Sunday, November 22, 2009

बाळासाहेबांचा सचिनला 'नो बॉल'!


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी क्रिकेट जगताचे दैवत असणार्‍या सचिन तेंडुलकरविषयी केलेल्या विधानबद्दल सर्वत्र त्यांच्या रोखाने निषेधाचे बाऊन्सर पडत आहेत. असे अनेक बाऊन्सर सहन करण्याचा त्यांचा गाढा अनुभव आहे. पण हे बाऊन्सर सहन करण्याइतके आता बाळासाहेब तरूण नाहीत, नि ते हुकविण्याइतके त्यांचे चिरंजीव चतुर नाहीत.

वास्तविक बाळासाहेबांनी सचिनच्या माध्यमातून आपल्याच चाळीस वर्षांपूर्वीच्या विचारांची नवी आवृत्ती असणार्‍या राज ठाकरे यांच्यावरच बाऊन्सर टाकण्याचा प्रयत्न केला, पण वयोमानामुळे बाळासाहेबांचे लक्ष्य अंमळ चुकलेच. ज्याच्या मार्फत आपण टीका केली, तो सचिन केवळ मराठीच्या संकुचित भूमिकेखाली दडपण्यासारखा नाही, याचा अंदाजच त्यांना आला नाही. उलट 'खंजीर खुपसण्याचे' त्यांचेच विधान ते स्वतःच खरे करून दाखवत असल्याच्या भावनेने मराठी मने उगाचच दुखावली गेली. त्यांचा बाऊन्सर चक्क नो बॉल पडला. पण त्यासाठी 'पीच' कसे होते, ते समजून घ्यावे लागेल.

राज ठाकरेंच्या मनसेने विधानसभा निवडणुकीने शिवसेनेला मुंबईत तिसर्‍या क्रमांकावर ढकलून देत मराठी माणसांचा नवा तारणहार असल्याचे सिद्ध केले. लगोलग मनसेच्या शिलेदारांनी अबू आझमीचे थोबाड रंगवून भर विधानसभेत राडा घातला. देशभर त्याचा निषेध झाला असला तरी बरीचशी मराठी मने यामुळे सुखावली. आझमीने बाळासाहेबांबद्दलही गरळ ओकले. त्यालाही मनसेनेच प्रत्त्युत्तर देत आघाडी घेतली. या संपूर्ण प्रकरणात शिवसेनेचा प्रचंड गोंधळ उडाला. त्यात मनसे आमदारांच्या निलंबनाला 'ममं' म्हटल्याने 'आता कुठे गेला वाघा तुझा मराठी धर्म?' असा प्रश्नही उपस्थित झाला. त्यावर नेत्यांची बोलती बंद झाली नि कार्याध्यक्षांनीही मौन बाळगले. यातून शिवसेनेच्या 'वाघाच्या' सद्यस्थितीबद्दल जायचा तो संदेश गेला.

या संपूर्ण प्रकरणात 'बुंद से जो गई' ती 'हौदाने मिळविण्याचा प्रयत्न शिवसेनेने सचिनच्या प्रकरणात केला. वास्तविक सचिनने मुंबई व मराठीविषयी काढलेल्या उद्गारात आक्षेपार्ह असे काहीच नव्हते. एका पत्रकाराने जाणून बुजून वाद निर्माण करण्यासाठी त्याला तसा प्रश्न केला. त्याने 'मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे, पण मी आधी भारतीय आहे,' असे उत्तर देत चेंडू योग्य तटवला. शिवाय 'मुंबई सर्वांचीच आहे,' असेही सांगितले. मराठी वृत्तपत्रांनी हे विधान सरळपणे छापले. पण इंग्रजी आणि हिंदी वृत्तपत्रांनी चापलुसगिरी करून 'मुंबई सर्वांचीच आहे, असे सचिन म्हणतो,' अशी हेडलाईन देत 'सचिनचा परप्रांतीय लोंढ्याना आक्षेप नाही, असा अर्थ त्यातून काढला. यातून सचिनला संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या आंदोलनाबद्दल अनादर आहे हे कुठूनही ध्वनित होत नाही. शिवसेनाप्रमुखांनी त्याच्याविषयी थयथयाट करण्याची गरज नव्हती. पण इंग्रजी वृत्तपत्रांनी हा वाद पेटवून त्यांना जे अपेक्षित होते, ते साध्य केले.

बाळासाहेबांनीही ही शिवसेनेच्या पुनरूज्जीवनाची संधी मानली असावी. मराठीचा मुद्दा राज यांनी अमिताभ बच्चन यांना टार्गेट केल्यानंतर देशपातळीवर पोहोचला नि मराठीचा नवा 'तारणहार निर्माण झाल्याचा संदेश समस्त मराठी जनांपर्यंत पोहोचला. चक्क राजचेच अनुसरण करत आता बाळासाहेबांनी सचिनसारख्या मोठ्या व्यक्तीला टार्गेट करून मराठी भाषकांत 'मीच तुमचा (जुना) तारणहार' हे स्थापित करण्याचा (केविलवाणा) प्रयत्न केला. पण त्यांचा हा बॉल चक्क नो बॉल पडला. यातून रन तर सोडाच धावाच गेल्या. उत्तुंग प्रतिमा असणार्‍या नि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव असणार्‍या मोजक्या मराठी लोकांत सचिन तेंडुलकर एक आहे. त्याच्यावर टीका करून सेनाप्रमुखांनी त्याच्या कर्तृत्वाला उगाचच खुजे करण्याचा प्रयत्न केला. सचिनवर प्रेम करणारी मराठी मने त्यामुळे दुखावली गेली आणि हिंदी भाषकांना बाळासाहेबांवर तोंडसुख घेण्याची एक संधी तेवढी मिळाली.

अर्थात, हे विधान बाळासाहेबांच्या फोटोनिशी सामनात प्रसिद्ध झाले असले तरी ते बाळासाहेबांचेच आहे काय? असा प्रश्न पडतो. कारण विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मराठी माणसानेच आपल्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप शिवसेनेने सामनामधून केला होता. काही दिवसांपूर्वी रंगशारदात झालेल्या मेळाव्यात दस्तुरखुद्द शिवसेनाप्रमुखांनी आपण असे कोणतेही विधान केले नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता सचिनबाबतही केलेले विधान हे बाळासाहेबांचेच आहे काय? असे म्हणण्याला जागा आहे. राज ठाकरेंना उत्तर देण्यासाठी त्यांच्याच चिरंजीवाने लोकांसमोर येऊन बोलण्यापेक्षा सामनाच्या माध्यमातून वडिलांच्या नावे मराठी माणसांना साद घालण्याचा यत्न केला हे न कळे. या काळातले त्यांचे मौनही बरेच बोलके आहे.

पण तूर्तास तरी शिवसेनेची ही खेळी 'नो बॉल' ठरली आहे हे नक्की. तर तिकडे राज ठाकरेंनी नुसता चेंडू तटवून चक्क एक धावही मिळवली आहे.

No comments: