Sunday, September 20, 2009

कशासाठी?... पोटासाठी!

शहरातल्या त्या अम्युझमेंट पार्कात मिकी माऊसच्या वेषात तेरा चौदा वर्षांचा एक मुलगा नाचत होता. मनोरंजनाच्या मिषानेच त्याला तिथं ठेवलं होतं. येणार्‍या जाणाऱ्यांशी तो हस्तांदोलन करत होता. त्याला पाहून विशेषतः लहान मुलं खूप आनंदीत होत होती. त्याला पाहून त्यांच्या चिमुकल्या चेहऱ्यावर हास्य उमटत होतं. त्याच्या हातात हात मिळविण्यासाठी तेही उत्सूक दिसत होते.

तेवढ्यात नेत्यासारखी दिसणारी एक व्यक्ती शुभ्र वेषभूषेत तेथे आली. मिकी माऊसकडे त्यांनी एक छद्मी कटाक्ष टाकला आणि दुसरीकडे जाऊ लागली. तेवढ्यात त्यांना काय वाटले कुणास ठाऊक. ते त्या मिकी माऊसच्या दिशेनं गेले. त्याच्या कानाजवळ तोंड नेऊन म्हणाले,
``काय रे, आत श्वास कोंडून जीव घाबरा होत नाही का?

सुरवातीला त्या मुलाला नीट ऐकू गेलंच नाही. मग नेत्यानं ओरडून पण काहीशा जरबयुक्त भाषेतंच पुन्हा तोच प्रश्न विचारला. त्या मुलानं त्यांच्याकडे पाहिलं नि हळू आवाजात सांगितलं, ``होतो ना. पण भूक लागल्यावर जेवढा जीव घाबरतो तेवढा नाही.``

नेत्याचा चेहरा साफ पडला. तेवढ्यातच पार्कातील कलकल वाढली. जनांचा एक प्रवाहो पार्कात शिरला. त्यांच्या मनोरंजनासाठी मिकी माऊस पुन्हा जोरात आणि जोषात नाचू लागला....

मूळ हिंदी लेखक- शिशिर उपाध्याय

No comments: