Sunday, September 20, 2009

इये इंदुर नगरी

अस्मादिकांचे वास्तव्य सध्या इंदूर शहरात आहे. काही गावांची नाव उच्चारली तरी अंगावर रोमांच उमटतात. ग्वाल्हेर, इंदूर, अटक, पानिपत ही गावं त्यापैकीच. कारण या गावांना इतिहासाचा स्पर्श आहे. उत्तर दिग्विजय करायला निघालेल्या मराठ्यांच्या फौजांनी नर्मदापार झेप घेताना अनेक ठिकाणी आपल्या पराक्रमाचे झेंडे गाडले. या मोहिमांमधील ही काही गावं. इंदूर हे त्यातले मध्य भारतातील महत्त्वाचे ठिकाण. मल्हारराव होळकरांच्या कर्तृत्वाचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाच्या काळात या या भागाची वाटणी झाली आणि ग्वाल्हेर शिंद्याच्या वाट्याला, इंदूर होळकरांकडे आणि धार पवारांकडे गेले. पण प्रामुख्याने अमराठी प्रांतातील प्रमुख मराठी गावे सांगताना ग्वाल्हेर व इंदूर ही नावं प्रामुख्याने येतात.

(थोडं विषयांतर, सुरवातीला उज्जैन शिंद्यांकडे होतं. पण तेथे महाकालेश्वर (ज्योतिर्लिंग) हा एकच राजा असतो, अशी समजूत आहे. तो इतरांना तेथे राहू देत नाही, असे मानतात. म्हणून शिंद्यांचा राजवाडाही गावाबाहेरच बांधण्यात आला. त्यानंतर त्यांनी तेथून सर्व काही हलवून ग्वाल्हेरला कूच केलं. धार व देवास ही पवारांच्या धाकटी पाती व थोरली पाती यांच्या वाटणीत वेगळी झालेली संस्थानं आहेत.)

त्यापैकी इंदुरात मी रहातो. मराठ्यांच्या विशेषतः पेशवाईच्या काळात उत्तर दिग्विजयासाठी मराठी फौजांनी स्वाऱ्या केल्या. त्यानंतर मराठी सत्ता येथे प्रस्थापित झाल्यानंतर अनेक मराठी कुटुंबे येथे स्थिरावली. त्यानंतरही येत राहिली. अगदी विसाव्या शतकातही रेल्वे खाते वा केंद्र सरकारच्या नोकरीच्या निमित्ताने अनेक कुटुंबे महाराष्ट्रातून येथे आली. स्थिरावली. त्यामुळे मध्यप्रदेशात ठिकठिकाणी मराठी कुटुंबे सापडतात. अनेक ठिकाणी त्यांच्या वेगळ्या गल्ल्या आहेत. इंदूर, ग्वाल्हेर व्यतिरिक्त धार, देवास, महेश्वर, जबलपूर, झाबुआ अशा अनेक ठिकाणी मराठी लोक आहेत. मध्य प्रदेशातील प्रत्येक शहरात मराठी माणसे आहेतच. विशेष म्हणजे ती अनेक वर्षांपासून तेथे रहात आहेत.

आता इंदूरबद्दल. हे शहर मध्य प्रदेशातील सर्वांत मोठे शहर आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ असली तरी सर्व महत्त्व मात्र इंदूरला आहे. (येथे मराठीत लिहिताना इंदूर लिहितात. हिंदीत उल्लेख असल्यास इंदौर असे लिहितात.) या शहराची लोकसंख्या वीस लाखांच्या आसपास आहे. इंदूर ज्या भागात आहे, त्याला माळवा प्रांत असे म्हणतात. मध्य प्रदेशातील सर्वांत संपन्न, समृद्ध प्रांत म्हणजे माळवा. त्याची राजधानी इंदूर. त्यामुळे तीही तितकीच संपन्न आहे. इथे लोकांकडे पैसा भरपूर आहे. (इथे असलेली दागिने, कपड्यांची दुकाने आणि खाण्यापिण्याचे नानाविध पदार्थ यातूनही ही समृद्धी जाणवते.) कारखानदारी काही प्रमाणात असली तरी शेतीआधारीत उत्पन्नही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शहरात चमक धमक आहे.

इंदूरमध्ये मराठी लोकांचे प्रमाण वीस टक्क्यांच्या आसपास जाईल. पूर्वी हे प्रमाण निम्म्यापेक्षा जास्त होते, असे म्हणतात. पण इंदूरच्या समृद्धीमुळे बाहेरून येथे खूप लोक आले. त्यामुळे येथेही मराठी टक्का कमी झाला. येथील रामबाग हा येथील जुना मराठी इलाका. होळकरांचा जुना राजवाडा गावाच्या अगदी मध्यवर्ती भागात आहे. तेथे लागूनच रामबाग आहे. या भागात वाडे बरेच होते. आता वाडे पाडून इमारती बांधल्या जाऊ लागल्या आणि मुंबईतील मराठी माणूस जसा उपनगरात गेला अगदी तशीच स्थिती येथील मराठी मंडळींचीही झाली. त्यामुळे आता नारायण बाग या भागात काही मराठी मंडळी रहातात. बाकी लोकमान्य नगर, राजेंद्र नगर, सहदेव नगर, टिळकनगर या भागांमध्ये मराठी मंडळी रहायला गेली आहेत. या भागात गेल्यास कानावर मराठी पडू लागते.

मराठी मंडळी कुठेही गेली तरी त्यांचे काही गुण अगदी सारखे आहेत. त्यामुळे येथील मराठी मंडळीही प्रामुख्याने नोकरी क्षेत्रात आहेत. येथील कुठल्याही शाळेत गेल्यास किमान चाळीस ते पन्नास टक्के शिक्षक वर्ग मराठी आहे. कॉलेजांमध्येही तीच परिस्थिती. डॉक्टर मंडळीतही मराठी लोकांचे प्रमाण बरेच आहे. याशिवाय इतर खासगी सेवा क्षेत्रातही मराठी लोक बरेच आहेत. त्यामुळे बाहेर पडल्यानंतर मराठी ऐकू येणे ही नवलाची बाब रहात नाही. (इतर हिंदी भाषक क्षेत्रात असे वाटू शकते.) त्यातच मराठी माणसांचे आणखी एक क्वालिफिकेशन म्हणजे प्रामाणिकपणा. त्यामुळे नोकरी देणाऱ्यापुढे मराठी, पंजाबी, राजस्थानी, बिहारी वा इतर कुठलाही हिंदी भाषक आल्यास तो प्राधान्य मराठी माणसालाच देतो. कारण तो प्रामाणिक असतो. आपलं काम भले आणि आपण भले असा त्याचा एटिट्यूड असतो. आणि आपल्याकडून शिकून दुसरीकडे जाऊन स्वतःचा उद्योग सुरू करेल अशी सुतराम शक्यता नसते. थोडक्यात येथील मराठी माणूस हा अपवाद वगळता नोकरदारच आहे.

No comments: