Monday, January 18, 2010

पिंडीभोवतीचं 'ब्रह्मांड'! (2)


पहिला भाग


उज्जैनला महांकालेश्वराच्या दर्शनासाठी मुख्य मंदिरात प्रवेश केल्यानंतर पुढे....

पुढे गेल्यानंतर उंच घुमट असलेली वास्तु लागली. इथेही रेलिंग होते. पण एका क्षणी पंधरा ते वीस फुटांवरून महंकालेश्वराचे दर्शन घेता येत होते. या रेलिंगच्या पलीकडे थोडी मोकळी जागा. तिथे नंदी आणि त्याच्यासमोर असलेल्या खोलीत महंकालेश्वराची पिंड असा मामला होता. एरवी गर्दी नसताना थेट तिथपर्यंत जाऊन दर्शन घेण्याची सोय असते. पण आज गर्दी असल्याने थेट पिंडीपर्यंत प्रवेश वर्ज्य होता. त्यामुळे लांबूनच दर्शन घेणे क्रमप्राप्त होते. नेहमीप्रमाणे भाविकांनी इथे रांग मोडून देवाच्या जास्तीत जास्त जवळ कसे जाता येईल, याची काळजी घेतली. त्यामुळे ढकलाढकली, खेचाखेची, धक्काबुक्की, आरडाओरडी, गोंधळ नि कोलाहल अशा अवस्था क्रमशः गाठल्या गेल्या.

समोरच्या रिकाम्या चौकात असलेले पिवळी वस्त्रे परिधान केलेले पुजारी या गोंधळाला आवर घालण्यसाठी 'आरडाओरडी'चे हुकमी अस्त्र वापरत होते. भाविकांकडून आणल्या गेलेल्या थाळ्यांवरील हार, नारळादी वस्तू उचलून घेऊन त्या महादेवचरणी वाहण्याची व्यवस्था पाहणारी पुजारी मंडळी अर्थातच तोर्‍यात होती. बाजू हटो, आगे बढो, आहिस्ते, सबको दर्शन लेने दो या त्यांच्या प्रचलित वाक्यसमुहांचा मुबलक वापर होत होता. इकडे पुजार्‍यांनी भाविकांचा हार-फुलादी 'भक्तीभाव' पिंडीवर वाहिल्यानंतर तो तत्परतेने उचलून दुसरीकडे टाकण्याचा व्यवहार्यभाव पाहणारी पुजार्‍यांची दुसरी फळी मंदिराच्या मुख्य खोलीत कार्यरत होती.

मंदिरात इतरांसाठी प्रवेश निषिद्ध असला तरी काही मंडळी मात्र आत दिसत होती. त्यांची 'उंची' कपड्यांतून, आचरणातून, व्यवहारातून नि अनेक बाबींतून कळत होती. आमच्या जत्थ्यातल्या काकूंचा भलताच हिरमोड झाला होता. त्यांना आत जाऊन देवदर्शन करायचे होते. पण ते शक्य नव्हते. आम्ही इतर अनेकांप्रमाणे आत शिरता येईल काय याची चाचपणी केली परंतु, त्यातून दुर्लक्ष करणे, धुत्कारणे, झिडकारणे या वृत्तींची नवी उदाहरणे कळाली.

तेवढ्यात देवाची आरती झाल्याची वार्ता कापराच्या वासाने दिली. सहाजिकच ती आरती घ्यायला लोकांची गर्दी झाली. दुसर्‍या थाळीत प्रसादही होता. जत्थ्यातल्या आमच्या एका सौभाग्यवतीच्या चिमुकल्या चिरंजीवाने त्या थाळीतील वाटपासाठीच चालवलेला प्रसाद स्वहस्ते उचलला नि मग कपाळावरची उजवी शिर तडतडून पुजार्‍याने 'देवाघरची फुले' असलेल्या त्या मुलाच्या मातेला 'पुत्रसंस्काराचे' धडे दिले. तेवढ्याशा त्या शाब्दिक माराने त्या मातेला अश्रू आवरेनासे झाले.

अखेरीस लांबून का होईना दर्शन पार पडल्यानंतर जत्था सभागृह मंडपातून बाहेर पडला. बाहेरही अनेक मंदिरे थाटलेली होती. ही मंदिरे बर्‍यापैकी ऐसपैस जागेत होती. त्यात एक मंदिर विठ्ठलाचेही होती. तिथे आल्यानंतर आजूबाजूला मराठी आवाज तेवढे ऐकू आले. बाकी मंदिरातही बरीच गर्दी होती. इथून सगळी दर्शने करून आमचा जत्था अखेरीस मंदिराच्या बाहेर पडला.

दर्शन करूनही ते जवळून न झाल्याने काकूंचा झालेला हिरमोड चेहर्‍यावर दिसत होताच. सहलसंयोजकाने इच्छामणी गणपतीचे दर्शन आधी घेतले असते तर थेट आतपर्यंत जाऊन दर्शन घेता आले असते. आपण आधी इथे यायला नको होते, अशी पश्चातभावना व्यक्त केली. आणि मग हा सगळा जत्था इच्छामणीच्या दर्शनाला गेला. तिकडून मग मंगलनाथ, भैरवनाथ अशी मंदिरे करत संध्याकाळपर्यंत उज्जयिनी नगरिला प्रदक्षिणा घालत पुन्हा महांकालेश्वराच्या प्रांगणात अवतरला. तिथे गेल्यानंतर मंदिरात गर्दी नसल्याची सुखद वार्ता कळली. तातडीने सगळ्यांनी मंदिराकडे धाव घेतली.

आता सगळी सर्पिलाकार वेटोळी मिटली होती. प्रवेश केल्यानंतर कुठेही न थांबताच सगळी मंडळी थेट मंदिराच्या आत जाऊन पोहोचली. पायीची वाट थेट महांकालेश्वराच्या गाभार्‍यातच पोहोचली. समोर महांकालेश्वराचे शिवलिंग. त्याच्याभोवती योनीपटल. सर्पाने छानपैकी फणा पसरलाय. आणि त्या सगळ्यावर पुजारीवर्ग डोलतोय. असा सारा माहौल होता. आतले दृश्य अगदी रमणीय होते. काही भाविकांनी पिंडीलाच मिठी मारली होती. काहींनी भक्तीभावाने पिंडीजवळ डोके ठेवले होते. हलवल्याशिवाय ते वर उचलण्याची तसदी ते अजिबात उचलत नव्हते. काही जण आणलेल्या वस्तू वाहत होते. काही जण अभिषेकाला बसले होते. काही जप करत होते. प्रत्येकाच्या भक्तीभावनेला तोंड फुटले होते.

गर्भगृहात मोजकीच मंडळी होती. पण पुजारी मंडळी आपले अस्तित्व विसरू देत नव्हती. दक्षिणांच्या नोटेवरून त्यांचे आवाज ठरत होते. काहींचे अभिषेक त्यांच्या मार्फत सुरू होते. त्याच्या मंत्राचे आवाज येत होते. काही जणांनी मध्यस्थाविना पुजा चालवली होती. काही जप करत होते. आमच्या जत्थ्यातल्या काकू महांकालेश्वराचे रूप पाहून हरखून गेल्या होत्या. पुजार्‍यांचे आवाज ऐकल्यानंतर त्यांनी शंभराची नोट काढली नि वाहिली. ती नोट नि हातातली जपाची माळ पाहताच पुजारीबुवांनी त्यांना जपासाठी वेगळी जागा उपलब्ध करून दिली. त्यांचा जप सुरू झाला. आम्ही निवांतपणे दर्शन घेतले. पुजारी बुवांची पुजा चालली होती. लोक येत होते. दर्शन घेत होते.

आता गर्दी खूपच कमी झाली होती. सगळ्यांची दर्शने आटोपली होती. काकूंचा जप संपला होता. निश्चिंत नि निवांत भावाने त्या जप आटोपून पिंडीसमोरच्या मोकळ्या जागेत बसल्या. दर्शनाने त्या तृप्त झाल्या होत्या. सहल संयोजकाने आठवण करून दिली, 'यह इच्छामणीका प्रसाद है. उसका दर्शन लिया और महांकालेश्वरके अच्छे दर्शन हो गए.' त्याच्या म्हणण्याला उगाचच होकार भरत आम्ही त्याच्या चेहर्‍यावरच्या तृप्त गोलाई वाढवली. दर्शन झाले. दिवसभराची कटकट, तगमग, वसवस, तडतड अशा अनेक द्वि दुरूक्त शब्दांच्या भावनांचा अंत 'याचसाठी केला होता अट्टाहास' या भावनेने झाला ही समाधानानाची बाब.

इत्यलम.

No comments: