या सगळ्यांचे शिव्याशाप निर्मम भावाने खाता यायला पाहिजे. त्याचवेळी एखादा प्रवासी डोक्यात जायला लागला की त्याला 'आई-भन' यांच्यावरून शिव्याही त्याला देता यायला पाहिजे. पण त्याहीपेक्षा प्रवासी भरण्यावरून, गाडी सोडण्यावरून स्पर्धक गाडीच्या कंडक्टर-कम- ड्रायव्हर-कम- क्लिनर या आपल्या समपदस्थ व्यक्तीशी खच्चून भांडता यायला हवे. आणि हो महत्त्वाचे म्हणजे गुटखा वगैरे खाता यायला पाहिजे. अन्यथा त्याला या पदावर ठेवले जात नाही.

ड्रायव्हर- या व्यक्तीचा गाडीतल्या प्रवाशांशी त्यांच्यात असूनही संबंध नसतो. ही व्यक्ती गुटखा खाणारी असली पाहिजे आणि गाडी हाणणे हा एकमेव उद्देश त्याच्यासमोर असतो. त्यात स्पर्धक 'ट्रेवल्स' कंपनीची गाडी दिसली की त्याच्याशी 'रेस' खेळ. त्याला मागे टाकून वाकुल्या दाखव. (यासाठी कंडक्टर-कम- ड्रायव्हर-कम- क्लिनर या आपल्या सहकार्‍याची मदत घे.) ही उपकामे त्याच्याकडे असतात. या व्यक्तीसाठी आणखी एक गोष्ट 'मस्ट' आहे, ती म्हणजे गाडीत चढणे आणि उतरणे याचा एक खास 'अंदाज' त्याच्याकडे हवा. साडेनऊला सुटणारी गाडी जवळपास आठ वाजता भरायला घेतली जाते. तब्बल दीड तास गाडीत 'शिजल्यानंतर' ती खिडकी उघडून आत रूबाबत शिरणारा तो 'ड्रायव्हर' हा त्राता, देवदूत वगैरे वाटू लागतो. त्यात त्याचा रूबाब या अवस्थेशी आणखी जवळीक साधून देतो. आणखी एक. खच्चून भरलेली बस असली तरी ती लगेचच सुटते आहे, याचा आभास करून देण्यासाठी गाडी चालू करून देऊन, लोकांच्या बोलण्याकडे कान न देता तोच कान एफएमवरची गाणी ऐकण्याकडे वळविण्याची विलक्षण हातोटी हवी अशा व्यक्तीलाच ड्रायव्हर म्हणण्याची इथे पद्धत आहे.

सवारी- सवारी म्हणजे प्रवासी. गाडीत शिरल्यानंतर सगळेच सवारी होतात. त्याच्यासाठीही काही पात्रता आहे. जागा नसतानाही उभे रहाण्याचे कौशल्य तुमच्यात हवे. आपल्याबरोबरच दुसर्‍यांच्या पायावर बिनदिक्कत पाय ठेवता यायला हवा. आपला पार्श्वभाग दुसर्‍याच्या तोंडासमोर आला तरी तो तिथेच ठेवण्याचा नाईलाजात्मक निर्लज्जपणाही हवाच. त्याचबरोबर जागेवरून उठवले तरीपर्याय नसल्याने गाडीत राहून प्रवास करण्याचा निलाजरेपणाही हवा.

सवारीचा एक अर्थ मिरवणूक असाही आहे. देवदेवता, राजे यांची सवारी काढली जाते. एवढे वाचल्यानंतर हा प्रवास त्या 'मिरवणुकी'पेक्षा काही वेगळा नसतो, याची कल्पनाही एव्हाना तुम्हाला नक्कीच आली असेलच. नाही का?

Thursday, April 17, 2008

वर्तुळ पूर्ण झालं

नाशिकजवळ सिन्नरच्या कुशीत बिलगलेलं डुबेरे नावाचं गाव आहे. अगदी छोटसं गाव. हे दोन गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. एक इथं भोपळ्याचा वेल आहे म्हणून आणि मराठी साम्राज्याचा उत्तर दिग्विजय घडवून आणणारा महापराक्रमी पहिला बाजीराव पेशवा इथे जन्माला आला म्हणून. या गावातच साठेंचं घर आहे. एके दिवशी गाडी काढली आणि बायकोला मागे टाकून थेट डुबेरे गाठलं. साठेंचं घर शोधून काढलं आणि 'त्या' खोलीत प्रवेश केला. जिथे मराठी साम्राज्याचा पराक्रमी सूर्य जन्माला आला होता. अगदी थरारून गेलो होतो आम्ही. या छोट्याशा खोलीत बाजीरावाचा फोटो होता. एक तलवार होती. फार काही नव्हतं. पण त्या खोलीत गेल्यानंतरचा थरार खूप काळ कायम होता.
----------

इंदूरला आल्यानंतर बाजीरावासंदर्भातील निनाद बेडेकर यांनी लिहिलेला लेख वाचनात आला. बाजीरावाने मराठी सत्तेचा प्रचंड साम्राज्यविस्तार केला. नर्मदा ओलांडणारा हा पहिला मराठी वीर. त्याच्या पराक्रमाला तोड नव्हती. इंग्रजी इतिहासकारांनाही त्याचं कौतुक करण्याचा मोह आवरला नाही. शाहू महाराज तर एकदा म्हणाले होते ''दहा हजार सैन्य आणि बाजीराव यांच्यातलं काही निवडायला सांगितलं तर मी बाजीरावाला निवडेन.'' उत्तर भारत आजही महाराष्ट्रापासून इतका लांब आणि 'परप्रांत' वाटतो, तर त्यावेळी कुठलीही साधने नसताना हा भाग कसा वाटत असेल? मग बाजीरावाने उत्तर भारतात विस्ताराचं धैर्य कसं दाखवलं असेल? माळव्यापासून बुंदेलखंडापासून त्याने मराठी जरीपटका डौलाने फडकावला. त्याच्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात ३५-४० लढाया त्याने खेळल्या. पण एकही तो हरला नाही. तो हाडाचा सैनिक होता आणि लढाई कशी जिंकावी याचे शास्त्र त्याला अतिशय चांगले अवगत होते. बाजीरावाच्या मातोश्री राधाबाईंनी एकदा काशीयात्रेची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी वाटेतल्या सर्व राजांनी बिनधोकपणे त्यांना जाऊ दिले. पण त्यांचा विशेष आदरसत्कार केला. बाजीरावाने या भागात गाजवलेल्या पराक्रमामुळेच हे घडू शकलं.
बाजीरावाच्या तत्कालीन पराक्रमाचा एक किस्सा बेडेकरांनी नोंदवला आहे. त्यावेळी उदयपूरच्या राण्यानेबाजीरावाला बोलवलं. खास त्याच्यासाठी तिथली बाग सुशोभित केलं. त्याच्यासाठी सुवर्णाचं सिंहासन ठेवलं होतं. एक चांदीचं सिंहासन स्वतःसाठी ठेवलं होतं. बाजीरावाला त्याने सुवर्णसिंहासनावर बसण्याची विनंती केली. रायाने त्या सिंहासनाकडे एकदा पाहिलं आणि तो पटकन चांदीच्या सिंहासनावर बसला. सगळेच आश्चर्यचकीत झाले. मग रायाने खुलासा केला. ज्या सिंहासनावर 'राणा प्रताप बसले, त्यावर बसण्याची माझी लायकी नाही.' तेवढ्या एका वाक्याने राजपूत समाजाला रायाने जिंकून घेतलं. पुढे जयपूरच्या जयसिंहाने देखील उदयपूरच्या राजासारखेच सुवर्णसिंहान केले. तिथे मात्र राया सुवर्णसिंहासनावरच बसला आणि उदयपूर आणि जयपूर या दोन्ही गाद्यातील भेदही दाखवून दिला. मराठी साम्राज्यविस्तार करणारा हा बाजीराव अवघ्या चाळीसाव्या वर्षी नर्मदेजवळ रावेरखेडी येथे अतिश्रमाने मरण पावला.

-----------------------

नुकतेच इंदूरजवळ धार या गावाला गेलो होतो. या गावाला मोठा इतिहास आहे. परमार वंशातील प्रसिद्ध राजा भोज दहाव्याशतकांत इथेच राज्य करत होता. नंतर इस्लामी आक्रमणानंतर राज्य अल्लाउद्दीन खिलजीने गिळंकृत केलं. पुढे मुसलमानीराज्यानंतर बाजीरावाने या प्रांतात मराठी अंमल प्रस्थापित केला. मराठी सुभेदारीच्या वाटण्या झाल्यानंतर धार पवारांकडे गेले. आनंदराव पवार या पवारांच्या राज्यसत्तेतील पहिले राजे. धारच्या किल्ल्यावर मुसलमानांनंतर मराठ्यांनीही आपले वर्चस्व प्रस्थापित केले. पण या किल्ल्याशी निगडीत आणखी एक इतिहास निगडीत आहे. या किल्ल्यावर बघण्यासारखे काहीच नाही, असे आम्हाला (मी आणि बायको) तिथे घेऊन जाणार्‍या रिक्षावाल्याने सांगितले. पण आम्हाला किल्ला आवडला. नंतर तिथे गेल्यानंतर एक महत्त्वाची बाब समजली. मराठी साम्राज्याचा अस्त ज्याच्या काळात झाला तो दुसरा (पळपुटा) बाजीराव याच किल्ल्यात जन्माला आला होता.

माधवराव पेशव्यांशी झगडा मोडून घेतलेला राघोबादादा नंतर धारला आला होता. आनंदीबाईला इथेच ठेवलं होतं. आणि इथेच तिने दुसर्‍या बाजीरावाला जन्म दिला होता. पुढे घडलेला इतिहास तर सर्वांनाच माहिती आहे. बाजीरावाच्या कितीही बाजूने आणि विरोधात लिहिलं तर त्याच्या कारकिर्दीतच मराठी राज्य संपलं हेही तितकंच खरं.

पुरातत्व खात्याच्या एका कर्मचार्‍याने नियम डावलून आम्हाला ती खोली दाखवली, ज्यात दुसर्‍या बाजीरावाचा जन्म झाला होता. पुरातत्व खात्याने ठेवलेल्या जुन्या मूर्तींखेरीज तिथं काहीही नव्हतं. एका भिंतीवर पेशवाईतील वाटावं असं चित्र ठेवलं होतं. बस्स. मराठी साम्राज्याचा विस्तार करणारा एक बाजीराव आणि ज्याच्या काळात मराठी राज्य लयाला गेलं असा दुसरा बाजीराव.दोघांच्या जन्माचा माझ्याशी जोडला गेलेला हा दुवा. यानिमित्ताने एक वर्तुळ पूर्ण झालं.

Tuesday, April 15, 2008

'सत्तर एमएम' मराठी बाणा

दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा वसा हाती घेतलेल्या राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची 'उत्तरपूजा' बांधून मराठी बाणा दाखवून दिल्यानंतर आता हा बाणा अधिक रूंद करण्याचे ठरविल्याचे दिसते. म्हणूनच राज्यातील खाजगी कंपन्यात ८० टक्के आरक्षण मराठी तरूणांना द्यायला हवे असा 'फतवा' त्यांनी काढला आणि लगोलग या फतव्याची अंमलबजावणी करावी अन्यथा उद्योग चालू देणार नाहीत, असा इशारा देणारी पत्रे त्या त्या उद्योगांना पाठविण्यात येतील, असे सांगितले.

राज ठाकरे यांच्या या 'सत्तर एमएम' मराठी बाण्याने नवे प्रश्न जन्माला घातले आहेत. राज यांनी अतिशय जाणीवपूर्वक हा नोकर्‍याचा पत्ता फेकला आहे. कारण ' उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ट शेती' मानणार्‍या मराठी माणसाला हा मुद्दा नक्कीच अपील होईल, याची त्यांना खात्री आहे. त्याचबरोबर शिवसेनेलाही याचा शह बसेल, अशीही व्यवस्था त्यात आहे. पण त्यानिमित्ताने होणारे प्रश्न काय याचाही विचार व्हायला हवा.

कोणताही उद्योगपती व्यवसाय सुरू करतो, ते त्याला जिथे सर्व बाबी अनुकूल आहेत, अशा ठिकाणी. त्यावेळी त्या कंपनीत काम करणारे मनुष्यबळ कोणते भाषक आहे, याच्याशी त्याला काहीही देणे घेणे नसते. कंपनीला आवश्यक असणारे मनुष्यबळ तिथे नसेल तर तो उद्योजक ते मनुष्यबळ जिथून मिळेल तिथून आणेल. आणि आणत आहेत. शेवटी त्याला व्यवसाय करायचा आहे. ज्या उद्योगांत मराठी माणूस काम करू शकतो, तिथे त्याला प्राधान्य द्या. पण अनेक उद्योग असे आहेत, जिथे मराठी लोक दिसत नाही. तिथे बाहेरचे लोक येऊन काम करतात. मग अशा ठिकाणी मराठी माणूस का नाही, याचा शोध घेण्याचा प्रयत्न 'मनसे' का करीत नाही? मुळात कोणताही व्यावसायिक स्वतःच्या फायद्यासाठी व्यवसाय करतो. त्याला कामगारांकडून काम करून घ्यायचे आहे. त्याला स्थानिक-परप्रांतीय वादाशी काय देणेघेणे?

महाराष्ट्रात आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर इतर प्रांतीय कामगार काम करतात, ते केवळ त्यांचे कोणी भाईबंद त्या कंपनीत आहे, म्हणून नव्हे तर त्यांच्यात तिथे काम करण्याची गुणवत्ता आहे, म्हणून. कंपनीत लागणारे एखादे काम करण्याची क्षमता मराठी माणसांत नसेल तर कंपनी ते काम ज्याला येत असेल अशा कामगाराला इतर राज्यातून आणणारच ना? उगाचच मराठी मराठी असे म्हणून काहीही होणार नाही. आणि समजा या सगळ्या उद्योगात परप्रांतीयांना काढून मराठी माणसाला संधी दिली आणि कंपनी मालकाला अपेक्षित असे काम झाले नाही, पर्यायाने कंपनीची प्रगती झाली नाही, तर त्याच्या होणार्‍या नुकसानीची भरपाई राज ठाकरे घेणार आहेत काय? मुळात राज यांचा हुकम या कंपनी मालकांनीही का पाळावा?

आणखी एक बाब स्पष्ट व्हायला पाहिजे. ती म्हणजे मराठी कुणाला म्हणावे? महाराष्ट्रात पिढ्यान पिढ्या रहाणार्‍या मारवाडी, गुजराती समाजाला (जे मराठी बोलतात आणि व्यवहाराही करतात.) मराठी म्हणायचे की नाही? अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात वास्तव्य करणार्‍या दक्षिण वा उत्तर भारतीयांना मराठी समजायचे की नाही. मुळात हे जर नक्की नसेल तर मराठी म्हणायचे कुणाला? आणि कशाच्या आधारावर नोकर्‍या मागायच्या? मूळ प्रांतापेक्षा कर्मभूमी महत्त्वाची हे जर नक्की असेल तर मग गुजराती, मारवाडीही मराठीच म्हणायला हवेत. कारण त्यांनीही कोणत्याही मराठी माणसाइतकेच महाराष्ट्रावर प्रेम केले आहे. मग ते मराठी नाहीत का? तीच स्थिती महाराष्ट्राबाहेर मराठी माणसांचीही आहे. इंदूर, बडोदा, ग्वाल्हेर, हैदराबाद, बंगलोर येथे मराठी टक्का लक्षणीय आहे. जमशेदपूरमध्ये टाटांच्या उद्योगांत अनेक मराठी माणसे काम करतात. स्थानिकांनाच नोकर्‍या द्यायच्या म्हटल्यानंतर त्यांना गाशा गुंडाळून महाराष्ट्रात परतावे लागेल. त्यांना इथे त्यांच्या क्षमतेचे काम मिळेल काय?

मराठी माणसाचा विकास म्हणजे त्यांना कंपन्यांमध्ये नोकर्‍या मिळवून देणे एवढीच संकल्पना राज ठाकरे यांच्या मनात असेल तर ही संकल्पना आधी नीट तपासून घ्यायला हवी. नोकरीची मानसिकता सोडून देऊन उद्योगांच्या वाट्याला मराठी तरूणांनी वळायला हवे, यासाठी राज ठाकरेंनीच शिवउद्योग सेना काढली. तो 'उद्योग' बंद पडला आणि हा नवा उद्योग त्यांनी आता सुरू केला आहे. महाराष्ट्रातल्या बहुतांश बड्या कंपन्या अमराठी लोकांच्याच आहेत. असे असताना त्यात आजही बर्‍यापैकी मोठ्या प्रमाणात मराठी लोक काम करतात. हे प्रमाण ८० टक्क्यावर नेण्याने काय साध्य होणार? मुळात मराठी लोकांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल तो कंपनीमालक समाधानी असेल तर तो त्यांची भरती करेलच की त्यासाठी राज ठाकरेंनी सक्ती करण्याचे कारण काय?

राज यांच्या आंदोलनाच्या घेर्‍यात आता इतर भारतीयही आले आहेत, असा त्यांच्या या नव्या घोषणेचा अर्थ आहे. महाराष्ट्राचं भलं करण्याच्या नादात ठाकरे इतर भारतीयांशीही 'पंगा' घेत आहेत, ते चुकीचे आहेत. कारण महाराष्ट्रात कंपनी उघडणारा कोणताही व्यावसायिक सगळे कर शेवटी महाराष्ट्र सरकारला भरतो. त्याचा फायदाही शेवटी मराठी जनतेलाच होतो. उद्या त्या उद्योगात अमराठी कामगार भरले तरी ते रहाणार महाराष्ट्रात, त्यांचा सगळा रहाण्या-खाण्याचा खर्च महाराष्ट्रातच होणार. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीत भर पडणार ना? त्याला विविध सेवा पुरविण्याच्या निमित्ताने मराठी माणसाला प्रत्यक्षाप्रत्यक्ष रोजगार मिळणार ना?

शिवसेनेला मात्र राज यांच्या भूमिकेचा मोठा शह नक्कीच बसणार. कारण मराठी माणसांच्या नोकर्‍यांसाठी शिवसेनेने एकेकाळी काढलेली स्थानीय लोकाधिकार समिती सध्या थंड आहे. सुधीर जोशींनी एकेकाळी जोमाने त्याचे काम केले होते. पण आता तिचे अस्तित्व जाणवत नाही. शिवसेनेचा मराठी माणसाचा बेस उखडून टाकण्यासाठी राज यांनी उचललेले पाऊल राजकीय दृष्ट्या योग्य आहे. पण महाराष्ट्राच्या हिताचे मात्र नाही. महाराष्ट्राबद्दल उद्योजकांत असुरक्षितता निर्माण झाली तर मात्र स्थिती कठीण होईल. आणि महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी चांगले राज्य नाही, असा चुकीचा संदेश जाईल. याचा परिणाम महाराष्ट्राच्या विकासावरच होईल. राज यांनी हे लक्षात घ्यायला हवे ही अपेक्षा.