Saturday, November 28, 2009

स्मिता चित्रे ते ठाकरे- कथा नाममाहात्म्याची!


''स्मिता चित्रे या नावात काय आहे? पण या नावामागे ठाकरे हे आडनाव लागलं नि जगच बदलून गेलं. बाळासाहेबांसारखे सासरे नि त्यांचं आडनाव मला बरंच 'लाभलं'. त्यामुळेच मी आज इथवर पोहोचू शकले. नाही तर मी केलेल्या विनंतीला कुणी भीक तरी घातली असती काय?''


-स्मिता ठाकरे ( एका मुलाखतीतून)


आठवण एक-

स्मिता ठाकरेंच्या 'हसीना मान जायेगी' या चित्रपटाला फायनान्स पुरवला होता तो प्रख्यात हिरे व्यावसायिक भरत शहा यांनी. त्यावेळी भरत शहा, म्हणाले होते, मी स्मिता ठाकरेंना ओळखतही नव्हतो. पण त्या बाळासाहेबांच्या स्नुषा आहेत, हे माहिती असल्याने त्यांना पैसा नाकारण्याचा प्रश्नच उद्भवला नाही.

आठवण दोन-

स्मिता ठाकरेंचा 'हसीना मान जायेगी' हा चित्रपट तयार होऊन रिलीजच्या प्रतीक्षेत होता. पण अडचण ही होती, की त्याच वेळी आमिर खानचा 'मन' हाही रिलीज होण्याच्या वाटेवर होता. या दोन्ही चित्रपटांचे प्रदर्शन एकावेळी झालं असतं तर हसीनाला मोठा फटका बसणार हे नक्की होतं. स्मिता ठाकरे मनचे निर्माते अशोक कटारियांना भेटल्या. त्यांना 'विनंती' केली नि मनचे प्रदर्शन आठवडाभर लांबलं. 'हसीना' रिलीज करण्याचा मार्ग मोकळा झाला.

स्मिता ठाकरेंच्या मुलाखतीतील एक वाक्यांश आणि त्यानंतरच्या दोन आठवणींनंतर स्मिता ठाकरेंच्या चकाकत्या आयुष्याची चकाकी कुणामुळे आली ते सांगायची गरज नाही. त्या ठाकरे आहेत, म्हणूनच त्यांची चर्चा आहे. पण ज्या ठाकरेंमुळे आयुष्याच्या या टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या स्मिता ताईंनी शिवसेना सोडण्याचा निर्णय का घेतला असावा?

पण त्या आधी स्मिता चित्रे ते स्मिता ठाकरे हा प्रवास आधी पाहूया...

स्मिता ठाकरे हे नाव आज बॉलीवूडमध्ये अतिशय आदराने (की दरार्‍याने?) घेतले जाते. कोणत्याही कार्यक्रमासाठी बोलविण्यात येणार्‍या पाहुण्यांच्या यादीत हे नाव असतेच. त्यांच्या मुक्ती फाऊंडेशनने कार्यक्रम आयोजित केला तर अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान हे सुपरस्टारही बिनबोभाट हजेरी लावतात. त्यांच्या 'आदेशानंतर' कोणताही स्टार त्यांच्या चित्रपटात काम कराण्यासाठी डेट देतो. त्यांनी आपल्या मालिकेसाठी मागितलेला टाईम स्लॉट मिळत नाही, असे होत नाही. बॉलीवूडच्या पार्ट्यांमध्ये त्या आल्यानंतर त्यांचा फोटो काढला गेला नाही, असे होत नाही. त्यांच्यासोबत फोटो काढायला इतर स्टार पुढे सरसावले नाहीत, असेही होत नाही. त्यांचे कपडे, दागिने याचीही खमंग चर्चा मीडीयात रंगलेली असते. अर्थात, हे ग्लॅमर आहे, त्यांच्या आडनावात. नाही तर एरवी स्मिता मधुकर चित्रे असे नाव असलेल्या महिलेबाबत अशी चर्चा कुणी केली असती काय?

प्रिमियर ऑटोमोबाईल्स या कंपनीतील एक कर्मचारी असलेल्या मधुकर चित्रे आणि कुंदा चित्रे या दाम्पत्याची ही कन्या. पासपोर्ट कार्यालयात कारकून म्हणून काम करत असलेल्या स्मिता आणि जयदेव बाळ ठाकरे यांचे भावबंध जुळले नि त्यांनी १९८७ मध्ये लग्नाचा निर्णय घेतला. चित्रे ते ठाकरे हा प्रवास म्हणजे मोठेच स्थित्यंतर होते. चित्रे कुटुंबिय पुरोगामी. नि ठाकरे पारंपरिक. पण स्मिताताईंनी स्वतःला एडजस्ट केले. पुढे या दाम्पत्यातच बेबनाव झाला आणि जयदेव वेगळे रहायला लागले. स्मिता ताईंनी मात्र सासर सोडले नाही. त्या मातोश्रीतच राहू लागल्या. नशीबाने मिळालेल्या गोष्टीला त्यांनी कर्तृत्वाचीही जोड दिली.

जयदेव आयुष्यातून गेल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या कामात स्वतःला गुंतवले. बाळासाहेबांच्या त्या जणू पर्सनल सेक्रेटरीच बनल्या. मातोश्रीच्या व्हिजिटर्स लिस्टवर नजर टाकणे, त्यातल्या कुणाला भेट द्यायची कुणाला नाही हे ठरविणे अशी महत्त्वाची कामे त्या करू लागल्या. कुणाही नेत्याला बाळासाहेबांना भेटायचे असेल तर स्मिताताईंना टाळणे शक्य नव्हते. सहाजिकच मातोश्रीवर त्यांचे एक सत्ताकेंद्र निर्माण झाले. आपोआपच दबाव तयार होत गेला. नावालाही वलय आले. त्यातच मीनाताई ठाकरे आणि बिंदा ठाकरेंचे निधन झाल्यानंतर तर मातोश्रीवरची सर्व व्यवस्था स्मिताताईंच्या हाती गेली. तोपर्यंत उद्धव फोटोग्राफीतच रमला होता एकाकी पडलेल्या बाळासाहेबांचा स्मिताताई या मोठा आधार होत्या.

शिवसेना-भाजप युतीचे राज्य आल्यानंतर स्मिताताईंचे स्थान वाढले. त्यांच्या निर्णयालाही मान होता. मनोहर जोशींनतर मुख्यमंत्री कोण असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्यांनीच नारायण राणेंचे नाव सुचविले होते. राजकीय सल्लामसलीत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या स्मिताताईंनी तोपर्यंत आपल्या महत्त्वाकांक्षेला कर्तृत्वाचीही जोड दिली होती. त्यांच्याभोवती असलेल्या वलयाने त्यांची ओळख समाजात पोहोचली होती. त्याचाच उपयोग करून त्यांनी मालिका आणि चित्रपट निर्मितीचे क्षेत्र निवडले. आडनाव ठाकरे असल्याने सगळ्याच अडचणी दूर झाल्या. सकाळी मातोश्रीवरचे राजकीय जग आणि संध्याकाळी बॉलीवूडचे चकाकते जग अशी त्यांच्या आयुष्याची विभागणी झाली.

मालिका, चित्रपट यात सातत्याने मग्न राहून त्यांनी या चकाकत्या वर्तुळात जम बसवला. पण हे करण्यासाठी त्यांनी कष्टही तितकेच घेतले.

इंग्लिश चांगले बोलता यावे म्हणून त्या अनेक तास आरशासमोर सराव करत असायच्या. इतर लोक इंग्लिश कसे बोलतात याचे निरिक्षण करायच्या. ड्रेस सेन्स त्यांनी शिकून घेतला. व्यक्तिमत्वाला काय शोभून दिसेल याचा विचार केला. त्यांच्या या कष्टानेच बॉलीवूडमध्ये या 'वहिनीसाहेब' हे नाव तयार झाले आहे. बॉलीवूडमधील 'इम्पा' या संघटनेच्या अध्यक्षपदीही त्या निवडून आल्या होत्या. मुक्ती फाऊंडेशन स्थापून त्यांनी सामाजिक कार्यातही उडी घेतली. या फाऊंडेशनसाठी अंधेरीत मोकळा असलेला भूखंड त्यांना सरकारतर्फे मिळाला. आता त्यावेळी महसूल मंत्री राणेच होते हा योगायोग!

उद्धव यांचा राजकारणात उदय झाल्यानंतर राज यांना खड्यासारखे बाजूला करण्यात आले तसेच स्मिताताईही बाजूला फेकल्या गेल्या. पण राजइतकी त्यांची चर्चा झाली नाही. याचे कारण त्या प्रत्यक्ष राजकारणात नव्हत्या. आता शिवसेनेतली सगळे निर्णयही उद्धव घेऊ लागले होते. त्यामुळे स्मिताताईंना फारसे स्थान उरले नव्हते. त्यांनी बॉलीवूडच्या जगात आपल्या कामाचा पसारा वाढवला. पण राजकीय आकांक्षा मात्र कायमच होत्या. काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी त्या इच्छुक होत्या. पण उद्धव यांनी पत्रकार भारतकुमार राऊत यांना संधी दिली आणि स्मिताताईंचा पुन्हा एकदा हिरमोड झाला.

तेव्हापासूनच त्या दुखावल्या होत्या. राज ठाकरेंकडे जाणेही त्यांना परवडण्यासारखे नव्हते, कारण त्यांच्या बॉलीवूडी वर्तुळाला ते मारक ठरले असते. या वर्तुळात रहाताना केवळ मराठीचा गजर करून चालणार नाही हे त्यांना माहित होते. म्हणूनच त्यांनी काही दिवसांपूर्वीच एका वर्तमानपत्रात लेख लिहून मराठीच्या जोडीने हिंदी आणि इंग्रजीचीही तरफदारी केली होती. आता त्यानंतर लगेचच त्यांनी शिवसेना सोडण्याची घोषणा केली आहे.

त्यांच्या जाण्याने पक्षाला फारसा धक्का बसेल असे नाही. कारण त्यांच्या मागे कार्यकर्ता ही ताकदच कधी नव्हती. पण नावात ठाकरे असल्याने या घराण्याची एक सून प्रतिस्पर्धी पक्ष असलेल्या कॉंग्रेसमध्ये जात असल्याचा निराळा संदेश तेवढा जाईल. पण ठाकरे या नावाचे वलय त्यानंतर राहिल काय ही मात्र शंका आहे.

1 comment:

Anonymous said...

लेख चांगला जमलाय. पण बरीचशी माहिती कधीतरी इंडिया टुडेमध्ये छापल्या गेलेल्या शीला रावळ यांनी लिहिलेल्या स्मिता ठाकरेच्या प्रोफाईलमधली वाटते. अगदी सुरूवातही डिट्टो आहे.. बरोबर आहे, कारण त्याचं प्रोफाईल लिहिताना मनचं रिलीज हाच सर्वांत स्ट्राँग पाँईन्ट आहे...

बाकी लेख छान आहे...