Sunday, September 20, 2009

बदलाबदली!

बदल हा माणसाचा स्थायीभाव आहे. बदलतो तो माणूस. बदलला म्हणून माणूस इथवर पोहोचला. असली बदलाबदलीची वाक्ये ऐकून, वाचून कान आता किटले नि डोळे विटले आहेत. अस्मादिक 'ठेविले अनंते तैसेचि रहावे' या तुकारामी प्रवृत्तीचे. त्यामुळे बदलाचं वारं काही झेपत नाही. मग तो बदल वैयक्तिक असो की सार्वजनिक. वैयक्तिक बाबतीत लिहायचं तर, अगदी हाफिसमधली जागा असो, खुर्ची असो, कम्प्युटर असो की आणखी काही. यातलं काही काही बदललेलं चालत नाही. मालकाने पैसे मोजून ठेवून घेतलं असलं तरी या 'ठेविले अनंते' वृत्तीचा माज मात्र त्याला सहन करावाच लागतो. कारण माझ्याकडून होणार्‍या कामातूनच त्याला 'चित्ती समाधान' लाभत असतं. पण हाफिसातली ही मिजास सगळीकडे चालत नाही. असो.

...तर नमनाला घडाभर तेल घालण्याचं कारण काय ते पहिल्याछूट सांगतो. पण त्यासाठीही आणखी थोडं तेल सांडावंच लागेल.

तर सांगायचा मुद्दा असा की तुम्ही घरात गेलात आणि भिंतीवरचे घड्याळ अचानकपणे दुसर्‍या भिंतीवर पाहुणे म्हणून गेले की त्या दिवशी हमखास मान भूमितीत शिकलेल्या सगळ्या कोनात फिरते की नाही? नाष्ट्याला पोहे देऊन सौभाग्यवती अंघोळीला निघून जातात नि चमचा द्यायाच विसरतात. मग खाण्यासाठी खुणावत असलेल्या पोह्यांसाठी चमचा शोधण्याची शर्यत सुरू होते. नेहमीच्या जागेवर हात घालूनही तो सापडत नाही, पण त्या गाफिल क्षणी संधी साधून तिथे ठेवलेली किसणी हमखास टोचते की नाही? घाईघाईत कपाटात मोजे घालण्याच्या कप्प्यात हात घातला जातो नि तिथे पुजेसाठी ठेवलेल्या टोप्या सापडतात की नाही? अंघोळीला जाण्यासाठी बाथरूममध्ये शिरणार तोच टॉवेल घ्यायचं लक्षात येतं. नि टॉवेलच्या जागेवर हात जातो नि तिथे हातरूमाल सापडतात. हे सारं तुमच्याही आयुष्यात नक्कीच घडत असेल. माझ्याही घडतं. पण माझ्याकडे तुमच्यापेक्षा एक टक्का तरी नक्कीच जास्त घडतं. पण ही टक्केवारी नेमकी किती हे बरीक आता तुम्हीच ठरवा.

तसं आमचं स्वतःचं 'अंग' कोणत्याही बदलाला दाद न देणारं. कारण बदल म्हटला की हालचाल आली. हालचालीसाठी चापल्य हवे ते आमच्या शरीराला नि स्वभावाला शोभत नि सोसवतही नाही. पण आमचं 'अर्धांग' मात्र प्रचंड चपळ. बदबदलीच्या या खेळात प्रचंड तरबेज. चापल्य हा मुल स्वभाव असल्याने इथून तिथे, तिथून इथे हा स्वस्वभाव वस्तूंमध्येही उतरविण्यात तिचा हात मीही (चापल्याअभावी!) धरू शकलेलो नाही. म्हणूनच आमच्या घरात कोणतीही गोष्ट ३६५ काय दिवसभरात एका ठिकाणी राहिल तर शपथ.

म्हणूनच, स्थलांतर, स्थानांतर, निर्वासित, विस्थापित, स्थानभ्रष्ट या शब्दांचा खरा अर्थ लग्न झाल्यानंतरच कळला. कारण हाफिसातून परत येईपर्यंत आमच्या घरातल्या अनेक वस्तूंनी आपली जागा सोडलेली असते. भिंतीला टेकून असलेलं टेबल अवचितपणे दुसर्‍याच कुठल्या भिंतीशी गुलुगुलू बोलू लागतं. दरवाजालगतचा टिव्ही अगदी विरूद्ध दिशेला कुठल्याशा भिंतीच्या आधाराने टेकवला जातो. दिवाणखान्यातल्या भिंती सजवत असणारी चित्रे अचानक तिथून गायब होतात नि भलत्याच भिंतीची शोभा वाढवतात. कुठल्याश्या टेबलाखालची पुस्तके बैठकीच्या खालच्या जागी विराजमान होतात. नि बैठकी खालच्या वस्तू टिव्ही खालच्या कपाटात विस्थापित होतात. संध्याकाळी घरी आल्यानंतर आपण आपल्याच घरात शिरतोय की दुसर्‍याच्या असा प्रश्न पडावा इतकं घराचं रूपडं बदललेलं असतं.

कपाटातले माझे कपडे जागा सोडून भलत्याच कप्प्यात घुसतात. कम्प्युटरखाली सीडी ठेवलेल्या खणात अनेकदा सुईदोरा नि लेकीची खेळणी सापडतात. कपाटातले कपडे भिंतीतल्या कपाटात कोबंले जातात नि इतर वस्तू कपाटात शिरतात. कपबशींची कोणीही वटवट न करता जागा बदलून त्याच मांडणीत जाऊन टेकतात. चमचे, पेले ताटल्या, वाट्या कोणतीही किणकिण न करता गुमान जिथे जातील तिथे सुखी रहायचा प्रयत्न करतात. पाण्याची पंचपात्री खळखळ न करता ओट्यावरून खाली जाते, तर कधी प्रमोशन होऊन ओट्यावर येते. ओट्याच्या खालच्या वस्तू मांडणीत शिरतात, तर मांडणीतल्या वस्तू देवघरातल्या मांडणीत व्याप्त होतात. बाथरूममधल्या साबणाची जागाही अशा शिताफीने बदलली जाते की अंघोळीला गेल्यानंतर तो शोधण्यात अर्धा तास जावा. साधा नेहमी मांडणीत सापडणारा चमचा घ्यायला कधी कधी 'साष्टांग नमस्कार' घालून ओट्याच्या खालून मोठ्या मुश्किलीने काढावा लागतो. वाकण्याची इच्छा\ ताकद\ क्षमता संपलेल्या आमच्या उदरावर वाढलेल्या अंमळशा तनूला तो अतिरिक्त भारही सोसवत नाही. आणि त्यामुळेच कपाळावरची शीर त़डतडून विचारलेल्या 'चमचा इतक्या खाली का ठेवला? या प्रश्नाला 'वाढलेली तुंदीलतनू'ला व्यायाम नको का? असे फणकार्‍याने भरलेले उत्तर आल्यानंतर आपलाच अनमान कोण बापडा पुरूष करून घेईल?

कधी कधी या बदलाबदलीच्या खेळाला अस्मादिकांच्या उपस्थितीतच सुरवात होते. रविवारचा दिवस नेमका निवडून त्याच दिवशी काही 'उलथापालथ' करण्याचा बायकोचा जाव असतो. पण 'चला चला आपल्याला बाहेर जायचंय' असं सांगून मी तो अनेकदा उधळून लावतो. पण आमच्या आयुष्यातला सूर्य प्रत्येकवेली पूर्वेलाच उगवतो असे नाही.
'आता कशाला बदला बदली'? मी निषेधाचा क्षीण सुर काढण्याचा प्रयत्न करतो.
'अहो, बदल केल्याने घर नवीन वाटतं. तोच तोच पणा निघून जातो. छान वाटतं.' बायको मुद्दा रेटून नेते.
मी इतर काही निषेध सूर काढण्याचा प्रयत्न करतो. पण बायकोपुढे ते सारे सूर थिजून जातात. नि बदलाबदलीच्या या खेळात मीही 'उचल्या'ची भूमिका पार पाडतो. अशा खास दिवशी छोट्या वस्तूंची बुडे फारशी हलत नाहीत. अस्मादिकांच्या शरीरयष्टीच्या प्रमाणानुसार वस्तूंच्या हालचाली होतात.

त्या दिवशी आमचा पलंग नेहमीची जागा सोडतो नि खिडकीकडशी लगट करायला जातो. ताटकळलेल्या पाठीने उभे असलेले कपाट दुसर्‍या एखाद्या भिंतीला जाऊन टेकते. कम्प्युटर नेहमीच्या टेबलाला सोडचिठ्ठी देतो. घरातल्या तमाम डब्यांना माझा हस्तस्पर्श होऊन ती स्थलांतरीत होतात. माळ्यावरची पुस्तके खाली येतात, खालची पुस्तके माळ्यावर जातात. लेकीची खेळणीची फरफट होत ती कुठल्याशा कोपर्‍यात जाऊन व्यापतात. टिव्हीखालच्या कपाटातल्या वस्तू बाहेर निघतात नि पलंगाखाली जातात. बेडरूममधल्या भिंतीतल्या कपाटावरीच बोचकी खाली येतात नि दिवाणखान्याच्या माळ्यावर चढून बसतात. बेडरूममधल्या कपाटावरच्या बॅगा खाली येतात नि पलंगाखाली जातात. पलंगाखालच्या बॅगांमधल्या वस्तू कपाटात दडवल्या जातात.

बदलाबदलीच्या या खेळाने माळ्यावरची मंडळीही हडबडून जातात. तीही कधी कधी निर्वासित होतात. माळ्यावरची भांडी वापरात येतात किंवा त्यांच्या 'निरूपयोगी' 'राखीव' क्लबमध्ये कुणाची भर पडल्याने आनंदितही होतात. खाली-वर करण्याच्या या नादात मग कुठलीशी घरातल्या घरात हरवलेली वस्तू सापडते नि तिच्या आठवणींचे कढ निघतात. (या कढांना 'सासर', 'माहेर' असे संदर्भ असल्याने हे कढ 'बाय डिफॉल्ट' आपल्यासाठी त्रासदायकच असतात.) बदलाच्या या वार्‍यात घरातल्या रद्दीची पानेही फडफड करतात. कुणाच्या वडापावचा आधार बनणारी आमच्या घरची रद्दीही या घरातली आपली नेमकी किंमत जाणून स्थानभ्रष्ट होते. तिचे स्थान कधी रद्दीवाल्याच्या गाडीवर तर कधी घरातलीच एखादी कोपर्‍याची जागा असते.

बदलाबदलीच्या या सगळ्या गोंधळात विस्थापित झालेल्या त्या वस्तूंना काय वाटत असेल या गोष्टींनी मी उगाचच गहिवरून जातो. सुखासुखी कुणी जागा सोडून जात नाही. स्थलांतरीतही होत नाही. कुठलीशी कारणं अवचित समोर येतात नि स्थानभ्रष्ट व्हायला भाग पाडतात. अध्यात्मिक भाषेतच बोलायचं तर नियतीच्या पटावर कुणी तरी हलविणारा आपल्याला हलवतो, हलायला भाग पाडतो नि आपण आपली जागा सोडतो. इथे तीच नियती बनून आपणही या वस्तूंच्या बाबतीत तेच करतो. इकडे तिकडे हलताना आपणही जागा सोडतो. कधी स्थलांतरीत, कधी निर्वासित, कधी विस्थापित नि मग हळूहळू स्थापितही होत असतो. आपल्या भावनांचा आपण इतका विचार करतो, मग या मुक्या वस्तूंना भावनेचं इंद्रिय फुटलं तर त्यांच्या भावना काय असतील? फार हळहळायला होतं. स्वतःची मुळं उपटून रूजवणं खरोखरंच अवघड. पण बदल हा स्थायीभाव आहे नि तो स्वीकारला पाहिजे म्हणून हे हळवेपण बाजूला ठेवून मी व्यवहारात उतरतो. नि निमूटपणे बायकोच्या हाताला हात लावून या बदलाबदलीच्या मोहिमेस 'मम' म्हणतो.

No comments: