Sunday, September 20, 2009

भाषा इंदूरी


इंदूरची भाषा खास इंदूरी आहे. म्हणजे आहे ती हिंदीच पण तिच्यातही बरेच प्रादेशिक रंगही मिसळेले आहेत. त्यामुळे इथली हिंदी उत्तरेतल्या हिंदीपेक्षा काहीशी वेगळी वाटणारी आहे. म्हणजे कहॉं से आ रहे हो, कहॉं जा रहे हो हे हिंदी रूप इंदूरमध्ये आल्यानंतर मात्र कहॉंसे आ रीया, कहॉं से जा रीया होतं. इथला सामान्य माणूस याच भाषेत बोलतो. हे ऐकताना आपल्याला वेगळं वाटत असलं तरी त्यांना काहीही वाटत नाही. हिंदी भाषक दुसर्‍या प्रदेशातून आलेल्यांनाही इथलं हिंदी विचित्र वाटतं. कुणीही बोलत असलं की आपण हो किंवा होय असं म्हणतो. इथं 'हाऊ' असं म्हणण्याची प्रथा आहे. स्त्री असो की पुरूष सगळे असंच बोलतात. इथे आल्यानंतर तुम्हाला उद्देशून 'भीय्या' म्हटलं तर 'भ्याव' वाटू देऊ नका. हा भय्या या शब्दाचा इथला खास इंदुरी उच्चार आहे. तेच भौत भूख लगी है असे कुणी म्हटल्यानंतर भूत पाहिल्यासारखे दचकू नका. बहूतला दिलेला हा भौत टच इंदुरी आहे.

इंदुरमध्ये पोहे 'भयानक' फेमस आहेत. आपल्याकडे जसा मिसळपाव यत्र तत्र सर्वत्र मिळतो, तसे इथे पोह्यांचे आहे. हे पोहे मागताना 'एक पोहा देना' असं म्हणावं. आपल्याला कंटाळा येतो तसा इथल्या लोकांना 'कंटाला' येतो. माळवी आणि निमाडी बोलीचाही इंदूरच्या बोलीवर प्रभाव आहे. निमाड हा भाग इंदूरला लागून असलेला त्यामुळे या भाषेचा इथे प्रभाव, तर इंदूर माळव्यातच मोडत असल्याने ती तर इथली स्थानिक भाषा. या सगळ्या मिश्रणाने इथल्या बोलीला एक खास 'टेस्ट' आहे. तुम्हाला शेजारी बसायला जागा पाहिजे असेल तर 'जगो' है क्या असे विचारले गेले तर चमकून पाहू नका. जगहचा 'जगो' हा खास निमाडी बाज आहे.

इथल्या हिंदीची जशी वेगळी चव तशीच मराठीचीही आहे. माळव्यातील मराठी बोली भन्नाट आहे. येथील लोकांच्या मराठी बोलण्यात हिंदी शब्द येणं ही 'आम' बात आहे. येथे लोक छान किंवा मजेत नसतात, तर 'बढिया' असतात. इंदूरमध्ये मराठी भागात पत्ता शोधत असताना 'थोडं पुढे जाऊन डावीकडे 'मुडा' असं ऐकू आलं नाही तर आश्चर्य वाटू देऊ नका. एकारान्ती क्रियापदांची इंदूरी आवृत्ती खाशी आहे. म्हणजे जाईल्ले, करील्ल्ये खाईल्ल्ये, अशी क्रियापदे नीट लक्ष देऊन ऐकली तर ऐकू येतात. जाशील ना, करशील ना या प्रकारच्या अंत्य शब्दांचा वळणदार पण छान वाटणारा उच्चारही येथील लोक करतात. इथल्या मराठी बोलीने हिंदी ताल धरला आहे. म्हणजे नहीं करेंगेच्या तालावर 'नाही करणार' असं म्हटलं जातं. असंच नाही आहेचं, आहे नाही होतं. वास्तविक हे इथे लिहिण्यापेक्षा ते ऐकण्यात मजा आहे.

आणखी एक बाब. इथल्या मराठी घरातील नाती मराठीच आहेत. त्याचे हिंदीकरण वा आंग्लीकरण झालेले मला तरी दिसले नाही. त्यामुळे पप्पा, मम्मी, डॅडीऐवजी शुद्ध, आई, बाबा, काका, काकू, मामा, मामी हेच शब्द येथे वापरात आहेत.


या मराठीला मुंबई, पुण्याचे लोक धेडगुजरी असं म्हणतात. पण ते चुकीचं आहे. इथल्या मराठीवर हिंदीचा प्रभाव अपरिहार्य आहे. उलट माझ्या मते अनेक मराठी कुटुंबाच्या पिढ्या येथे जाऊनही ती मराठी बोलतात, हे विशेष आहे. हिंदीच्या आधाराने का होईना पण मराठी टिकून आहे. इथले मराठी लोक साहित्यातही पुष्कळ आहे. त्यांच्या मराठी लेखनातही हिंदी शब्द असतात. मला त्याचेही कौतुक वाटते. भाषकदृष्ट्या आपल्याला ती चुक दिसेल. पण माझ्या मते हे लोक मराठीत साहित्य निर्मिती करतात हे जास्त महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रात मराठी विविध पदरी असताना इंदूरमध्ये ती वेगळे रूप घेऊन जिवंत आहे. त्यामुळे तिची उपेक्षा करण्यापेक्षा तिला बोलीचा दर्जा दिला तर ते जास्त योग्य ठरेल.

No comments: