Saturday, September 26, 2009

आशियात शक्तीशाली कोण?


चीनविरूद्धच्या १९६२ च्या युद्धात झालेला भारताचा पराभव जिव्हारी लागला आहे. ४७ वर्षे झाली तरी आपण ते दुःख विसरू शकलो नाही. भारताच्या प्रतिष्ठेला लागलेला हा डाग अजूनही निघालेला नाही. पण १९६२ च्या संघर्षाकडे केवळ सीमाप्रश्नातून उद्भवलेला वाद असे पाहणे योग्य ठरणार नाही. आशियात शक्तीशाली कोण हे ठरविणार्‍या स्पर्धेचा तो पहिला अंक होता.

विसावे शतक स्वातंत्र्याचे वारे घेऊन अवतरले. अनेक देश साम्राज्यवादी देशांच्या पकडीतून मुक्त झाले आणि त्यांनी स्वातंत्र्याचा श्वास घेतला. भारत आणि चीनही आगे-मागे स्वतंत्र झाले. या दोन्हीही अवाढव्य देशांच्या सीमा मात्र ठरवल्या होत्या त्या त्यांच्यावर राज्य करणार्‍या साम्राज्यवादी देशांनी. १९४९ मध्ये स्वतंत्र झालेल्या चीनने लगेचच आपल्या सीमांची पुनर्रचना करायला सुरवात केली. त्यासाठी पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार आणि भारताशी बोलणीही सुरू केली. ही बोलणी म्हणजे केवळ सीमाप्रश्न नव्हता, तर आपला गेलेला परिसर परत मिळविण्याची आकांक्षा त्यात दडलेली होती.

त्यावेळी भारताने पाकिस्तानला फार गंभीरपणे घेतले नाही, असे पाश्चात्य जगतातील विद्वानांचे मत आहे. भारतासारखाच समाजवादी चीन आपल्यावर हल्ला करेल, असा विचारही स्वप्नाळू पंडित जवाहरलाल नेहरूंना यांनी केला नाही. हिमालयाची भिंतच आपल्या संरक्षणासाठी पुरेशी आहे, असे त्यांना वाटत होते. चीनची धोरणे आणि लष्करी क्षमता नेहरूंच्या कधी लक्षातच आली नाही. राजनैतिक पातळीवर नेहरू चीनला कमी लेखत राहिले आणि हे संबंध युद्धाच्या रूपाने जमिनीवर उतरले त्यावेळी भारतीयांना आपली जमीन सोडून पळावे लागले.

भारतीयांच्या या प्रतिकारामुळे (?) चीन भारताला कमकुवत समजला हा त्यांचा दोष नाही. पण भारताच्या नमतेपणाची सुरवातही नेहरूंनी १९५१ मध्ये घातली होती. भारत आणि चीन यांच्यात 'बफर स्टेट' म्हणून असलेले तिबेट चीनने बळकावले आणि त्याच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या भारताने आपले हात वर केले. नेहरूंना चीनच्या भावी चालीचा अंदाजच त्यांना आला नाही. चीनला विरोध करण्याऐवजी दलाई लामांना त्यांनी भारतीय भूमीवर आश्रय तेवढा दिला. १९५९ मध्ये चीनने तिबेटमधले बंडही अतिशय क्रूरपणे मोडून काढले, त्यावेळीही नेहरू शांत बसले.

नेहरूंनी तिबेटप्रश्नी चीनच्या पायी लोटांगण घालून १९५४ मध्ये करार केला आणि शांतीपूर्वक परस्पर साहचर्याची पंचशील तत्वे जाहिर केली. पण हीच पंचशील तत्वे म्हणजे भारताचा दुबळेपणा अशी व्याख्या चीनने केली.

नेहरूंना तिसर्‍या जगाचे नेते होण्याची आस लागली होती. ही आस पूर्ण करण्यासाठीचे साधन म्हणजे पंचशील तत्वे होती. परस्परांचा आदर, शांततापूर्वक अस्तित्व, परस्परांच्या भानगडीत नाक न खुपसणे ही त्यातली काही तत्वे होती. नेहरूंनी पुढच्याच वर्षी ही तत्वे आफ्रो आशियाई एकात्मता चळवळीत आणि बांडुंगला भरलेल्या तटस्थ देशांच्या परिषदेतही फडकावली. त्या जोरावर त्यांनी अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धात तिसर्‍या जगातील देशांचा एक तटस्थ समूह तयार केला आणि त्याचे एक महत्त्वाचे नेते बनले. चीनचे नवे नेतेही त्यांनीच या परिषदेत जगापुढे आणले. 'हिंदी चीनी भाई भाई' ही घोषणाही याच काळातली.

पण चीनचा हुकूमशहा माओ याला मात्र नेहरूंचे वाढते वर्चस्व खुपत होते. आशियात वसाहतवाद झुगारून स्वातंत्र्य झालेल्या देशांत चीनच ताकदवान असल्याची त्याची समजूत होती. चीनचे महत्त्व कुणी डावलू नये असे त्याचे म्हणणे होते. भारताशी सीमाप्रश्न उकरून त्याने भारतालाही हाच संदेश देण्याचा प्रयत्न केला. पण दुर्देवाने नेहरूंना माओ आणि पर्यायाने चीनचा डाव समजलाच नाही. बंधुभावाच्या संकल्पनांमध्येच ते मग्न राहिले. तिसर्‍या जगाचे नेतृत्व आपल्याकडे येईल या स्वप्नातही ते दंग होते. तिकडे चीन मात्र स्वतःचे नेतृत्व पुढे आणत होता.

त्याचवेळी चीनने भारताला कमकुवत करण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले. चीनने पाकिस्तानला आर्थिक, लष्करी सर्व मदत करून भारताविरोधात भडकावले. त्यामुळेच फाळणीनंतर पाकिस्तानबरोबर भारताची तीन युद्ध झाली. यासाठी पाकला झालेला शस्त्रपुरवठा बव्हंशी चीननेच केला होता. शिवाय पाकबरोबरच्या या तणावने भारताला आपले लाखो सौनिक सीमेवर तैनात ठेवावे लागले. एवढ्या मनुष्यबळाचा केवढा हा अपव्यय!

दुसरीकडे चीनने भारताचा उपखंडातील प्रभावही मर्यादीत करायला सुरवात केली. आता नेपाळ आणि म्यानमार यांना चीनने आपल्या बाजूने वळविले आता भूतान आपल्या घशात घालण्याचा त्यांचा डाव आहे. नेपाळ आणि म्यानमानरला चीनने सर्व ती मदत केली. नेपाळमध्ये सध्या सर्व पायाभूत कामे चिनी मदतीने होत आहेत. म्यानमारमध्ये तळ उभारून हिंदी महासागरातही चीनने आपले अस्तित्व निर्माण केले. पाकिस्तान हा तर चीनचा दोस्त आहेच. तिथेही चीनने तळ उभारल्याचे बोलले जाते. श्रीलंकेलाही एलटिटिईच्या संघर्षात चीननेच गरज पडेल ती लष्करी मदत केली. भारताच्या सर्व शेजार्‍यांना आपल्या हाताशी धरून चीनने भारताला अशांत कसे करता येईल, याचे चोख नियोजन केले आणि त्यावर अंमलबजावणीही सुरू आहे. भारताला उपखंडातच मर्यादीत करण्याचा चीनी डाव सध्या तरी यशस्वी झाल्याचे दिसते आहे.

तात्विक, आर्थिक आणि राजकीय, कुठल्याही दृष्टिकोनातून विचार केल्यास आज चीनने भारतावर मात केल्याचे दिसून येईल. चीनची उद्दिष्ट्ये स्पष्ट होती. त्यांना श्रीमंत आणि ताकदवान देश बनायचे होते. ते उद्दिष्ट त्यांनी साध्य केले. या उद्दिष्टाच्या आड येणार्‍या अडचणी त्यांनी हरप्रकारे दूर केल्या. त्यासाठी विचारसरणीही सोडली. एकाकाळी कवटाळून धरलेली साम्यवादी विचारधारा आणि समाजवादी अर्थव्यवस्था सोडून राष्ट्रीयतेचा आणि भांडवलशाहीचा हात धरला. तैवान आणि दक्षिण चिनी समुद्रातील बेटांचा प्रश्नही तात्पुरता थंड बस्त्यात बांधून ठेवला. शिवाय पुरेपूर संधीसाधूपणाही अंगी बाणवला. जागतिक पातळीवर परिस्थितीनुरूप कधी रशिया तर कधी अमेरिकेचा हात धरण्यातही कमीपणा मानला नाही. आर्थिक विकासाच्या नावाखाली हे सारे काही त्यांनी केले.

चीनने नेहरूंची पंचशीलेही अंगीकारली. पण वेगळ्या अर्थाने. बांडुंगमध्ये रूजलेले तटस्थतेचे बीज त्यांनी आशियातील नव्या सत्तांचा क्रम ठरविण्यासाठी उपयोगात आणले. अर्थात, त्या पंचशीलांचा अर्थ आता बदललाय. आता बहुदेशीय संघ, परस्पर सहकार्य, आर्थिक विकास आणि सुरक्षितता हे या पंचशीलांचे आधार बनले आहेत. शीतयुद्धाच्या काळात असलेली दोन सत्ताकेंद्रे आता बहुदेशीय सत्ताकेंद्रात परिवर्तित व्हावीत आणि आर्थिक संरक्षण सहकार्य हे त्याचे आधार असावेत, असे चीनचे उद्दिष्ट आहे.

याचा अर्थ भारत आता शांत बसला आहे, असे नाही. तटस्थ राष्ट्रांच्या काळात तयार झालेली छबी पुसून भारतही आता स्वतःचा गट तयार करतो आहे. गेल्या काही काळात स्वतःचा एक संघ बांधण्याचा प्रयत्नही भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर केला आहे. अमेरिकेशी संबंध जुळवताना झालेला अणू करारही महत्त्वाचा आहेच. शिवाय रशियाशी जुने संबंधही टिकवून आहे. त्याचवेळी फ्रान्स, इंग्लंडसह अनेक देशांना वळवून घेत ब्राझीलसह नव्या शक्तींनाही आपल्या कवेत घेण्याचा भारताचा प्रयत्न आहे. त्यामुळे १९६२ चा अर्धजागृत भारत आता राहिलेला नाही. लष्करी आणि राजनैतिक दृष्ट्याही तो कुमकुवत राहिलेला नाही.

आता खरं तर पाश्चात्य जगताने भारताला बळ देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आशियातील सत्ता समतोल हा भारत आणि चीन यांच्यात राहिला पाहिजे. चीनची एकाधिकारशाही आणि साम्राज्यवादी भूमिका आशियातील शांततेला आव्हान आहे. हे लक्षात घेऊन पाश्चात्य जगताने भारताला बळकट करण्याची गरज आहे.

(हा लेख तयार करण्यासाठी नेटवरील विविध स्त्रोतांमधील माहितीचा आधार घेण्यात आला आहे.)

भारत-चीनमध्ये युद्ध होईल काय?


भारत आणि चीनमध्ये युद्ध होण्याची शक्यता आहे काय? आंतरराष्ट्रीय अभ्यासकांची मते लक्षात घेता अशी शक्यता आहे, पण ती अंधुक. अभ्यासकांच्या मते, भारत-पाकिस्तान संबंधात चीनचा हस्तक्षेप, तिबेटमध्ये चीनचा वाढता हस्तक्षेप आणि उभय देशातील अद्यापही न मिटलेला सीमाप्रश्न या तिन्ही किंवा यापैकी एका मुद्यावरूनही दोन्ही देशांत युद्ध होऊ शकते.

भारत-पाक युद्ध झाल्यास चीन यात हस्तक्षेप करेल हे उघड आहे. कारण दक्षिण आशियात भारत आणि पाक असा सत्तेचा समतोल राखणे हे चीनचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच पाकचे पारडे कमी पडतेय हे लक्षात आले की त्याला आधार द्यायचे चिनी धोरण आहे.

भारत चीनकडे व्यूहात्मक दृष्ट्या लक्ष देतोय असं म्हटल्यावर ते लक्ष दूर करण्यासाठी पाकिस्तान सक्षम आहे. म्हणूनच चीनला भिडलेल्या पूर्व सीमांवरून भारताला पश्चिम सीमांकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी लागणार्‍या आगळिकीही या देशाकडून सातत्याने केल्या जात आहेत. म्हणूनच आपण नेहमीच चीनपेक्षा पाकिस्तानकडे जास्त लक्ष देत आहोत. दुर्देवाने चीनकडे दुर्लक्ष करत आहोत. आपले परराष्ट्रधोरण पाकिस्तानभोवतीच घुटमळत राहिल्याने भारताची शक्तीही मर्यादीत झाली आहे. किंबहूना भारताला दक्षिण आशियापुरताच तेही उपखंडापुरताच मर्यादीत ठेवण्याचा चीनचा मनसुबाही यशस्वी ठरला आहे. चीनप्रमाणेच आशियाई किंवा जागतिक पातळीवर एक बडा खेळाडू म्हणून पुढे येण्याचे भारतीय मनसुबे पाकिस्तानी कारवायांनी हाणून पाडले आहेत. त्यामुळे आशियातील चीन हीच एकमेव शक्ती म्हणून पुढे येते आहे.

भारताला डोकं वर काढू देऊ नये म्हणून चीनने कायम पाकिस्तानला मोठे करण्याचा मार्ग अंगीकारला. पाकच्या लष्करी विकासाला, क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाला आणि अंतिमतः अण्वस्त्रसज्ज होण्याला चीननेच सहकार्य केले. १९७४ मध्ये भारताने अणू चाचणी केल्यानंतर चीनने पाकला त्यासाठी प्रेरीत केले. त्यासाठी लागणारी सर्व मदत पुरवली. आता भारताबरोबर पाकही अण्वस्त्रसज्ज देश बनला आहे. त्यामुळे चीनला अपेक्षित दक्षिण आशियातील सत्तासमतोलही साधला गेला आहे.

अशा वेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्द झाल्यास चीन हस्तक्षेप करेल काय? याची शक्यता कमीच वाटते. त्याऐवजी चीन पाकला लष्करी साहित्य आणि राजकीय पाठिंबा देईल. शिवाय अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, रशिया, जपान आणि इतर देशांच्या मदतीने भारतावर पाकविरोधातील युद्ध थांबविण्यासाठी दबाव आणेल. त्यामुळे उपखंडातील परिस्थिती 'जैसे थे' राहू शकेल.

अर्थात, अशाही परिस्थितीत भारत या दबावाला बळी न पडता, वर्षानुवर्षे भिजत पडलेला पाकिस्तान प्रश्न एकदाच काय तो सोडवायचा या हेतूने आग्रही राहिल्यास मात्र चीन नक्कीच हस्तक्षेप करेल. पण याचे स्वरूप वेगळे असेल. त्यासाठी चीन सैन्याची हालचाल करून ते भारताच्या सीमेपर्यंत आणून ठेवेल. उभय देशातील संबंधात तणाव निर्माण होईल असे काही करेल. उभय देशांच्या सीमेवर तणाव वाढविण्यासाठी आगळीक करेल. त्यामुळे सहाजिकच भारताला पश्चिमेकडून आपले लक्ष पूर्वेकडे हटवावे लागेल.

त्यानंतरही भारताने धूप न घातल्यास मग मात्र चीन भारताशी युद्ध पुकारून दक्षिण आशियातील सत्तासमतोल राखण्यसाठी थेट कारवाई करेल. अर्थात, हे एवढे सोपे नाही. ही घडेल त्यावेळी चीनही सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच मगच कोणतेही पाऊल उचलेल. आपल्या हस्तक्षेपाचे काय परिणाम होतील याची काळजी चीनलाही करावी लागेल. भारत-पाक युद्धातील प्रत्यक्ष स्थिती काय आहे आणि भारतीय लष्कराची ताकद नेमकी किती आहे, याचा अंदाज आल्यानंतरच चीन कोणतेही पाऊल उचलेल हे नक्की.

शिवाय त्यावेळी अमेरिका आणि पाश्चात्य जगतही शांत बसणार नाही. चीनने भारतावर हल्ला केल्यास तेही चीनची कोंडी करू शकतात. त्यावेळी चीनला या सगळ्यांना आपल्या बाजूने वळविणे अवघड जाईल. शिवाय भारताचे राजनैतिक कौशल्यही पणास लागेल. यात अमेरिकने बघ्याची भूमिका घेऊन चीनच्या कारवायांबाबत काहीच भूमिका न घेतल्यास अर्थातच चीन भारतावर हल्ला करेल.

तिबेटप्रश्नावरून चीन आणि भारत यांच्यात युद्ध होण्याची शक्यता सध्या तरी वाटत नाहीये. त्यातच चीनने तिबेटमध्ये हान वंशीय लोकांचे जाणीवपूर्वक स्थलांतर करवून आणल्यामुळे तिबेटींची संख्या त्यांच्याच प्रांतात कमी झाली आहे. त्यामुळे स्वतंत्र तिबेटसाठी सुरू असलेल्या चळवळींनाही आता फारसा अर्थ उरलेला नाही.

सीमाप्रश्नावरून चीन आणि भारत यांच्यात युद्ध होण्याची शक्यता दुस्तर वाटते. अरूणाचल प्रदेश हा आपला प्रदेश असल्याचे चीनचे मत आहे. भारताने हा भाग बळकावल्याचे चीनचे म्हणणे आहे. हा भाग पुन्हा मिळविण्यासाठी चीन युद्ध करेल याची शक्यता खूपच कमी वाटते.

या प्रश्नावरून जाहिररित्या बोलणे चीन टाळते. पण राजनैतिक स्तरावर यावर चर्चा होते.

चीन एकीकडे अरूणाचल प्रदेशवर दावा करत असताना अक्साई चीन हा आपला भाग असल्याचे भारताचे म्हणणे आहे. १९६२ च्या युद्धात चीनने हा भाग बळकावल्याची भारताची तक्रार आहे. हा भाग भारताला देणे चीनला परवडणारे नाही. कारण पश्चिम तिबेट नियंत्रणात राखण्यासाठी चीनला हा भाग आपल्याकडे असणे गरजेचे आहे. या भागातून रस्ते तयार करून तिबेट ताब्यात राखणे चीनला शक्य आहे. तरीही हा भाग चीन सोडू इच्छित असल्यास त्या मोबदल्यात त्यांना पूर्वेकडील काही भाग द्यावा लागेल.

पण भारताने पूर्व भाग दिल्यास आणखी एक गोची होऊ शकते. अरूणाचल प्रदेशातील तवांग आणि तिबेटमधील चुंबी या दरम्यान असलेले भूतानही चीन आपल्या घशात घालेल. भूतानचे लष्करी संरक्षण करण्याची जबाबदारी भारताची आहे. त्यामुळे त्याच्या संरक्षणासाठी का होईना भारताला चीनशी युद्ध पुकारावे लागेल.

त्यामुळे एकुणातच सीमाप्रश्न हा तसाच ठेवण्यास उभय देश प्राधान्य देतील असे वाटते.

आता उभय देशांच्या सैन्यांकडून परस्परांच्या देशात घुसखोरी, पेट्रोलिंग करताना इकडे तिकडे जाणे, रस्ता चुकणे हे प्रकार घडतात. पण त्यातून युद्ध होईल असे वाटत नाही. दोन्ही देशांची सरकारेच तसे घडू देणार नाहीत. सुमदुरोंग चू च्या मुद्यावरून १९८७ मध्येही असेच घडले होते.

अर्थात, म्हणून सीमाप्रश्नावरून या देशांमध्ये तणातणी रहाणारच नाही, असे नाही. कारण ईशान्य भारत हा दिसायला चिंचोळी पट्टी असला तरी बराच मोठा भूभाग आहे. भारताच्या सीमेपलीकडे चीन मजबूत आहे. त्यामुळे सीमाप्रश्नावरून युद्ध झाल्यास भारतासाठी मोठा धक्का म्हणजे त्याला पूर्वेकडील भाग गमवावा लागू शकेल. पण त्याचवेळी हा सीमाप्रश्न सुटल्यास भारतावर दबाव आणण्याचे चीनचे शस्त्रच बोथट होईल. अरूणाचल प्रदेशच्या मुद्यावरून भारताला धमक्या देणे आणि त्याचवेळी पाकिस्तानला सर्वबाबतीत मदत करणे असा 'समतोल' चीन आतापर्यंत साधत आहे. हा समतोल त्यानंतर बिघडून जाईल. भारतावर दबाव टाकण्याचा मुद्दाच हातातून निसटून जाईल. त्यामुळे चीन असे काही करेल असे वाटत नाही.

थोडक्यात काय, तर चीन आणि भारत यांच्यात जुंपू नये म्हणून पाक तिकडे कारवाया करत राहिल आणि पाकिस्तानशी भारत भिडू नये यासाठी चीनच्या पूर्वोत्तर बाजूलाही आगळिकी अधून मधून चालूच रहातील.

थोडक्यात दक्षिण आशियातील सत्तासमतोल राखण्यासाठीचा हा चिनी फॉर्म्युला आहे.

(हा लेख तयार करण्यासाठी नेटवरील विविध स्त्रोतांमधील माहितीचा आधार घेण्यात आला आहे.)

Tuesday, September 22, 2009

पाणीपुरी


पाणीपुरी हा काय पदार्थ आहे? 'पाणीपुरी' आणि तीही 'खायची'? छ्या. पुरीत भरलेलं पाणी प्यायचं की खायचं? आणि त्यातलं पाणी महत्त्वाचं की पुरी? त्या क्षुद्र पातळ पुरीला खायचं काय? (आणि त्या पुरीतल्या पाण्यात असतं तरी काय? नुस्तं आंबटगोडपणा. उगाचच, दिवस गेलेल्या बाईसारखं वाटतं.) खाणं म्हणजे कसं असावं, ज्यातून आत्मानंद, परमात्मानंद मिळाला पाहिजे. एकेक घास खाता खाता परमोच्च आनंदाची प्राप्ती झाल्याचा फील आला नाही तर ते खाणं कसलं? त्यामुळे आंबटगोड पाणीपुरीविषयी अस्मादिकांची मतं अशी 'तिखट' होती.

पण इंदूरला आलो नि पुदिन्याचं पाणी पिऊन दुसर्‍या दिवशी पोटाचं जे होतं, तसे सगळे समज-गैरसमज 'स्वच्छ' झालेत. अरे पाणी पुरी काय खायची गोष्ट आहे? या आता इतर कुणाच्याही आक्षेपाला 'होय, पाणीपुरी खायचीच गोष्ट आहे, या आग्रहापर्यंत अस्मादिकांचा प्रवास झालाय. आता महाराष्ट्रात राहून भय्यांच्या हातची पाणीपुरी खाणार्‍यांना कदाचित माझ्या बोलण्यातलं इंगित कळायचं नाही, त्यासाठी राजे हो, इंदूरलाच यावं लागेल.

इकडे पाणीपुरी (इथल्या भाषेत पानी-पतासे) तुम्हाला कुठंही मिळेल. अगदी पाच रूपयात दहा-पंधरा पुर्‍या देणार्‍यापासून ते अगदी पाच रूपयांत पाच पुर्‍यांपर्यंतची रेंज इथे आहे. पण मुळात पाणीपुरी म्हणजे काय ते तुम्हाला आधी कळलं पाहिजे. त्यात पुदिन्याचं पाणी तर हवंच. त्याला मस्तपैकी हिरवा रंगही यायला हवा. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्याला मस्तपैकी 'चरका' म्हणजे तिखट स्वादही हवा. आता हा तिखट स्वाद म्हणजे लागलीच 'हाशहुश्श' करायला लावणारा नव्हे. आणि हा स्वादही दोन-चार पुर्‍या खाल्ल्यानंतर यायला हवा. तरच पाणीपुरी जमली महाराजा. आणि हो, ते महाराष्ट्रात मिळतं, तसं आंबटगोड पाणीही इथं असतं, पण ते स्पेशल मागणीनुसारच. ज्यांना ज्जहाल पाणीपुरी पचत, परवडत (पोटाच्या दृष्टीने) नाही, त्यांनी बापडं हे पाणी घालून घ्यावं. पण अशी आंबटगोड 'कोकणस्थी' पाणीपुरी खाण्यात ती काय मजा? पाणीपुरी खायची ती तिखट पाण्याचीच. आंबटगोडची बातच नच्छो. पाणीपुरीत बुंदी घालतात महाराष्ट्रात. तशी ती इथेही असते, पण त्यात बटाट्याचं मस्तपैकी सारणही असतं. पाणीपुरीची चव अप्रतिम करण्यात यांचाही वाटा नक्कीच मोठाय. पण या सगळ्या घटकाचं गणित तेवढं त्या पाणीपुरीवाल्याला जमलं पाहिजे. नाही तर काही तरी 'बाकी' राहून चव मात्र शून्य होते.

आणि हो, पाणीपुरी खायचंही टेक्निक आहे, बरं का महाराजा. भय्यानं पाणी भरून पुरी देणं आणि ती 'गिळंकृत' करणं यात एकतानता निर्माण व्हायला हवी नि ती पाच-सहा पुर्‍यांनी होत नाही. त्यासाठी एकामागोमाग एक पुर्‍यांची अशी लड लागली पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या पुर्‍यांची बरोबरी इथल्या पुर्‍यांशी करू नका. तिथल्या भय्यांसारखी पोटं खपाटीला गेलेली पुरी इथे मिळत नाही. इथल्या लोकांसारखीच नि त्यांच्या प्रेमासारखीच गोलगरगरीत पुरी इथं असते. त्यातलं पाणी ओरपल्याशिवाय पुरी खाल्ल्याचं समाधान नाही, मिळणार महाराजा.

महत्त्वाचं म्हणजे, पाणीपुरी कुठे खायची हेच कळलं नाही तर मग तुमची इंदूरवारी व्यर्थ. म्हणूनच इंदूरला आलात तर सराफ्यात जालच. तिथे गेल्यानंतर सराफा पोलिस चौकीच्या कॉर्नरला दोन पाणीपुरीवाले बसतात. पण अहं, त्यातल्या पोलिस चौकीच्या बाजूने बसतो, त्याची खाऊ नका. तशी तीही चांगलीच असते. पण अलीकडच्याची खाल्लीत ना तर 'दिल बाग बाग हो गया' की कायसं हिंदीत म्हणतात ना तसं होतं. नाही तर मग सिख मोहल्ल्यात या. इथे लोक फक्त पाणीपुरी खायला येतात. ( याच गल्लीत गानसम्राज्ञ लता मंगेशकरांचा जन्म झालाय. या 'मधुर' स्वराच्या गायिकेची ही गल्ली त्याच्या 'तिखट' स्वादासाठी प्रसिद्ध आहे!) तिथेही नाही जमलं तर मग छावणीत जाऊन मथुरावाल्याची पाणीपुरी खायला विसरू नका. छप्पनलाही पाणीपुरी मिळते चांगली, पण त्याहीपेक्षा मथुरावाल्याची चव काही औरच. त्याची पाणीपुरीही अप्रतिम. तिथली पाणीपुरी खाता खाता मरण आलं तरी बेहत्तर.

त्यानंतर मग तिकडे बंगाली चौराह्याला जातानाही एक पाणीपुरीवाला आहे. तिथेही पाणीपुरी छान मिळते. बाकी इंदुरात कुठेही गेलात तरी पाणीपुरी किमान एका 'एव्हरेज' दर्जाची तरी मिळतेच. पण वरच्या ठिकाणी ती खाल्लीत तर मग तुम्ही स्वर्गसुख अनुभवून आलात, असं म्हणायला काहीच हरकत नाही, काय?

ता. क. आणि हो, इंदूरच्या पाणीपुरीशी महाराष्ट्रातल्या पाणीपुरीशी तुलना करू जाल, तर जरा थांबा. कारण इथली पाणीपुरी ही साक्षात अनुभवायचीच गोष्ट आहे, महाराजा. अक्षरांमध्ये तिची चव मावत नाही, त्यामुळे तुलनेची बातच नच्छो काय?

Sunday, September 20, 2009

जग हा वेड्यांचा पसारा


जग हा वेड्यांचा पसारा असे कुणीतरी म्हटलेय, म्हणे. पण माझ्या मते जग हा मुर्खांचा पसारा असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. माझ्या या विधानाने बरेच लोक नाराज होतील, याची मला कल्पना आहे. पण मी मांडलेले स्पष्टीकरण वाचल्यानंतर ते किती योग्य आहे, हेही तुम्हाला पटेल. आणि स्वतःला मुर्ख म्हणवून घेण्याचा तुम्हालाही आनंदच वाटेल.

वास्तविक समर्थ रामदासांनी 'मुर्खांची लक्षणे' सांगितली, असली तरी त्यात बरीच कमतरता आहे. आम्ही शोधून काढलेली लक्षणे आणि त्याचे फायदे वाचल्यानंतर तुम्हीही नक्की आमचे 'दास' होऊन आमचा 'बोध' मान्य कराल याची खात्री आहे.


वस्तुतः जगात आपण किती शहाणे आहोत, हे सांगण्याची जणू स्पर्धा चाललेली आहे. पण मी किती मुर्ख आहे, हे कधीही कोणीही सांगत नाही. याचे कारण अगदी सोपे आहे. कितीही शहाणे असलो तरी आपला मुर्खपणा सिद्ध करण्याची जबाबदारी आपली नसते. त्यासाठी जागोजागी लोक टपलेले असतात.


आता हेच घ्या ना. घरात आपल्याला खाली दाखविण्याची एकही संधी बायको सोडत नाही. 'तुम्हाला काही कळत नाही. तुम्ही म्हणजे अगदी 'हे' आहात, हे सांगणार्‍या बायकोला 'हे' चा आणि 'हे' असणार्‍या नवर्‍याला त्या 'हे'चा अर्थ चांगलाच माहित असतो. आता घरात आईच बाबांना मुर्खात काढते हे 'याची डोळीयाने' पाहिल्यावर कुलदीपक आणि कुलदीपिका ही संधी कशी बरे सोडतील? वेळ आल्यावर 'बाबा तुम्हाला ना काही कळत नाही' हे वाक्य आईच्याच चालीवर आपल्या दिशेने फेकून आपण किती मुर्ख आहोत, हे 'तो' शब्द न वापरता ते बरोब्बर सांगतात.


पण घरात असा मुर्खपणा पांघरून घेण्यातही आपलीच सोय आहे, हे कधी तुमच्या लक्षात आलेय? आपल्याला हे कळत नाही, या बाबतीत आपल्याला माहित नाही, किंवा त्याचे काय करायचे असे असे म्हटल्यावर त्यासंदर्भातली आपली जबाबदारीही तिथेच संपते. कारण आपलं 'अर्ध अंग' आपण असे म्हटल्याक्षणी 'पूर्णांग' होऊन आपली जबाबदारी आपल्यावर ओढवून घेते. सहाजिकच त्याविषयाचा जास्त विचार करण्याची वेळ आपल्यावर येत नाही. आपल्याला बाजूला काढून बाकीचे लोक ती बाजू भरून काढतात. शेवटी काय 'मुर्ख' बनून रहाण्यात फायदा आपलाच असतो.


हे घरचे. बाहेरही याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती नसते. ऑफिसात काही महत्त्वाचं काम असेल तर साहेब आपल्याबरोबरच्या हुशार सहकार्‍याला बोलवतो आणि त्याला ते देतो. त्यानं कुरकुर केली, की साहेब त्याला काही कळत नाही. तूच हे करू शकतो.' असं आपलं नाव घेऊन सांगतो. थोडक्यात आपल्याला मुर्ख ठरविण्याचा कार्यक्रम इथेही सुरू असतो. पण मला सांगा आपल्या मुर्खपणामुळे आपल्यावर येऊन पाहणार्‍या संभाव्या कामाच्या जबाबदारीतून आपली सुटका होत असेल तर मुर्ख रहाण्याचा फायदा आहे की नाही?


समजा साहेबाने आपल्याला काम सोपवलेच तर ते टाळण्याची आणखी एक युक्ती तुम्हाला सांगतो. साहेबाने सोपविलेल्या कामातले आपल्याला फार कळते असे कधीही चुकूनही दाखवून देऊ नका. आपल्याला काहीच कळत नाही, असे सोंग घ्या आणि चेहर्‍यावर त्या सोंगावर छानपैकी थोडा बावळटपणा शिंपडा. तेच मुखमंडल घेऊन साहेबाकडे जा. आता थोडी निर्भत्सना सहन करण्याची तयारी ठेवा. कारण, असे म्हणतात, की मोठ्या विजयासाठी थोडी माघार घ्यावी लागते. साहेब, तुम्हाला म्हणेल, 'काय हो एवढं साधं तुम्हाला कळत नाही?'
ते समजावून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न जरी केला, तरी चेहर्‍यावरचे बावळटपणाचे भाव केसावरच्या तेलासारखे ढळू देऊ नका. ते तसेच ठेवा. म्हणजे तुमच्या बावळटपणावर शिक्कामोर्तब होईल. आणि मग हताश झालेला साहेब तुमच्याच एखाद्या सहकार्‍याला बोलावून ते काम त्याच्याकडे सोपवेल. थोडक्यात थोड्याशा बावळटपणामुळे तुमच्यावरचा कामाचा ताण किती कमी होईल? जरा कल्पना करा.


मी असा मुर्खपणा अनेकदा दाखवतो. बाजारात गेलो की खरेदी करताना आपण अगदी बावळट आहोत, आपल्याला काही कळत नाही, असा चेहरा करतो. दुकानदाराने एखादी वस्तू दाखवली की थेट त्याच्या निम्मी किंमत सांगतो. तो माझ्याकडे 'काय मुर्ख माणूस आहे हा, असा चेहरा करून बघतो. मी मात्र माझा चेहरा कायम ठेवतो आणि तिथेच चिकटून बसतो. दुकानदार मला सुरवातीच्या काळात किंमत पटवून देण्याचा प्रयत्न करतो, पण मी ते पटत नसल्याचे दाखवतो. नंतर तो हरतर्‍हेने घालविण्याचा प्रयत्न करतो. पण मी डिंकासारखा चिकटून रहातो. यामुळे होतं काय की नंतर दुकानदार वैतागून मला ती वस्तू सांगितली त्यापेक्षा बर्‍याच कमी किमतीत देऊन टाकतो. अर्थात ही युक्ती सगळीकडे चालत नसली तरी बर्‍याच ठिकाणी चालते हेही तितकेच खरे आहे.


थोडक्यात रोजच्या जगण्यात मला माझ्या शहाणपणापेक्षा मुर्खपणा जास्त फायदेशीर ठरतो. मी मुर्ख असल्याचे दाखविणे, भासविणे आणि ठसविणे हेच अंतिमतः माझ्या फायद्याचे असते. शेवटी मुर्खपणापेक्षा फायदा महत्त्वाचा. आणि कुण्या एरिस्टॉटलने का कुणीतरी म्हणूनच ठेवलेय ना 'आपण मुर्ख आहोत, हे ज्याला माहित आहे तोच खरा शहाणा.' बस्स. शहाणे ठरण्यासाठी तरी आपल्यात मुर्खपणा हवाच नाही का?

भाषा इंदूरी


इंदूरची भाषा खास इंदूरी आहे. म्हणजे आहे ती हिंदीच पण तिच्यातही बरेच प्रादेशिक रंगही मिसळेले आहेत. त्यामुळे इथली हिंदी उत्तरेतल्या हिंदीपेक्षा काहीशी वेगळी वाटणारी आहे. म्हणजे कहॉं से आ रहे हो, कहॉं जा रहे हो हे हिंदी रूप इंदूरमध्ये आल्यानंतर मात्र कहॉंसे आ रीया, कहॉं से जा रीया होतं. इथला सामान्य माणूस याच भाषेत बोलतो. हे ऐकताना आपल्याला वेगळं वाटत असलं तरी त्यांना काहीही वाटत नाही. हिंदी भाषक दुसर्‍या प्रदेशातून आलेल्यांनाही इथलं हिंदी विचित्र वाटतं. कुणीही बोलत असलं की आपण हो किंवा होय असं म्हणतो. इथं 'हाऊ' असं म्हणण्याची प्रथा आहे. स्त्री असो की पुरूष सगळे असंच बोलतात. इथे आल्यानंतर तुम्हाला उद्देशून 'भीय्या' म्हटलं तर 'भ्याव' वाटू देऊ नका. हा भय्या या शब्दाचा इथला खास इंदुरी उच्चार आहे. तेच भौत भूख लगी है असे कुणी म्हटल्यानंतर भूत पाहिल्यासारखे दचकू नका. बहूतला दिलेला हा भौत टच इंदुरी आहे.

इंदुरमध्ये पोहे 'भयानक' फेमस आहेत. आपल्याकडे जसा मिसळपाव यत्र तत्र सर्वत्र मिळतो, तसे इथे पोह्यांचे आहे. हे पोहे मागताना 'एक पोहा देना' असं म्हणावं. आपल्याला कंटाळा येतो तसा इथल्या लोकांना 'कंटाला' येतो. माळवी आणि निमाडी बोलीचाही इंदूरच्या बोलीवर प्रभाव आहे. निमाड हा भाग इंदूरला लागून असलेला त्यामुळे या भाषेचा इथे प्रभाव, तर इंदूर माळव्यातच मोडत असल्याने ती तर इथली स्थानिक भाषा. या सगळ्या मिश्रणाने इथल्या बोलीला एक खास 'टेस्ट' आहे. तुम्हाला शेजारी बसायला जागा पाहिजे असेल तर 'जगो' है क्या असे विचारले गेले तर चमकून पाहू नका. जगहचा 'जगो' हा खास निमाडी बाज आहे.

इथल्या हिंदीची जशी वेगळी चव तशीच मराठीचीही आहे. माळव्यातील मराठी बोली भन्नाट आहे. येथील लोकांच्या मराठी बोलण्यात हिंदी शब्द येणं ही 'आम' बात आहे. येथे लोक छान किंवा मजेत नसतात, तर 'बढिया' असतात. इंदूरमध्ये मराठी भागात पत्ता शोधत असताना 'थोडं पुढे जाऊन डावीकडे 'मुडा' असं ऐकू आलं नाही तर आश्चर्य वाटू देऊ नका. एकारान्ती क्रियापदांची इंदूरी आवृत्ती खाशी आहे. म्हणजे जाईल्ले, करील्ल्ये खाईल्ल्ये, अशी क्रियापदे नीट लक्ष देऊन ऐकली तर ऐकू येतात. जाशील ना, करशील ना या प्रकारच्या अंत्य शब्दांचा वळणदार पण छान वाटणारा उच्चारही येथील लोक करतात. इथल्या मराठी बोलीने हिंदी ताल धरला आहे. म्हणजे नहीं करेंगेच्या तालावर 'नाही करणार' असं म्हटलं जातं. असंच नाही आहेचं, आहे नाही होतं. वास्तविक हे इथे लिहिण्यापेक्षा ते ऐकण्यात मजा आहे.

आणखी एक बाब. इथल्या मराठी घरातील नाती मराठीच आहेत. त्याचे हिंदीकरण वा आंग्लीकरण झालेले मला तरी दिसले नाही. त्यामुळे पप्पा, मम्मी, डॅडीऐवजी शुद्ध, आई, बाबा, काका, काकू, मामा, मामी हेच शब्द येथे वापरात आहेत.


या मराठीला मुंबई, पुण्याचे लोक धेडगुजरी असं म्हणतात. पण ते चुकीचं आहे. इथल्या मराठीवर हिंदीचा प्रभाव अपरिहार्य आहे. उलट माझ्या मते अनेक मराठी कुटुंबाच्या पिढ्या येथे जाऊनही ती मराठी बोलतात, हे विशेष आहे. हिंदीच्या आधाराने का होईना पण मराठी टिकून आहे. इथले मराठी लोक साहित्यातही पुष्कळ आहे. त्यांच्या मराठी लेखनातही हिंदी शब्द असतात. मला त्याचेही कौतुक वाटते. भाषकदृष्ट्या आपल्याला ती चुक दिसेल. पण माझ्या मते हे लोक मराठीत साहित्य निर्मिती करतात हे जास्त महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रात मराठी विविध पदरी असताना इंदूरमध्ये ती वेगळे रूप घेऊन जिवंत आहे. त्यामुळे तिची उपेक्षा करण्यापेक्षा तिला बोलीचा दर्जा दिला तर ते जास्त योग्य ठरेल.

उपेक्षित सावरकर


सावरकर नाव घेताच 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी आठवते त्यांची ती प्रसिद्ध गाजलेली उडी आठवते. त्यांची सशस्त्र क्रांती आठवते. मग त्यानंतरची हिंदूत्ववादी भूमिका आठवते. आणि मग फार तर जातीनिर्मुलनासाठी केलेलं काम आठवतं. कधी कधी भाषाशुद्धी चळवळ आठवते. पण समग्र सावरकर आपण समजून घेण्याचा प्रयत्न कधी केलाय? हे सगळं आणि याहूनही बरंच काही करणारी, मांडणारी एकच व्यक्ती होती. तिला वेगवेगळे आयाम होते आणि त्यातले अनेक आपल्याला पटणारे आणि न पटणारेही होते. पण म्हणून ते समजून न घेता त्याकडे दुर्लक्षच बरेच झाले. सावरकरांना समजून घेण्यात आपण कमी पडलो आणि त्यांचं मोठेपण इतरांपर्यंत पोहचविण्यातही आपल्याला अपयश आलं. त्यातही त्यांना 'स्वातंत्र्यवीर' या उपाधीत बांधून ठेवलं, पुढे 'हिंदूत्ववादी' म्हणून त्यांचं कार्य अधिक संकुचित करण्याचा प्रयत्न आपणच केला.

राष्ट्रीय पातळीवर ज्यांचं नाव घ्यायला पाहिजे अशा व्यक्तिंमध्ये एकेकाळी महाराष्ट्रातील अनेक मोठ्या व्यक्ती होत्या. त्यात निर्विवादपणे सावरकर होते. त्यावेळी त्यांचे महत्त्व तेवढे होतेही. बंगालमधील अनेक क्रांतीकारकांना सावरकरांची प्रेरणा होती. सावरकरांचे 'मॅझिनी'चे चरित्र अनेक तरूणांमध्ये स्वातंत्र्याची ज्वाला पेटवून गेले. गांधी, सुभाष यांच्यासारख्या नेत्यांनाही त्यांना भेटावे वाटले एवढे त्यांचे महत्त्व त्या काळात होते. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांची प्रतिमा आणखी मोठी होऊ नये यासाठीही प्रयत्न झाले किंवा केले गेले. देशात कॉंग्रेसचे राज्य असल्याने आणि सावरकर कॉंग्रेसविरोधी असल्यानेही सावरकरांसंदर्भात, त्यांच्या दूरदृष्टीच्या विचारांसंदर्भात फार काही झाले नाही. अगदी आत्ता आत्तापर्यंत सावरकर द्वेष संपलेला नाही. मणिशंकर अय्यर नावाचा एक कॉंग्रेसी उटपटांग मंत्री अंदमानमध्ये असलेल्या सावरकरांच्या काव्याच्या ओळी पुसायचे धाडस करतो, तरी सत्ताधारी कॉंग्रेस सदस्यांपैकी कोणीही हे चुकीचे केले म्हणून मान ताठ करून सांगत नाही. म्हणजे राज्यात सावरकर गुणगान करणारे कॉंग्रेसचे खासदार हायकमांडसमोर मान तुकवून पिचलेल्या कण्याचे दर्शन घडवतात.

थोडं मागे जायचे झाले तर गांधीहत्येला सावरकरांचा कथित आशीर्वाद होता, म्हणूनही त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचे प्रयत्न केले. स्वातंत्र्यासाठी झगडणार्‍या या स्वातंत्र्यसूर्याने स्वातंत्र्यासाठी शंभर वर्षाची शिक्षा झाली पण आपले उद्दिष्ट साध्य झाल्यानंतरही त्यांना कोठडी चुकली नाही. गांधी हत्येच्या निमित्ताने हेही घडले.

सावरकरांचे जहाल हिंदूत्ववादी विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही मानवत नाहीत. म्हणून संघाच्या व्यासपीठावर सावकरांच्या फोटोला सहसा स्थान नसते. मुळात सावकरांनीच हिंदू महासभा नावाचा वेगळाच पक्ष काढला होता. पुढे संघप्रणित जनसंघ हा राजकीय पक्ष स्थापन झाल्यानंतरही हिंदू महासभेचे स्थान कायम होते. सावरकरांची विज्ञाननिष्ठाही संघीयांना अडचणीत टाकणारी होती. 'गाय हा उपयुक्त पशू असून प्रसंग ओढवला तर गायीचे मांसभक्षण करायलाही हरकत नाही' असे सावरकरांचे 'प्रॅक्टिकल' विचार पुराणमतावादाला धरून चालणार्‍या संघाला परवडणारे नव्हते. त्यामुळेच संघाने सावरकरांना दूर ठेवूनच चालायला सुरवात केली.

समाजवाद्यांना सावरकरांचे हिंदूत्ववादी धोरणच मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी सावरकरांची तळी उचलून धरण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळे समाजवाद्यांनी कायमच सावरकरांना दूरच ठेवले. त्यामुळे सावकर उपेक्षितच राहिले. कम्युनिस्टांच्या दृष्टीने सावरकर आणि इंग्रज सारखेच होते. सुभाषचंद्र बोस व सावरकरांवर त्यांनी कायम टीकाच केली. इतकेच नव्हे तर अंदमानच्या तुरूंगातून राजकीय आंदोलनात न पडण्याच्या अटींवर सावरकर बाहेर पडले ही बाबही बिनडोक कम्युनिस्टांसाठी सावरकरांच्या राष्ट्रभक्तीत न्यून दाखविणारी ठरली. मुळात सावरकरांसारखा अतिशय महत्त्वाचा नेता तुरूंगात खितपत पडून रहाणे त्या काळात परवडणारे नव्हते. त्यामुळे तिथे खितपत पडून रहाण्यापेक्षा बाहेर काही कार्य करत रहाणे जास्त महत्त्वाचे हे सावरकरांनी महत्त्वाचे मानले. त्याचवेळी आपल्यापेक्षा आपल्या इतर सहकार्‍यांची सुटका करावी यासाठी ते जास्त आग्रही होते, हेही कागदपत्रातून पुढे आले आहे. पण हे समजण्याइतकी कम्युनिस्टांची बुद्धी कधी प्रगल्भ झालीच नाही. रत्नागिरीला अज्ञातवासात असतानाही सावरकरांनी राजकीय कार्य लपून छपून केलेच. त्याकडे त्यांचे अगदी सोयीस्कररित्या दुर्लक्ष होते.

मुळात मोठ्या विजयासाठी थोडी माघार घ्यावीच लागते, हे शिवाजी महाराजांचे धोरण सावरकरांनी अतिशय मुत्सद्दीपणे राबविले. त्यामुळे सावरकरांच्या या निर्णयात चुक काय? तेच कळत नाही. कम्युनिस्टांपैकी कोणत्या नेत्याला शंभर वर्षे तुरूंगवास झाला? कोणी कोलू ओढणे, अतिशय विपरीत स्थितीतही जगण्याची लालसा जिवंत ठेवत ठामपणे जिवंत रहाणे हे कुणी सहन केले?

सावरकरांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्यही याच काळात केले, हेही कम्युनिस्ट विसरतात. धर्म ही अफूची गोळी मानायची आणि येऊन जाऊन मुस्लिमांचे लांगुलचालन करायचे हा कम्युनिस्टांचा उद्योग राहिला. त्यांना जाती व्यवस्था संपवून टाकण्यासाठी झटत असलेले सावरकर कधी दिसलेच नाहीत. गांधींच्या अस्पृश्यता निर्मुलन चळवळीचे गोडवे गायले जात असताना गांधी चार्तुवर्ण्यावर विश्वास ठेवणारे होते, याकडे दुर्लक्ष होते आणि 'जातीजातीतील मानवी जन्मजात जातिभेदाचा उच्छेद करावयाचा म्हणजे या जातीजातीतील मानवी उच्चनीच भावनेचा व तदअनुषंगिक विशिष्टाधिकारंचा तेवढा उच्छेद करायचा' असे मत मांडणारे सावरकर 'हिंदूत्वाचा' मुद्दा मांडतात म्हणून प्रतिगामीही ठरविले जातात.

दुसरीकडे सावरकरभक्तांनी नेहमीच गांधींवर टीका करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे झाले असे की गांधी मोठे होतेच, पण त्यामुळे दुर्देवाने सावरकर उगाचच छोटे ठरविले गेले. समाजातही कट्टर सावरकरभक्त व विरोधक असे दोन गटच तयार झाले. सावरकरभक्तांचा एक गट कायम वेगळाच राहिला. त्यांच्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टीही विकसित झाली.


सावरकर या देशासाठी झटले असतील पण त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही, अशा प्रकारे सरकारी पातळीवर ते कायम उपेक्षित राहिले. त्याचा परिणाम समाजावरही आपसूक पडला. कारण ते काही 'सरकार प्रायोजित' स्वातंत्र्यवीर ठऱले नाहीत. देशपातळीवर उंची गाठलेला एक नेता आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादीत ठरवला गेला. त्यातही 'स्वातंत्र्यवीर' या 'कोंदणात' आणि 'मार्सेलिस'च्या उडीत त्यांचे कर्तृत्व आटोपले. त्यापलीकडेही सावरकर आहेत, हे फारसे कधी पुढे येतच नाही. त्यांचे काही विचार कदाचित न पटणारेही असतील. मग याच न्यायाने गांधी तरी कुठे पूर्णपणे पटणारे होते? सावरकरांचे विविध विषयासंदर्भातील चिंतन, दूरदृष्टी, मते याविषयी समाजात सातत्याने चर्चा होणेही कधी घडत नाही. किंबहूना असे विचार करणारे लोक प्रतिमागी ठरवले जातात. सावरकर विज्ञाननिष्ठ हिंदूत्ववादी असले तरी हल्ली 'हिंदूत्ववाद' मात्र प्रतिगामी ठरलाय. दुर्देव दुसरे काय.


सावरकर हे इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ आणि विचारवंतही होते. ब्रिटिश, कम्युनिस्टांच्या नजरेतील इतिहासाला त्यांनी भारतीय दृष्टी दिली. १८५७ चा उठाव हा तोपर्यंत बंड ठरवला होता, पण सावरकरांनी हे बंड नव्हते स्वातंत्र्यसमर होते, हे ठासून सांगितले. स्वातंत्र्याची पहिली ज्वाला या घटनेनेच पेटवली, हेही त्यांनी बर्‍याच आधाराने सांगितले. त्यासाठी इतिहासही खोदून काढला. दुर्देवाने या उठावाची दीडशे वर्षे दोन वर्षापूर्वीच सरकारी पातळीवर झोकात साजरी झाली, पण गेले वर्ष सावरकरांचे १२५ वे जयंती वर्ष असूनही सरकारी पातळीवर सारे काही थंड होते. सावरकरांची उपेक्षा अजूनही संपलेली नाही, याचा हा पुरावा.

माय, मावशी नि माझी लेक!


जैसी हरळामाजी रत्नकिळा
की रत्नांमजी हिरा निळा
तैसी भाषांमाजी चोखळा
भाषा मराठी
फादर स्टिफन्स या पोर्तुगीज माणसाने लिहिलेले मराठी भाषेचे वर्णन वाचून छाती अभिमानाने फुगली. तोच आमची साडेतीन वर्षाची लेक आली. तिच्या हातात बाहूली होती. तिला तिचे कपडे बदलायचे होते. तिने 'ऑर्डर' सोडली, बाबा, मला जरा बाहूलीचे कपडे 'निकलून' द्या ना ! क्षण दोन क्षण काय बोलली ते कळलंच नाही. मग मेंदूपर्यंत झण्णकन गेल्यासारखं काही तरी झालं. 'कपडे निकालके दे ना' या हिंदी वाक्यातल्या 'निकलके'चा लचका तोडून तिने मराठी वाक्याला जोडून माझ्यासमोर आदळला होता. तिला हवं ते करून देत मी निमूटपणे 'भाषांमाजी साजिरी
मराठिया' च्या हिंदी अवतारावर विचार करत बसलो.

सव्वादोन वर्षाच्या इंदूरी वास्तव्यात आमच्यापेक्षा आमच्या कन्येने मराठीच्या या मावशीला आमच्यापेक्षा जास्त आपलेसे केल्याचे लक्षात आले. सुरवातीला आम्ही महाराष्ट्रातून आलेलो, म्हणजे आमचे मराठी म्हणजे 'नेटिवां'पेक्षा खासच अशी एक उगाचच मिजास स्वभावात होती. कन्येने ती मिजास उतरवून टाकण्याचा पार विडाच उचलला. याची खरी सुरवात झाली ती शाळेत जायला लागल्यावर. तिने हिंदी चांगले बोलावे ही आमची अपेक्षा होतीच, पण मराठीत हिंदी शब्द यायला नको असं आम्हाला आपलं वाटायचं. (इंदुरी मुलांसारखं आपली मुलगी 'हिंमराठी' बोलायला नको अशी खाज उगाचच मनात असावी!) तिच्या आधीच्या नर्सरीत मराठी भाषक लहान मुले होती. पण प्रामुख्याने बोलणे हिंदीतच व्हायचे. मग हेच हिंदी शब्द तिच्या मराठीच्या हद्दीत येऊन घुसखोरी करायला लागले. सुरवातीला भातात खडे लागल्यासारखे लागायचे, पण आता या भाताचीही आम्हाला सवय झालीय. व्हॅनवाल्या 'शंकरभय्या'पासून ते शाळेतल्या 'मॅम'पर्यंत आणि सगळ्या फ्रेंडसोबत आमची कन्यका हिंदीत सराईत संवाद साधते.

त्यांच्याशी बोलताना हिंदी छान बोलणारी आमची कन्या आता आमच्याशीही हिंदाळलेल्या मराठीत बोलायला लागलीय. 'बाबा चिल्लाऊ नकोस' असं एकदा माझ्यावर ओरडल्यानंतर मी गप्प. काय बोलणार? ती शाळेत जाण्यासाठी 'तैय्यार' होते. डिस्नेवरच्या आर्ट एटॅकसारखं ती काही तरी फरशीवर करते नि म्हणते 'बाबा बघ, मी कसं 'शेहर' बनवलं.' 'आई, मला गोदीत घे ना' असं म्हटल्यावर तिच्या आईलाही आपल्याला धरणीने गिळंकृत करावंसं वाटतं. ती आमच्याशी चर्चा नाही 'गोष्टी' करते. मैत्रिणींशी 'बातें' करते. लपाछपीत ती 'छुपून' बसते. तिला 'गर्मी' होऊन 'पसीना' येतो. 'चिडियाघर'मध्ये गेल्यानंतर 'शेर' तिला 'डरावना' वाटतो. 'बंदर' पाहून मजा वाटते. भिंतीवर 'चिपकली' असते. ती शाळेत नाही, 'स्कूल'मध्ये जाते. तिला 'पढायचं' असतं.

या घुसखोरीपर्यंतही ठीक आहे, पण मराठी शब्दांनाही ती हिंदीचा आधार देऊ लागलीय. हिंदीत प्रत्येक शब्द वेगळा असतो, तिथे प्रत्यय नावाची भानगड नाहीये. त्यामुळे कन्येनेही तिच्या मराठी बोलण्यातले बरेचसे प्रत्यय उडवून लावलेत. ती गाय'ला' पोळी घालते, गायीला नाही. 'चोर'ला पकडायला पाहिजे, असं ती म्हणते. हा 'वाला' तो 'वाला' असं म्हणणारी माझी लेक 'लालवाला स्कर्ट पेहनायचाय' असं सहज म्हणून जाते.

खरी गंमत तिचा अभ्यास घेताना होते. तिला गोष्ट तीन भाषांमध्ये सांगावी लागते. मराठी भाषांत शिकलेल्या आम्हाला तिला गोष्ट सांगताना भयंकर शाब्दिक फरफट करावी लागते. ती जाते, इंग्रजी माध्यमात. पण तिथे 'मॅम' समजावून सांगतात, ते हिंदीत. आणि आम्ही घरी बोलतो मराठीत. पण गोष्ट सांगताना तिच्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आम्हाला आमच्या तोडक्यामोडक्या हिंदीचाच आधार घ्यावा लागतो. अनेक शब्द आठवावे लागतात. मराठीला पर्यायी हिंदी शब्दांचा पाठलाग करून त्यांना पकडावे लागते. कोल्हा म्हणजे की 'भेडिया' चमकादड म्हणजे वटवाघूळ, उल्लू म्हणजे घुबड हे लक्षात ठेवावं लागतं. तिला गोष्टीही खरगोश-कछुवा, चुहा- बिल्ली यांची सांगावी लागते.

तिच्या अभ्यासात येणार्‍या शब्दांकडेही नीट लक्ष द्यावं लागतं, नाही तर आमचीच एखाद्या गाफिल क्षणी विकेट उडण्याची शक्यता असते. आम्ही अ अननसाचा शिकलो होतो. आ आईचा होता. पण तिच्या शाळेत अ अनारचा, आ 'आम'चा इ इमलीचा आणि ई 'ईख'चा( उस) असतो. तिची बाराखडीचीही गाणी आहेत. 'अम्मा आई आम लायी..' हे सुरवातीच्या शाळेतलं गाणं आता आणखी वेगळं झालंय. 'अ अनार का मीठा दान आ आम को चूसके खाना' असं झालंय. 'एडी ढोलो ऐनक ले लो, ओखली में मूसल कांड, औरत ने फिर पकडा कान' यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आधी आम्हाला समजून घेऊन तिला सांगायला लागलाय. आमच्या लहानपणीची गाणी तिला आम्ही शिकवलीय, पण ज्या गाण्यांचा पगडा तिच्यावर बसलाय अर्थातच ती हिंदी आहेत. कारण ती शाळेत घोकून घेतली जातात. 'खबडक खबडक घोडोबा घोड्यावर बसले लाडोबा' म्हणणारी माझी कन्या आता 'लकडी की काठी काठी पे घोडा' सहजपणे म्हणून जाते. मराठीतून पोहणारी आमची मासोळी तिच्या तोंडी 'मछली जल की रानी है. जीवन उसका पानी है' अशी झालीय. 'कोरा कागद निळी शाई' म्हणणार्‍या आम्हा आई-बापांची ही लेक खेळातही हिंदी गाण्यांवर 'झुमते'. 'अटकन मटकन दही चटाकन, राजा गया दिल्ली, दिल्ली से लाया बिल्ली, बिल्ली गई लंडन' 'ओ मीनो सुपर सीनो, कच्चा धागा रेस लगाओ' ही सध्या तिची खेळातली गाणी.

एका अरूंद पुलावर दोन बकरे आले आणि भांडता भांडता दोघांनी पलीकडे जाण्याचा उपाय शोधला ही गोष्ट ' एक सकरे पुलपर दो बकरे' अशी हिंदीत आहे. कन्या सांगत असतानाच त्याचा अर्थ कळला, पण दहावीपर्यंत हिंदी विषय असूनही 'सकरे' म्हणजे अरूंद हे समजायला मुलगी हिंदी माध्यमाच्या शाळेत जावी लागली.

तिच्या हिंदीतले शब्दच फक्त मराठीत घुसखोरी करतात असं नाही. तर हिंदीची वाक्यरचना तिच्या मराठीत डोकावते. म्हणूनच जाईल्ले, करील्ले, खाईल्ले हे उच्चारही तिने नकळत आत्मसात केले आहेत. शिवाय 'गडबड होऊन जाईल, 'गोष्टी करून घे' 'मी तर तैय्यार झाले', अशी हिंदीच्या चालीवरची मराठी वाक्येही ती बोलून जाते.

पण आता या सगळ्याची आम्हाला सवय झालीय. मराठीचा आग्रह आम्ही सोडलाय. तिला मराठी यायला हवं हे नक्की. पण आम्ही जसं बोलतो तसं ती कसं बोलेल? दोघांची बालपणं वेगळ्या वातावरणात गेली. त्यातला फरक असा मिटवता येणार नाही याचीही कल्पना आलीय. एक मात्र नक्की तिचं हिंदी उच्चारणही अगदी इकडच्यासारखं टिपीकल होतंय. आमची मात्र हिंदीची झटापट अजूनही सुरूच आहे. हिंदी बोलताना येणारा मराठी लहेजा लपवू म्हणता लपत नाही. आणि मुलगी मात्र मावशीच्या कडेवर बसून जगाच्या खिडकीबाहेर नजर टाकतेय.

भाषा हरवली म्हणजे अस्तित्व हरवते ?


उत्तर भारतीयांच्या आक्रमणापुढे माघार घेत चालेला मराठी माणूस आणि त्याची भाषा आणि संस्कृती हा विषय गेल्या अनेक दिवसांपासून अनेकांच्या चिंतेचा, चिंतनाचा बनला आहे. अनेकांचे ते राजकीय हत्यार बनले आहे आणि अनेकांची दुखरी नस. शिवाय व्यक्तिगतरित्या प्रत्येकाचा या विषयाकडे पाहण्याचा आपापला चष्माही आहे. भाषा हरवली म्हणजे अस्तित्वच हरवते, असाही मुद्दा उच्चरवात मांडला जातोय. याच अनुषंगाने इथे इंदूरमध्ये रहात असल्याने मला काही आढळलं हे मांडण्याचा हा प्रयत्न...

प्रामुख्याने होळकर काळापासून मराठी वर्ग इथे आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण त्यानंतरही महाराष्ट्रातून या भागात होणारे स्थलांतर थांबलेले नाही. नोकरीपासून धंद्यापर्यंत हे स्थलांतर आजही होतेय. पुणे, मुंबईतून अल्पसा वर्ग प्रामुख्याने नोकरीच्याच मिषाने इथे आला आहे. ज्याचे वास्तव्य साधारपणे अल्पकालीनच म्हणजे नोकरीपुरतेच असते. पण याशिवाय नागपूर आणि विदर्भातून मोठ्या प्रमाणात इथे लोक येतात. यात उच्चशिक्षित नोकरीसाठी येतात, तर इतर म्हणजे समाजातल्या खालच्या स्तरातले लोक छोट्या-मोठ्या नोकर्‍या आणि व्यवसायासाठी इथे येतात. याची कारणे अनेक आहेत. विदर्भातील लोक प्रामुख्याने इंदूर, भोपाळ, जबलपूर आणि छत्तीसगडमधल्या विलासपूर, रायपूर या भागात वरील सर्व कारणांसाठी स्थलांतरीत होतात. म्हणजे मूळ स्थलांतरीत आणि नव स्थलांतरीत असा मोठा वर्ग मध्य प्रदेशातील या शहरांत रहातो आहे. याशिवाय फार वर्षांपूर्वी स्थलांतरीत झालेली अनेक मराठी मंडळी मध्य प्रदेशातील अनेक गावागावांत रहात आहेत, ती वेगळी.

ही सगळी मंडळी (प्रामुख्याने फार पूर्वी स्थलांतरीत झालेली) इतकी वर्षे राहूनही मराठी राहिली आहेत का? तर मुळात मराठी रहाणे म्हणजे काय हे आधी तपासावे लागेल? भाषा या दृष्टिकोनातून विचार केल्यास महाराष्ट्रात बोलली जाते तशी मराठी इथे नक्कीच बोलली जात नाही. त्यातल्या त्यात एकुणात मध्य प्रदेशात इंदूरमध्ये बरीच बरी मराठी बोलली जाते. बरीच बरी हा शब्द गुणात्मक आणि संख्यात्मक दोन्ही दृष्टीने लागू आहे. पण इंदूरी मराठी म्हणजे हिंदीची पोटबहिण मानायला हरकत नाही, इतकी त्यात सायुज्यता आहे. इंदूरी मराठीचे अनेक नमुने मी यापूर्वीच्या माझ्या लेखात आणि इतरांनी दिलेल्या दुव्यातही सापडतील. पण अनेक कुटुंबात पुढची पिढी प्रामुख्याने हिंदीत बोलते. याचे कारण आदल्या पिढीत किमान (इंदूरचा विचार केला तर) मराठी शाळा होत्या. त्यामुळे त्यांचे काही शिक्षण मराठीत किंवा मराठी विषय घेऊन झाले. तसे या पिढीत झालेले नाही. घराच्या बाहेर पडल्यानंतर मराठीचा कुठेही संबंध येत नाही. मैत्रिणी मराठी असल्या तरी एकुणात ग्रुप हिंदी असल्याने दोन मराठी मैत्रिणी हिंदीतच बोलतात. त्यांना हिंदीत बोलणेच जास्त कम्फर्टेबल वाटते. अनेकांना मराठी कळते, पण बोलता येत नाही. काहींचे आई-बाबा मराठीत, मुले हिंदीत आणि परस्परांशी बोलताना हिंदीतच बोलतात.

हे सगळं असलं तरीही ही मंडळी 'मराठीच' राहिली आहेत, भलेही ती हिंदी बोलत असली तरी. कशी? पहा. भाषा हा निकष लावला तर नक्कीच त्यांना 'मराठी येत नाही', 'तितके चांगले येत नाही' किंवा 'समजते पण बोलता येत नाही' अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर आहे. पण मराठी माणसांची गुणवैशिष्ट्ये मात्र त्यांनी उचलली आहेत. इथला मराठी माणूस व्यवसायात फारसा कुठेही दिसत नाही. इथला संपूर्ण व्यवसाय गुजराती आणि मारवाडी आणि उरलेला हिंदी भाषकांच्याच ताब्यात आहे. मराठी माणूस इथेही नोकरदारच आहे. शिक्षण क्षेत्रात प्रामुख्याने मराठी मंडळी नावाजलेली आहेत. बाकी इतर नोकर्‍यातही मराठी माणूस मोठ्या 'टक्क्याने' दिसून येतो. पत्रकारीतेतही मराठी नावे दिसून येतात. नई दुनिया या प्रमुख दैनिकाचे संपादक जयदीप कर्णिक हे तर चक्क मराठी आहेत. मुळात या दैनिकाचे एक गाजलेले संपादक कै. राहूल बारपुते (पुलंचे मित्र) मराठीच होते. याशिवायही अनेक मराठी भाषक हिंदी पत्रकारांची देदिप्यमान परंपरा इथे आहे.

मराठी माणसाची सांस्कृतिक आवड नि गरज इथेही तुटलेली नाही. इंदूरमध्ये तरी भरपूर मराठमोळे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. त्यासाठी महाराष्ट्रातून कलावंत तर येतातच, शिवाय इथेही मोठ्या प्रमाणात नाटके, गाण्याचे कार्यक्रम होतात. आधीच्या तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी नियमितपणे होतात ही महत्त्वाची बाब आहे. त्याला उपस्थित रहाणारी मंडळी चाळीशीच्या पलीकडे असतात. पण काही चुकार तरूणही दिसून येतात. सानंदसारख्या संस्थेच्या माध्यमातून मराठीपण हरवू नये यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. त्यात नाट्य व एकांकिका स्पर्धेचा उपक्रम आहे. यात मोठ्या प्रमाणात मराठी तरूण जोडला गेला आहे. हा तरूण एरवी हिंदी बोलतो आणि कार्यक्रम मराठीत सादर करतो. (आश्चर्य वाटेल, पण डिश टिव्ही आल्याचा मोठा फायदा इथल्या मंडळींना झाला कारण समकालीन मराठी काय आहे ते त्यांना कळले. हल्ली इथल्या सर्व मराठी घरांत किमान सायंकाळी तरी मराठीच कार्यक्रम लागलेले असतात.)

पुरोहित परंपरा इथेही जपली गेली आहे. सगळे मराठी सण, समारंभ नियमित व्रतवैकल्ये इथला मराठी माणूस करतो. किंबहूना जास्त निष्ठेने करतो. माझी बायको या सगळ्या व्रतवैकल्यात फारशी सहभागी होत नाही, हे पाहून आमच्या घरमालकिणबाईंना आश्चर्य वाटते. बारशापासून बाराव्यापर्यंत कुठलेही विधी हिंदी पद्धतीने होत नाहीत. हिंदी भाषकांचा सांस्कृतिक व धार्मिक त्यांनी आपल्यावर पडू दिला नाही. म्हणूनच करवा चौथ मराठी भाषक महिला करत नाहीत. हिंदी भाषकांचा श्रावण आपल्याआधी पंधरा दिवस सुरू होतो. पण इथले मराठी भाषक श्रावण आपल्या पद्धतीनेच साजरा करतात. (उज्जैनला श्रावण सोमवारी महाकालाची स्वारी निघते.खास मराठी भाषकांसाठी ती इथल्या श्रावणाच्या पाचव्या आणि मराठी भाषकांच्या पहिल्या श्रावण सोमवारीही काढली जाते.) गणपतीला आलेले महाराष्ट्रातील उत्सवी रूप तसेच इथे दिसत नसेल, पण इतर शहरांपेक्षा इथला उत्सव डोळ्यात भरेल असाच असतो. स्वयंपाकात या भागातल्या पदार्थांनी शिरकाव केला असला तरी मुळचे मराठी पदार्थ सुटलेले नाहीत. इथल्या सर्व सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक उपक्रमात सर्व जातीसमूहात वाटला गेलेला मराठी माणूस सहभागी असतो. धनगर, मराठा समाजही इथे मोठ्या प्रमाणावर आहे ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे.

या झाल्या सार्वजनिक गोष्टी. वैयक्तिक किंवा खासगी बाबीतही हे मराठीपण तुटलेले नाही. हिंदी भाषक प्रांतात असल्याने आंतरजातीय विवाह हिंदी भाषकांशी होतात, पण हे प्रमाण तसे कमी आहे. प्रामुख्याने आपल्या भाषक जातीगटात विवाह करण्याकडेच इथल्याही बहुतांश पालकांचा कल असतो. त्यातही गंमत आहे. मुलगा किंवा मुलगी शक्यतो मध्य प्रदेशातीलच असावी यासाठी पालक बर्‍याचदा आग्रही असतात. कारण एकच, वातावरणाची सवय. मध्य प्रदेशातील एक विशिष्ट रहाणीमानाची सवय झालेली असते. महाराष्ट्रात मुलगी दिल्यास सगळेच वेगळे असाही विचार असतो. आता मुलगा किंवा मुलगी नोकरीसाठी महाराष्ट्रात गेल्यास या अटी गळून पडतात.

मराठी माणसांची याही पलीकडे असलेली गुणवैशिष्ट्ये इथल्या मराठी मंडळींनी जपलीत. 'चळवळेपण' सुटलेले नाही. स्वातंत्र्यसंग्रामापासून ते अगदी आताच्या सहकारी चळवळीपर्यंत आणि राजकारणातही मराठी माणसू एक्टिव दिसून येतो. मराठी माणसाच्या या सगळ्या सांस्कृतिक, सहकारातील, राजकारणातील आणि इतर चळवळीतील योगदानामुळे इंदूरमधल्या अनेक चौकांना, वास्तुंना मराठी माणसांची नावे आहेत. (होळकर विश्वविद्यालय, सरवटे बस स्टॅंड, देवळालीकर कलाविथिका, होळकर रूग्णालय, बापट तिराहा, वाकणकर पुरस्कार इ.अशी अनेक नावे सांगता येतील.) समाजिक कामात इथेही मराठी माणूस आघाडीवर आहे. मध्यंतरी देहदानासंदर्भात एक बातमी होती. त्यात देहदानाचे प्रमाण कमी अशी खंत व्यक्त केली होती. त्यात देहदान करणार्‍या दहा व्यक्तींची नावे होती. त्यात सहा मराठी होती. बाकीची जैन! इथल्या वृत्तपत्रात सामाजिक सुधारणेसंदर्भातील पत्रे छापून येतात, त्यातली अधिकांश मराठी माणसांनी लिहिलेली असतात. इथे मराठी वाचनालयेही बरीच आहेत, त्यांना सदस्यही बर्‍यापैकी आहेत. नवीन पुस्तकेही बरीच येतात. इतकेच नव्हे तर येथील लेखकांची मराठी पुस्तके प्रकाशितही होतात. अगदी तीन दिवाळी अंकही निघतात.

मराठी भाषकांच्या मोठ्या गटामुळे त्यांच्याविषयीच्या बातम्या इथे विपुल शब्दांत छापून येतात. त्यांचे सण-समारंभ, कार्यक्रम यांचे वृत्तांतही येतात. त्यांची दखल पेपरवाल्यांना घ्यायलाच लागते. अनेक पेपरवाल्यांनी आतले एक पान मराठीत द्यायला सुरवात केलीये. एवढंच काय आत्ता झालेल्या विधानसभा निवडणुकीत या भागातून उभ्या असलेल्या एका उमेदवाराने या भागातली तेवढी पत्रके मराठीत छापली होती.

भाषा सुटली म्हणून इथल्या मंडळींनी संस्कृती सोडली नाही. उलट ती घट्ट धरून ठेवली. याची कारणे काय याचा मी अनेकदा विचार करतो. भाषा सुटल्याने सामाजिक अस्तित्व संपणार नाही, पण संस्कृती तुटली तर तेच गमावून बसू आणि इथल्या हिंदी भाषकांत इतके मिसळून जाऊ की आपण कोण याची ओळख आपल्यालाच पटू नये, ही जाणीव कदाचित इथल्या मराठी मंडळींमध्ये खोलवर रूजली असावी.भाषा टिकवणे, जपणे खरं तर ही वैयक्तिक आणि नंतर सामूहिक बाब आहे. त्यासाठी आपण किती आग्रही रहातो हे जास्त महत्त्वाचे आहे.

(ता. क. माझ्या इंदूरमधल्या एका परिचितांनी सांगितलं, इथे पूर्वी राजवाड्याच्या भागात किराणा मालाची बरीच दुकानं होती. अर्थातच गुजरात्यांची. त्यांच्याकडे मराठीत यादी घेऊन गेलो तरी ते सामान काढून द्यायचे. इतकच नाही, तर यादीतली एखादी वस्तू क्रमाने नसली तरी सांगायचे.' एवढंच काय माझ्या कॉलनीसमोरची दुकानंही सिंधी आणि गुजराती माणसाची आहे. तिथे कोकणातल्या कोकम सरबतापासून, चितळेंच्या मिठाईपर्यंत सारं काही मिळतं. यादी मराठीत दिली तरीही तो सामान न चुकता आणू देतो. जुजबी मराठी बोलायलाही ते शिकलेत. त्याला ही गिर्‍हाईकं टिकवून ठेवण्याची नि वाढविण्याची गरज असल्याने तो ही भाषा शिकला!)

बदलाबदली!

बदल हा माणसाचा स्थायीभाव आहे. बदलतो तो माणूस. बदलला म्हणून माणूस इथवर पोहोचला. असली बदलाबदलीची वाक्ये ऐकून, वाचून कान आता किटले नि डोळे विटले आहेत. अस्मादिक 'ठेविले अनंते तैसेचि रहावे' या तुकारामी प्रवृत्तीचे. त्यामुळे बदलाचं वारं काही झेपत नाही. मग तो बदल वैयक्तिक असो की सार्वजनिक. वैयक्तिक बाबतीत लिहायचं तर, अगदी हाफिसमधली जागा असो, खुर्ची असो, कम्प्युटर असो की आणखी काही. यातलं काही काही बदललेलं चालत नाही. मालकाने पैसे मोजून ठेवून घेतलं असलं तरी या 'ठेविले अनंते' वृत्तीचा माज मात्र त्याला सहन करावाच लागतो. कारण माझ्याकडून होणार्‍या कामातूनच त्याला 'चित्ती समाधान' लाभत असतं. पण हाफिसातली ही मिजास सगळीकडे चालत नाही. असो.

...तर नमनाला घडाभर तेल घालण्याचं कारण काय ते पहिल्याछूट सांगतो. पण त्यासाठीही आणखी थोडं तेल सांडावंच लागेल.

तर सांगायचा मुद्दा असा की तुम्ही घरात गेलात आणि भिंतीवरचे घड्याळ अचानकपणे दुसर्‍या भिंतीवर पाहुणे म्हणून गेले की त्या दिवशी हमखास मान भूमितीत शिकलेल्या सगळ्या कोनात फिरते की नाही? नाष्ट्याला पोहे देऊन सौभाग्यवती अंघोळीला निघून जातात नि चमचा द्यायाच विसरतात. मग खाण्यासाठी खुणावत असलेल्या पोह्यांसाठी चमचा शोधण्याची शर्यत सुरू होते. नेहमीच्या जागेवर हात घालूनही तो सापडत नाही, पण त्या गाफिल क्षणी संधी साधून तिथे ठेवलेली किसणी हमखास टोचते की नाही? घाईघाईत कपाटात मोजे घालण्याच्या कप्प्यात हात घातला जातो नि तिथे पुजेसाठी ठेवलेल्या टोप्या सापडतात की नाही? अंघोळीला जाण्यासाठी बाथरूममध्ये शिरणार तोच टॉवेल घ्यायचं लक्षात येतं. नि टॉवेलच्या जागेवर हात जातो नि तिथे हातरूमाल सापडतात. हे सारं तुमच्याही आयुष्यात नक्कीच घडत असेल. माझ्याही घडतं. पण माझ्याकडे तुमच्यापेक्षा एक टक्का तरी नक्कीच जास्त घडतं. पण ही टक्केवारी नेमकी किती हे बरीक आता तुम्हीच ठरवा.

तसं आमचं स्वतःचं 'अंग' कोणत्याही बदलाला दाद न देणारं. कारण बदल म्हटला की हालचाल आली. हालचालीसाठी चापल्य हवे ते आमच्या शरीराला नि स्वभावाला शोभत नि सोसवतही नाही. पण आमचं 'अर्धांग' मात्र प्रचंड चपळ. बदबदलीच्या या खेळात प्रचंड तरबेज. चापल्य हा मुल स्वभाव असल्याने इथून तिथे, तिथून इथे हा स्वस्वभाव वस्तूंमध्येही उतरविण्यात तिचा हात मीही (चापल्याअभावी!) धरू शकलेलो नाही. म्हणूनच आमच्या घरात कोणतीही गोष्ट ३६५ काय दिवसभरात एका ठिकाणी राहिल तर शपथ.

म्हणूनच, स्थलांतर, स्थानांतर, निर्वासित, विस्थापित, स्थानभ्रष्ट या शब्दांचा खरा अर्थ लग्न झाल्यानंतरच कळला. कारण हाफिसातून परत येईपर्यंत आमच्या घरातल्या अनेक वस्तूंनी आपली जागा सोडलेली असते. भिंतीला टेकून असलेलं टेबल अवचितपणे दुसर्‍याच कुठल्या भिंतीशी गुलुगुलू बोलू लागतं. दरवाजालगतचा टिव्ही अगदी विरूद्ध दिशेला कुठल्याशा भिंतीच्या आधाराने टेकवला जातो. दिवाणखान्यातल्या भिंती सजवत असणारी चित्रे अचानक तिथून गायब होतात नि भलत्याच भिंतीची शोभा वाढवतात. कुठल्याश्या टेबलाखालची पुस्तके बैठकीच्या खालच्या जागी विराजमान होतात. नि बैठकी खालच्या वस्तू टिव्ही खालच्या कपाटात विस्थापित होतात. संध्याकाळी घरी आल्यानंतर आपण आपल्याच घरात शिरतोय की दुसर्‍याच्या असा प्रश्न पडावा इतकं घराचं रूपडं बदललेलं असतं.

कपाटातले माझे कपडे जागा सोडून भलत्याच कप्प्यात घुसतात. कम्प्युटरखाली सीडी ठेवलेल्या खणात अनेकदा सुईदोरा नि लेकीची खेळणी सापडतात. कपाटातले कपडे भिंतीतल्या कपाटात कोबंले जातात नि इतर वस्तू कपाटात शिरतात. कपबशींची कोणीही वटवट न करता जागा बदलून त्याच मांडणीत जाऊन टेकतात. चमचे, पेले ताटल्या, वाट्या कोणतीही किणकिण न करता गुमान जिथे जातील तिथे सुखी रहायचा प्रयत्न करतात. पाण्याची पंचपात्री खळखळ न करता ओट्यावरून खाली जाते, तर कधी प्रमोशन होऊन ओट्यावर येते. ओट्याच्या खालच्या वस्तू मांडणीत शिरतात, तर मांडणीतल्या वस्तू देवघरातल्या मांडणीत व्याप्त होतात. बाथरूममधल्या साबणाची जागाही अशा शिताफीने बदलली जाते की अंघोळीला गेल्यानंतर तो शोधण्यात अर्धा तास जावा. साधा नेहमी मांडणीत सापडणारा चमचा घ्यायला कधी कधी 'साष्टांग नमस्कार' घालून ओट्याच्या खालून मोठ्या मुश्किलीने काढावा लागतो. वाकण्याची इच्छा\ ताकद\ क्षमता संपलेल्या आमच्या उदरावर वाढलेल्या अंमळशा तनूला तो अतिरिक्त भारही सोसवत नाही. आणि त्यामुळेच कपाळावरची शीर त़डतडून विचारलेल्या 'चमचा इतक्या खाली का ठेवला? या प्रश्नाला 'वाढलेली तुंदीलतनू'ला व्यायाम नको का? असे फणकार्‍याने भरलेले उत्तर आल्यानंतर आपलाच अनमान कोण बापडा पुरूष करून घेईल?

कधी कधी या बदलाबदलीच्या खेळाला अस्मादिकांच्या उपस्थितीतच सुरवात होते. रविवारचा दिवस नेमका निवडून त्याच दिवशी काही 'उलथापालथ' करण्याचा बायकोचा जाव असतो. पण 'चला चला आपल्याला बाहेर जायचंय' असं सांगून मी तो अनेकदा उधळून लावतो. पण आमच्या आयुष्यातला सूर्य प्रत्येकवेली पूर्वेलाच उगवतो असे नाही.
'आता कशाला बदला बदली'? मी निषेधाचा क्षीण सुर काढण्याचा प्रयत्न करतो.
'अहो, बदल केल्याने घर नवीन वाटतं. तोच तोच पणा निघून जातो. छान वाटतं.' बायको मुद्दा रेटून नेते.
मी इतर काही निषेध सूर काढण्याचा प्रयत्न करतो. पण बायकोपुढे ते सारे सूर थिजून जातात. नि बदलाबदलीच्या या खेळात मीही 'उचल्या'ची भूमिका पार पाडतो. अशा खास दिवशी छोट्या वस्तूंची बुडे फारशी हलत नाहीत. अस्मादिकांच्या शरीरयष्टीच्या प्रमाणानुसार वस्तूंच्या हालचाली होतात.

त्या दिवशी आमचा पलंग नेहमीची जागा सोडतो नि खिडकीकडशी लगट करायला जातो. ताटकळलेल्या पाठीने उभे असलेले कपाट दुसर्‍या एखाद्या भिंतीला जाऊन टेकते. कम्प्युटर नेहमीच्या टेबलाला सोडचिठ्ठी देतो. घरातल्या तमाम डब्यांना माझा हस्तस्पर्श होऊन ती स्थलांतरीत होतात. माळ्यावरची पुस्तके खाली येतात, खालची पुस्तके माळ्यावर जातात. लेकीची खेळणीची फरफट होत ती कुठल्याशा कोपर्‍यात जाऊन व्यापतात. टिव्हीखालच्या कपाटातल्या वस्तू बाहेर निघतात नि पलंगाखाली जातात. बेडरूममधल्या भिंतीतल्या कपाटावरीच बोचकी खाली येतात नि दिवाणखान्याच्या माळ्यावर चढून बसतात. बेडरूममधल्या कपाटावरच्या बॅगा खाली येतात नि पलंगाखाली जातात. पलंगाखालच्या बॅगांमधल्या वस्तू कपाटात दडवल्या जातात.

बदलाबदलीच्या या खेळाने माळ्यावरची मंडळीही हडबडून जातात. तीही कधी कधी निर्वासित होतात. माळ्यावरची भांडी वापरात येतात किंवा त्यांच्या 'निरूपयोगी' 'राखीव' क्लबमध्ये कुणाची भर पडल्याने आनंदितही होतात. खाली-वर करण्याच्या या नादात मग कुठलीशी घरातल्या घरात हरवलेली वस्तू सापडते नि तिच्या आठवणींचे कढ निघतात. (या कढांना 'सासर', 'माहेर' असे संदर्भ असल्याने हे कढ 'बाय डिफॉल्ट' आपल्यासाठी त्रासदायकच असतात.) बदलाच्या या वार्‍यात घरातल्या रद्दीची पानेही फडफड करतात. कुणाच्या वडापावचा आधार बनणारी आमच्या घरची रद्दीही या घरातली आपली नेमकी किंमत जाणून स्थानभ्रष्ट होते. तिचे स्थान कधी रद्दीवाल्याच्या गाडीवर तर कधी घरातलीच एखादी कोपर्‍याची जागा असते.

बदलाबदलीच्या या सगळ्या गोंधळात विस्थापित झालेल्या त्या वस्तूंना काय वाटत असेल या गोष्टींनी मी उगाचच गहिवरून जातो. सुखासुखी कुणी जागा सोडून जात नाही. स्थलांतरीतही होत नाही. कुठलीशी कारणं अवचित समोर येतात नि स्थानभ्रष्ट व्हायला भाग पाडतात. अध्यात्मिक भाषेतच बोलायचं तर नियतीच्या पटावर कुणी तरी हलविणारा आपल्याला हलवतो, हलायला भाग पाडतो नि आपण आपली जागा सोडतो. इथे तीच नियती बनून आपणही या वस्तूंच्या बाबतीत तेच करतो. इकडे तिकडे हलताना आपणही जागा सोडतो. कधी स्थलांतरीत, कधी निर्वासित, कधी विस्थापित नि मग हळूहळू स्थापितही होत असतो. आपल्या भावनांचा आपण इतका विचार करतो, मग या मुक्या वस्तूंना भावनेचं इंद्रिय फुटलं तर त्यांच्या भावना काय असतील? फार हळहळायला होतं. स्वतःची मुळं उपटून रूजवणं खरोखरंच अवघड. पण बदल हा स्थायीभाव आहे नि तो स्वीकारला पाहिजे म्हणून हे हळवेपण बाजूला ठेवून मी व्यवहारात उतरतो. नि निमूटपणे बायकोच्या हाताला हात लावून या बदलाबदलीच्या मोहिमेस 'मम' म्हणतो.

स्थलांतराचा धार्मिक संदर्भ


स्थलांतरीतांच्या प्रश्नाला प्रांतिक किंवा भाषक संदर्भच नसतात. त्याला धार्मिक संदर्भही बराच आहे. आपल्या देशात बांगलादेशातून होणारे स्थलांतरही याच सदरात मोडते. बांगलादेशीय मुस्लिमांच्या आसाममधील वाढत्या संख्येने तिथे जातीय दंगली पेटल्याचा इतिहासही ताजाच आहे. अधून मधून ही धुसफुस पुन्हा डोके वर काढते. पण त्यापलीकडे जाऊनही भारतात धार्मिक स्थलांतराचा प्रश्न अजूनही म्हणावा तितका गंभीर नाही. (किंवा आपण तो घेतला नाही, असंही असू शकेल.)

पण युरोपात मात्र या धार्मिक आणि स्पष्टपणे सांगायचे तर मुस्लिमांच्या स्थलांतराने मोठीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. भारतात मुस्लिम आले त्याला हजार वर्षे झाली. राज्यकर्ता बनलेली ही जमात भारतात मोठ्या प्रमाणात रूजली. फळली. वाढली. बर्‍यापैकी मुरलीही. तरीही हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एक अदृश्य तणाव राहिलेलाच आहे. अधून मधून तो दिसूनही येतो. पण तरीही मुस्लिमांचा निःसंशय प्रभाव इथल्याही जनजीवनावरही पडला आहे. भांडणं, दंगली होत असल्या तरी दोन्ही धर्मियांचे प्रमाण पाहता परिस्थिती हाताबाहेर गेलेली दिसत नाही. 'यादवी' माजणे काही घडले नाही. सांस्कृतिक बाबतीत तर उभय धर्मियांनी बरेच मोठे योगदान दिले आहे. त्यामुळेही असेल कदाचित संबंध फार काही ताणले गेलेले नाहीत.

मुस्लिमांच्या शांततामय आणि आक्रमक अशा विस्तारातूनही पूर्ण भारत मुस्लिम झाला नाही. पण तरीही फाळणीतून पाकिस्तान आणि पुन्हा बांगलादेश असे दोन 'मुस्लिम' देश निर्माण झाले खरे. त्यानंतर राहिलेल्या भारतातही मोठ्या प्रमाणात मुस्लिम जनसंख्या राहिली. पण त्यातून त्यांचे वेगळे राज्य, देश अशी मागणी आकाराला आली नाही. राहिलेल्या मुस्लिमांनी कदाचित ही भूमी आपली मानली असावी आणि मुस्लिमांचे आपल्यात असणे हिंदूंनीही मान्य केले असावेत. पण विसाव्या शतकापूर्वी मुस्लिमांचे अस्तित्वही फारसे नसलेल्या युरोपात मात्र त्या शतकात आलेल्या मुस्लिमांमुळे बरीच अस्वस्थता पसरली आहे.
ख्रिस्तोफर काल्डवेल नावाच्या एका अमेरिकन पत्रकाराने याच विषयावर आधारीत 'रिफ्लेक्शन्स ऑफ द रिव्होल्युशन इन युरोपः इमिग्रेशन, इस्लाम अँड द वेस्ट' या नावाचे पुस्तक लिहिले आहे. इकॉनॉमिस्टमध्ये त्याचे परिक्षणही आले आहे. त्यावरून या अस्वस्थतेचा अंदाज येतो. मुस्लिमांच्या युरोपात येण्याने काय घडलंय आणि का घडलंय याची मीमांसा त्याने केली आहे.


युरोपात छोट्या छोट्या नोकर्‍यांची गरज होती, म्हणून दरवाजे उघडे ठेवले गेले. त्यातून मोठ्या प्रमाणात लोक येत गेले. पुढे नोकर्‍या संपल्या तरीही लोकांचे येणे काही थांबले नाही आणि आलेले लोक काही परत गेले नाही. उलट त्यांच्यामुळे त्यांची लोकसंख्या वाढली. म्हणूनच युरोपातील देशांत स्थलांतरीतांची संख्या किमान दहा टक्के तरी आहे. त्यातही मुस्लिमांची जास्तच. त्यातही मोठ्या शहरांत हे प्रमाण ३० टक्के आहे. हे मुस्लिम या देशांत आले ते प्रामुख्याने आशिया आणि आफ्रिकेतून. पण ते भारतात जसे मिसळले तसे तिकडे मिसळले गेले नाहीत. (भारतात स्थानिकांमध्ये झालेल्या धर्मप्रसारामुळे कदाचित स्थानिकांपेक्षा ते वेगळे वाटतही नसतील.) त्यांच्या न मिसळण्याला 'इस्लाम' हा शब्द कारणीभूत असावा असा काल्डवेलचा तर्क आहे. इस्लामची शिकवण, राहणीमान इतर धर्मांपेक्षा त्यांना वेगळे रहाण्यास, वागण्यास भाग पाडत असल्याने ते स्थानिकांत मिसळत नाहीत. परिणामी त्यांची स्वतंत्र ओळख तयार होते. अस्मिता निर्माण होते.

त्यांच्यासाठी आता युरोपीय देशांना वेगळे कायदे करावे लागत आहेत. त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्या धर्मांतर्गत असलेल्या न्यायनिवाड्याचा आधार त्यांना घेऊन द्यावा यासाठी तिथल्या न्यायव्यवस्थांवर दबाव वाढत आहे. फ्रान्समध्ये दाढी आणि पगडी ठेवण्यास सरकारचा प्रतिबंध हे त्याचे उदाहरण. पण आणखी एका उदाहरणात लग्नावेळी आपली बायको कुमारी नव्हती, म्हणून एका मुस्लिम व्यक्तीने विवाह रद्द ठरवावा असा अर्ज न्यायालयात दिला. यावर फ्रान्सच्या कायद्यात काहीही तरतूद नाही. तिथे काय करणार? इतकंच नव्हे तर ब्रिटनमध्ये पेन्शनविषयक लाभ नवर्‍याच्या 'इतरही बायकांना' मिळावेत यासाठी विशेष व्यवस्था करावी लागली आहे. याशिवायही अनेक कायदे नव्याने करावे लागत आहेत किंवा आहे त्यात दुरूस्ती करावी लागत आहेत. या सगळ्या गोष्टी पहाता, स्थलांतरीत मुस्लिमांसाठी आपल्या देशाने झुकणे हे स्थानिकांना त्रासदायक वाटत आहे.

स्थलांतरीतांविरूद्धच्या युरोपातील भावना आता इतक्या तीव्र झाल्या आहेत की फक्त १९ टक्के लोकांना स्थलांतर हे आपल्या देशाच्या हिताचे वाटते आहे, तर ५७ टक्के लोकांना आपल्या देशात उपर्‍यांची संख्या वाढली आहे असे वाटते. युरोपातल्या नोकर्‍यांमध्येही ही मंडळी शिरली आहेत. त्यामुळे स्थानिक विरूद्ध उपरे हा संघर्षही तीव्र झाला आहे. तिकडेही 'राज ठाकरे' उभे ठाकू लागले आहेत. टोनी ब्लेयर आणि जॅक स्ट्रॉ यांनी तर बुरखा हा फुटिरवादी मानसिकतेचे प्रतिक असल्याचे म्हटले होते. या स्थलांतराला आणखी एक मुद्दा आहे. युरोपातील लोकसंख्या अधिकाधिक वृद्द होत चालली आहेत. पण स्थलांतरीत मुस्लिमांची कुटुंबे मोठी असल्याने युवा भरपूर आहेत. त्यामुळे उद्या युरोपात मुस्लिमांचे वर्चस्व निर्माण झाले तर आश्चर्य वाटायला नको ही भीतीही या मुळाशी आहे.


काल्वडेलने त्याच्या पुस्तकात हे सगळे मुद्दे मांडले आहेत. पुस्तक नक्कीच वादग्रस्त आहे. ते मीही वाचलेले नाही. पण त्याच्या इकॉनॉमिस्टवरील परिक्षणावरून आणि त्याखाली आलेल्या प्रतिक्रियातूनही त्याची झलक मिळतेच. तुम्हाला या सगळ्यविषयी काय वाटते. तुम्ही कुणी हे पुस्तक वाचलेय काय? किंवा तुम्ही युरोपात किंवा इतरत्र रहात असलात तर तुमचा अनुभव काय आहे?


इकॉनॉमिस्टमधील मूळ परिक्षण-
http://www.economist.com/books/displaystory.cfm?story_id=14302290

अपराजित योद्धा - पहिला बाजीराव


मराठ्यांना नर्मदेपलीकडे नेऊन उत्तर दिग्विजय करणारा वीर म्हणून पहिल्या बाजीराव पेशव्यांचे नाव आदराने घ्यावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा पाया रचला आणि बाजीरावांनी त्यावर कळस चढविला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दक्षिणेतील श्रीरंगपट्टणपासून संपूर्ण मध्य आणि उत्तर भारत बाजीरावाने मराठ्यांच्या घोड्यांच्या टाचेखाली आणला. राजपूत राजांपासून मुस्लिम नबाब आणि शाह्यांना या रावबाजीने नमवले मराठी जरीपटका डौलात उत्तर हिंदुस्तानात फडकविला.

बाजीरावाचा जन्म भाद्रपद शुक्ल पौर्णिमा शके १६२२ अर्थात १८ ऑगस्ट १७०० साली झाला. पहिले पेशवे बाळाजी बाजीराव हे बाजीरावाचे पिता. वडिलांच्या सानिध्यात बाजीराव बरेच काही शिकला. शिपाई गडी करण्याची खुमखुमी त्याच्यात लहानपणापासूनच होती. म्हणूनच बाळाजी बाजीरावावर दिल्लीच्या बादशहाची भेट घ्यायला गेले तेव्हा अवघ्या १९ वर्षाचा बाजीही त्यांच्याबरोबर होता. उत्तर हिंदुस्थानात मराठी सत्तेला हातपाय पसरायच्या किती शक्यता आहे, याचा अदमास त्या कोवळ्या वयातच बाजीने घेतला होता. दुर्देवाने त्यानंतर लगेचच बाळाजी बाजीरावांचा मृत्यू झाला नि पेशवेपदाची सुत्रे बाजीरावाच्या हातात आली. पण हे इतके सहज घडले नाही. शाहू महाराजांच्या दरबारी मंडळींचा बाजीरावाला विरोध होता. पण शाहूंनी त्यांचे न ऐकता बाजीरावाला या पदाची शिक्के नि कट्यार सोपवली. शाहूंचा हा निर्णय बाजीनेही सार्थ ठरवला.

वयाच्या विसाव्या वर्षी पेशवेपद मिळवलेला हा पेशवा वयाच्या चाळिसाव्या वर्षी मध्य प्रदेशातील नर्मदेकिनारी असलेल्या रावेरखेडी येथे मरण पावला. पण या वीस वर्षाच्या पेशवेपदाच्या कारकिर्दीत त्याने 'अतुलनीय' पराक्रम केला. या काळात त्याने एकूण ३० ते ३५ लढाया खेळल्या आणि त्या सर्व जिंकल्याही. त्यातल्या २१ तर मोठ्या लढाया होत्या. लढाईत शंभर टक्के यश मिळविणारा आणि एकही लढाई न हारणारा हा एकमेव वीर आहे.

बाजीने माळवा, निमाड प्रांत ताब्यात घेतला. गुजरातमध्येही धडक मारली. पुढे आणखी उत्तर हिंदुस्तानात पसरण्याची संधीही त्याला मिळाली. बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल यावर दिल्लीच्या बादशहाचा वजीर फरीदाबादच्या बंगश पठाणांनी हल्ला चढवून त्याला कैद करून ठेवले. छत्रसालाने बाजीला पत्र लिहून "जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा "गजांतमोक्षाचा" हवाला देउन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाही. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंजावातापुढे मोगल हैराण झाले.

छत्रसालाने यानंतर बाजीरावाच्या पराक्रमावर खुष होऊन आपल्या उपपत्नीपैकी एकीची मुलगी 'मस्तानी' बाजीरावाला दिली. तीही रितसर लग्न लावून. मराठी इतिहासात पेशवाईचा उल्लेख करताना बाजीरावाचे नाव येते. पण का कुणास ठाऊक त्याच्या पराक्रमाचे योग्य दान त्याच्या पदरात टाकले गेले नाही. अतुलनीय पराक्रम गाजवूनही तो उपेक्षित राहिल्यासारखाच वाटतो. मस्तानी हे कदाचित त्याचे कारण असावे. हिंदू जोधाबाईला पत्नी करून घेणारा सम्राट अकबर सर्वत्र चर्चिला जातो, पण एका मुस्लिम (?- मस्तानी ही प्रणामी पंथाची होती, ज्यात हिंदू व मुस्लिम यांची मिश्र उपासना पद्धत आहे.) बाईला कायद्याने पत्नी म्हणून घरी आणणारा आणणारा बाजीराव मात्र उपेक्षित ठरविला जातो हे दुर्देव आहे.

बाजीरावाची आपण उपेक्षा केली तरी जगाच्या इतिहासात मात्र तो तितका उपेक्षित राहिला नाही. म्हणूनच अ कन्साईज हिस्ट्री ऑफ वॉरफेअर या युद्धशास्त्रावर आधारीत ग्रंथात फिल्ड मार्शल मॉंटगोमरी यांनी जगातील सात लढायांचा उल्लेख केला आहे. त्यात पालखेड (वैजापूर-औरंगाबादजवळ) येथील लढाईचा उल्लेख आहे. या लढाईत बाजीने निजामाला पाणी पाजले. या लढाईत अतिशय वेगवान हालचाल करून बाजीने निर्णय घेतले आणि निजामाला दाती तृण धरायला लावले. याशिवाय नादिरशहाला पराभूत केले ती लढाईसुद्धा त्याच्या अद्वितीय पराक्रमाची साक्ष देणारी आहे. १७३९ मध्ये नादिरशहाने दिल्लीClick here to see more news from this city लुटली. बाजीरावाने चंबळच्या खोर्‍यात आणले आणि चक्क लढाई न करताच शत्रूचे सैन्य परत गेले. बाजीरावाकडे योजना आखण्याची बुद्धी होती आणि तिची अंमलबजावणी करण्यासाठी हात होते, हे इंग्रज इतिहासकार ग्रॅंट डफनेही लिहून ठेवले आहे.

बाजीरावाच्या लढाईची अनेक वैशिष्ट्ये आहेत. तो एक चांगला सेनापती होता. युद्ध कसे लढावे आणि कुठे लढावे याचे यथायोग्य ज्ञान त्याच्याकडे होते. घोडेस्वारांचे पथक हे त्याचे मुख्य बळ होते. त्याच्या शिस्तबद्ध फौजा ७५ किलोमीटर प्रती दिन या वेगाने जायच्या. त्यांच्याबरोबर सामान अगदीच कमी असे. महिला नव्हत्या. रात्री झोपण्यापेक्षा जास्त हल्ला कसा करायच्या याच्या योजना ठरत. शत्रूची रसद तोडणे आणि त्याला होणारा सगळा पुरवठा तोडणे यावर भर दिला जाई. स्वतः बाजीराव घोड्यावरच झोप घेई. त्यावरच तो जेवण करत असे.

पुण्याचा शनिवारवाडाही बाजीरावानेच बांधला. पुण्यातून हललेले मराठी सत्तेचे केंद्र त्यानेच कोल्हापुरातून आणून पुण्यात वसविले. हिंदूस्थानभर आपल्या नावाचा धाक बसविणारा बाजीराव घरच्या कारवायांना मात्र तोंड देऊ शकला नाही. मस्तानीवर त्याने अफाट प्रेम केले तरी पुण्यातल्या तत्कालीन ब्रह्मवृंदाला, त्याच्या आईला आणि बंधू चिमाजी अप्पांना ते काही पटले नाही. मस्तानीपासून त्याल समशेरबहाद्दर नावाचा मुलगाही झाला. घरच्या कारवायांनी सतत वैतागलेला बाजी लढाईच्या मोहिमांवरच राहू लागला. याच वातावरणात २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुध्द जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून मध्य प्रदेशातील खांडवा- इंदूर मार्गावर असलेल्या सनावदजवळ नर्मदा नदीच्या किनारी रावेरखेडी येथे २८ एप्रिल १७४० (वैशाख शुध्द शके १६६२) रोजी पहाटे हा महापराक्रमी पेशवा विषमज्वराने मरण पावला. मृत्यूवेळी तो अवघ्या चाळीस वर्षांचा होता.

'जीवाची बाजी लावणे' हा वाक्प्रचार आपल्या कर्तृत्वाने जन्माला घालणार्‍या या महान योध्याला सलाम.

न्यूनगंडाचे नवनिर्माण


मुंबईत उत्तर भारतीय लोकांविरूद्ध ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन छेडले ते पाहता, परप्रांतीयांना विरोधापेक्षा मराठी माणसाचा न्यूनगंडच जास्त दिसून आला. किंबहूना न्यूनगंडातूनच हे आंदोलन उभारले गेले असे वाटते. मराठी लोकांची प्रगती ही परप्रांतींयांच्या विरोधाच्या पायावर अवलंबून आहे, की स्वतःच्या कर्तृत्वावर हेच अजून नेत्यांना समजले नाही, असे वाटते.

मुंबईमध्ये परप्रांतीय टॅक्सीवाले, चणे-फुटाणेवाले, भेळवाले भाजी विकणारे असे आहेत. या मंडळींनी मराठी मंडळींचा कोणता हक्क हिरावून घेतला? मुळात हे व्यवसाय करण्यासाठी परप्रांतीय येण्यापूर्वी मराठी माणसाला पुरेशी संधी होती. पण रस्त्यावर येऊन काही विकण्याची लाज आणि आळशीपणा हाच स्वभाव असेल तर प्रत्यक्ष परमेश्वर खाली उतरला तरी मराठी माणसाची प्रगती होणार नाही. मुंबईतला हा 'व्हॅक्युम' परप्रांतीयांनी ओळखला आणि तो भरून काढला. कारण मुंबईत तो जेवढे कमावतो तेवढेही कमाविण्याची संधी त्यांच्या स्वतःच्या राज्यात त्यांना मिळत नाही.

वास्तविक मुंबईची आर्थिक सत्ता युपी, बिहारी लोकांपेक्षा इतर अमराठी लोकांच्या हाती आहे. हे अमराठी म्हणजे गुजराती, मारवाडी, पंजाबी, सिंधी आहेत काही प्रमाणात दाक्षिणात्य आहेत. पण यांना विरोध करण्याची आपली छाती नाही. म्हणून युपी व बिहारी लोकांना लक्ष्य केले जाते. वास्तविक या श्रीमंत परप्रांतीयांपुढे मराठी माणूस दबतो. आपल्या मुंबईत हे बाहेरून येऊन श्रीमंत झाले याचा एक शूळ आपल्या पोटात असतो. म्हणूनच एक न्यूनगंड आपल्यात तयार होतो आणि आपण त्यांच्यापुढे दबतो. मुंबईतल्या उच्चभ्रु भागात फिरताना आपण याच न्यूनगंडाच्या प्रभावामुळे घाबरतो. म्हणूनच या श्रीमंत मंडळींना संस्कृती नाही. फक्त पैसा कमावतात. त्यांना आपल्या संस्कृतीशी देणे घेणे नाही, म्हणून टीका करतो. पण ही शुद्ध आत्मवंचना आहे.

या व्यावसायिकांच्या बाबतीत चरफड व्यक्त करून काहीही होणार नाही. कारण याच मंडळींनी मुंबईत व्यवसाय थाटले आहेत. त्यांच्याकडे मराठी माणसे नोकर्या करत आहेत. त्यांचे व्यवसाय नसते तर या मंडळींनी कुठे नोकर्या केल्या असत्या? बरे मराठी मंडळींना उद्योग करण्यापासून कुणीच रोखलेले नाही. पण ती मानसिकताच मराठी माणसात रूजलेली नाही. अमेरिकेत जाऊन तेथे व्यवसाय स्थापन करणारी मंडळी आपल्यात आहेत. पण आपल्याच देशात आपल्याच राज्यात व्यवसाय स्थापन करण्याची धमक आणि तो यशस्वी चालविण्याची व्यावसायिकता मात्र, आपल्याकडे नाही.

'मनसे'म्हणते सरकारी नोकर्यांत मराठी माणसाला स्थान मिळत नाही. पण मुळात सरकारी नोकर्यांची संख्या कमी झाली असताना हे तरूण नोकरीच्या शोधात का आहेत? त्यांना उद्योगाकडे वळविण्याची गरज आहे, त्यासाठी 'मनसे' काय करत आहे? बिहारी वा युपीच्या सर्व तरूणांनाही नोकर्या मिळत नाही. पण मुंबईत आपल्या घरापासून दोन तीन हजार किलोमीटरवर येऊन धंदा करण्याची धमक ते दाखवतात. ते मराठी तरूणांना का जमत नाही? बिहारी वा युपी या तरूणांचा संघर्ष हा 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' सारखा आहे. जिवंत रहायचं आहे, तर काही तरी केले पाहिजे. तोच तो करतो आहे.

मराठी माणसाला तेवढी गरज वाटत नाही. खूप पैसा कमवावा. मुंबईत आपलंही घर असावं असं स्वप्न त्याचं कधीच नसतं. त्यामुळे माफक पैशांतही तो आनंद मानतो. पैशांपेक्षा सांस्कृतिक घडामोडीत तो आनंद मानतो. मराठी भाषा टिकावी यासाठी संघर्ष करूया वगैरे असे तो म्हणतो. पण बाजारचा नियम असा आहे, की ज्याचा पैसा असतो, त्याचीच भाषा बोलावी लागते. मुंबईवर वर्चस्व ज्या परप्रांतीयांचे आहे, त्यांचीच भाषा बोलावी लागते. शेअर बाजार, बांधकाम क्षेत्र यात गुजराथी, मारवाडी लोकांचे प्राबल्य आहे. बॉलीवूडमध्ये पंजाबी आहेत. इतर ठिकाणी राजस्थानी आहेत. या सर्वांची मिळून बनलेली बंबईय्या हिंदी हिच बोलायची भाषा रहाणार. या सर्व व्यवसायांत मराठी माणसाचे वर्चस्व असते तर सर्वांनीच मराठी शिकली असती. पण तसे घडणे नाही.

बाजारात सर्वांना समान संधी असते. सर्व व्यवसाय, नोकरी करण्यासाठी समान संधी आहे. पण कॉस्मोपॉलिटिन कल्चर म्हणून आपण त्याला घाबरत असू तर मग आपल्यासारखे मुर्ख आपणच. खरे तर मला आश्चर्य वाटते ते बॉलीवूडमध्ये येणार्या परप्रांतीयांचे. किती स्वप्न डोळ्यात घेऊन ही मंडळी मायानगरी मुंबईत येतात. येथील कॉस्मोपॉलिटिन कल्चर त्यांच्या सवयीचे नसते. लोक सवयीचे नसतात. पण तरीही ही मंडळी येथे निश्चयाने टिकून रहातात आणि नाव कमावतात. आपल्याला हे का जमत नाही?

आपल्याकडील नाना पाटेकरचा अपवाद सोडला तर बॉलीवूडवर मराठी लोकांचे का वर्चस्व नाही. इतर प्रांतीयांच्या तुलनेत तरी त्यांना कमी संघर्ष करावा लागतो. तरीही तिकडे जाण्याचे धाडस मराठी तरूण का दाखवत नाही. दिल्लीतून शाहरूख कसलीही पार्श्वभूमी नसताना, गॉडफादर नसताना मुंबईत येतो आणि बॉलीवूडचा बादशहा बनतो. हे आपल्याला का जमत नाही. एखादीच माधुरी दीक्षित टॉपच्या पोझिशनला जाते. पण सर्वांनाच का जमत नाही. दिग्दर्शक म्हणून एखादा आशुतोष गोवारीकर दिसतो. पण निर्माता म्हणून एकही बडे मराठी बॅनर दिसत नाही. सध्या तर एकही मराठी संगीतकार हिंदीत नाही.

मराठी संस्कृती टिकविण्यसाठी आणि ती इतरांनी आत्मसात करण्यासाठी केवळ सांस्कृतिक आंदोलने करून चालत नाही. त्यासाठी परिस्थितीवर वर्चस्व लागते. मराठी लोक सांस्कृतिक कार्यक्रमात रमतात. पण त्या कार्यक्रमांचे प्रायोजकत्व कुणाकडे असते? अर्थातच अमराठी लोकांकडे वा त्यांच्या कंपन्यांकडे. (अपवाद वगळून) म्हणजे आपले संस्कृती टिकवणारे कार्यक्रमही परप्रांतीयांच्या पैशावरच चालत असतात, मग आपली संस्कृती परप्रांतीय बिघडवत आहेत, असे आपण कसे म्हणू शकतो.

ज्या राज ठाकरेंनी म्हटले आहे, की मुंबईत रहाणार्यांनी मराठी संस्कृतीशी आपुलकी दाखवली पाहिजे, त्याच राज ठाकरेंनी मुंबईत असताना शिवउद्योग सेनेच्या प्रमोशनसाठी मायकल जॅक्सनला आणून नाचवले होते. त्यावेळी 'मराठी संस्कृती' कुणाच्या घरी पाणी भरत होती? संस्कृती टिकविण्यासाठी साहित्य संमेलनांची 'बोंब' आणि 'नवनिर्माणा'ची हिंसक आंदोलने करून चालत नाही. त्यासाठी मराठी लोकांची आर्थिक स्थिती सुधारायला हवी.

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेवेळी दाक्षिणात्यांविरोधात आंदोलन सुरू केले होते. पुढे ते आंदोलन आपोआप थंडावलेही गेले. कारण दाक्षिणात्यांना विरोध करून मराठी माणसाची प्रगती होणार नाही हे त्यांना कळले. आता. राज युपी व बिहारी लोकांना विरोध करून त्याच 'न्यूनगंडा'चे 'नवनिर्माण' करताहेत. पण या मुंबई बदलली आहे. मराठी माणसाचीची मानसिकता बरीच बदलली आहे हे राज यांनी आता लक्षात घ्यायला हवे.

रायगडाला जेव्हा जाग येते....


भारतात इंग्रज अंमल प्रस्थापित झाल्यानंतर मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास, गड, किल्ले, समाध्या आणि पुतळे उपेक्षेच्या गर्तेत कोसळले. संस्थानिक, जमीनदार, वतनदार आणि मनसबदारांनी इंग्रजांची तळी उचलून धरायला सुरवात केली आणि महाराष्ट्राला स्वाभिमानाचा म्हणून काही इतिहास उरलाच नाही. उलट लाचारीचा वर्तमान काय तो समोर राहीला. ज्याने मराठ्यांचा स्वाभीमान जागविला, उत्थानाची प्रेरणा दिली त्या शिवाजी महाराजांची समाधी तर रायगडावरील भग्वाशेषांत उन, पाऊस आणि वारा खात एकाकी पडली होती.

जेम्स डग्लस या इंग्रज अधिकार्‍याने शिवरायांच्या समाधीच्या उपेक्षेकडे लक्ष वेधले. १८८३ मध्ये त्याने रायगडाला भेट दिली. औरंगाजाबेच्या मोगली सत्तेशी टक्कर देऊन रयतेचे हिंदवी स्वराज्य उभारणार्‍या या मराठी राजाच्या समाधीच्या दुरवस्थेने तो इंग्रज अधिकारीही हेलावला. त्यावेळी रायगडावरील मंदिर भग्न झाले होते. महाराजांची मूर्तीची अवस्थाही चांगली नव्हती. त्याने आपल्या 'अ बुक ऑफ बॉम्बे' या पुस्तकांत ही अवस्था लिहिली. एक मोठे साम्राज्य उभारणार्‍या या राजाच्या समाधीसाठी आज साधा रूपयाही खर्च होत नाही. कुणी त्याकडे ढुंकूनही बघत नाही, अशा शब्दांत त्याने तत्कालीन मराठी समाजाची लक्तरे काढली. एवढे करून डग्लस थांबला नाही. त्याने ब्रिटीश सरकारलाही या समाधीकडे लक्ष द्यायला सांगितले. भलेही शिवाजी महाराजांचे राज्य आज ब्रिटिशांच्या ताब्यात आले असले तरी तो एक मोठा राजा होता, याकडे त्याने लक्ष वेधले.

डग्लसचे प्रयत्न अगदीच वाया गेले नाहीत. समाधीची अवस्था कळाल्यानंतर तत्कालीन समाजातही संतापाची भावना उसळली. त्याचबरोबर राजांच्या देदिप्यमान पराक्रमानंतर वतनदारी, जमीनदारी उबवणार्‍या सरदार-दरकदारांवर ही चीड व्यक्त झाली. एकूणच प्रजेचा दबाव वाढू लागल्याने ब्रिटिश सरकारने पुरातत्व खात्याकडे या समाधीची व्यवस्था सोपवली.

पण हे केले ते ब्रिटिश सरकारने. शिवाजी महाराजा आपले राजे होते, त्यांच्यासाठी आपण काय केले ही भावना उरतेच. मग त्यावेळी महाराष्ट्रातील बुद्धिजीही एकत्र आले. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात हिराबागेत १८८६ मध्ये एक बैठक झाली. तीत अनेक मराठा सरदार, वतनदार आणि कोल्हापूर संस्थानचे प्रतिनिधीही उपस्थित होते. पण बैठका होऊनही काहीही ठोस असे झाले नाही. हे सगळे होत असताना इतर व्यापात गुंतलेले लोकमान्य टिळक काहीसे दूरच होते. मग काही वर्षांनी व्ही. एन. मंडलिक या गृहस्थांनी १८९५ मध्ये पुन्हा रायगडला भेट दिली, त्यावेळी समाधीची अवस्था फारशी बदलली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मग नेटिव्ह ओपिनियनमध्ये यासंदर्भात एक लेख लिहिला. त्यात डग्लसच्याच म्हणण्याची री ओढली.

त्याचवेळी डग्लसने आणखी भर घालून काढलेल्या त्याच्या बॉम्बे अँड वेस्टर्न इंडिया या पुस्तकात पुन्हा तोच लेख छापला. या एकूणच प्रयत्नांनी वातावरण चांगलेच तापले. मग टिळकांनी हा विषय हातात घेतला. त्यांनी केसरीत २३ एप्रिल १८९५ मध्ये एक सणसणीत लेख लिहिला. त्यात मराठी माणसाच्या निष्क्रियतेवर टीका करताना शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे लाभ उचलणार्‍या त्या पिढीतील सरदार, वतनदारांवरही चांगलीच झोड उठवली.

टिळकांच्या या लेखाने योग्य तो परिणाम साधला. आता लोकभावना चांगल्याच तापल्या होत्या. महाराजांच्या समाधीसाठी आता काही तरी ठोस केले पाहिजे ही भावना तयार झाली. मग त्यातून निधी उभारण्याची संकल्पना पुढे आली. त्यातून रायगडावरील शिवकालीन साधनांची दुरूस्ती करून तेथे दरवर्षी महाराजांची जयंती साजरी करण्याचे ठरले. हा मुद्दा त्यावेळी एवढा पेटला की तो केवळ महाराष्ट्राचा राहिला नाही. एक तर आधीच ब्रिटिश अंमल असल्यामुळे छत्रपती शिवाजी हे आपोआपच राष्ट्रभक्तीचे प्रतीक बनले. मग काय पश्चिम बंगाल, आसाम संयुक्त प्रांत इकडेही शिवाजी महाराजांचे वारे पसरले. जणू एक राजकीय चळवळच तयार झाली.

टिळकांनी आता सर्व सूत्रे हाती घेतली. त्यांनी रानडेंप्रमाणेच ३० मे १८९५ मध्ये हिराबागेत बैठक घेतली. तीत एक स्मारक समिती स्थापन करण्यात आली. पन्नास सदस्यांच्या या समितीत स्वतः टिळकही होते. वास्तविक त्यावेळी सरकारही समाधीच्या दुरूस्तीसाठी पैसे देत होते. पण ती रक्कम होती वर्षाला पाच रूपये. मराठा साम्राज्याची निर्मिती करणार्‍या छत्रपतीच्या वाट्याला ही अवस्था यावी? टिळकांनी या बैठकीत सगळ्यांनाच चांगले खड़सावले. ही बाब आपल्याला शोभनीय नाही, हे त्यांनी लक्षात आणून दिले आणि ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून निधी उभारण्याचे ठरले. अगदी एका विद्यार्थ्याकडून मिळालेले दोन आणे ते बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळालेले एक हजार रूपये अशा प्रकारे निधीची उभारणी सुरू झाली. अवघ्या सहा मिहन्यात नऊ हजार रूपये जमले.

लोकांच्या या प्रतिसादाने सर्वच जण भारावून गेले. एवढा प्रतिसाद सर्वस्वी अनपेक्षित होता. मग त्याचवेळी हाही निर्णय घेण्यात आला की शिवजयंती आता उत्साहात आणि दणक्यात साजरी करण्यात यावी. पूर्वी ती रायगडाखाली महाडला साजरी व्हायची. यानंतर मात्र, ती रायगडावरच साजरी करण्याचे ठरले. त्यासाठी नियमावलीही करण्यात आली.

अर्थात शिवजयंती उत्सव साजरी करण्यासाठी ब्रिटिशांनी सहजासहजी परवानगी दिली नाही. सुरवातीला मागणीच फेटाळण्यात आली. कारण काय तर रायगड हा जंगल भाग आहे, म्हणून. दुसर्‍या वेळेला यात्रा असा उल्लेख होता, म्हणून. मग उत्सव असा शब्द टाकल्यानंतर एकदाची परवानगी मिळाली. त्यासाठी टिळकांना फार यातायात करावी लागली. महाबळेश्वरमध्ये सुटीवर असलेल्या ब्रिटिश गव्हर्नरला जाऊन ते भेटले. उत्सवावेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची हमी त्यांना दिली. त्यानंतर मग ही परवानगी मिळाली.

एवडे सव्यापसव्य करूनही पहिली सार्वजनिक शिवजयंती दणक्यात साजरी झाली. २१ एप्रिल १८९६ च्या केसरीत छापलेल्या वृत्तानुसार या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून आलेले तब्बल सहा हजार लोक उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकानंतर रायगडावर झालेला सर्वांत मोठा कार्यक्रम हाच ठरला. कारण मधल्या काळात कोणताही एवढा मोठा कार्यक्रम रायगडावर झाला नव्हता. टिळकांच्या या प्रयत्नाने 'रायगडाला पुन्हा एकदा जाग आली'. हिंदवी स्वराज्य उभारणार्‍या छत्रपतींचा तेजस्वी इतिहास रायगड पुन्हा एकदा दिमाखात सांगू लागला....

मराठीचं मरण शहरांत-शेवाळकर


मराठी भाषा मरणपंथाला लागली आहे, अशी भीती गेल्या अनेक वर्षांपासून वाटते आहे. पण हे फक्त शहरी लोकांना वाटते आहे. कारण शहरात मराठीचं स्वतंत्र रूप नाहीसं होतं आहे. इंग्रजीच्या अतिवापराने ती भ्रष्ट होते आहे. मात्र, खेड्यात मराठी मूळ आणि शुद्ध स्वरूपात टिकून आहे. त्यामुळे मराठी टिकून राहील का ही भीती शहरांत वाटते. खेड्यात तसे अजिबात चित्र नाही, असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राम शेवाळकर यांनी केले.

कुसुमाग्रजांची जयंती 'मराठी दिन' म्हणून साजरी केली जाते. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शेवाळकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी वरील मत मांडले.

महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढताहेत. त्याचवेळी मराठी शाळा मात्र बंद पडत आहेत. या मुद्याकडे लक्ष वेधले असता, शेवाळकर म्हणाले, की इंग्रजी शिकण्याची धडपड सध्या शहरी भागात मोठ्या प्रमाणावर आहे. ही प्रतिष्ठेची धडपड आहे. नोकरी मिळविण्यासाठी इंग्रजी आवश्यक आहे, या भावनेतून इंग्रजीत शिक्षण घेण्याचा प्रकार वाढत चालला आहे. थोडक्यात काय तर इंग्रजी हे चांगली नोकरी व पर्यायाने उच्च रहाणीमान मिळविण्याचे साधन आहे. नोकरी मिळवून देण्यात मराठीला मर्यादा आहेत, हे खरे. पण केवळ त्यामुळे इंग्रजी स्वीकारून मराठीला लाथाडणे योग्य नव्हे.

प्रसारमाध्यमातून होणार्‍या बेसुमार इंग्रजीच्या वापराबद्दलही शेवाळकरांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे मराठी भ्रष्ट होते आहे, हे सांगून दूरचित्रवाणीवरून ऐकविल्या जाणार्‍या मराठीवरही आक्षेप घ्यायला पाहिजे असे मत व्यक्त केले. मराठी भाषा समृद्धीसाठी राज्य सरकारनेही जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज असताना हे सरकार पहिलीपासून इंग्रजी शिकवायला सुरवात करत असेल तर त्यापुढे काय बोलणार या शब्दांत प्रा. शेवाळकरांनी आपली खंत व्यक्त केली.

ज्यांचा जयंतीदिन मराठी दिन म्हणून साजरा केला जातो, त्या कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या आठवणीही शेवाळकरांनी जागवल्या. नाशिकमधील कुसुमाग्रजांचे घर म्हणजे तीर्थक्षेत्र होते. ते समाजशील साहित्यिक होते. समाजाविषयी त्यांना खूपच ममत्व होते. म्हणूनच साहित्याशी संबंध असलेल्या आणि नसलेल्या लोकांचा त्यांच्या घरी कायम राबता असे.

हिंदी, इंग्रजी मीडीयाच्या नजरेतून राज


मराठी भाषा, मराठी माणूस, राज ठाकरे आणि त्याला अनुषांगिक उपप्रकरणे जया, अमिताभ, युपी, बिहारी वगैरे वगैरे. या सगळ्या विषयांनी गेले काही महिने नुसते गाजवून सोडले आहेत. राज ठाकरे यांची बर्‍यापैकी पाठराखण मराठी प्रसारमाध्यमांनी (छापील आणि दृकश्राव्य दोन्ही) केली आहे. हिंदी व इंग्रजी मीडीयाने मात्र राज ठाकरे हा कुणीतरी गुंड असल्याचे चित्र उभे केले आहे. त्याचाच परिणाम म्हणून की काय पण हिंदी प्रांतातही राज नावाचा कुणीतरी एक राक्षस महाराष्ट्र नामे प्रांतात असून तेथे जाणार्‍या प्रत्येकाला तो मराठी बोलायला भाग पाडतो. 'जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी' त्याला फक्त मराठीच दिसते अशी काहीशी इमेज निर्माण झाली आहे. इकडे इंदूरमध्ये या काळातली हिंदी वर्तमानपत्रे वाचल्यानंतर आणि इथल्या लोकांशी चर्चा केल्यानंतर ही प्रतिमा अधिक ठळक होते.

एक तर लोकांना धड माहिती नसते. त्यात माध्यमे जे दाखवतील त्याच्या आधारे मत बनविण्याची आणि ती व्यक्तही करण्याची सवय लागलेली असते. जया बच्चन यांनी असेच एक बिनडोक विधान केले. 'मै युपी की हूँ हिंदी में ही बात करूंगी' हे सांगून झाल्यावर 'महाराष्ट्र के लोग हमें माफ करे' असे सांगत त्यांना राज ठाकरे यांना शालजोडीतून हाणण्याचा उद्योग केला. पण हे करताना हा 'जोडा' राज ठाकरेंऐवजी अवघ्या महाराष्ट्राला लागेल याचा अंदाजच आला नाही. बर्‍याच चॅनेलवाल्यांनी मात्र पहिले वाक्य दाखवून त्याला राज ठाकरेंची प्रतिक्रिया जोडली. त्यातून असा अर्थ निघाला, की राज ठाकरेंचा हिंदीत बोलायलाही विरोध आहे. आणि मुंबई व महाराष्ट्रात फक्त मराठीतच बोलावे अशी त्यांची 'आज्ञा' आहे. वास्तविक राज काय इतरही कुणा मराठी माणसाचा महाराष्ट्रात हिंदी बोलायला विरोध आहे असे नाही. त्या कार्यक्रमात महाराष्ट्राविषयी जया यांनी जे कुत्सित उद्गार काढले, त्याविरोधात सगळे काही पेटले आहे, ते सोडून भलत्याच गोष्टीचे दळण चॅनेलवाली मंडळी दळत होती.

विशेष म्हणजे हा वृत्तांत पाहून इथल्या वृत्तपत्रात येणारी पत्रे लेखही तसेच होते. योगायोगाने या वादानंतर काही दिवसातंच हिंदी दिन आला. त्यावर इथल्या नई दुनियाच्या पुरवणीत मुख्य लेख आला. त्या लेखात एका बाईंनी वेगवेगळ्या मातृभाषा असलेल्या व्यक्ती हिंदी कसे शिकतात आणि त्यांना ती कशी आवडते, हे मांडले. इथपर्यंत ठीक होते. लेखाचा शेवट करताना त्या राज ठाकरेंवर घसरल्या. 'बॉलीवूडचे तारे नेहमीच इंग्रजीतच बोलतात, त्या तुलनेत जया बच्चन या राष्ट्रभाषेत बोलल्या हे चांगलेच, पण तरीही ती बाब म्हणे राज ठाकरे या कट्टर भाषावाद करणार्‍याला खटकली', असे लिहून या बाई मोकळ्या झाल्या. अहो, बाई पण वाद काय? तुम्ही लिहिता कशावर कशाचा काही संबंध आहे का? माहित नाही त्या विषयावर मतं व्यक्त करायची कशाला?

त्याच नई दुनियात पुढच्याच रविवारी राज ठाकरे यांच्यामुळे निर्माण झालेला भाषावाद या विषयावर लेख आला आहे. या गृहस्थांनी लेखाची सुरवात अशी केलीय की माझा जन्म रावेरमध्ये झाला आहे. आम्ही गुजराती असूनही घरात बरचसे मराठी बोलणारे आहेत, माझी आई मराठी भाषक आहे. एवढं सगळं सांगून झाल्यावर त्यांचीही गाडी राज ठाकरेंवर घसरली आहे. राज ठाकरेंनी म्हणे हिंदी बोलणार्‍यांच्या डोक्यात काठी घालायची ठरवली आहे. असे करण्यामुळे ते स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारत आहेत. लता मंगेशकर, आशा भोसले यांना मिळालेली कीर्ति हिंदी गाणी गाऊनच मिळाली आहे. अन्यथा त्या केवळ 'मराठी गायिका' ठरल्या असत्या. अशी उदाहरणे देऊन राज ठाकरे 'बॉलीवूड'चे मराठीकरण करण्याच्या प्रयत्नात असले तरी ते शक्य नाही, असा निष्कर्ष काढूनही हे महाशय मोकळे झाले आहेत. पुढे मराठी लोक इंदौरला 'इंदूर' म्हणतात. पण म्हणून त्यांना कोणी बोलत नाही असा छुपा वारही केला आहे. हे वाचल्यानंतर हसावं की रडावं तेच कळेना. अरे, बाबा, महाराष्ट्रात हिंदी बोलू नका असं कोणी म्हणतंय का? राज ठाकरे यांनीही असं सांगितलेलं नाही. मग फुका स्वतःच निष्कर्ष का काढतोस बाबा. नीट म्हणणं समजून घे ना, असं त्याला जाऊन सांगागावसं वाटलं.

इकडे ऑफिसमध्येही वेगळीच तर्‍हा. इथल्या काही हिंदी भाषक सहकार्‍यांना असं वाटतंय की जणू छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या बाहेर 'मनसे'चे कार्यकर्ते बसले आहेत आणि स्टेशनमधून बाहेर येणार्‍या प्रत्येकाला ते 'मराठी बोलायला भाग पाडत आहेत.' किंवा मुंबईत ज्यांना मराठी बोलता येत नाही, त्यांना हाणून, मारून मुंबईबाहेर पळवलं जातंय. किंवा महाराष्ट्रात रहाणारे इतर भाषक भलतेच दबावाखाली रहात आहेत. काहींना वाटतं, 'दोन दिवसांसाठी मुंबईत गेलं तरी मला मराठी बोलायला लावतील. काहींनी म्हटलं, 'तुमच्याकडे स्पॅनिश पर्यटक आला तरी तुम्ही त्याला मराठीत बोलायला लावाल.' काहींचे निष्कर्ष तर फार पुढचे होते. त्यांच्या मते, आता महाराष्ट्रात उद्योग रहाणारच नाहीत. नवे उद्योग येणार नाहीत. पर्यटनावरही मर्यादा येतील.'' प्रत्येकाच्या कल्पनेचा पतंग सरसरून वर जातो आहे. या विषयावर पत्र लिहिणार्‍यांचीही अहमहमिका लागली आहे. जो उठतो, तो राज ठाकरेला झोडपायला पहातो आहे. ती पत्र वाचून हसायला येतं आहे. त्यातल्या त्यात डांगे नावाच्या एक माणसाने छान पत्र लिहिलं. जम्मूमधून म्हणे बिहारी आणि युपीच्या लोकांना तिथल्या लोकांनी मध्यंतरी हाकलून लावलं. त्यावर कुणीही आवाज उठवला नाही. पण मुंबईत राज ठाकरेंनी नुसतं काही बोललं की बास त्याविरोधात दळण दळणं सुरू होतं. हा अपवाद वगळता बाकी सगळं यच्चयावत पत्र राज ठाकरेंना झोडणारीच होती.

तिकडे टिव्ही चॅनल्सवरही सुरू असलेली बोंबाबोंब वेगळीच. अगदी एनडीटिव्हीसारखं इतरांच्या तुलनेच चांगलं असणारं चॅनेलही काही वेळा काहीही दाखवत होतं. 'व्हॉइस ऑफ इंडिया' नावाचं एक महान चॅनल आहे. त्याने एकदा राज ठाकरेवर एक बातमी केली. त्यात असं दाखवलं की राज ठाकरे नावाचा कोणी गुंड आहे. बरं हे दाखवलंही असं की एका यज्ञाच्या तिथून राज ठाकरे जात आहेत. (हे सगळं स्लो मोशनमध्ये) त्या पार्श्वभूमीवर 'सरकार'मधलं 'गोविंदा गोविंदा' हा घोष वाजतोय. सालं, ते पाहिल्यावर राज ठाकरे नावाचा फार मोठा राजकीय गुंड आहे, की काय असं वाटत होतं. या चॅनेलवाल्यांच्या डोक्यात त्यांचा तो बुम घालावा असं वाटलं. त्यातल्या त्यात एकदा नाईन एक्स या इंग्रजी चॅनेलवर जरा बरी चर्चा झाली. त्यात 'उषा उत्थप, भरत दाभोळकर, प्रल्हाद कक्कड' असे लोक होते. त्यात भरत दाभोळकरने नेमका आक्षेपाचा मुद्दा काय नि जया यांच्या बोलण्यातून ध्वनित होणारा अर्थ कसा अवमानकारक आहे, ते छान सांगितलं. मुळात समाजात ज्यांची प्रतिमा मोठी आहे, त्यांनी सार्वजनिक ठिकाणी सांभाळून बोलायला हवं. त्याचे काय परिणाम होतात, हे त्यांना कळलं पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे बाकीच्या वक्त्यांनीही त्याला अनुमोदन दिले. पण अशा प्रकारचे कार्यक्रम जरा कमीच झाले. बाकीच्या चॅनलवाल्यांनी त्याला गुंडच ठरवून टाकले.

त्यातल्या त्यात अगदी सुरवातीच्या काळात म्हणजे फेब्रुवारीत रमणदीप सिंग नावाच्या एनडीटिव्हीच्या एका संरक्षण विभाग पहाणार्‍या पत्रकाराचा या विषयाचा सर्वांगीण वेध घेणारा छान लेख त्यांच्या वेबसाईटवर वाचायला मिळाला. बिहारी आणि युपीच्या मंडळींची मानसिकता, गटात राहून तिथे मतदारसंघ तयार करण्याचे त्यांचे प्रयत्न, त्यातून निर्माण होणारे नेतृत्व, त्याला हवा देण्यासाठी बिहार, युपीतून येणारी नेतेमंडळी, या सगळ्याची मानसिकता, त्याचा मराठी माणसावर झालेला परिणाम, इतर राज्यात असलेली युपी, बिहारी लोकांची प्रतिक्रिया या सगळ्या बाबी छान मांडल्या होत्या. पण असे प्रयत्न अपवादात्मकच.

हिंदी, इंग्रजी वेबसाईटवर आणि ब्लॉगवरही राज ठाकरेंविरोधात लिहिणारी मंडळी भरपूर दिसली. या सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून तर मुंबई आणि मराठी माणसे जणू भांडकुदळ आहेत. ती अमराठी लोकांच्या डोक्यात दगड घालायच्या इराद्यात आहेत, असेच चित्र उभे रहात होते. त्यात हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, हा पाठही होताच. त्यात मला अगदी अपवादात्मकच दक्षिण भारतीयाची प्रतिक्रिया वाचायला मिळाली. एका तमिळी भाषकाने आयबीएनच्या वेबसाईटवर लिहिलेली प्रतिक्रिया वाचली. स्वभावधर्मानुसार आयबीएनने त्याचा वेगळा लेख करून लावला. हा तमिळ भाषक म्हणत होता, 'मीही एकेकाळी तमिळनाडूत हिंदीविरोधी आंदोलनात सहभागी होतो. जे दिसेल ते आम्ही त्यावेळी फोडायचो. पण आता मी किती चुक होतो, हे आज मला कळतं आहे. उत्तर भारतातल्या संधींसाठी मला हिंदी येणं किती गरजेचं आहे, हे मला जाणवतंय वगैरे वगैरे.' अरे बाबा, पण मराठी माणसाला हिंदी येत नाही. हिंदी बोलायला विरोध आहे, असं कुणी सांगितलं? अहिंदी राज्यात सर्वाधिक हिंदी बोलणारे महाराष्ट्रातच सापडतील. देशात सर्वाधिक हिंदी बोलणार्‍यांचे शहर मुंबई आहे. प्रश्न हिंदीला विरोधाचा नाही, तिच्या कुरघोडीचा आहे. हिंदी लोकांनी महाराष्ट्राचा, मराठी संस्कृतीचा आदर करावा आणि महाराष्ट्रातल्या सरकारी व केंद्र सरकारी नोकर्‍यांत मराठी भाषकांना प्राधान्य मिळावे (त्यात बिहारी व युपीवाले भरले जाताहेत म्हणून) एवढी आमची माफक अपेक्षा आहे. त्यात एवढा गहजब माजविण्याचे कारण काय? ब्लॉगवरही तीच कथा. ब्लॉग लिहिणारेही संगणकाच्या की दामटून लिहित होते.

हे सगळं पाहिल्यावर एक नक्की वाटलं. या लोकांच्या आक्षेपांना तोंड देण्यासाठी, वस्तुस्थिती मांडण्यासाठी इंग्रजी व हिंदी या भाषांत काही लिहिलं गेलं पाहिजे. इंग्रजीत लिहिणारी बरीच मराठी मंडळी आढळली. पण इंग्रजीत लिहिणारे मराठी स्तंभलेखक जवळपास नाहीत. त्याचवेळी हिंदीत लिहिणारी मंडळीही नाहीत. हिंदी भाषक प्रदेशात पत्रकारिता करणारी मराठी मुळे असलेल्यांना मुख्य प्रश्न माहित नसतो. त्यामुळे त्यांची भूमिकाही अनेकदा इतर हिंदी भाषकांप्रमाणेच असते. माझ्या परीने मी बराच प्रयत्न करून हिंदीत लिहिले. प्रतिक्रिया लिहिल्या. या सगळ्याबाबतीत तुमचा अनुभव काय?

डिसक्लेमर- मी कुठल्याही प्रकारे राज ठाकरे यांचा समर्थक नाही. पण त्यांच्या काही मुद्यांत नक्कीच दम आहे. भलेही हिंसाचाराचा मार्ग चुकीचा असेल. पण काही मुद्दे मांडले जाणे गरजेचेच आहे.

मराठीची अवनती- थोडं आत्मपरिक्षण


भाषा ही संपर्काचं साधन आहे. आपल्या भावना, विचार आदिम माणूस देहबोलीतून व्यक्त करत होता. पुढे त्या बोलीला शब्द मिळाले. जिथल्या तिथल्या भाषा वेगळ्या होत गेल्या. ही दुसर्‍याशी संपर्क साधण्यास उपयुक्त ठरणारी भाषाच सध्या वादाचा विषय ठरतो आहे. मुंबईत मराठी भाषेवरून सुरू असलेले रणकंदन हे त्याचेच उदाहरण. या भाषक वादाला रोज नवे पैलू जोडले जात आहेत. मुंबईत रहाणार्‍या परप्रांतीयांना मराठी बोलता येत नाही, यासाठी त्यांना दोषी धरण्यापेक्षा याला मराठी माणूसच जास्त दोषी आहे, असे मला वाटते.

त्याच्या समर्थनार्थ काही मुद्दे मांडावेसे वाटतात. मुंबईत मराठी माणसांची संख्या ४२ टक्क्यांहून जास्त कधीच नव्हती. पुढे पुढे ती कमी कमी होत गेली आणि मराठी माणूस उपनगरात रहायला गेला. याचे वेगवेगळे अर्थ आहेत. मुंबईत जमिनी व फ्लॅट्सचे भाव इतके वाढले की त्याला तिथेच राहून नवे घर घेणे परवडत नव्हते. त्याचवेळी चाळीत रहाणारा मराठी माणूस सांपत्तिकदृष्ट्या सुधारला होता. त्याला चांगले रहाणीमान हवे होते. त्याला त्या पैशात भलेही मुंबईत घर घेता येत नसले तरी उपनगरात चांगले घर मिळत होते. सहाजिकच तो मुंबईबाहेर गेला. मुंबईतले भाव परप्रांतीयांनी वाढविले या म्हणण्याला माझ्या मते तरी तितका अर्थ नाही. मुंबईची स्वतःची किंमतच एवढी आहे, की तीच भाववाढीला कारणीभूत ठरते. कारण प्रत्येक कंपनीला आपले ऑफिस मुंबईत हवे असते. याचे कारण मुंबईला लाभलेले आंतरराष्ट्रीय ग्लॅमर, महत्त्व. सहाजिकच मुंबईचा विस्तार होत असताना जागेची गरज वाढत गेली. परिणामी किमती वाढत गेल्या. या सगळ्यामुळे मराठी माणसाने उपनगरात जाणे पसंत केले.

मुंबईच्या या एकूणच विस्तारामुळे सहाजिकच रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात होत होती आणि आहे. सहाजिकच देशापरदेशातून नोकरदारांचा, व्यावसायिकांचा लोंढा मुंबईकडे न येता तरच नवल. या सगळ्यांच्या येण्यामुळे आणि आधीच मुंबईत निम्म्याहून जास्त इतर प्रांतीय लोक असल्यामुळे मुंबई अधिकाधिक बहुसांस्कृतिक आणि बहूभाषक होत गेली. सहाजिकच बहुसांस्कृतिकतेच्या लोकांना कळेल अशा भाषेचे चलन सुरू झाले. ही भाषा अर्थातच हिंदी होती. त्यात रोजगारनिर्मितीचे मोठे केंद्र असलेले हिंदी चित्रपटनिर्मितीचे केंद्र बॉलीवूड हेही मुंबईतच होते. त्यामुळे सहाजिकच हिंदीचे चलन मोठ्या प्रमाणात वाढले. हिंदीच्या या विस्तारापायी एकेकाळी वेळही अशी आली की भाषेप्रती अत्यंत जागरूक असलेल्या दक्षिण भारतीयांनाही मुंबईत रहाताना हिंदी शिकावी लागली. कारण मोठ्या जनसमूहाला ती भाषा समजत होती. मुंबईत मराठी भाषक लोक असले तरी त्यांची संख्या तुलनेने कमी असल्याने संपूर्ण जनव्यवहारात मराठीचे प्राबल्य निर्माण झाले नाही. त्याचवेळी त्यांना हिंदी सहजी समजत होते, हेही त्याचे कारण ठरले. गुजराती भाषकही मोठ्या प्रमाणात होते. पण म्हणून गुजराती भाषा ही मुंबईची भाषा बनली नाही. कारण सगळ्यांना सामावून घेईल, समजू शकेल अशी हिंदी भाषा होती. हिंदी चित्रपट हे त्यासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरले.

या सगळ्यामुळे पूर्ण मुंबईत असे वातावरण तयार झाले की भलेही मराठी आले नाही तरी चालेल हिंदी येते आहे ना मग कोणतेही काम अडणार नाही. कारण समोरचा माणूस मराठी असो वा तमिळी त्याला हिंदी समजते आहे, मग चालू शकते. केवळ याचमुळे हिंदीचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आणि राज्याची स्थानिक भाषा मराठी मागे पडली. कारण व्यवहाराची जी भाषा असते तीच बाजारात चालते. हेच अनुसरून हिंदीचे चलन वाढले. राजभाषा मराठी असूनही ती बोलण्याची गरजच पडली नाही, तर अमराठी लोकांनाही ती भाषा शिकण्याची गरजच पडली नाही.

म्हणूनच अनेकजण मुंबईत बरीच वर्षे राहूनही मराठी बोलू शकत नाही. कारण ती भाषा बोलण्याची गरज पडावी असे वातावरण त्याला मिळत नाही. तो बाजारात गेला आणि विक्रेता मराठी असला तरी समोरच्या व्यक्तीला मराठी येत नाही, हे म्हटल्यावर तो हिंदीत बोलतो. ग्राहकाचे काम होऊन जाते. त्याला मराठी बोलण्याची गरजच पडत नाही. मग तो मराठी शिकेल कशाला? अमराठी व्यक्तीला करमणुकीसाठी हिंदी चित्रपट आहेत. मग त्याला मराठी चित्रपट बघण्याची गरजच पडत नाही. आणि त्यासाठी ती भाषाही शिकण्याची आवश्यकता वाटत नाही. उदाहरण शाहरूख खानचे घेऊया. शाहरूख खान ज्या वर्तुळात सुरवातीपासून वावरतो आहे, ते पहाता त्याचा संबंध कधी मराठी माणसाशी आला असावा असे वाटत नाही. हिंदी चित्रपटांच्या दुनियेत वावरणार्‍या शाहरूखचे सगळे वर्तुळ बहुसांस्कृतिक असल्याने सहाजिकच व्यवहाराची भाषा हिंदी वा इंग्रजी झाली. सहाजिकच मुंबईत इतके दिवस राहूनही त्याला मराठी बोलण्याची कधी गरजच पडली नसावी. त्यामुळे त्यालाही कधी मराठी शिकावे असे वाटले नाही.

कोलकता, चेन्नई किंवा दक्षिणेतल्या कोणत्याही शहरात बराच काळ राहिल्यानंतर तिथली भाषा शिकणे क्रमप्राप्त आहे कारण तिथला सगळा व्यवहार त्याच भाषेत चालतो. तो त्या लोकांनी चालवला आहे. त्यामुळे तिथे रहाणार्‍यांनाही तो पाळावा लागतो. शिवाय स्थानिक लोक तिथल्या शहरांत बहुसंख्याक होते. चेन्नई बहुसांस्कृतिक म्हणवले जात असले तरी तेथे स्थानिक तमिळी लोकच जास्त आहेत. कोलकत्यातही तसेच आहे. मुंबईत तसे नव्हते. त्यामुळे स्थानिक भाषेचे अर्थात मराठीचे वर्चस्व तेथील व्यवहारावर कधीच राहिले नाही. त्याचवेळी मराठी माणसाला हिंदी चांगले समजते ही बाबही त्याच्या मुळावर उठली. थोडक्यात सुरवातीपासूनच मराठी माणूसच स्वतःच्या भाषेविषयी आग्रही राहिला नाही. त्यामुळे ही भाषा व्यवहारात मागे पडत गेली.

या सगळ्यामुळेच असे वाटते की मराठी बोलण्याची गरजच पडत नसेल तर परप्रांतीयांकडून मराठी बोलण्याची अपेक्षा आपण का करावी? म्हणूनच मराठी मंडळींनी स्वतःहून सगळीकडे मराठीचा वापर सुरू केला तरच परप्रांतीयांना ती भाषा शिकण्याची गरज वाटू शकेल. त्यानंतर मग ते मराठी भाषा अवलंबतील. सहाजिकच हा प्रश्न भावनेचा ठरणार नाही. कुणावरही जबरदस्ती करून, कुणाच्या कानपटात वाजवून मराठी बोलले पाहिजे असे म्हणणे चुकीचे ठरेल. त्यापेक्षा त्याला मराठी शिकणे ही गरज वाटेल अशी परिस्थिती निर्माण करणे जास्त योग्य आहे.

मराठी समाज कुठे एक आहे?


राज ठाकरे यांच्या मराठी आंदोलनाची धुळ आता थोडी खाली बसायला लागली आहे. अर्थात राजकारण सुरू आहे. पण ते उत्तरेत. मराठी माणसांनी या एकूणच प्रकरणातून आत्मचिंतन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. याचा अर्थ हाही सल्ला फक्त मराठी माणसांना आहे असं नाही, तर हा समाज तुलनेने विचारी, समंजस आणि सर्वांगीण विचार करणारा, तारतम्याने वागणारा आहे म्हणून आत्मचिंतनाची धुराही त्याकडे येणेही सहाजिक आहे. शिवाय उत्तरेशी तुलना करता विकासाच्या, पुरोगामीत्वाच्या बाबतीतही मराठी समाजच अग्रेसर आहे. म्हणूनच आता आपणच विचार करायची वेळ आली आहे.

राज ठाकरेंनी ज्या मराठी समाजासाठी आंदोलन केले असे ते म्हणतात, तो समाज तरी एक आहे का? नाही. नक्कीच नाही. अख्खा मराठी समाज आणि त्यातले प्रांतही वाटले गेले आहेत. वैधानिक विकास महामंडळात विकासाचा असमतोल आहे. विदर्भ आणि मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष भरता भरत नाहीये. या भागातले लोक कायम पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांवर खार खाऊन असतात. आमच्या वाट्याचा निधी हे लोक पश्चिम महाराष्ट्रात पळवतात अशी त्यांची कायम तक्रार असते. अगदी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही हे मतभेद अनेकदा समोर येतात. एवढंच काय विदर्भाच्या वेगळ्या राज्याची मागणीही होते आणि त्याला बर्‍यापैकी प्रतिसादही लाभतो हेही याच मराठी माणसांच्या महाराष्ट्रात घडते. विकास फक्त दिसतो तो पुण्या-मुंबईत बाकीच्या महाराष्ट्रात काय आहे? असेही उच्चरवात विचारले जाते. ते खरेही आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशाचा काही भाग आणि कोकण यांना तर विकासाचा फारसा स्पर्शही झालेला नाही. त्यामुळे त्या भागातही सूप्त नाराजी आहेच. असे असताना आपण एक कसे?

राज ठाकरेंच्या आंदोलनाला मोठ्या मराठी समाजाचा पाठिंबा असल्याचे दिसले खरे. पण ते कायम टिकेल काय? कारण एकेकाळी शिवसेना स्थापन झाल्यानंतर तिलाही मोठा पाठिंबा मिळाला, पण नंतर त्याविरोधातही समाजातील एक मोठा वर्ग होताच. आणि आजही आहे. शिवसेनेचा प्रभावही साधारणपणे शहरी भागावरच राहिला. याचा अर्थ शहरी आणि ग्रामीण भागाच्या विचारसरणीतीही फरक आहे. शहरी विरूद्ध ग्रामीण असाही छुपा संघर्ष आहेच. भलेही तो टोकदार होणार नाही. पण त्याचा सल कुठेतरी आत असणारच.

हे झालं ग्रामीण- शहरी. हे मतभेद एवढ्यावरच संपत नाहीत. प्रांतीय भेद पुन्हा वेगळे आहेत. खानदेशातील मंडळी मध्यंतरी कोकणातील नोकरीच्या जागांसाठी आली त्यावेळीही तिथे नाराजीचा सूर उमटला होता. विदर्भाची मंडळी मराठवाड्याला जड होतात. आणि दोहीकडची पुणेकरांना. पुण्यात बाहेरून आलेल्या मराठी माणसांना हाकलत नाहीत, पण त्यांना तुम्ही बाहेरून आलात याची जाणीवही करून दिली जाते. हे दुय्यमत्वाचे अनुभव अनेकदा विविध संकेतस्थळांवरच्या चर्चेतून अनुभवायला मिळतात. खुद्द पुणेकर आणि मुंबईकरांमध्ये किती तरी मतभेद आहेत. हे झाले प्रांतीय मतभेद. भलेही ते तितके टोकदार नसतील. पण जातीय मतभेदांचे काय?

जातीपातीत तर पुरोगामी म्हणवणारा आख्खा महाराष्ट्र वाटला गेला आहे. आता मराठा आरक्षणाने या आगीत तेल ओतले आहे. त्यामुळे जाती-जातीतील संघर्षही चांगलाच पेटला आहे. वेगवेगळ्या जातींची मोठमोठी संमेलने होताहेत. त्यात मराठी म्हणून एकता साधण्यापेक्षा जातीय एकतेवर भर दिला जातोय. मागास जातींना ओबीसींच्या बॅनरखाली एकत्र केले गेले. त्याचा संबंध आरक्षणाशी जसा आहे, तसा बलिष्ठ मराठा जातीशी संघर्ष करायलाही ही एकताच कारणीभूत ठरेल, हा हिशेबी हेतूही आहे. म्हणूनच मराठा आरक्षणाचा बार झाला, त्यावेळी ओबीसी नेत्यांमध्ये अस्वस्था जाहीर झाली आणि ती प्रकटही करून दाखवली गेली.

पण मुळात ओबीसी जाती तरी कुठे एक आहेत? तेली, शिंपीं, माळींसह इतर सगळ्या जाती 'आपले' मेळावे साजरे करून 'जातीय' एकता अबाधित राखण्याचे काम करतात. पण समस्त ओबीसी म्हणूनही त्यांचा विचार फक्त व्यासपीठावर होतो. कारण त्याचा संबंध आरक्षणाशी होतो. कारण आरक्षणासाठी तुम्ही एक असणे गरजेचे असते. ओबीसी जातींमध्ये तर फारसे समाज व्यवहारही होत नाहीत. मराठी अस्मितेच्या मुद्यावर इतर मराठी समाजासमवेत एकत्र येऊन ते आवाज उठवू शकतील?

दलितांची कथाच निराळी. दलितांमध्येच इतके अंतर्गत मतभेद आहेत की त्या जातीही परस्परांशी फारसे संबंध ठेवत नाहीत. त्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाची तर त्यांच्या अनुयायांनी शकले करून टाकली. या महामानवाचे विचारही त्यांच्या नेत्यांना पेलले नाहीत. गटातटात फुटली गेलेली दलित अस्मिताही निदान स्वतःच्या विकासासाठी एकत्र येऊ शकली नाही. मग मराठी समाजात मिसळणे तर दूरच राहिले. तीच कथा आदिवासी आणि भटक्यांची. अशा वेळी स्वतःच्या विकासाचे पडले असताना मराठीच्या मुद्याचे त्यांना किती देणेघेणे असेल?

सत्ताधारी मराठा समाजाचे तरी वेगळे काय? मराठ्यांमध्ये तर तुम्ही किती कुळी त्यावर सगळे काही ठरणार? जात्याच आलेल्या पुढारीपणाच्या जोरावर या जातीने राजकारण, सहकार, शिक्षण ही क्षेत्रे काबीज केली आहेत. तरीही त्यांच्याकडून आरक्षणाची मागणी होतेच आहे. त्यासाठी प्रसंगी आंदोलनांचीही भाषा होते आहे. याच जातीच्या संघटनांनी दोन वर्षांपूर्वी जेम्स लेनप्रकरणी ब्राह्मण समाजावर तीव्र टीकेची झोड उठवली होती. त्यातल्या काहींनी तर पुरोहितशाही वर्चस्ववादी दृष्टिकोनाला 'शिवधर्म' स्थापून कठोर उत्तर दिले होते आणि त्यानिमित्ताने ब्राह्मणांवरही पुष्कळ आगपाखड केली होती.

दुसरीकडे पुरोगामीत्वाचा कायम ठेका घेतलेल्या ब्राह्मण समाजाचे तर काय सांगावे? आम्ही मेळावे घेत नाही, असे म्हणणार्‍या याच समाजातल्या कोकणस्थ पोटजातीयांनी गेल्या वर्षी पुण्याच्या स. प. महाविद्यालयाचे मैदान मारून आम्ही परशुरामाचे वंशज असे अभिमानाने मिरवले. आता याच पुण्यनगरीत अखिल भारतीय ब्राह्मणांचे मोठे संमेलन होऊ घातले आहे. आपण एकत्र येण्यात कुठेतरी आपल्यावर टीका करणार्‍या समजाला उत्तर देण्याचा गुढार्थही लपलेला दिसून येतो. असे असताना आता कुठे गेला 'तुमचा मराठी धर्म?' असे विचारण्याची वेळ आली आहे.

मराठी समाजातील मतभेद एवढ्यावरच संपत नाहीत. बृहन्महाराष्ट्रातील मराठी, परदेशातील मराठी यांच्या भूमिका पुन्हा वेगळ्या.

हे सगळे चित्र पहाता ज्या मराठी समाजसाठी राज ठाकरे भांडताहेत तो तरी कुठे समस्तरित्या एक आहे? उद्या, सगळे काही राज ठाकरे यांच्या मनासारखे झाले तरी महाराष्ट्रात अंतर्गत भांडणे सुरू होणार नाहीत हे कशावरून? जातीसाठी एकत्र येणारी मंडळी मराठी म्हणून एकत्र आलेली दिसली नाही आणि आल्यानंतरही परत ती जातीत वाटली गेली तर मग 'हेचि फळ काय मम तपाला'? असे म्हणण्याचीच वेळ राज ठाकरेंवर आली नाही म्हणजे मिळवली.