Monday, January 18, 2010

पिंडीभोवतीचं 'ब्रह्मांड'! (1)



हे लेखन म्हणजे मला-तुम्हाला येणार्‍या अनुभवाला दिलेला उजाळा आहे. स्थळ महत्त्वाचे नाही. तुमचा `तो` अनुभव पुन्हा एकदा जागा होईल, यासाठीच हा लेखनप्रपंच. बस्स. बाकी काही नाही.

उज्जैनला पोहोचलो तेव्हा दुपारचे दीड-दोन वाजले होते. महांकालेश्वराच्या मंदिराच्या परिसरात असलेल्या पार्किंगमध्ये आमच्या गाड्या पोहोचल्या नि सुटीच्या दिवशी देवाची आठवण होणारे फक्त आपणच नाही, हे जाणवून तोपर्यंत उगाचच जाणवलेला अपराधभाव दूर झाला. गाड्या सुयोग्यजागी पार्क करून आमचा जत्था मंदिराकडे निघाला. मंदिरात देव सापडतो पण चप्पल हरवते, हे अनुभवांती बनलेले सुभाषित आठवून सुरक्षित ठिकाणाचा शोध सुरू असतानाच आमच्या सहल संयोजकाने एका दुकानासमोर आमच्या जत्थ्याला उभे केले. दुकानात चपला ठेवण्याच्या मोबदल्यात 'सजवलेली' थाळी तयार होतीच. पण आमच्या जत्थ्यातल्या बायकांनी निग्रहाने त्यातल्या अनेक वस्तू कमी करून चपला सांभाळायसाठी किमान पैसे खर्च होतील, याची काळजी घेतली. दुकानदारीण बाईचा नाराज चेहरा दिसत होताच. पण तरीही त्यांनी आम्हाला दुकानातून मंदिराच्या परिसरात सोडण्याचा खुष्कीचा मार्ग दाखवला.

अर्थात हा मार्ग थेट मंदिरात जात नव्हताच. प्रसिद्ध मंदिरात दर्शनाची सर्पिलाकार व्यवस्था असतेच. हे तर महादेवाचे मंदिर त्यामुळे त्याच्या गळ्यात पडलेल्या सर्पाने भाविकांसाठीही वेटोळे टाकले होतेच. पण हे सापाचे शेपूट दिसत होते तेवढेच नव्हते. एक टप्पा सहजी पार केल्यानंतर इमारतीत प्रवेश केला नि भल्या मोठ्या सभागृहात रागांची अनेक वेटोळी असल्याचे दिसून आले.

भक्तांचा 'जमावडा' चांगलाच होता. आमचा जत्था भक्तीभावाने हात-पाय धुवून तिथपर्यंत आला. ही गर्दी पाहूनच आज दर्शन लांबूनच घ्यावे लागणार याचा अंदाज आला. उभे रहाण्याच्या निरनिराळ्या तर्‍हा येथे पहायवायस मिळाल्या. काही जण रेलिंगला टेकून उभे राहिले होते. काहींनी त्याच्यावर बसणे पसंत केले. काही जण रेलिंग दोन्ही हातांनी पकडून काय काय व्यायाम तेवढ्या वेळात करता येईल याचा अदमास घेत होते. काहींनी एका पायावर उभे राहू बाई दुसर्‍या पायावर उभे राहू', असला प्रकार चालवला होता. शरीराची जाडी अंमळ जास्त असलेल्या काही बायकांनी 'सरणार कधी रांग, कुठवर साहू भार 'पायी' अशी अवस्था झालेली. त्यातल्या काहींनी सरळ जमिनीवर बसकण मारली होती. त्याच्या जोडीला इतरही बायकांनी पार जमवला. काहींच्या हातातल्या दर्शनासाठी घेतलेल्या थाळ्यांतील साखरफुटाण्याच्या पुड्याही फुटल्या.

तोपर्यंत पुढे असलेली गर्दी इंचाइंचाने मार्गक्रमण करत होती. मंदिराच्या आवारातच असल्याने भाविकांच्या भक्तीला पारावारही उरला नव्हता. परिवार असला की पारावार जास्त येतो असे कुणीसे सांगितल्याचे आठवले. शिवभक्तांचा हा परिवार बराच मोठा असल्याने 'बम बम भोले', भोलेनाथ की जय अशा अनेक महादेवाच्या संबोधनांचे द्वि,त्रि,चतुर्थ शब्दी उच्चार नि जय हे अंत्यशब्द असलेल्या अनेक घोषणांचा जागर होत होता. त्या जोडीला अनेक महिला कसलेसे स्तोत्र किंवा प्रार्थना पुटपुटत होत्या. या सगळ्या कोलाहलातच 'माला हे पायजे' छापाचे हिंदी भाषक आवाजही येऊ लागले होते. त्याला दरडावणारे सूरही ऐकू येत होते नि या दरडावण्याला हमखास गुडघ्यावर टेकायला लावणआरे रूदनाचे विविध पट्टीतले प्रतिसूरही ऐकू येऊ लागले.

या सगळ्यांतून आपले लक्ष त्या महादेवाचरणी नेण्याचा प्रयत्न मंदिर प्रशासनाने भिंतीच्या माध्यमातून कसोशीने केलेला दिसला. भिंतीवर लिहिलेले महांकालेश्वराचे महात्म्य हे काहींच्या दृष्टीने वेळ घालविण्याचा उद्योग होत असला तरी दर्शनास जाईपर्यंत निर्माण होणारा भक्तीभाव द्विगुणित करण्याची व्यवस्थापनाची चतुर युक्तीही जाणवत होती. या भित्तीलेखात तुलसीदासाच्या रामायणातील महादेवाला लागू पडतील अशी वचने सचित्र दिली होती. त्या वचनातील मध्ययुगीन हिंदी ही अंमळ आम्हा मराठीयांसाठी नेहमीप्रमाणे उगाचच विनोदाचा विषय बनली. पण चित्रे नक्कीच वेधक होती. रांगेतल्या मंडळींचा वेळ कारणी लागावा यासाठी त्या चित्रकाराने भलतेच कष्ट घेतले होते. या महांकालेश्वर महात्म्यात अनेक कथा दिल्या होत्या. त्यात मंदिरातचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी 'प्राचीन', एकमात्र हे शब्द वापरण्याची अर्वाचीन परंपरा न चुकता पाळली होती.

महादेवावरची भक्ती सभागृहात ठायी ठायी पेरलेली होती. देवदेवतांच्या तसबीरी, घड्याळे, पाण्याची भांडी, भित्तीचित्रे यातून ती डोकावत होती. या दानी मंडळींची नावेही आवर्जून लिहिली होती. त्यानिमित्ताने महांकालेश्वराचे भक्त देशाच्या कोणकोणत्या भागात आहेत, याची कृतज्ञ जाणीव होत होती.

तेवढ्यात बम बम भोलेचा जोरदार गजर जाला नि 'साचलेली' गर्दी अचानक फुटली. लोकांना अडवून बसलेल्या पोलिस मामांनी हिरवा झेंडा दाखवल्याने हा लोट पुढे सरकला. उतारावरून घरंगळत ही गर्दी मंदिराच्या मुख्य इमारतीत झेपावली. तिथे ठेवलेल्या धातूशोधक यंत्रातून पार होत आम्ही पुढे सरकलो. पुढे अनेक कोनाड्यांत विविध देवदेवतांची प्रतिष्ठापना केली होती. त्यावर भरपूर हार-फुले वाहिलेली होती. दानपेटीही अर्थातच होती. त्यात वर दिसतील अशा दहा, पन्नास, शंभराच्या नोटाही दिसल्या. थोडक्यात एका महांकालेश्वराच्या निमित्ताने या बाकीच्या देव मंडळींचे पर्यायाने त्यांच्या ‘पालकां’चे छान चालले होते. ‘तर-तम’ भाव म्हणजे काय हे इथल्या पुजार्‍यांकडून दिल्या जाणार्‍या प्रसादातूनही कळून येत होते.

याच ठिकाणी उजव्या बाजूला पुरोहितही बसले होते. शांती, पूजा, अभिषेकादी कार्ये येथे केली जात होती. पुजारी मंडळी आर्जवाने भाविकांना बोलवत होती. अनेक भाविक मंडळींनी त्यांच्या या आर्जवाला खरोखरच आपली ‘मान’ दिली होती.

आमचा जत्था मात्र निग्रहाने हे आग्रह ओलांडून पुढे गेला......

क्रमशः

No comments: