Sunday, September 20, 2009

हिंदी, इंग्रजी मीडीयाच्या नजरेतून राज


मराठी भाषा, मराठी माणूस, राज ठाकरे आणि त्याला अनुषांगिक उपप्रकरणे जया, अमिताभ, युपी, बिहारी वगैरे वगैरे. या सगळ्या विषयांनी गेले काही महिने नुसते गाजवून सोडले आहेत. राज ठाकरे यांची बर्‍यापैकी पाठराखण मराठी प्रसारमाध्यमांनी (छापील आणि दृकश्राव्य दोन्ही) केली आहे. हिंदी व इंग्रजी मीडीयाने मात्र राज ठाकरे हा कुणीतरी गुंड असल्याचे चित्र उभे केले आहे. त्याचाच परिणाम म्हणून की काय पण हिंदी प्रांतातही राज नावाचा कुणीतरी एक राक्षस महाराष्ट्र नामे प्रांतात असून तेथे जाणार्‍या प्रत्येकाला तो मराठी बोलायला भाग पाडतो. 'जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी' त्याला फक्त मराठीच दिसते अशी काहीशी इमेज निर्माण झाली आहे. इकडे इंदूरमध्ये या काळातली हिंदी वर्तमानपत्रे वाचल्यानंतर आणि इथल्या लोकांशी चर्चा केल्यानंतर ही प्रतिमा अधिक ठळक होते.

एक तर लोकांना धड माहिती नसते. त्यात माध्यमे जे दाखवतील त्याच्या आधारे मत बनविण्याची आणि ती व्यक्तही करण्याची सवय लागलेली असते. जया बच्चन यांनी असेच एक बिनडोक विधान केले. 'मै युपी की हूँ हिंदी में ही बात करूंगी' हे सांगून झाल्यावर 'महाराष्ट्र के लोग हमें माफ करे' असे सांगत त्यांना राज ठाकरे यांना शालजोडीतून हाणण्याचा उद्योग केला. पण हे करताना हा 'जोडा' राज ठाकरेंऐवजी अवघ्या महाराष्ट्राला लागेल याचा अंदाजच आला नाही. बर्‍याच चॅनेलवाल्यांनी मात्र पहिले वाक्य दाखवून त्याला राज ठाकरेंची प्रतिक्रिया जोडली. त्यातून असा अर्थ निघाला, की राज ठाकरेंचा हिंदीत बोलायलाही विरोध आहे. आणि मुंबई व महाराष्ट्रात फक्त मराठीतच बोलावे अशी त्यांची 'आज्ञा' आहे. वास्तविक राज काय इतरही कुणा मराठी माणसाचा महाराष्ट्रात हिंदी बोलायला विरोध आहे असे नाही. त्या कार्यक्रमात महाराष्ट्राविषयी जया यांनी जे कुत्सित उद्गार काढले, त्याविरोधात सगळे काही पेटले आहे, ते सोडून भलत्याच गोष्टीचे दळण चॅनेलवाली मंडळी दळत होती.

विशेष म्हणजे हा वृत्तांत पाहून इथल्या वृत्तपत्रात येणारी पत्रे लेखही तसेच होते. योगायोगाने या वादानंतर काही दिवसातंच हिंदी दिन आला. त्यावर इथल्या नई दुनियाच्या पुरवणीत मुख्य लेख आला. त्या लेखात एका बाईंनी वेगवेगळ्या मातृभाषा असलेल्या व्यक्ती हिंदी कसे शिकतात आणि त्यांना ती कशी आवडते, हे मांडले. इथपर्यंत ठीक होते. लेखाचा शेवट करताना त्या राज ठाकरेंवर घसरल्या. 'बॉलीवूडचे तारे नेहमीच इंग्रजीतच बोलतात, त्या तुलनेत जया बच्चन या राष्ट्रभाषेत बोलल्या हे चांगलेच, पण तरीही ती बाब म्हणे राज ठाकरे या कट्टर भाषावाद करणार्‍याला खटकली', असे लिहून या बाई मोकळ्या झाल्या. अहो, बाई पण वाद काय? तुम्ही लिहिता कशावर कशाचा काही संबंध आहे का? माहित नाही त्या विषयावर मतं व्यक्त करायची कशाला?

त्याच नई दुनियात पुढच्याच रविवारी राज ठाकरे यांच्यामुळे निर्माण झालेला भाषावाद या विषयावर लेख आला आहे. या गृहस्थांनी लेखाची सुरवात अशी केलीय की माझा जन्म रावेरमध्ये झाला आहे. आम्ही गुजराती असूनही घरात बरचसे मराठी बोलणारे आहेत, माझी आई मराठी भाषक आहे. एवढं सगळं सांगून झाल्यावर त्यांचीही गाडी राज ठाकरेंवर घसरली आहे. राज ठाकरेंनी म्हणे हिंदी बोलणार्‍यांच्या डोक्यात काठी घालायची ठरवली आहे. असे करण्यामुळे ते स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारत आहेत. लता मंगेशकर, आशा भोसले यांना मिळालेली कीर्ति हिंदी गाणी गाऊनच मिळाली आहे. अन्यथा त्या केवळ 'मराठी गायिका' ठरल्या असत्या. अशी उदाहरणे देऊन राज ठाकरे 'बॉलीवूड'चे मराठीकरण करण्याच्या प्रयत्नात असले तरी ते शक्य नाही, असा निष्कर्ष काढूनही हे महाशय मोकळे झाले आहेत. पुढे मराठी लोक इंदौरला 'इंदूर' म्हणतात. पण म्हणून त्यांना कोणी बोलत नाही असा छुपा वारही केला आहे. हे वाचल्यानंतर हसावं की रडावं तेच कळेना. अरे, बाबा, महाराष्ट्रात हिंदी बोलू नका असं कोणी म्हणतंय का? राज ठाकरे यांनीही असं सांगितलेलं नाही. मग फुका स्वतःच निष्कर्ष का काढतोस बाबा. नीट म्हणणं समजून घे ना, असं त्याला जाऊन सांगागावसं वाटलं.

इकडे ऑफिसमध्येही वेगळीच तर्‍हा. इथल्या काही हिंदी भाषक सहकार्‍यांना असं वाटतंय की जणू छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या बाहेर 'मनसे'चे कार्यकर्ते बसले आहेत आणि स्टेशनमधून बाहेर येणार्‍या प्रत्येकाला ते 'मराठी बोलायला भाग पाडत आहेत.' किंवा मुंबईत ज्यांना मराठी बोलता येत नाही, त्यांना हाणून, मारून मुंबईबाहेर पळवलं जातंय. किंवा महाराष्ट्रात रहाणारे इतर भाषक भलतेच दबावाखाली रहात आहेत. काहींना वाटतं, 'दोन दिवसांसाठी मुंबईत गेलं तरी मला मराठी बोलायला लावतील. काहींनी म्हटलं, 'तुमच्याकडे स्पॅनिश पर्यटक आला तरी तुम्ही त्याला मराठीत बोलायला लावाल.' काहींचे निष्कर्ष तर फार पुढचे होते. त्यांच्या मते, आता महाराष्ट्रात उद्योग रहाणारच नाहीत. नवे उद्योग येणार नाहीत. पर्यटनावरही मर्यादा येतील.'' प्रत्येकाच्या कल्पनेचा पतंग सरसरून वर जातो आहे. या विषयावर पत्र लिहिणार्‍यांचीही अहमहमिका लागली आहे. जो उठतो, तो राज ठाकरेला झोडपायला पहातो आहे. ती पत्र वाचून हसायला येतं आहे. त्यातल्या त्यात डांगे नावाच्या एक माणसाने छान पत्र लिहिलं. जम्मूमधून म्हणे बिहारी आणि युपीच्या लोकांना तिथल्या लोकांनी मध्यंतरी हाकलून लावलं. त्यावर कुणीही आवाज उठवला नाही. पण मुंबईत राज ठाकरेंनी नुसतं काही बोललं की बास त्याविरोधात दळण दळणं सुरू होतं. हा अपवाद वगळता बाकी सगळं यच्चयावत पत्र राज ठाकरेंना झोडणारीच होती.

तिकडे टिव्ही चॅनल्सवरही सुरू असलेली बोंबाबोंब वेगळीच. अगदी एनडीटिव्हीसारखं इतरांच्या तुलनेच चांगलं असणारं चॅनेलही काही वेळा काहीही दाखवत होतं. 'व्हॉइस ऑफ इंडिया' नावाचं एक महान चॅनल आहे. त्याने एकदा राज ठाकरेवर एक बातमी केली. त्यात असं दाखवलं की राज ठाकरे नावाचा कोणी गुंड आहे. बरं हे दाखवलंही असं की एका यज्ञाच्या तिथून राज ठाकरे जात आहेत. (हे सगळं स्लो मोशनमध्ये) त्या पार्श्वभूमीवर 'सरकार'मधलं 'गोविंदा गोविंदा' हा घोष वाजतोय. सालं, ते पाहिल्यावर राज ठाकरे नावाचा फार मोठा राजकीय गुंड आहे, की काय असं वाटत होतं. या चॅनेलवाल्यांच्या डोक्यात त्यांचा तो बुम घालावा असं वाटलं. त्यातल्या त्यात एकदा नाईन एक्स या इंग्रजी चॅनेलवर जरा बरी चर्चा झाली. त्यात 'उषा उत्थप, भरत दाभोळकर, प्रल्हाद कक्कड' असे लोक होते. त्यात भरत दाभोळकरने नेमका आक्षेपाचा मुद्दा काय नि जया यांच्या बोलण्यातून ध्वनित होणारा अर्थ कसा अवमानकारक आहे, ते छान सांगितलं. मुळात समाजात ज्यांची प्रतिमा मोठी आहे, त्यांनी सार्वजनिक ठिकाणी सांभाळून बोलायला हवं. त्याचे काय परिणाम होतात, हे त्यांना कळलं पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे बाकीच्या वक्त्यांनीही त्याला अनुमोदन दिले. पण अशा प्रकारचे कार्यक्रम जरा कमीच झाले. बाकीच्या चॅनलवाल्यांनी त्याला गुंडच ठरवून टाकले.

त्यातल्या त्यात अगदी सुरवातीच्या काळात म्हणजे फेब्रुवारीत रमणदीप सिंग नावाच्या एनडीटिव्हीच्या एका संरक्षण विभाग पहाणार्‍या पत्रकाराचा या विषयाचा सर्वांगीण वेध घेणारा छान लेख त्यांच्या वेबसाईटवर वाचायला मिळाला. बिहारी आणि युपीच्या मंडळींची मानसिकता, गटात राहून तिथे मतदारसंघ तयार करण्याचे त्यांचे प्रयत्न, त्यातून निर्माण होणारे नेतृत्व, त्याला हवा देण्यासाठी बिहार, युपीतून येणारी नेतेमंडळी, या सगळ्याची मानसिकता, त्याचा मराठी माणसावर झालेला परिणाम, इतर राज्यात असलेली युपी, बिहारी लोकांची प्रतिक्रिया या सगळ्या बाबी छान मांडल्या होत्या. पण असे प्रयत्न अपवादात्मकच.

हिंदी, इंग्रजी वेबसाईटवर आणि ब्लॉगवरही राज ठाकरेंविरोधात लिहिणारी मंडळी भरपूर दिसली. या सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून तर मुंबई आणि मराठी माणसे जणू भांडकुदळ आहेत. ती अमराठी लोकांच्या डोक्यात दगड घालायच्या इराद्यात आहेत, असेच चित्र उभे रहात होते. त्यात हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, हा पाठही होताच. त्यात मला अगदी अपवादात्मकच दक्षिण भारतीयाची प्रतिक्रिया वाचायला मिळाली. एका तमिळी भाषकाने आयबीएनच्या वेबसाईटवर लिहिलेली प्रतिक्रिया वाचली. स्वभावधर्मानुसार आयबीएनने त्याचा वेगळा लेख करून लावला. हा तमिळ भाषक म्हणत होता, 'मीही एकेकाळी तमिळनाडूत हिंदीविरोधी आंदोलनात सहभागी होतो. जे दिसेल ते आम्ही त्यावेळी फोडायचो. पण आता मी किती चुक होतो, हे आज मला कळतं आहे. उत्तर भारतातल्या संधींसाठी मला हिंदी येणं किती गरजेचं आहे, हे मला जाणवतंय वगैरे वगैरे.' अरे बाबा, पण मराठी माणसाला हिंदी येत नाही. हिंदी बोलायला विरोध आहे, असं कुणी सांगितलं? अहिंदी राज्यात सर्वाधिक हिंदी बोलणारे महाराष्ट्रातच सापडतील. देशात सर्वाधिक हिंदी बोलणार्‍यांचे शहर मुंबई आहे. प्रश्न हिंदीला विरोधाचा नाही, तिच्या कुरघोडीचा आहे. हिंदी लोकांनी महाराष्ट्राचा, मराठी संस्कृतीचा आदर करावा आणि महाराष्ट्रातल्या सरकारी व केंद्र सरकारी नोकर्‍यांत मराठी भाषकांना प्राधान्य मिळावे (त्यात बिहारी व युपीवाले भरले जाताहेत म्हणून) एवढी आमची माफक अपेक्षा आहे. त्यात एवढा गहजब माजविण्याचे कारण काय? ब्लॉगवरही तीच कथा. ब्लॉग लिहिणारेही संगणकाच्या की दामटून लिहित होते.

हे सगळं पाहिल्यावर एक नक्की वाटलं. या लोकांच्या आक्षेपांना तोंड देण्यासाठी, वस्तुस्थिती मांडण्यासाठी इंग्रजी व हिंदी या भाषांत काही लिहिलं गेलं पाहिजे. इंग्रजीत लिहिणारी बरीच मराठी मंडळी आढळली. पण इंग्रजीत लिहिणारे मराठी स्तंभलेखक जवळपास नाहीत. त्याचवेळी हिंदीत लिहिणारी मंडळीही नाहीत. हिंदी भाषक प्रदेशात पत्रकारिता करणारी मराठी मुळे असलेल्यांना मुख्य प्रश्न माहित नसतो. त्यामुळे त्यांची भूमिकाही अनेकदा इतर हिंदी भाषकांप्रमाणेच असते. माझ्या परीने मी बराच प्रयत्न करून हिंदीत लिहिले. प्रतिक्रिया लिहिल्या. या सगळ्याबाबतीत तुमचा अनुभव काय?

डिसक्लेमर- मी कुठल्याही प्रकारे राज ठाकरे यांचा समर्थक नाही. पण त्यांच्या काही मुद्यांत नक्कीच दम आहे. भलेही हिंसाचाराचा मार्ग चुकीचा असेल. पण काही मुद्दे मांडले जाणे गरजेचेच आहे.