Sunday, September 20, 2009

संवादाचा सुवावो ढळे



ज्येष्ठ साहित्यिक, प्रख्यात वक्ते आणि संत साहित्यासह संस्कृत साहित्याचेही गाढे अभ्यासक राम शेवाळकर यांच्या निधनाची बातमी कळाली नि गलबलून गेलो. शेवाळकर नाशिकला नित्य यायचे. नाशिकच्या देशदूत या वृत्तपत्रातर्फे सारडा व्याख्यानमाला होते. त्यात शेवाळकरांचे व्याख्यान ठरलेले असायचे. एकदा या व्याख्यानमालेत त्यांचे ज्ञानेश्वरीवरच्या एका अध्यायावरचे ओजस्वी निरूपण ऐकले नि प्रचंड प्रभावीत झालो. हा माणूस 'ग्रेट' आहे, एवढे जाणवले. पुढे 'मोगला फुलला' ही ध्वनिफित ऐकली नि ज्ञानेश्वरीच्या एकेका ओवीवरचा त्यांचा अभ्यास, त्यातल्या प्रत्येक शब्दाची केलेली फोड आणि त्याचा त्यांनी सांगितलेला अर्थ पाहून चकीत व्हायला झालं. या माणसाकडे किती नि काय काय भरलं आहे, याची जाणीव झाली नि मन त्यांच्याविषयीच्या नम्रतेने भरून गेले.



इंदूरला आल्यानंतर गेल्या वर्षी इथल्या महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे कार्यक्रम झाला. ज्ञानेश्वरीवरचेच निरूपण होते. पण हॉल तुडुंब भरला होता. लोकही अतिशय श्रद्धेने आणि लक्षपूर्वक ऐकत होते. तीन दिवस हा शब्दसोहळा चालला. या काळात त्यांना भेटायचं होतं, असं ठरवलंच होतं. एका कार्यक्रमानंतर थेट स्टेजवर गेलो नि माझा परिचय दिला. त्यांनी माझं नीट ऐकून घेतलं. मग मला शेजारीच बसवून घेतलं. हा अनौपचारिकपणा फारच भावला. मग एखाद्या मित्राशी गप्पा माराव्यात तसं बोलायला सुरू केलं. विषय मराठी भाषेचाच निघाला. हिंदी प्रांतात मराठी बोलणार्‍यांविषयी त्यांना खूप आस्था वाटली. मराठी कशी टिकतेय हे दाखवून ते म्हणाले, मराठीच्या मृत्यूची भीतीबिती बाळगायचं काही एक कारण नाही. ही सगळी शहरी भूतं आहेत. अशा बातम्या फक्त शहरात चर्चिल्या जातात. ग्रामीण भागात हीच भाषा प्रभावी नि प्रवाहीपणे बोलली जातेय. शहरात भाषक संक्रमणामुळे त्यात अनेक शब्द जोडले जात आहेत. पण शहरात अस्सल ग्रामीणपणा लेवून ही भाषा बोलली जातेय.'

इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढत असल्याचा विषयही मग निघाला. ते म्हणाले, 'इंग्रजी शिकण्याची धडपड शहरी भागातच आहे. ही सगळी प्रतिष्ठेची धडपड आहे. नोकरी मिळविण्यासाठी इंग्रजी आवश्यक आहे, या भावनेतून इंग्रजीत शिक्षण घेण्याचा प्रकार वाढत चालला आहे. थोडक्यात काय तर इंग्रजी हे चांगली नोकरी व पर्यायाने उच्च रहाणीमान मिळविण्याचे साधन आहे. नोकरी मिळवून देण्यात मराठीला मर्यादा आहेत, हे खरे. पण केवळ त्यामुळे इंग्रजी स्वीकारून मराठीला लाथाडणे योग्य नाहीये. त्यांचा विरोध इंग्रजी शिकण्याला नव्हताच.

हाच धागा धरून मी बोलता बोलता हळूच वैयक्तिक विषय काढला. म्हटलं मी सध्या इथं रहातोय. पण उद्या पुन्हा महाराष्ट्रात गेलो तर मुलीला कोणत्या माध्यमाच्या शाळेत घालायचं हा प्रश्न मला नि माझ्या बायकोला पडलाय. या विषयावर खल करून नि पुष्कळ वाचून आमचाच गोंधळ झालाय. काय करू? माझ्या खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले, हे बघ, तुम्ही घरात कोणती भाषा बोलताय यावर अवलंबून आहे. घरी मराठीतच सगळे व्यवहार चालत असतील तर तिची शाळा इंग्रजीत असल्याने काहीही फरक पडत नाही. शेवटी इंग्रजीच्या शिक्षणाने तिला नोकरी मिळणार असेल तर ती भाषा शिकलीच पाहिजे. पण घरात सर्व व्यवहार मराठीत हवेत. त्यामुळे ती मराठीपासूनही दूर जाणार नाही.' बोलता बोलता त्यांनी मला वाट दाखवून दिली होती.

मग मी नाशिकचा म्हटल्यावर विषय कुसुमाग्रजांचा निघाला. कुसुमाग्रजांविषयी त्यांना खूप ममत्व. त्यांच्या प्रेमापोटी ते अनेकदा नाशिकला येत होते. त्यांच्या काही आठवणीही सांगितल्या.

पुढे त्यांना एका स्थानिक लेखक स्नेह्याची घरी जायचं होतं. त्यांना चालायला अडचण होत होती. म्हणून माझ्या खांद्यावर हात ठेवत ते सावकाश गाडीत जाऊन बसले.

त्या पुसट होत जाणार्‍या गाडीकडे मी निवांतपणे पहात बसलो. दहा मिनिटांचा हा सहवास माझ्यात काही चैतन्य सांडून गेला. समुद्राच्या पाण्याचे चार शिंतोडे जणू अंगावर पडल्यासारखं वाटलं. एरवी स्पर्श या भावनेविषयी आपण किती कोरडे असतो. पण त्यांचा स्हेनल स्पर्श मला झालाय ही भावनाच मला खूप दिवस पुरून उरली. आज त्यांच्या निधनाची बातमी ऐकली नि माझ्यात सांडलेलं त्यांच्या स्पर्शाचं चैतन्य जागं झालं. 'हात आपसूकच संगणकाकडे वळला. 'मोगरा फुलला' लावलं नि त्यांच्या चिरपरिचित आवाजाचा स्पर्श कानात अल्लद शिरला.

रामभाऊ गेले तरी त्यांचं चैतन्य कायम आहे. ते सगळ्यांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारात सांडलंय. पुस्तकात. आवाजात. गाण्यात. निरूपणात. आणखी कशाकशात. त्यातला एक कण माझ्यातही आलाय.


श्रीमंती यापेक्षा काही वेगळी असते का?

No comments: