Sunday, September 20, 2009


शासनाच्या प्रौढ शिक्षण योजनेचे कसे धिंडवडे निघाले याचे वास्तव उपरोधिक शब्दांत मांडणारी रमेश इंगळे- उत्रादकरांची 'निशाणी डावा अंगठा' ही कादंबरी प्रचंड गाजली. या कादंबरीवर चित्रपटही नुकताच प्रदर्शित झाला असून तोही तुफान गर्दी खेचतो आहे. कादंबरीत शब्दांत पकडलेले वास्तव दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डेंनीही चित्रपटातही त्याच ताकदीने खेचून आणल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. या पार्श्वभूमीवर या कृतीचा मूळ कर्ता असलेल्या रमेश इंगळे-उत्रादकर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि या कादंबरीचा चित्रपटापर्यंतचा आणि त्यानंतरचाही प्रवास जाणून घेतला....




कादंबरी ते चित्रपट हा प्रवास कसा झाला?

रमेश इंगळे- ही कादंबरी २००५ मध्ये आली. ती खूप गाजली. वाचकांच्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या. मग नाटक, सिनेमात काम करणार्‍या मंडळींनी वाचली. मग या कादंबरीवर नाटक, सिरियल, चित्रपट करण्यासाठी फोन येऊ लागले. पण मला यातला काही अनुभव नव्हता. एके दिवशी पुरूषोत्तम बेर्डे यांचा फोन आला. त्यांची प्रतिक्रिया अतिशय उत्स्फूर्त होती. ते म्हणाले, चित्रपट करावासा वाटेल अशी कथा बारा वर्षे वाट पाहूनही मला मिळाली नव्हती. पण आता तुमच्या कादंबरीवर चित्रपट करून मी हा बारा वर्षांचा उपवास मोडतो.' ही प्रतिक्रिया व्यक्त करून त्यांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मला मुंबईला येणे शक्य नसल्यास, त्यांनी बुलढाण्याला येण्याची तयारी दर्शवली. त्यांच्या या उत्कट आत्मीयतेने मला त्यांना चित्रपटाचे हक्क द्यावेसे वाटले.


शुटींग सुरू असताना तुमची भूमिका काय होती?

रमेश इंगळे- एकदा हक्क दिल्यानंतर मात्र मी चित्रपटात कोणताही हस्तक्षेप केला नाही. कोणत्याही सूचना दिल्या नाहीत संहिता दिल्यानंतर मी अंग काढून घेतले. दिग्दर्शकाच्या मनात ज्याप्रमाणे हा चित्रपट असेल तसा तो होईल, हेच धोरण ठेवले. फक्त शुटींगपूर्वी एक गोष्ट मी त्यांना सांगितली होती, की ही कादंबरी विनोदी नाही. यात उपहासातून आलेला विनोद आहे. तो वेगळा आहे. त्यामुळे त्याची काळजी शुटींग करताना घ्यावी असे स्पष्ट केले होते. त्यांनीही त्याबरहुकूमच तो चित्रित केला.

कादंबरीच्या तुलनेत चित्रपट पडद्यावर कसा उतरला आहे?

रमेश इंगळे- कादंबरी ही संहिता आहे आणि चित्रपट हे वेगळं माध्यम आहे. या माध्यमाची म्हणून काही ताकद आणि मर्यादाही आहे. शिवाय या माध्यमाच्या काही गरजाही वेगळ्या आहेत. त्यामुळे जशीच्या तशी कादंबरी चित्रपटात येणे शक्य नाही. त्यात जुजबी बदलही करण्यात आले आहेत. तरीही नव्वद टक्के कादंबरी चित्रपटात नक्कीच पहायला मिळते. शिवाय ही कादंबरी पडद्यावरही चांगली साकारली गेली आहे. कादंबरी वाचलेल्यांनीही तशाच प्रतिक्रिया माझ्याकडे दिल्या आहेत. या चित्रपटातली सगळी पात्रे मुखवटा घेऊन वावरतात. त्यांचं जगणं खोटं आहे. पण ते जगण्याच्या नादात खोटं नि खरं जगणं मिसळून गेला आहे. खोट्यालाच ती खरं समजू लागली आहेत. खरं आणि खोट्यातलं द्वंद्व मी मांडलं होतं, ते पडद्यावरही तसंच साकारलं आहे. आज प्रत्येक जण मुखवट्याआड हरवून गेलाय. तोच चेहरा नि मुखवट्याचा खेळ या चित्रपटातही आहे.

कादंबरीला नायक नाही, पण चित्रपटाला मात्र नायक लागतो. इथे काय परिस्थिती आहे?

रमेश इंगळे- नाही. या कादंबरीला नायक नाही, तसाच चित्रपटालाही नाही. यात कुणा एका पात्राला महत्त्व नाही. यात परिस्थिती मध्यवर्ती आहे. नायकत्व द्यायचेच झाले, तर साक्षरता अभियानाला देता येईल किंवा ती राबविणार्‍या यंत्रणेला देता येईल. रूढार्थाने यात नायक नाही. त्यामुळे तोच न्याय पडद्यालाही लागू पडतो. यातली पात्रे ही सुद्धा प्रातिनिधिक आहे. यातला 'पुवेका' डुकरे म्हणजे तमाम कार्यकर्ता शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारा आहे. भाऊसाहेब हे तमाम हेडमास्तरांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. या पात्रांवरच कथा पुढे सरकते. यातल्या कुठल्याही पात्राला मोठं करणं हा कादंबरीचा हेतू नव्हताच. सहाजिकच तोच न्याय चित्रपटालाही लागू आहे.

या कादंबरीच्या विनोदातला उपरोध पडद्यावर आलाय की हरवलाय?

रमेश इंगळे- लेखक शब्दांच्या माध्यमातून मांडतो. वाचतांना त्या शब्दांचे मनोचित्र उमटते. पडद्यावर या शब्दांना दिग्दर्शकाने मांडलेल्या प्रतिमांमध्ये पहावे लागते. शिवाय पडद्यावर अनेक गोष्टींचा मेळही साधावा लागतो. पण ही सगळी तडजोड करूनही हा सिनेमा टिपीकल 'विनोदी' सिनेमा झालेला नाही. चित्रपट पहातानाही या अभियानातील वास्तवतेमुळे जाणवणारी सल बोचत रहाते. अस्वस्थ करते. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरही अशा अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. या सिनेमात विनोद महत्त्वाचाच आहे, पण त्या विनोदात उपरोध घसरण्याची शक्यता होती. पण तसे झाले नाही. दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे यांनी या कादंबरीला पूर्ण न्याय दिला आहे.

चित्रपटातील गाणी कशी वाटली?

रमेश इंगळे- या चित्रपटाता गाणी टाकण्यासंदर्भात मी आधी साशंक होतो. कारण पारंपरिक गाणी यात चालूच शकत नाहीत. पण दिग्दर्शकाने ती जबाबदारी संदीप खरे व सलील कुलकर्णी या जोडगोळीला सोपवली आणि त्यांनी चांगली गाणी केली. या कादंबरीतील शाब्दिक अवकाशाचा योग्य उपयोग करतच त्यांनी गाणी लिहिली. त्यामुळे ती उपरी, चिकटवल्यासारखी वाटत नाहीत. ती कथानकाला पुढे नेतात.

तुम्ही स्वतः कवी आहात, मग तुम्ही गाणी का लिहिली नाहीत?

रमेश इंगळे- संदीप खरे आणि सलील कुलकर्णी ही आघाडीची जोडगोळी आहे. सुस्थापित आहे. त्यांचे परस्परांशी ट्युनिंगही चांगले आहे. त्यामुळे दिग्दर्शकाने त्यांची निवड केली. माझ्या डोक्यात काही असा विचार आला नव्हता. पण कदाचित लिहायला सांगितली, असती तर मी गाणी लिहिली असती.

आता पुढे काय?

रमेश इंगळे- पहिल्या कादंबरीत मी वास्तव मांडलं. हे वास्तव विदारक होतं. अस्वस्थ करणारं होतं. त्यामुळे लोकांना भावलं. संदेश हा शब्द फार मोठा होईल, पण त्यात लेखक म्हणून मी जी भूमिका घ्यायला हवी होती, ती घेतली नाही. ते राहून गेलं होतं. आता म्हणूनच मी त्याच विषयावर दुसरी कादंबरी लिहितोय, त्यात हे राहून गेलेलं सारं असेल.

No comments: