Tuesday, January 5, 2010

इक पल तो हमे जीने दे जीने दो


*डोंबिवलीच्या नेहा सावंत या मुलीला नृत्याची विलक्षण आवड होती. अनेक स्पर्धात भाग घेऊन तिने बक्षिसेही मिळवली होती. बुगी वूगी या टिव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रमातही तिचा नाच झाला होता. पण अभ्यासाकडे दुर्लक्ष होते म्हणून तिच्या पालकांनी तिचा क्लास बंद केला आणि त्याचा राग आलेल्या नेहाने गळफास घेऊन जीवन संपवले.

*शेजारच्या दादरमधील शारदाश्रम या प्रसिद्ध शाळेत शिकणार्‍या सुशांत पाटील या सातवीतल्या विद्यार्थ्याने चार विषयात नापास झाल्याची नामुष्की सहन न झाल्याने शाळेतच टॉयलेटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

* नवी मुंबईतील डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयात फिजिओथेरेपीच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या पवई येथील वैजंत्री बुटेंद्रसिंग गुलेर या २० वर्षीय विद्यार्थिनीने रविवारी सकाळी गळफास घेवून आत्महत्या केली. मी ९० टक्के मार्क मिळवू शकले नाही, असे तिने भिंतीवर लिहून ठेवले होते. ती दोन विषयात नापास झाली होती.


जच्या शिक्षण पद्धतीविषयी मार्मिक भाष्य करणारा आमिर खान अभिनित '३ इडियट्स' हा चित्रपट प्रदर्शित झालेला असतानाच मुंबईत तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडावी हा दुर्देवी योगायोग म्हणावा लागेल. खरं तर या चित्रपटात याच विषयावर इतके नेमके भाष्य करण्यात आले आहे की वेगळे काही सांगायची गरज भासू नये. आमिरच्याच 'तारे जमी पर' मध्येही हाच विषय हाताळला होता. हे चित्रपट गाजत असले तरी त्यातून शिकले मात्र काही जात नसावे काय असे वाटण्यासारखी परिस्थिती या आत्महत्यांनी पुढे आणली आहे.

विद्यार्थ्यांना पोटार्थी बनविणार्‍या या शिक्षण व्यवस्थेविषयी यापूर्वीही अनेकदा पुष्कळ लिहिले गेले आहे. पण त्यात बदल होण्याचे अद्यापही घाटत नाही. शिक्षण हे संस्कारीत करणारे, सुबुद्ध करणारे आणि स्वतःच्या पायावर उभे करण्यास सक्षम करणारे असावे. पण ते नाहक स्पर्धा करणारे आणि बळ आणि कल नसतानाही नको त्या दिशेने पळायला लावणारे नको आहे. पण दुर्देवाने तसेच घडते आहे. शिक्षणाचा थेट संबंध करीयरशी जोडल्याने चांगले मार्क्स मिळविणे म्हणजे उत्तम करीयरची खात्री अशी एक समजूत उगाचच तयार झाली आहे.

चांगले मार्क्स म्हणजे चांगल्या कॉलेजात, आणि हव्या त्या (अर्थात, पालकांनाच) कोर्सला प्रवेश आणि अर्थातच हव्या त्या क्षेत्रात (इथेही पालकांनाच) करीयर असा शिक्षणाचा धोपटमार्ग ठरून गेला आहे. मुलगा जन्माला आला की त्याने काय व्हायचे ते पालकांनी ठरवून टाकलेले असते. त्याचा कल नि बुद्धीचा आवाका याचा जराही विचार न करता मग हे 'रोबो' जीवनाच्या लढाईत उतरतात. तिथे अपयश आले आणि ते सहन करण्याची शक्ती नसली की व्यसनाधीन होण्यापासून जीवन संपविण्यापर्यंत काहीही उपाय योजले जातात.

दुर्देवाने या सगळ्यातून पालक, शिक्षण व्यवस्था, राज्यकर्ते काहीही शिकले नाहीत. घोकंपट्टीच्या आधारवर रचलेली परिक्षा पद्धती तर आता जीवघेणी ठरलेली आहे. त्यामुळेच ती आमुलाग्र बदलण्याची गरज आहे. राज्यात चौथीपर्यंत परिक्षा न घेण्याचा निर्णय स्तुत्य आहे. पण त्यापुढेही या परिक्षांची पद्दत बदलायला हवी. परिक्षा तणावाचा केंद्रबिंदू न बनता तो मुलांमधल्या सृजनला वाव देणारा उत्सव ठरायला हवा. त्यात पोपटपंची नको तर त्याच्यातल्या गुणवत्तेला, बुद्धीला खर्‍या अर्थाने धार लावणारी कसोटी हवी. अलगद, सहजपणे मुलांना फुलू द्यायला हवे. एक परिक्षा विद्यार्थ्याचे जीवन हिरावून घेत असेल तर तिची भीती त्याच्या मनात किती बसली असेल याचा विचार करण्याची गरज आहे.

मार्क्स ही हुषारी मोजण्याची मोजपट्टी होता कामा नये. हुषारी इतरही क्षेत्रात असू शकते. संगीत, गाणे, नृत्य या कलांमधील 'हुषार' मंडळींना मार्कांच्या कसोटीत मोजायचे झाल्यास त्यातली बहुतांश नापासच ठरायची. पण म्हणून त्यांची हुषारी कमी ठरत नाही. एखाद्या विशिष्ट विषयातच रस असेल तर त्यातच शिक्षण घेण्याची करीयर करण्याची संधीही उपलब्ध व्हायला हवी.

राज्यकर्त्यांनी या सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्याने पहायची गरज आहे. राज्यातल्या मुलांनी काय व्हायचे हेही सरकारच ठरवते आहे. म्हणूनच भरमसाट इंजिनियरींग कॉलेजेसना परवानगी दिली जाते नि एकीकडे शिक्षक भरती बंद असतानाही डिएड नि बीएडची पिके घेण्याचे कारखाने मात्र सुरूच असतात. त्यातच या शिक्षणाचे उद्दिष्ट काय? त्याचा त्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात उपयोग काय याविषयी सरकारला काहीच व्हिजन नसते. पालकांच्या इच्छेखातर मॅकेनिकल इंजिनयिर झालेली मुले पुढे करीयर मात्र मार्केटिंगमध्ये करतात? मग तिथेच करीयर करायचे होते तर मॅकेनिकलच्या एका लायक मुलाला त्याच्यामुळे जागा मिळाली नाही याविषयीचा अपराधभाव नंतर त्या मुलात रहातो का? पण मॅकेनिकल इंजिनियरींगला प्रवेश न मिळाल्यामुळे एखाद्या मुलाने आत्महत्या केल्याची नोंद मात्र होते. करीयर ठरविण्यासाठी स्वतःचा कलही ओळखू न देऊ शकणारे शिक्षण देऊन आपण काय साध्य करत आहोत?

पालकांनीही या आत्महत्यांतून काही 'शिकण्याची' गरज आहे. पंधरा वर्षाच्या आतल्या वयाच्या या मुलांना मरणाला का कवटाळावेसे वाटले याचा शोध घेतला जावा. मार्कांच्या स्पर्धेत मुलांना दौडविणार्‍या पालकांना त्याचा नेमका कल काय हे जाणून घेण्याचीही गरज भासत नाही. उच्चशिक्षित पालकांना आपली मुले ही आपलीच 'क्लोन' आवृत्ती व्हावी असे वाटते, तर ज्यांची स्वप्ने पूर्ण झाली नाहीत, असे पालकांना ती स्वप्ने आपल्या मुलांनी पूर्ण करावी असे वाटते. यात त्याला काय व्हायचे हा भागच लक्षात घेतला जात नाही.

हे सगळे कमी की काय म्हणून मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली चॅनेल्सही टिआरपीच्या नादात अल्पावधीत यश प्राप्त करण्याच्या सवंग युक्त्या सांगणारे कार्यक्रम सादर करून या सगळ्याला दुजोराच देत आहेत. रियालिटी शोमधून मिळणारी झटपट प्रसिद्धीची चकाकी मुलांसमोर चकाकते. पण त्या पलीकडचा अंधार मात्र दिसत नाही. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत सांगितिक स्पर्धात महागायकापासून सुरों को सरताज ठरलेले आयडॉल आता कुठल्या अंधारात चाचपडताहेत हे मात्र दाखवले गेलेले नाही. त्यामुळे चकाकत्या या विश्वाच्या मागची अंधारलेली बाजू कधी या मुलांसमोर येतच नाही.

आमिरच्या थ्री इडियट्समध्येही अभ्यासाच्या ताणातून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे दाखवले होते. त्याच्या तोंडी एक गाणेही आहे.

सारी उम्रभर मर मर के जी लिए
इक पल तो हमे जीने दे जीने दो

give me sunshine, give me some rays
give one another chance to grow up onece again

नेहा, स्वप्नील आणि त्यांच्याच पिढीतल्या मुलांच्या भावना यापेक्षा वेगळ्या काय आहेत?

6 comments:

देवेंद्र चुरी said...

आपला लेख आवडला म्हणुनच ही प्रतिक्रिया.आपल्या इछा पाल्यावर लादुन त्याला हया रेसमध्ये ढकलण्यापुर्वी सुसंवादाने त्याच्या मनात काय आहे हे जाणुन घ्यायल हवे.पाल्याच्या विकासासाठी फ़क्त सोयिच पुरेश्या नाहीत तर आपला वेळही दयायला हवा.

Anonymous said...

खूप विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही, हल्लीच्या ह्या स्पर्धायुगात सगळ्यांच्याच आपल्या मुलांकडून अपेक्षेच असा उत्तुंग शिखर सर केलच पाहिजे असा दबाव वाढत चाललाय. जे फार धोकादायक आहे

seema tillu said...

atishay uttam lekh aahe.aajchi shikshanpaddhati badlayla haveech aahe.shivay hya ratracemadhun muktatahi milayla havee aahe.tasech apayash pachvaylahi mulana shikavle pahije. ravindranath tagoranchi shantineketanatli shala hee aadarsha shala aahe.mulala je aavdel te aani jyat tyala gati aahe te shiknyasathi pradhanya dile gele pahije.aapan mulana sahaj vadu det naahee. he sarva kuthe tari thamble pahije.

Anonymous said...

हा दोष शिक्षणपद्धतीचा नसून समाजाच्या विचारपद्धतीचा आहे. समाज काय म्हणेल या दडपणाखाली वावरणारे पालक हे घडवून आणतात.

sonali sawant said...

nukatach ek marathi pkay pahanyacha yog ala."papa jaag jayega"ase tyache title.
atishay sunder ase natak ahe.vishesh mhanje yaat sarva patra college student ahet.....
thodkyat shikshan paddhati madhye badal karnya peksha palak mandali ni aplya mansikte madhye badal karava.mulanvar apekshanche oze theu naye.

Gokul said...

कधी-कधी शिक्षण म्हणजे काय ? याची व्याख्याच समाजापुढे स्पष्ट नाही असे वाटते.
पूर्वी शिक्षण घेतले जायचे ते समाजाच्या हितासाठी ,काही तरी अमुलाग्र बदल घडविण्यासाठी आणि आता फक्त पैसे कमविण्याच्या या एकाच ध्येयासाठी…
अरे तो/ती बघ शिकून किती मोठा/मोठी झालेत आणि तुम्ही …. शिका जरा शिका जरा त्यांच्याकडून !
असे बहुतांश प्रत्येक घरात आणि प्रत्येक कानावर हमखास पडणारे वाक्य आता बदलायला हवय…
मुलांना त्यांच्या कुवती प्रमाणे किवा इच्छा नुसार शिकून मोठं होवूद्या जेणे करून आयुष्यात त्यांना शिक्षण कधी हि निरर्थक किवा जड वाटू नये…
खूप छान लेख आहे तुमचा !
मी माझ्या ब्लॉग आणि website वर हा लेख share करून जास्तीत जास्त पालकांनपर्यंत पोहचविण्याचा प्रयंत्न करेल.