Sunday, September 20, 2009

वृत्ती- प्रवृत्ती

प्रसंग पहिला

औरंगाबादमध्ये ऑफिसच्या कामासाठी गेलो होतो. तिथल्या टिव्ही सेंटर नावाच्या भागात होतो. हा भाग मुख्य गावापासून तसा बराच दूर आहे. पुन्हा गावात यायचं होतं. डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये काम होतं. जवळच्याच रिक्षा स्टॅंडवर गेलो. तीन-चार जणांच्या कोंडाळ्यातून पन्नाशीच्या वयाचा एक बापुडवाणा चेहरा पुढे आला आणि 'चला साहेब' मी घेऊन जातो म्हणाला. रिक्षात बसलो. रिक्षा आंबेडकर कॉलेजच्या दिशेने निघाली.

वाटेत थोडं फार बोलणं झालं, त्यात रिक्षाचालक मुसलमान असल्याचे जाणवले. आंबेडकर कॉलेज म्हणून सुरवातीला या रिक्षावाल्याने चुकून मराठवाडा विद्यापीठात रिक्षा घुसवली. मला आत शिरतानाच जाणवलं काही तरी चुकतंय. त्यात जोरदार पाऊस सुरू झालेला. त्यामुळे रिक्षावाला बरोबर नेतोय या विश्वासात काही बोललो नाही, पण आत गेल्यानंतर तोही गोंधळलेला दिसला. मग पावसापासून बचावासाठी झाडाखाली उभ्या राहिलेल्या काही जणांना आंबेडकर कॉलेज कुठे आहे विचारलंय. त्यांनी गेटमधून बाहेर पडल्यानंतर शेजारीच कॉलेज असल्याचे सांगितले.

मी रिक्षावाल्यावर आणि स्वतःवरही चरफडलो. कारण बोर्ड मी पाहिला होता, पण त्याचवेळी त्याला सांगितलं नव्हतं. माझ्या चरफडण्यावर रिक्षावाल्याच्या चेहर्‍यावर अजीजी दिसली. 'साहेब, वाचता येत नाही ना म्हणून गलती झाली.' मला उगाचच कसं तरी वाटलं. मग मी त्याला काही बोललो नाही. त्याने आंबेडकर कॉलेजमध्ये रिक्षा नेली. माझं काम अगदी थोड्या वेळाचं होतं. तिथून आणखी एका ठिकाणी जायचं होतं. पाऊसही सुरूच होता. त्या रिक्षावाल्यालाच विचारलं 'थांबणार का?' त्याने हो म्हटलं. त्याला काही पैसे देऊ केले. पण त्याने नाकारले. 'साहेब, तुम्ही या मी इथेच थांबतो,' म्हणून तो तिथेच थांबला. मी काम आटोपून बाहेर आलो. तिथून आम्ही आणखी दोन तीन ठिकाणी गेलो. तिथं त्याला थांबावही लागलं.

शेवटी हॉटेलपाशी येऊन रिक्षा सोडली तोपर्यंत किमान पंधरा-वीस किलोमीटर तरी फिरलो होतो. बिल विचारल्यावर त्याने काही तरी आकडेमोड करून शंभर रूपये बिल झाल्याचं सांगितलं. बिलाचा हिशेब सांगताना रिक्षावाला म्हणाला, 'साहेब, गलतीने विद्यापीठात तुम्हाला घेऊन गेलो. तेवढे पैसे बिलातनं वजा केलेत.' मी त्याच्या त्या बापुडवाण्या पण प्रामाणिकता ओथंबून वाहणार्‍या चेहर्‍याकडे पहातच राहिलो.
------------------------
प्रसंग दुसरा, त्याच दिवशीचा.

औरंगाबादला आलोच आहोत, तर पैठणला एकनाथ महाराजंची समाधी पहावी म्हणून तिकडे गेलो. मंदिर बघितल्यानंतर नाथसागर उद्यानात गेलो. रात्रीचे आठ वाजले होते. नाथांचं गावातलं घर पहायचं होतं. ते पाहून मग स्टॅंडवर येऊन एसटी पकडून औरंगाबादला परतायचा इरादा होता.

उद्यानाबाहेरच एक रिक्षावाला भेटला. तीस रूपये कबूल करून घेऊनच त्याने रिक्षा सुरू केली. जाता जाता त्याची टकळी सुरू झाली. नाथांच्या आयुष्यातील चमत्कार कुठे घडले, कसे घडले याची माहिती सांगू लागला. ते सगळं माहित होतं. पण पहिल्यांदाच ऐकतोय असा चेहरा करून 'बरं, काय म्हणता, बापरे' अशा प्रतिक्रिया देत होतो. जाता जाता रिक्षावाला म्हणाला, 'बरं झालं, तुम्ही आमच्या गाडीत आलात. मुसलमानाच्या रिक्षात बसला असतात तर त्याने तुम्हाला फक्त नेऊन सोडलं असतं. बाकी काही सांगितलं नसतं. त्यांना फक्त धंद्याशी मतलब.'
'मुसलमान रिक्षावाले आहेत इथे?' मी विचारलं.
'तर, भरपूर आहेत. पण नाथसागर गार्डनला आम्ही त्यांना येऊ देत नाही. इथे सगळे हिंदू रिक्षावाले आहेत. गावात रिक्षा फिरवणार्‍यात मुसलमान आहेत.' त्याने माझ्या माहितीत भर घातली.
'आपल्या धर्माचं त्यांना काय माहित. फिरवायचं म्हणून ते फिरवतात,' त्याने मुक्तपणे आपली मतं उधळली.
मी 'हं' म्हणत होतो.

नाथांच्या वाड्यात गेल्यानंतर त्यांच्या देवघराचं दर्शन घेतलं. तिथेच त्या वाड्यात नाथांचे वंशज रहातात. त्यातले बाराव्या आणि तेराव्या पिढीचे वंशजही भेटले. दोघेही वृद्ध होते. त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी एकूणच नाथांविषयी आणि वंशजांविषयी माहिती दिली. आम्हाला बरं वाटलं. रिक्षावालाही बरोबरच होता. 'तुमच्यामुळे मला पण ही माहिती मिळाली. एरवी ही माणसं भेटत नाहीत,' असं म्हणून त्याने आमच्या अंगावर उगीचच मूठभर मांस चढवलं.

दर्शन आटोपल्यानंतर जवळच नवनाथांच्या तपर्श्चर्येची जागा आहे, तुम्हाला दाखवतो, असं म्हणून त्याने आम्हाला तिथे नेले. तिथे खाली छोट्या गुहांमध्ये नवनाथांच्या मूर्ती तयार करून नऊ ठिकाणी ठेवल्या होत्या. आम्ही आडवे तिडवे होऊन त्या गुहांमध्ये उतरून प्रत्येक नवनाथाचं दर्शन घेत होतो. खूप भाविक असल्याचं 'बेअरींग'ही सांभाळून होतो. गेल्या गेल्या रिक्षावाल्याने पुजार्‍याला बोलवून त्याच्या 'उत्पन्ना'ची सोय केली होती. त्यामुळे दानपेटीत पैसे टाकणंही आलंच होतं. आम्ही भराभर दर्शन घेऊन तिथून अखेर निघालो. स्टॅंडवर येऊन औरंगाबादची गाडी पकडायची होती.

जाता जाता रिक्षावाला म्हणाला, 'सगळ्या नाथांनी इथेच येऊन तपर्श्चर्या केली. फार पवित्र स्थान आहे हे. तुमचं भाग्य म्हणून तुम्ही आज इथे आलात आणि मला भेटलात.' आम्हाला हे दर्शन घडविण्याचे श्रेयही त्याने स्वतःकडे घेऊन टाकले होते. रिक्षा स्टॅंडवर पोहोचली आणि खिशात हात घालून पैसे किती म्हणून विचारलं. त्याने आकडा फेकला 'ऐंशी रूपये'. मी त्याच्याकडे पहातच राहिलो.

म्हटलं, अहो, आपण चार किलोमीटरही फिरलो नाही. आणि ऐंशी रूपये?
तो म्हणाला, 'साहेब, रात्रीच्या वेळी एवढ्या लांब कुणी येत नाही. तुम्हाला बरंच फिरवलं की. शिवाय वेटींगही आहेच ना.'

मी चकीतच झालो. चरफडत ऐंशी रूपये त्याच्या हातावर टेकवले आणि समोर उभी असलेली औरंगाबाद गाडी पकडली. जाता रिक्षावाला म्हणाला, 'साहेब ओळख ठेवा. कुणाला घेऊन औरंगाबादला आला तर आपल्या रिक्षातच या'.

त्याला उत्तर देण्यासाठी माझ्या चेहर्‍यावर काही भावच उरले नव्हते.

No comments: