Saturday, November 28, 2009

स्मिता चित्रे ते ठाकरे- कथा नाममाहात्म्याची!


''स्मिता चित्रे या नावात काय आहे? पण या नावामागे ठाकरे हे आडनाव लागलं नि जगच बदलून गेलं. बाळासाहेबांसारखे सासरे नि त्यांचं आडनाव मला बरंच 'लाभलं'. त्यामुळेच मी आज इथवर पोहोचू शकले. नाही तर मी केलेल्या विनंतीला कुणी भीक तरी घातली असती काय?''


-स्मिता ठाकरे ( एका मुलाखतीतून)


आठवण एक-

स्मिता ठाकरेंच्या 'हसीना मान जायेगी' या चित्रपटाला फायनान्स पुरवला होता तो प्रख्यात हिरे व्यावसायिक भरत शहा यांनी. त्यावेळी भरत शहा, म्हणाले होते, मी स्मिता ठाकरेंना ओळखतही नव्हतो. पण त्या बाळासाहेबांच्या स्नुषा आहेत, हे माहिती असल्याने त्यांना पैसा नाकारण्याचा प्रश्नच उद्भवला नाही.

आठवण दोन-

स्मिता ठाकरेंचा 'हसीना मान जायेगी' हा चित्रपट तयार होऊन रिलीजच्या प्रतीक्षेत होता. पण अडचण ही होती, की त्याच वेळी आमिर खानचा 'मन' हाही रिलीज होण्याच्या वाटेवर होता. या दोन्ही चित्रपटांचे प्रदर्शन एकावेळी झालं असतं तर हसीनाला मोठा फटका बसणार हे नक्की होतं. स्मिता ठाकरे मनचे निर्माते अशोक कटारियांना भेटल्या. त्यांना 'विनंती' केली नि मनचे प्रदर्शन आठवडाभर लांबलं. 'हसीना' रिलीज करण्याचा मार्ग मोकळा झाला.

स्मिता ठाकरेंच्या मुलाखतीतील एक वाक्यांश आणि त्यानंतरच्या दोन आठवणींनंतर स्मिता ठाकरेंच्या चकाकत्या आयुष्याची चकाकी कुणामुळे आली ते सांगायची गरज नाही. त्या ठाकरे आहेत, म्हणूनच त्यांची चर्चा आहे. पण ज्या ठाकरेंमुळे आयुष्याच्या या टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या स्मिता ताईंनी शिवसेना सोडण्याचा निर्णय का घेतला असावा?

पण त्या आधी स्मिता चित्रे ते स्मिता ठाकरे हा प्रवास आधी पाहूया...

स्मिता ठाकरे हे नाव आज बॉलीवूडमध्ये अतिशय आदराने (की दरार्‍याने?) घेतले जाते. कोणत्याही कार्यक्रमासाठी बोलविण्यात येणार्‍या पाहुण्यांच्या यादीत हे नाव असतेच. त्यांच्या मुक्ती फाऊंडेशनने कार्यक्रम आयोजित केला तर अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान हे सुपरस्टारही बिनबोभाट हजेरी लावतात. त्यांच्या 'आदेशानंतर' कोणताही स्टार त्यांच्या चित्रपटात काम कराण्यासाठी डेट देतो. त्यांनी आपल्या मालिकेसाठी मागितलेला टाईम स्लॉट मिळत नाही, असे होत नाही. बॉलीवूडच्या पार्ट्यांमध्ये त्या आल्यानंतर त्यांचा फोटो काढला गेला नाही, असे होत नाही. त्यांच्यासोबत फोटो काढायला इतर स्टार पुढे सरसावले नाहीत, असेही होत नाही. त्यांचे कपडे, दागिने याचीही खमंग चर्चा मीडीयात रंगलेली असते. अर्थात, हे ग्लॅमर आहे, त्यांच्या आडनावात. नाही तर एरवी स्मिता मधुकर चित्रे असे नाव असलेल्या महिलेबाबत अशी चर्चा कुणी केली असती काय?

प्रिमियर ऑटोमोबाईल्स या कंपनीतील एक कर्मचारी असलेल्या मधुकर चित्रे आणि कुंदा चित्रे या दाम्पत्याची ही कन्या. पासपोर्ट कार्यालयात कारकून म्हणून काम करत असलेल्या स्मिता आणि जयदेव बाळ ठाकरे यांचे भावबंध जुळले नि त्यांनी १९८७ मध्ये लग्नाचा निर्णय घेतला. चित्रे ते ठाकरे हा प्रवास म्हणजे मोठेच स्थित्यंतर होते. चित्रे कुटुंबिय पुरोगामी. नि ठाकरे पारंपरिक. पण स्मिताताईंनी स्वतःला एडजस्ट केले. पुढे या दाम्पत्यातच बेबनाव झाला आणि जयदेव वेगळे रहायला लागले. स्मिता ताईंनी मात्र सासर सोडले नाही. त्या मातोश्रीतच राहू लागल्या. नशीबाने मिळालेल्या गोष्टीला त्यांनी कर्तृत्वाचीही जोड दिली.

जयदेव आयुष्यातून गेल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या कामात स्वतःला गुंतवले. बाळासाहेबांच्या त्या जणू पर्सनल सेक्रेटरीच बनल्या. मातोश्रीच्या व्हिजिटर्स लिस्टवर नजर टाकणे, त्यातल्या कुणाला भेट द्यायची कुणाला नाही हे ठरविणे अशी महत्त्वाची कामे त्या करू लागल्या. कुणाही नेत्याला बाळासाहेबांना भेटायचे असेल तर स्मिताताईंना टाळणे शक्य नव्हते. सहाजिकच मातोश्रीवर त्यांचे एक सत्ताकेंद्र निर्माण झाले. आपोआपच दबाव तयार होत गेला. नावालाही वलय आले. त्यातच मीनाताई ठाकरे आणि बिंदा ठाकरेंचे निधन झाल्यानंतर तर मातोश्रीवरची सर्व व्यवस्था स्मिताताईंच्या हाती गेली. तोपर्यंत उद्धव फोटोग्राफीतच रमला होता एकाकी पडलेल्या बाळासाहेबांचा स्मिताताई या मोठा आधार होत्या.

शिवसेना-भाजप युतीचे राज्य आल्यानंतर स्मिताताईंचे स्थान वाढले. त्यांच्या निर्णयालाही मान होता. मनोहर जोशींनतर मुख्यमंत्री कोण असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्यांनीच नारायण राणेंचे नाव सुचविले होते. राजकीय सल्लामसलीत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या स्मिताताईंनी तोपर्यंत आपल्या महत्त्वाकांक्षेला कर्तृत्वाचीही जोड दिली होती. त्यांच्याभोवती असलेल्या वलयाने त्यांची ओळख समाजात पोहोचली होती. त्याचाच उपयोग करून त्यांनी मालिका आणि चित्रपट निर्मितीचे क्षेत्र निवडले. आडनाव ठाकरे असल्याने सगळ्याच अडचणी दूर झाल्या. सकाळी मातोश्रीवरचे राजकीय जग आणि संध्याकाळी बॉलीवूडचे चकाकते जग अशी त्यांच्या आयुष्याची विभागणी झाली.

मालिका, चित्रपट यात सातत्याने मग्न राहून त्यांनी या चकाकत्या वर्तुळात जम बसवला. पण हे करण्यासाठी त्यांनी कष्टही तितकेच घेतले.

इंग्लिश चांगले बोलता यावे म्हणून त्या अनेक तास आरशासमोर सराव करत असायच्या. इतर लोक इंग्लिश कसे बोलतात याचे निरिक्षण करायच्या. ड्रेस सेन्स त्यांनी शिकून घेतला. व्यक्तिमत्वाला काय शोभून दिसेल याचा विचार केला. त्यांच्या या कष्टानेच बॉलीवूडमध्ये या 'वहिनीसाहेब' हे नाव तयार झाले आहे. बॉलीवूडमधील 'इम्पा' या संघटनेच्या अध्यक्षपदीही त्या निवडून आल्या होत्या. मुक्ती फाऊंडेशन स्थापून त्यांनी सामाजिक कार्यातही उडी घेतली. या फाऊंडेशनसाठी अंधेरीत मोकळा असलेला भूखंड त्यांना सरकारतर्फे मिळाला. आता त्यावेळी महसूल मंत्री राणेच होते हा योगायोग!

उद्धव यांचा राजकारणात उदय झाल्यानंतर राज यांना खड्यासारखे बाजूला करण्यात आले तसेच स्मिताताईही बाजूला फेकल्या गेल्या. पण राजइतकी त्यांची चर्चा झाली नाही. याचे कारण त्या प्रत्यक्ष राजकारणात नव्हत्या. आता शिवसेनेतली सगळे निर्णयही उद्धव घेऊ लागले होते. त्यामुळे स्मिताताईंना फारसे स्थान उरले नव्हते. त्यांनी बॉलीवूडच्या जगात आपल्या कामाचा पसारा वाढवला. पण राजकीय आकांक्षा मात्र कायमच होत्या. काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी त्या इच्छुक होत्या. पण उद्धव यांनी पत्रकार भारतकुमार राऊत यांना संधी दिली आणि स्मिताताईंचा पुन्हा एकदा हिरमोड झाला.

तेव्हापासूनच त्या दुखावल्या होत्या. राज ठाकरेंकडे जाणेही त्यांना परवडण्यासारखे नव्हते, कारण त्यांच्या बॉलीवूडी वर्तुळाला ते मारक ठरले असते. या वर्तुळात रहाताना केवळ मराठीचा गजर करून चालणार नाही हे त्यांना माहित होते. म्हणूनच त्यांनी काही दिवसांपूर्वीच एका वर्तमानपत्रात लेख लिहून मराठीच्या जोडीने हिंदी आणि इंग्रजीचीही तरफदारी केली होती. आता त्यानंतर लगेचच त्यांनी शिवसेना सोडण्याची घोषणा केली आहे.

त्यांच्या जाण्याने पक्षाला फारसा धक्का बसेल असे नाही. कारण त्यांच्या मागे कार्यकर्ता ही ताकदच कधी नव्हती. पण नावात ठाकरे असल्याने या घराण्याची एक सून प्रतिस्पर्धी पक्ष असलेल्या कॉंग्रेसमध्ये जात असल्याचा निराळा संदेश तेवढा जाईल. पण ठाकरे या नावाचे वलय त्यानंतर राहिल काय ही मात्र शंका आहे.

Sunday, November 22, 2009

गांधी आणि मी


अंबरीष मिश्र यांच्या मौजवरील लेखावर आधारीत 'उचललेस तू मीठ मूठभर' या मिसळपाव या संकेतस्थळावर लिहिलेल्या लेखावरून जे वाद निर्माण झाले, त्यावर माझी लेखनभूमिका स्पष्ट करणारा हा लेख....

गांधीजींनी भारतात जे काही कार्य केले, त्याचा पाय दक्षिण आफ्रिकेत कसा रचला गेला, त्यांनी काय काय 'प्रयोग' केले त्यासाठी अंबरिश मिश्र यांचे 'गंगेत गगन वितळले' हे पुस्तक वाचायलाच हवे. गांधीजींची जडणघडण त्यातून कळते. अर्थात, हे लिहिताना गांधींकडे फार खालून पाहिल्याने ते उंच दिसतात, यात काही वाद नाही. पण गांधींची ही जडणघडणही सोपी नाही. त्यातल्या अनेक प्रयोगांसाठी त्यांनी इतरांनाही भरडले आहे, स्वतःला तर आहेच आहे. भारतीय तत्वज्ञान, संस्कृती आणि परंपरांचा फार अभ्यास त्यांनी केल्याचेही लक्षात येते.

बाकी. गांधींच्या या एका सत्याग्रहामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले हे म्हणण्याचे धाडस मी तरी कधीच करणार नाही. कारण बाकीच्या सशस्त्र क्रांतिकारकांबद्दलही मला तितकीच आस्था आहे.

सुरवातीला तर माझ्यापुढे गांधी म्हणजे 'खिलाफत चळवळीला पाठिंबा देणारे, चौरीचौराच्या आंदोलनानंतर आंदोलकांचा हिरमोड करणारे, चले जावमधील हिंसेबद्दल काही न बोलणारे, फाळणीच्या योजनेला मान्यता देणारे, प्रसंगी जिनांकडे या देशाची धुरा द्या, पण फाळणी होऊ देऊ नका असे म्हणणारे, पाकिस्तानी टोळीवाल्यानी घुसखोरी केल्यानंतरही पाकिस्तानला त्यांच्या वाट्याचे ५५ कोटी द्या असा आग्रह धरणारे असेच गांधी होती. गांधींविषयी नकारात्मक मते बनविण्यासाठी एवढी उदाहरणे पुरेशी होती. यालाच मग नेहरूंना पुढे आणणे, पटेलांना मागे सारणे, सुभाषबाबूंना कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून काम करू न देण्यासारखी परिस्थिती निर्माण करणारे, भगतसिंगांच्या फाशीविषयी स्वतःचा शब्द खर्ची न पाडणारे इत्यादी उपप्रकरणेही गांधींची 'खलनायक' म्हणून प्रतिमा करायला पुरेशी होती. ओशोंचे गांधीवादाची खिल्ली उडवणारे पुस्तक वाचल्यानंतर या 'महात्म्या'ची किवही आली.

सावरकर आणि टिळकांबद्दल आस्था असल्याने गांधींविषयीचे हे नकारात्मक मुद्दे फार प्रकर्षाने दिसून यायचे. त्यात एका मोठ्या माणसांविषयी त्याच्या चुका दर्शविणारी पुस्तके बरीच असल्याने आणि चर्चा त्याचीच होत असल्याने ही मतेही ठाम बनली होती. पण पुढे गांधी वाचायला सुरवात केली आणि काही धुके निवळले. त्यांचे इतरही गुण पैलू दिसून आले. याचा अर्थ गांधी पूर्णांशाने चांगले होते असे नाही, पण त्या कालखंडावर अफाट असा प्रभाव त्यांनी कसा निर्माण केला याविषयी काही हाती लागले.

मुळात गांधी अखिल भारताला व्यापून कसे उरले होते, याचे आश्चर्य वाटायचे. लोकांमध्ये त्यांची प्रचंड लोकप्रियता का होती? ब्रिटिशांनाही भारताविषयी बोलण्यांसाठी हा नंगा फकिरच का सापडायचा? आणि परदेशातही त्यांनी अनेकांना प्रेरणा कशी दिली असावी? असे अनेक प्रश्न पडायचे. माझ्या पणजे सासूबाईंनी एकदा सांगितले, की त्या बंगालमध्ये असताना गांधीजी त्यांच्या गावी आले होते. त्यावेळी आम्ही त्यांच्या पाया पडलो, त्यासाठी कशी झटापट चालली होती याचं रसभरीत वर्णन त्यांनी केलं होतं. अनेक स्त्रियांना त्यावेळी त्यांच्यासमोर आंदोलनासाठी स्वतःचे दागिने काढून दिल्याचे त्यांनी सांगितले. हा किस्सा ऐकल्यानंतर तर अजूनच आश्चर्य वाटले. असे किस्से पुस्तकातून वाचणे वेगळे नि प्रत्यक्ष त्याचे साक्षीदार असलेल्या व्यक्तीकडून ऐकणे वेगळे. त्यांच्या या किश्श्यामुळे थरारून जाऊन मी गांधी वाचायला सुरवात केली. त्यात काही चांगल्या गोष्टी सापडत गेल्या. त्यांची जडणघडण कळली. स्वतःवर केलेले प्रयोगही समजले. भारतीय तत्वज्ञान, संस्कृती याचा अभ्यास त्यांच्याइतका दुसर्‍या कोणत्याही भारतीय नेत्याने क्वचित केला असावा असे वाटले. भारतीय मानसिकताही त्यांनी बरोबर ओळखली म्हणूनच त्यांना झेपेल, पचेल रूचेल असेच आंदोलन त्यांनी चालवले.

पण त्याचवेळी त्यांचे इतरही 'गुण' जाणवले. संयमनाचा अतिरेक. नैतिक मुल्यांमध्ये त्यांच्या मुलांची झालेली फरफट. खादीचा अट्टाहास. वगैरे वगैरे.
दुसर्‍यांना स्वतःच्या नियमांमध्ये बसविण्याचा अट्टाहास करणारा हटवादी 'महात्मा'ही यातूनच कळला. (प्रभा नारायण आणि जयप्रकाश नारायण यांना म्हणे त्यांनी 'आत्मसंयमन' पाळायला सांगितले होते! )

या देशाला फक्त गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले यावर माझाही विश्वास नाही. पण त्यांचे योगदान मोठे होते, हेही टाळून चालणार नाही. त्याचवेळी गांधींचा कॉंग्रेसमध्ये झालेला उदय तोपर्यंत कॉंग्रेसमध्येच सक्रिय असलेल्या जिनांना वळचणीला टाकणारा ठरला आणि त्यातच फुटीरतेची बिजे पेरली गेली हेही तितकेच सत्य आहे. कॉंग्रेसचे सर्वमान्य नेते म्हणून गांधींनी एस्टाब्लिश होताना जिनांना अलगद दूर सारले नि कॉंग्रेसवर वर्चस्व मिळवले हे सत्य आहे. पण हे करताना त्यांनी सर्वांना बरोबर घेतले (जिना वगळता) हेही लक्षात घेण्यासारखे आहे.

जिना आणि गांधी यांच्यातील 'लव्ह अँड हेट' रिलेशनशिपही पहाण्यासारखी आहे. गांधीजींच्या हत्येनंतर जिनांनी पाकिस्तानातील शोकसभेत त्यांचा उल्लेख म्हणे 'मि. गांधी' असाच केला होता.

उचललेस तू मीठ मुठभर


यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते. 'उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया' या वाक्याच्या उत्तरार्धाविषयी मनात का कुणास ठाऊक खिल्लीच दाटून येते. पण या लेखातून या सत्याग्रहामागची गांधीजींची व्यापक भूमिका समजायला मदत होते. आणि खरोखरच या साध्याशा वाटणार्‍या सत्याग्रहातून ब्रिटिश साम्राज्याचा पाया गांधींनी कसा हादरवला हेही कळते.

लखनौच्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्याची मागणी केल्यानंतर समस्त भारतीय जनतेला काही कृती कार्यक्रम देण्याची गांधीजींची योजना होती. पण कोणते आंदोलन करावे ते डोळ्यासमोर नव्हते. संपूर्ण समाज, धर्म-जात विरहित भावनेने उतरू शकेल असे आंदोलन त्यांना सुरू करायचे होते. आणि अचानक त्यांच्या डोळ्यासमोर मीठ आले. त्यावेळी सरकारने मिठावर कर लावला होता. मीठ घरी तयार करायला बंदी घातली होती. वास्तविक मीठ ही निसर्गाची देणगी. त्यावर कसला कर? असा गांधीजींचा सवाल. त्यामुळे या कराला विरोध करण्यातून मिठाचा सत्याग्रह करण्याचे ठरविले.

वास्तविक शेतसार्‍यासह अनेक विषयांवर आंदोलन करण्याचे प्रस्ताव त्यावेळी कॉंग्रेस नेत्यांनी पुढे आणले होते. पण गांधींनीही मीठच निवडले. कारण त्यात असलेली व्यापकता. मीठ हा पदार्थ जेवणात अत्यंत महत्त्वाचा. मीठ वगळता जेवण म्हणजे अळणी. थोडक्यात चवहीन. त्यामुळे कोणत्याही खाद्य पदार्थात मीठ हवेच. शिवाय जाती-धर्मभेदापार मिठाची व्याप्ती आहे. त्यामुळे या आंदोलनाला कोणातीही जातीय, धार्मिक किनारही येणार नाही हेही गांधीजींनी हेरले. पण वल्लभभाई पटेलांपासून मोतीलाल नेहरूंपासून अनेकांना गांधीजींच्या या आंदोलनाच्या यशाबद्दल विश्वास वाटत नव्हता.

पण तराही गांधीजींनी हे आंदोलन सुरू करायेच ठरवले. साबरमतीपासून पायी यात्रा सुरू करून सूरतजवळ असलेल्या दांडी येथे जायचे आणि तिथे जाऊन मीठ उचलून सरकारी कायद्याचा 'सविनय' भंग करायचा एवढे सोपे हे आंदोलन होते. त्यानंतर घरोघर मीठ तयार करायला सुरवात होणार होती. आंदोलनातला हा सोपेपणा फार परिणामकारक होता. सरकारचा निषेध करण्याचा याहून सोपा मार्ग नसेल. गांधीजींचे म्हणणे एकच होते, या आंदोलनात कोणताही हिंसाचार अपेक्षित नव्हता. कारण चौरीचौरा येथील अनुभव ताजा होता. आंदोलनाचे त्यांनी बरेच नियमही दिले होते. अहिंसा हा त्यापैकीच एक. तसाच, ब्रिटिश ध्वजाचाही आदर राखणे हाही एक. कारण उघड आहे. युनियन जॅक जाळण्याचा प्रयत्न झाल्यास चिडलेले ब्रिटिश सोजिर हाणा-मारायला कमी करणार नाहीत आणि आंदोलन उगाचच कार्यकर्त्यांकडूनही हिंसाचाराकडे ढकलले जाईल, अशी भीतीही त्यांना होती.

म्हणूनच या आंदोलनासाठी गांधीजींनी ७८ आंदोलक नीट निवडले. आपल्याला अपेक्षित त्या गोष्टी त्यांना समाजावून सांगितल्या. या आंदोलकांत तरूणांपासून वृद्धांपर्यंत आणि सर्व जाती धर्माचे लोक होते. ही सगळी मंडळी साबरमतीहून दांडीकडे निघाली. जाताना गांधीजींनी आपल्या सामाजिक सुधारणांचाही अवलंब करण्याचा यत्न केला. त्यासाठी हरिजनांच्या घरी जेवणे, सामाजिक अभिसरण व्हावे यासाठी मुद्दाम प्रयत्न करणे हे सगळे प्रकार केले.

अखेरीस दांडी येथे जाऊन या जत्थ्याने मीठ उचलले आणि ब्रिटिश कायदा मोडला. ब्रिटिशांनी हे आंदोलन मोडण्याचा खूप प्रयत्न केला. पण आंदोलन मोडावे कसे हेच त्यांना कळत नव्हते. कारण साबरमतीहून निघाल्यानंतर ते दांडीपर्यंत पोहेचेपर्यंत गांधीजींनी कोणताच कायदा मोडला नव्हता. शिवाय हिंसाचारही होत नव्हता. त्यामुळे कोणत्या कारणाखाली गांधींना रोखावे हेच ब्रिटिशांना कळत नव्हते.

गांधीजींनी प्रत्यक्ष कायदा मोडल्यानंतर त्यांना अटक करून पुण्यात पाठविण्यात आले. त्यानंतर देशभर या आंदोलनाचा भडका उडाला. पेशावरपासून ते पाटण्यापर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अवघा देश गांधींच्या या आंदोलनात एकवटला. त्याने स्वातंत्र्याचे उद्दिष्ट जरी लगेच साध्य झाले नाही, तरी कॉंग्रेसमध्ये आणि देशभरात गांधीजींचे नेतृत्व सर्वमान्य झाले. पूर्ण स्वराज्याची मागणी ताकदीने इंग्रजांपर्यंत पोहोचवली गेली.

गांधीजींच्या या आंदोलनाला मिळालेल्या यशाचे काही परिणामही पहाण्यासारखे आहेत. अहिंसात्मक आंदोलनामागचा गांधीजींचा विचार फार व्यापक होता. हिंसात्मक आंदोलनात ब्रिटिशांकडून दडपशाही होते. नेते, कार्यकर्त्यांना गुप्त राहून कामे करावी लागतात. त्यात पकडले जाण्याचा धोका असतो. समाजाला विचार देणारा नेता तुरूंगात आणि प्रसंगी जगातूनच नाहिसा होतो. त्यातून कार्यकर्त्यांमध्येच आणि प्रामुख्याने सर्वसामान्य लोकांमध्ये आंदोलानाबद्दल भीतीची भावना निर्माण होते. धाडसाबद्दल आदर असला तरी ते स्वतः दाखविण्याकडे लोकांचा कल नसतो. त्यामुळे आंदोलनाला व्यापकत्व मिळत नाही. या उलट अहिंसात्मक आंदोलनात त्यातही मिठाच्या सत्याग्रहासारख्या कार्यकर्त्यांकडून हिंसा होण्याची शक्यता नव्हती. आणि ब्रिटिशांपुढेही या कार्यकर्त्यांच्या अटकेव्यतिरिक्त फार काही पर्याय नव्हते. तांत्रिकदृष्ट्या अटक झाली तीर सुटका होण्याचेही मार्ग उपलब्ध होते. वैयक्तिक नुकसान फार होण्याची शक्यता नव्हती. त्यामुळेच सामान्य माणूस या आंदोलनात सहज सहभागी होऊ शकत होता.

गांधीजींच्या या उद्देशांनाही बर्‍यापैकी यश आल्याचे दिसून येते. आंदोलनाची देशभर व्यापकताच ते दाखवून देते. लॉर्ड आयर्विन या ब्रिटिश व्हॉईसरॉयला गांधीजींशी करार करावा लागला. तिकडे ब्रिटनमध्ये असलेला चर्चिल या 'नंग्या फकिरा'च्या या अफाट ताकदीमुळे खवळला होता. या फकिराने व्हॉईसरॉयसारख्या उच्चपदस्थ अधिकार्‍यासमोर चर्चेला यावे हेच त्याला सहन होण्यासारखे नव्हते. पण मिठाच्या सत्याग्रहाने ते घडविले.

याच काळात सशस्त्र क्रांतीचे आंदोलन त्या काळात नेताजींच्या मार्फत सुरू असले तरी त्यांच्या प्रयत्नांना दुर्देवाने मर्यादा पडल्या. पुढे तर त्यांना याच आंदोलनासाठी देशाबाहेरही जावे लागले. तिकडे सावरकरांना ब्रिटिश सरकारने जखडून ठेवले होते. भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांनाही व्यापक जनसहानुभूती असली तरीही त्यांना फासावर जावे लागल्याने भारतीय समाज निर्नायकी अवस्थते आला होता. तेच ओळखून गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत गिरवलेला अहिंसात्मक आंदोलनाचा पाठ भारतीय भूमीत गिरवला. गांधींच्या या आंदोलनाने निःशस्त्र आंदोलनाची नवी ज्योत पेटवली. भारतीय जनांच्या सहभागाने त्यामागून हजारो ज्योती पेटत गेल्या

उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया..... किती सार्थ ओळी आहेत नाही?

बाळासाहेबांचा सचिनला 'नो बॉल'!


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी क्रिकेट जगताचे दैवत असणार्‍या सचिन तेंडुलकरविषयी केलेल्या विधानबद्दल सर्वत्र त्यांच्या रोखाने निषेधाचे बाऊन्सर पडत आहेत. असे अनेक बाऊन्सर सहन करण्याचा त्यांचा गाढा अनुभव आहे. पण हे बाऊन्सर सहन करण्याइतके आता बाळासाहेब तरूण नाहीत, नि ते हुकविण्याइतके त्यांचे चिरंजीव चतुर नाहीत.

वास्तविक बाळासाहेबांनी सचिनच्या माध्यमातून आपल्याच चाळीस वर्षांपूर्वीच्या विचारांची नवी आवृत्ती असणार्‍या राज ठाकरे यांच्यावरच बाऊन्सर टाकण्याचा प्रयत्न केला, पण वयोमानामुळे बाळासाहेबांचे लक्ष्य अंमळ चुकलेच. ज्याच्या मार्फत आपण टीका केली, तो सचिन केवळ मराठीच्या संकुचित भूमिकेखाली दडपण्यासारखा नाही, याचा अंदाजच त्यांना आला नाही. उलट 'खंजीर खुपसण्याचे' त्यांचेच विधान ते स्वतःच खरे करून दाखवत असल्याच्या भावनेने मराठी मने उगाचच दुखावली गेली. त्यांचा बाऊन्सर चक्क नो बॉल पडला. पण त्यासाठी 'पीच' कसे होते, ते समजून घ्यावे लागेल.

राज ठाकरेंच्या मनसेने विधानसभा निवडणुकीने शिवसेनेला मुंबईत तिसर्‍या क्रमांकावर ढकलून देत मराठी माणसांचा नवा तारणहार असल्याचे सिद्ध केले. लगोलग मनसेच्या शिलेदारांनी अबू आझमीचे थोबाड रंगवून भर विधानसभेत राडा घातला. देशभर त्याचा निषेध झाला असला तरी बरीचशी मराठी मने यामुळे सुखावली. आझमीने बाळासाहेबांबद्दलही गरळ ओकले. त्यालाही मनसेनेच प्रत्त्युत्तर देत आघाडी घेतली. या संपूर्ण प्रकरणात शिवसेनेचा प्रचंड गोंधळ उडाला. त्यात मनसे आमदारांच्या निलंबनाला 'ममं' म्हटल्याने 'आता कुठे गेला वाघा तुझा मराठी धर्म?' असा प्रश्नही उपस्थित झाला. त्यावर नेत्यांची बोलती बंद झाली नि कार्याध्यक्षांनीही मौन बाळगले. यातून शिवसेनेच्या 'वाघाच्या' सद्यस्थितीबद्दल जायचा तो संदेश गेला.

या संपूर्ण प्रकरणात 'बुंद से जो गई' ती 'हौदाने मिळविण्याचा प्रयत्न शिवसेनेने सचिनच्या प्रकरणात केला. वास्तविक सचिनने मुंबई व मराठीविषयी काढलेल्या उद्गारात आक्षेपार्ह असे काहीच नव्हते. एका पत्रकाराने जाणून बुजून वाद निर्माण करण्यासाठी त्याला तसा प्रश्न केला. त्याने 'मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे, पण मी आधी भारतीय आहे,' असे उत्तर देत चेंडू योग्य तटवला. शिवाय 'मुंबई सर्वांचीच आहे,' असेही सांगितले. मराठी वृत्तपत्रांनी हे विधान सरळपणे छापले. पण इंग्रजी आणि हिंदी वृत्तपत्रांनी चापलुसगिरी करून 'मुंबई सर्वांचीच आहे, असे सचिन म्हणतो,' अशी हेडलाईन देत 'सचिनचा परप्रांतीय लोंढ्याना आक्षेप नाही, असा अर्थ त्यातून काढला. यातून सचिनला संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या आंदोलनाबद्दल अनादर आहे हे कुठूनही ध्वनित होत नाही. शिवसेनाप्रमुखांनी त्याच्याविषयी थयथयाट करण्याची गरज नव्हती. पण इंग्रजी वृत्तपत्रांनी हा वाद पेटवून त्यांना जे अपेक्षित होते, ते साध्य केले.

बाळासाहेबांनीही ही शिवसेनेच्या पुनरूज्जीवनाची संधी मानली असावी. मराठीचा मुद्दा राज यांनी अमिताभ बच्चन यांना टार्गेट केल्यानंतर देशपातळीवर पोहोचला नि मराठीचा नवा 'तारणहार निर्माण झाल्याचा संदेश समस्त मराठी जनांपर्यंत पोहोचला. चक्क राजचेच अनुसरण करत आता बाळासाहेबांनी सचिनसारख्या मोठ्या व्यक्तीला टार्गेट करून मराठी भाषकांत 'मीच तुमचा (जुना) तारणहार' हे स्थापित करण्याचा (केविलवाणा) प्रयत्न केला. पण त्यांचा हा बॉल चक्क नो बॉल पडला. यातून रन तर सोडाच धावाच गेल्या. उत्तुंग प्रतिमा असणार्‍या नि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव असणार्‍या मोजक्या मराठी लोकांत सचिन तेंडुलकर एक आहे. त्याच्यावर टीका करून सेनाप्रमुखांनी त्याच्या कर्तृत्वाला उगाचच खुजे करण्याचा प्रयत्न केला. सचिनवर प्रेम करणारी मराठी मने त्यामुळे दुखावली गेली आणि हिंदी भाषकांना बाळासाहेबांवर तोंडसुख घेण्याची एक संधी तेवढी मिळाली.

अर्थात, हे विधान बाळासाहेबांच्या फोटोनिशी सामनात प्रसिद्ध झाले असले तरी ते बाळासाहेबांचेच आहे काय? असा प्रश्न पडतो. कारण विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मराठी माणसानेच आपल्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप शिवसेनेने सामनामधून केला होता. काही दिवसांपूर्वी रंगशारदात झालेल्या मेळाव्यात दस्तुरखुद्द शिवसेनाप्रमुखांनी आपण असे कोणतेही विधान केले नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता सचिनबाबतही केलेले विधान हे बाळासाहेबांचेच आहे काय? असे म्हणण्याला जागा आहे. राज ठाकरेंना उत्तर देण्यासाठी त्यांच्याच चिरंजीवाने लोकांसमोर येऊन बोलण्यापेक्षा सामनाच्या माध्यमातून वडिलांच्या नावे मराठी माणसांना साद घालण्याचा यत्न केला हे न कळे. या काळातले त्यांचे मौनही बरेच बोलके आहे.

पण तूर्तास तरी शिवसेनेची ही खेळी 'नो बॉल' ठरली आहे हे नक्की. तर तिकडे राज ठाकरेंनी नुसता चेंडू तटवून चक्क एक धावही मिळवली आहे.