Sunday, September 20, 2009

विषवल्लीची मुळं

कामावरून परतल्यानंतर मी जेवायलाच बसलो होतो. तेवढ्याच डॉलीने आठवा सूर लावला.
ओ रे बाळा ओ. काय झालं. कुणी मारलं का माझ्या बाळाला? मी तिला गोंजारत विचारलं.
बाबा, मला स्कूटर पायजे. हुंदके देत डॉली म्हणाली.
अगं, पण तु्झ्याकडे तर भरपूर खेळणी आहेत. मग आता स्कूटर कशाला?
हे म्हणताच, ती आणखी जोरजोरात हुंदके द्यायला लागली. हुंदके देता देताच म्हणाली,
बाबा, माझ्या भावलीला वाचवा.
काय झालंय तुझ्या बाहुलीला. मी प्रेमानं विचारलं.
शेजारच्या पिंकीने तिच्या भावल्यासोबत माझ्या भावलीचं लग्न लावलं आणि माझी भावली घेऊन गेली. हे सांगितल्यानंतर तर डॉलीला रडू आवरेना.
हुंदके देता देताच ती म्हणाली,
आता पिंकी म्हणतेय, हुंड्यात मला स्कूटर दे नाही तर भावलीला जाळून टाकेन. बाबा, आपल्या भावलीला वाचवा ना. मला स्कूटर घेऊन द्या ना.
डॉलीचे हुंदके वाढत गेले. तिच्या हुंदक्यात हरवलेले शब्द माझ्या कानावर सारखे आदळू लागले. मी सुन्न झालो.

मूळ हिंदी लेखक- बलराम अग्रवाल

No comments: