यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते. 'उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया' या वाक्याच्या उत्तरार्धाविषयी मनात का कुणास ठाऊक खिल्लीच दाटून येते. पण या लेखातून या सत्याग्रहामागची गांधीजींची व्यापक भूमिका समजायला मदत होते. आणि खरोखरच या साध्याशा वाटणार्या सत्याग्रहातून ब्रिटिश साम्राज्याचा पाया गांधींनी कसा हादरवला हेही कळते.
लखनौच्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्याची मागणी केल्यानंतर समस्त भारतीय जनतेला काही कृती कार्यक्रम देण्याची गांधीजींची योजना होती. पण कोणते आंदोलन करावे ते डोळ्यासमोर नव्हते. संपूर्ण समाज, धर्म-जात विरहित भावनेने उतरू शकेल असे आंदोलन त्यांना सुरू करायचे होते. आणि अचानक त्यांच्या डोळ्यासमोर मीठ आले. त्यावेळी सरकारने मिठावर कर लावला होता. मीठ घरी तयार करायला बंदी घातली होती. वास्तविक मीठ ही निसर्गाची देणगी. त्यावर कसला कर? असा गांधीजींचा सवाल. त्यामुळे या कराला विरोध करण्यातून मिठाचा सत्याग्रह करण्याचे ठरविले.
वास्तविक शेतसार्यासह अनेक विषयांवर आंदोलन करण्याचे प्रस्ताव त्यावेळी कॉंग्रेस नेत्यांनी पुढे आणले होते. पण गांधींनीही मीठच निवडले. कारण त्यात असलेली व्यापकता. मीठ हा पदार्थ जेवणात अत्यंत महत्त्वाचा. मीठ वगळता जेवण म्हणजे अळणी. थोडक्यात चवहीन. त्यामुळे कोणत्याही खाद्य पदार्थात मीठ हवेच. शिवाय जाती-धर्मभेदापार मिठाची व्याप्ती आहे. त्यामुळे या आंदोलनाला कोणातीही जातीय, धार्मिक किनारही येणार नाही हेही गांधीजींनी हेरले. पण वल्लभभाई पटेलांपासून मोतीलाल नेहरूंपासून अनेकांना गांधीजींच्या या आंदोलनाच्या यशाबद्दल विश्वास वाटत नव्हता.
पण तराही गांधीजींनी हे आंदोलन सुरू करायेच ठरवले. साबरमतीपासून पायी यात्रा सुरू करून सूरतजवळ असलेल्या दांडी येथे जायचे आणि तिथे जाऊन मीठ उचलून सरकारी कायद्याचा 'सविनय' भंग करायचा एवढे सोपे हे आंदोलन होते. त्यानंतर घरोघर मीठ तयार करायला सुरवात होणार होती. आंदोलनातला हा सोपेपणा फार परिणामकारक होता. सरकारचा निषेध करण्याचा याहून सोपा मार्ग नसेल. गांधीजींचे म्हणणे एकच होते, या आंदोलनात कोणताही हिंसाचार अपेक्षित नव्हता. कारण चौरीचौरा येथील अनुभव ताजा होता. आंदोलनाचे त्यांनी बरेच नियमही दिले होते. अहिंसा हा त्यापैकीच एक. तसाच, ब्रिटिश ध्वजाचाही आदर राखणे हाही एक. कारण उघड आहे. युनियन जॅक जाळण्याचा प्रयत्न झाल्यास चिडलेले ब्रिटिश सोजिर हाणा-मारायला कमी करणार नाहीत आणि आंदोलन उगाचच कार्यकर्त्यांकडूनही हिंसाचाराकडे ढकलले जाईल, अशी भीतीही त्यांना होती.
म्हणूनच या आंदोलनासाठी गांधीजींनी ७८ आंदोलक नीट निवडले. आपल्याला अपेक्षित त्या गोष्टी त्यांना समाजावून सांगितल्या. या आंदोलकांत तरूणांपासून वृद्धांपर्यंत आणि सर्व जाती धर्माचे लोक होते. ही सगळी मंडळी साबरमतीहून दांडीकडे निघाली. जाताना गांधीजींनी आपल्या सामाजिक सुधारणांचाही अवलंब करण्याचा यत्न केला. त्यासाठी हरिजनांच्या घरी जेवणे, सामाजिक अभिसरण व्हावे यासाठी मुद्दाम प्रयत्न करणे हे सगळे प्रकार केले.
अखेरीस दांडी येथे जाऊन या जत्थ्याने मीठ उचलले आणि ब्रिटिश कायदा मोडला. ब्रिटिशांनी हे आंदोलन मोडण्याचा खूप प्रयत्न केला. पण आंदोलन मोडावे कसे हेच त्यांना कळत नव्हते. कारण साबरमतीहून निघाल्यानंतर ते दांडीपर्यंत पोहेचेपर्यंत गांधीजींनी कोणताच कायदा मोडला नव्हता. शिवाय हिंसाचारही होत नव्हता. त्यामुळे कोणत्या कारणाखाली गांधींना रोखावे हेच ब्रिटिशांना कळत नव्हते.
गांधीजींनी प्रत्यक्ष कायदा मोडल्यानंतर त्यांना अटक करून पुण्यात पाठविण्यात आले. त्यानंतर देशभर या आंदोलनाचा भडका उडाला. पेशावरपासून ते पाटण्यापर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अवघा देश गांधींच्या या आंदोलनात एकवटला. त्याने स्वातंत्र्याचे उद्दिष्ट जरी लगेच साध्य झाले नाही, तरी कॉंग्रेसमध्ये आणि देशभरात गांधीजींचे नेतृत्व सर्वमान्य झाले. पूर्ण स्वराज्याची मागणी ताकदीने इंग्रजांपर्यंत पोहोचवली गेली.
गांधीजींच्या या आंदोलनाला मिळालेल्या यशाचे काही परिणामही पहाण्यासारखे आहेत. अहिंसात्मक आंदोलनामागचा गांधीजींचा विचार फार व्यापक होता. हिंसात्मक आंदोलनात ब्रिटिशांकडून दडपशाही होते. नेते, कार्यकर्त्यांना गुप्त राहून कामे करावी लागतात. त्यात पकडले जाण्याचा धोका असतो. समाजाला विचार देणारा नेता तुरूंगात आणि प्रसंगी जगातूनच नाहिसा होतो. त्यातून कार्यकर्त्यांमध्येच आणि प्रामुख्याने सर्वसामान्य लोकांमध्ये आंदोलानाबद्दल भीतीची भावना निर्माण होते. धाडसाबद्दल आदर असला तरी ते स्वतः दाखविण्याकडे लोकांचा कल नसतो. त्यामुळे आंदोलनाला व्यापकत्व मिळत नाही. या उलट अहिंसात्मक आंदोलनात त्यातही मिठाच्या सत्याग्रहासारख्या कार्यकर्त्यांकडून हिंसा होण्याची शक्यता नव्हती. आणि ब्रिटिशांपुढेही या कार्यकर्त्यांच्या अटकेव्यतिरिक्त फार काही पर्याय नव्हते. तांत्रिकदृष्ट्या अटक झाली तीर सुटका होण्याचेही मार्ग उपलब्ध होते. वैयक्तिक नुकसान फार होण्याची शक्यता नव्हती. त्यामुळेच सामान्य माणूस या आंदोलनात सहज सहभागी होऊ शकत होता.
गांधीजींच्या या उद्देशांनाही बर्यापैकी यश आल्याचे दिसून येते. आंदोलनाची देशभर व्यापकताच ते दाखवून देते. लॉर्ड आयर्विन या ब्रिटिश व्हॉईसरॉयला गांधीजींशी करार करावा लागला. तिकडे ब्रिटनमध्ये असलेला चर्चिल या 'नंग्या फकिरा'च्या या अफाट ताकदीमुळे खवळला होता. या फकिराने व्हॉईसरॉयसारख्या उच्चपदस्थ अधिकार्यासमोर चर्चेला यावे हेच त्याला सहन होण्यासारखे नव्हते. पण मिठाच्या सत्याग्रहाने ते घडविले.
याच काळात सशस्त्र क्रांतीचे आंदोलन त्या काळात नेताजींच्या मार्फत सुरू असले तरी त्यांच्या प्रयत्नांना दुर्देवाने मर्यादा पडल्या. पुढे तर त्यांना याच आंदोलनासाठी देशाबाहेरही जावे लागले. तिकडे सावरकरांना ब्रिटिश सरकारने जखडून ठेवले होते. भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांनाही व्यापक जनसहानुभूती असली तरीही त्यांना फासावर जावे लागल्याने भारतीय समाज निर्नायकी अवस्थते आला होता. तेच ओळखून गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत गिरवलेला अहिंसात्मक आंदोलनाचा पाठ भारतीय भूमीत गिरवला. गांधींच्या या आंदोलनाने निःशस्त्र आंदोलनाची नवी ज्योत पेटवली. भारतीय जनांच्या सहभागाने त्यामागून हजारो ज्योती पेटत गेल्या
उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया..... किती सार्थ ओळी आहेत नाही?
Sunday, November 22, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment