Monday, February 1, 2010

'मराठी' म्हणजे नेमके कोण?

मुंबई कुणाची या मुद्यावरून शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच त्यांची राजकीय शाखा असलेल्या भाजपमध्ये कलगीतुरा रंगलेला असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि 'मराठी ह्रदयसम्राट' राज ठाकरे यांनी षण्मुखानंद सभागृहात मराठी म्हणजे कोण याची व्याख्याच जाहिर केली. राज यांची ही व्याख्या म्हणजे त्यांच्या वैचारीक गोंधळाचे नवे टोक आहे.

राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेवेळी शिवाजी पार्कवर घेतलेल्या सभेत मराठीची व्याख्या अशी केली होती. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय असे म्हटलं की आपसुक 'जय' असं म्हणतो तो मराठी. ज्ञानेश्वरांपासून ते कुसुमाग्रजापर्यंत कवींच्या रचना तल्लीनतेने वाचतो तो मराठी'. ही व्याख्या बर्‍याच प्रमाणात व्यापक असल्याने महाराष्ट्रात रहाणारा आणि न राहाणारा पण मराठी भाषा, संस्कृती यांच्यावर प्रेम करणारा, आदर बाळगणारा नि अंगीकारणाराही त्यात येत होता. पण नव्या व्याख्येने मात्र अनेकांना मराठीच्या परिघातून खड्यासारखे दूर ढकलले आहे.

राज यांच्या नव्या व्याख्येनुसार 'जन्माने मराठी तोच मराठी. त्यामुळे नोकर्‍या त्यालाच मिळायला हव्यात. केवळ बोलता, लिहिता नि वाचता येते म्हणून त्याला मराठी म्हणता येणार नाही.' याचा अर्थ आत्तापर्यंत महाराष्ट्रात दीर्घकाळापासून आलेल्या परप्रांतीयांनी इथली भाषा, संस्कृती आत्मसात केली तरीही त्यांचा केवळ जन्म इथला नाही म्हणून त्यांना मराठी म्हणता येणार नाही?

जन्माने मराठी या शब्दातून राज यांना नेमके काय म्हणायचे आहे? ज्याचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे तो मराठी की जो मराठी आडनावाच्या घरात जन्माला आहे तो मराठी? या प्रश्नाचा पूर्वार्ध लक्षात घेतला तर महाराष्ट्राबाहेर परभाषेच्या सानिध्यातही मराठी भाषेचा झेंडा डौलाने फडकवत ठेवणारी मंडळी मराठी ठरत नाहीत! ती महाराष्ट्रात आली तरीही ती मराठी ठरत नाहीत. शिवरायांच्या काळापासून दक्षिणेत गेलेली नि पेशव्यांच्या काळात उत्तर दिग्विजय केलेल्या मंडळींना
तीनशे-साडेतीनशे वर्षानंतर महाराष्ट्रात स्थान नाही, असा याचा अर्थ घ्यावा काय?

राज यांना असे म्हणायचे नसेल तर मग केवळ मराठी आडनावाच्या घरात जन्माला आला म्हणून तो मराठी हा निकष लावायाचा झाल्यास इथल्या भूमीशी एकरूप होऊन, त्यावर नांदणारी भाषा, संस्कृती आपलीशी करणारे गुजराती, मारवाडी काही प्रमाणात दाक्षिणात्यही यांना मराठी म्हणताच येणार नाही. मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा, लेखिका सुरेखा शहा, व्यावसायिक धूत कुटुंबिय, विदर्भातील शेतकर्‍यांच्या विधवांसाठी आंदोलन उभारणारे किशोर तिवारी यांच्यासारखी अमराठी मंडळी मराठी ठरणारच नाहीत. इतकेच काय पण मराठी अस्मितेचे प्रतीक असणारे छत्रपती शिवाजी महाराजही राजस्थानच्या सिसोदीया वंशातीलच होते, मग त्यांनाही आणि त्यांच्या वंशजांनाही मराठी म्हणता येणार नाही.

बाहेरून महाराष्ट्रात येणार्‍या मंडळींनी मराठी भाषेचा, संस्कृतीचा आदर करायला हवा. ती शिकायला हवी आणि अंगीकारयलाही हवी, हा आग्रह असल्याचे राज यांच्या आतापर्यंतच्या आंदोलनातून दिसून येत होते. पण एवढे करूनही ती व्यक्ती मराठी ठरणार नाही, असे सांगून आता राज यांनी त्या मंडळींची आणखी कोंडी केली आहे. यापैकी जी मंडळी मराठी तुच्छ मानून आपल्याच भाषेचा आडमुठा अभिमान बाळगत होती, त्यांना असलेला राज यांचा विरोध किमान समर्थनीय तरी होता. पण आता मात्र, मराठी बोलायला, लिहायला नि वाचायला शिकूनही एखादी अमराठी व्यक्ती मराठी ठरणार नसेल तर मग तो कोणत्या मार्गाने मराठी ठरेल हे तरी आता राज यांनी जाहीर करायला हवे.

या व्याख्येतून राज यांना महाराष्ट्रात अमराठी लोक अजिबात नको आहेत, हेच ध्वनित होते आहे किंवा महाराष्ट्रातल्या सर्व नोकर्‍या मराठी आडनावाच्या मुलांनाच मिळायला हव्यात, असा त्यांचा आग्रह दिसून येतो. पण त्यासाठी जी व्याख्या केली ती मात्र अनेकांवर अन्याय करणारी आहेच, पण त्यांच्या आतापर्यंतच्या आंदोलनातील निरर्थकत्व स्पष्ट करणारी आहे.