Sunday, September 20, 2009

वाहतुकीची 'यातायात'

महाराष्ट्रात रहात असल्याचा आपल्याला अभिमान असणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्राची संस्कृती, तिथली परंपरा, तिथली प्रगती, सुव्यवस्था, (पैसे खाल्ले जात असलं तरी) जपलं जाणारं कायद्याचं राज्य वगैरे वगैरे आपल्या अभिमानाची ठळक स्थळं असतात. ही सगळी अभिमानस्थळं किती सार्थ आहेत, हे महाराष्ट्रात राहून नाही कळत. त्यासाठी महाराष्ट्राबाहेर पडावं लागतं. दक्षिणेतलं माहित नाही. पण उत्तरेत गेल्यानंतर तर हा अभिमान रास्त नसून अत्यंत योग्य असल्याचा भाव आपोआप मनी दाटायला सुरवात होतो.

सध्या अस्मादिकांचं वास्तव्य इंदूर शहरात आहे. एरवी इंदूरची आपल्याला ओळख खवय्यांच शहर असं आहे. शिवाय तिथं असलेल्या मराठी मंडळींमुळे आपल्या मनात त्याच्याविषयी एक हळवा कोपरा आहे. पण इंदूरच्या मराठी संस्कृतीवर 'हावी' झालेली हिंदी संस्कृती पाहिली की मग मात्र, तोपर्यंत चढलेला अंमल खाडकन उतरतो.

हे शहर मध्य भारतातल्या शहरांमधलं मोठं शहर आहे. २५ लाखांपर्यंत वस्ती आहे. पण नियम, कायदा या बाबी कशाशी खातात, हे इथल्या लोकांना अजिबात 'ठाव' नाही. इंदूरमध्ये गाडी चालवणं म्हणजे किती 'यातायात' असते ते गाडी चालवल्याशिवाय कळत नाही. कदाचित म्हणूनच 'पुलं'नी म्हटल्याप्रमाणे हिंदीत वाहतुकीला 'यातायात' म्हणत असावेत, हे शंभर टक्के पटतं.

महाराष्ट्रात तुम्हाला वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय असेल तर इंदौरमध्ये ( हा इथला उच्चार) गाडी चालवताना चुकूनही त्या फंदात पडू नका. अन्यथा समोर दिसलेला लाल दिवा पाहून तुम्ही गाडी थांबवलीत तर तुम्हाला मागच्या गाडीने उडवलं म्हणून समजा.

इथे शुभ्र वाटणारा असा शर्ट, निळी पॅंट आणि निळी टोपी असलेले, ज्यांना वाहतूक पोलिस की कायसं असं म्हणतात, ते लोक दिनवाण्या चेहर्‍यानं रंगनिदर्शक दिव्याखाली ( सिग्लन) किंवा कुठल्याही रस्त्याच्या आडोशाला उभे असतात. वाहतुक सुरळीत करणे आणि ती शिस्तीत बसवणे ही कामे आपली नाहीत बॉ अशी त्यांची ठाम समजूत असते. त्यामुळे ते त्या भानगडीत पडत नाहीत.

माझ्या एका महाराष्ट्रातून आलेल्या मित्रानं एकदा सिग्नल पडल्यावर गाडी थांबवली, तसे इथले पोलिसकाका धावत आले आणि 'साब, गाडी मत रूकाना. आते आते दिया लाल हुआ तो भी निकल जाने का. नही तो पीछेसे आनेवाली गाडी आपको उडा दे सकती है' असे सांगून नियम पाळण्याचा आगाऊपणा करू नका असे अप्रत्यक्षणे सांगत निघून गेले.

विशेष म्हणजे एका चौराह्यावर (चौकात) चार चार असे पोलिस असूनही त्यांचा अजिबात 'दाब' पडत नाही. त्यांना फाट्यावर मारून लोक सर्रास सिग्नल तोडून धुर्राट पुढे निघून जातात. रस्ता हा आपल्या 'तीर्थरूपांनी' आपल्याला दिला आहे, अशी या सर्व प्रकारच्या वाहनचालकांची ठाम समजूत असते. वाहतूक पोलिस आपल्या (उघड्या) डोळ्यांदेखत हे सारे काही निर्ममपणे पहात असतो. या पोलिसांची दादागिरी चालते ती सायकलस्वारांवर 'ए पीछे जा साले' इथपर्यंत ते त्याला दम देतात.

आपल्याकडे पोलिस खात्याच्या आणि स्वतःच्याही निधीत भर घालण्याचा जो उद्योग पोलिसकाका करत असतात, तो सहसा इथे दिसत नाही. कदाचित त्यामुळेही शिस्त बसत नसावी. तसे केल्यास त्यांना फाट्यावर मारणारी 'जन्ता'ही इथे आहे. त्यामुळे पोलिसही त्या भानगडीत पडत नसावेत. त्यांचा हा उद्योग चालतो तो हायवे परिसरात. एरवी मुख्य शहरात तरी असे चित्र पाहण्यास मी उत्सुक आहे.

माझी महाराष्ट्र पासिंगची गाडी घेऊन मी बिनधास्त शहरभर हिंडत असतो. गेल्या दहा महिन्यात माझं एकदाही लायसन्स तपासलं गेलं नाही. गाडीची कागदपत्र तपासली गेली नाहीत. मुद्दाम पोलिसासमोर गाडी नेऊनही पाहिली, तरीही त्या दयाळू इसमांनी गाडीकडं ढुंकूनही पाहिलं नाही.

एकूणच इथल्या वाहतुकीच्या परिस्थितीमुळे अपघाताचं प्रमाण बरंच आहे. इथल्या नई दुनियाचं पहिलं पान उघडून आत शिरलं की सगळ्या अपघाताच्या बातम्या दिसतात. नियम न पाळणार्‍या इथल्या लोकांवर सुरवातीला खूप संताप यायचा. पण हळू हळू मी तो संताप कमी केला आणि किमान वैयक्तिक नियम पाळायचं ठरवलं. पण त्याचेही अनुभव उलटे आले. आता सिग्लन सुटल्यानंतरही बिनदिक्कतपणे गाडीस्वार पुढे जातात हे पाहिल्यावर जीवाच्या भीतीपोटी का होईना माझाही पाय हल्ली एक्सलेटर कधी दाबतो ते मलाही कळत नाही.

No comments: