Sunday, September 20, 2009

मराठीची अवनती- थोडं आत्मपरिक्षण


भाषा ही संपर्काचं साधन आहे. आपल्या भावना, विचार आदिम माणूस देहबोलीतून व्यक्त करत होता. पुढे त्या बोलीला शब्द मिळाले. जिथल्या तिथल्या भाषा वेगळ्या होत गेल्या. ही दुसर्‍याशी संपर्क साधण्यास उपयुक्त ठरणारी भाषाच सध्या वादाचा विषय ठरतो आहे. मुंबईत मराठी भाषेवरून सुरू असलेले रणकंदन हे त्याचेच उदाहरण. या भाषक वादाला रोज नवे पैलू जोडले जात आहेत. मुंबईत रहाणार्‍या परप्रांतीयांना मराठी बोलता येत नाही, यासाठी त्यांना दोषी धरण्यापेक्षा याला मराठी माणूसच जास्त दोषी आहे, असे मला वाटते.

त्याच्या समर्थनार्थ काही मुद्दे मांडावेसे वाटतात. मुंबईत मराठी माणसांची संख्या ४२ टक्क्यांहून जास्त कधीच नव्हती. पुढे पुढे ती कमी कमी होत गेली आणि मराठी माणूस उपनगरात रहायला गेला. याचे वेगवेगळे अर्थ आहेत. मुंबईत जमिनी व फ्लॅट्सचे भाव इतके वाढले की त्याला तिथेच राहून नवे घर घेणे परवडत नव्हते. त्याचवेळी चाळीत रहाणारा मराठी माणूस सांपत्तिकदृष्ट्या सुधारला होता. त्याला चांगले रहाणीमान हवे होते. त्याला त्या पैशात भलेही मुंबईत घर घेता येत नसले तरी उपनगरात चांगले घर मिळत होते. सहाजिकच तो मुंबईबाहेर गेला. मुंबईतले भाव परप्रांतीयांनी वाढविले या म्हणण्याला माझ्या मते तरी तितका अर्थ नाही. मुंबईची स्वतःची किंमतच एवढी आहे, की तीच भाववाढीला कारणीभूत ठरते. कारण प्रत्येक कंपनीला आपले ऑफिस मुंबईत हवे असते. याचे कारण मुंबईला लाभलेले आंतरराष्ट्रीय ग्लॅमर, महत्त्व. सहाजिकच मुंबईचा विस्तार होत असताना जागेची गरज वाढत गेली. परिणामी किमती वाढत गेल्या. या सगळ्यामुळे मराठी माणसाने उपनगरात जाणे पसंत केले.

मुंबईच्या या एकूणच विस्तारामुळे सहाजिकच रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात होत होती आणि आहे. सहाजिकच देशापरदेशातून नोकरदारांचा, व्यावसायिकांचा लोंढा मुंबईकडे न येता तरच नवल. या सगळ्यांच्या येण्यामुळे आणि आधीच मुंबईत निम्म्याहून जास्त इतर प्रांतीय लोक असल्यामुळे मुंबई अधिकाधिक बहुसांस्कृतिक आणि बहूभाषक होत गेली. सहाजिकच बहुसांस्कृतिकतेच्या लोकांना कळेल अशा भाषेचे चलन सुरू झाले. ही भाषा अर्थातच हिंदी होती. त्यात रोजगारनिर्मितीचे मोठे केंद्र असलेले हिंदी चित्रपटनिर्मितीचे केंद्र बॉलीवूड हेही मुंबईतच होते. त्यामुळे सहाजिकच हिंदीचे चलन मोठ्या प्रमाणात वाढले. हिंदीच्या या विस्तारापायी एकेकाळी वेळही अशी आली की भाषेप्रती अत्यंत जागरूक असलेल्या दक्षिण भारतीयांनाही मुंबईत रहाताना हिंदी शिकावी लागली. कारण मोठ्या जनसमूहाला ती भाषा समजत होती. मुंबईत मराठी भाषक लोक असले तरी त्यांची संख्या तुलनेने कमी असल्याने संपूर्ण जनव्यवहारात मराठीचे प्राबल्य निर्माण झाले नाही. त्याचवेळी त्यांना हिंदी सहजी समजत होते, हेही त्याचे कारण ठरले. गुजराती भाषकही मोठ्या प्रमाणात होते. पण म्हणून गुजराती भाषा ही मुंबईची भाषा बनली नाही. कारण सगळ्यांना सामावून घेईल, समजू शकेल अशी हिंदी भाषा होती. हिंदी चित्रपट हे त्यासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरले.

या सगळ्यामुळे पूर्ण मुंबईत असे वातावरण तयार झाले की भलेही मराठी आले नाही तरी चालेल हिंदी येते आहे ना मग कोणतेही काम अडणार नाही. कारण समोरचा माणूस मराठी असो वा तमिळी त्याला हिंदी समजते आहे, मग चालू शकते. केवळ याचमुळे हिंदीचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आणि राज्याची स्थानिक भाषा मराठी मागे पडली. कारण व्यवहाराची जी भाषा असते तीच बाजारात चालते. हेच अनुसरून हिंदीचे चलन वाढले. राजभाषा मराठी असूनही ती बोलण्याची गरजच पडली नाही, तर अमराठी लोकांनाही ती भाषा शिकण्याची गरजच पडली नाही.

म्हणूनच अनेकजण मुंबईत बरीच वर्षे राहूनही मराठी बोलू शकत नाही. कारण ती भाषा बोलण्याची गरज पडावी असे वातावरण त्याला मिळत नाही. तो बाजारात गेला आणि विक्रेता मराठी असला तरी समोरच्या व्यक्तीला मराठी येत नाही, हे म्हटल्यावर तो हिंदीत बोलतो. ग्राहकाचे काम होऊन जाते. त्याला मराठी बोलण्याची गरजच पडत नाही. मग तो मराठी शिकेल कशाला? अमराठी व्यक्तीला करमणुकीसाठी हिंदी चित्रपट आहेत. मग त्याला मराठी चित्रपट बघण्याची गरजच पडत नाही. आणि त्यासाठी ती भाषाही शिकण्याची आवश्यकता वाटत नाही. उदाहरण शाहरूख खानचे घेऊया. शाहरूख खान ज्या वर्तुळात सुरवातीपासून वावरतो आहे, ते पहाता त्याचा संबंध कधी मराठी माणसाशी आला असावा असे वाटत नाही. हिंदी चित्रपटांच्या दुनियेत वावरणार्‍या शाहरूखचे सगळे वर्तुळ बहुसांस्कृतिक असल्याने सहाजिकच व्यवहाराची भाषा हिंदी वा इंग्रजी झाली. सहाजिकच मुंबईत इतके दिवस राहूनही त्याला मराठी बोलण्याची कधी गरजच पडली नसावी. त्यामुळे त्यालाही कधी मराठी शिकावे असे वाटले नाही.

कोलकता, चेन्नई किंवा दक्षिणेतल्या कोणत्याही शहरात बराच काळ राहिल्यानंतर तिथली भाषा शिकणे क्रमप्राप्त आहे कारण तिथला सगळा व्यवहार त्याच भाषेत चालतो. तो त्या लोकांनी चालवला आहे. त्यामुळे तिथे रहाणार्‍यांनाही तो पाळावा लागतो. शिवाय स्थानिक लोक तिथल्या शहरांत बहुसंख्याक होते. चेन्नई बहुसांस्कृतिक म्हणवले जात असले तरी तेथे स्थानिक तमिळी लोकच जास्त आहेत. कोलकत्यातही तसेच आहे. मुंबईत तसे नव्हते. त्यामुळे स्थानिक भाषेचे अर्थात मराठीचे वर्चस्व तेथील व्यवहारावर कधीच राहिले नाही. त्याचवेळी मराठी माणसाला हिंदी चांगले समजते ही बाबही त्याच्या मुळावर उठली. थोडक्यात सुरवातीपासूनच मराठी माणूसच स्वतःच्या भाषेविषयी आग्रही राहिला नाही. त्यामुळे ही भाषा व्यवहारात मागे पडत गेली.

या सगळ्यामुळेच असे वाटते की मराठी बोलण्याची गरजच पडत नसेल तर परप्रांतीयांकडून मराठी बोलण्याची अपेक्षा आपण का करावी? म्हणूनच मराठी मंडळींनी स्वतःहून सगळीकडे मराठीचा वापर सुरू केला तरच परप्रांतीयांना ती भाषा शिकण्याची गरज वाटू शकेल. त्यानंतर मग ते मराठी भाषा अवलंबतील. सहाजिकच हा प्रश्न भावनेचा ठरणार नाही. कुणावरही जबरदस्ती करून, कुणाच्या कानपटात वाजवून मराठी बोलले पाहिजे असे म्हणणे चुकीचे ठरेल. त्यापेक्षा त्याला मराठी शिकणे ही गरज वाटेल अशी परिस्थिती निर्माण करणे जास्त योग्य आहे.

No comments: