पुस्तकांनी आयुष्य बदलून जातं असं थोर लोक म्हणतात. अस्मादिकांना हा अनुभव वयाच्या फार लवकर आला. कारण आयुष्याच्या या गाफील क्षणी पुस्तके हातात आली नि दुकानात बसून पिढीजात व्यवहार करण्याऐवजी अस्मादिक शब्दव्यवहारात गढून गेले. 'हे द्या ते द्या' या ग्राहकी आरोळ्यात आम्ही मात्र हातीमताई, विक्रम-वेताळ, गुलबकावली, ठकसेन यांच्या जगात वावरत होतो. वाचनानंदी लागलेली ही टाळी गिर्हाईकाच्या टाळीनेच भंग पावायची हा भाग अलाहिदा. शिवाय ग्राहकाने मागितले एक की द्यायचे भलतेच, पैशाच्या देण्याघेण्यात होणारी चूकभूल, वस्तुमापनात होणारा गोंधळ हा भाग तर नित्याचा. विद्याभाराने जड झालेले (नि व्यवहारीक काम न करणारे) डोके मग जन्मदात्याच्या जड हातांनीच एका फटक्यातच रिते व्हायचे. दुकानाच्या अलीकडे न उभे रहाता पलीकडेच कायम उभे रहायचे हा धडा घेतला तो त्याचवेळी. आयुष्य बदलाचा आलेला हा पहिल्या (वाचन)धारेचा अनुभव म्हणायला हरकत नाही.
आयुष्याची पाने फडफडत असताना एकीकडे पुस्तकाची पानेही फडफडत होतीच. कॉलेजात जाण्याच्या वाढत्या वयात तर त्याला मुळी घरबंध उरला नाही. आयुष्याला कोणत्याच एका रंगाने रंगवायचे नाही, हा धडा पुस्तकांनीच शिकवला. त्यामुळेच पिवळ्यापासून लालपर्यंत कोणत्याही रंगाची पुस्तके हातातून सुटली नाहीत. भगवे, लाल, निळे हिरवे असे सर्व रंगी साहित्य मनसोक्त वाचले. पण ही पुस्तके वाचूनही नजर कोणत्याच एका रंगाची झाली नाही.
खाणे हा वाचणे या शब्दाचा पर्यायवाची शब्द बनला. त्यामुळे पुस्तके ही 'खाल्ली' गेली नि त्यासोबत पोटातही भर पडतच होती. दोन्हीची गती सारखीच असल्यामुळे हा विद्येचा भार डोक्यावर दिसत नसला तरी पोटावर मात्र अंमळ दिसू लागला तो तेव्हापासून. शिवाय अंतिमतः डोक्यालाही तो भार सहन न होऊन केसांनी शरणागती पत्करली. 'डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा' असा प्रश्न त्याच काळात पडला नि चष्मा नावाचा नवीन अवयव आपल्या कान आणि नाक या दोन अवयवांवर बांडगूळासारखा नांदणार असे निदानही झाले. वाचनाने 'हार्डवेअर'मध्ये असा बदल घडवून आणल्यावर तोंडातल्या भाषेनेही सॉफ्टवेअरमध्ये राहिलेला बदल पूर्ण केला.
वाचन आता तोंडावर नाचायला लागलं नि पुस्तके तोंडात येऊन बोलू लागली. म्हणूनच एकदा ज्येष्ठ भगिनींबरोबर एका चित्रपटाला जाऊन आल्यानंतर त्याच्या स्तुतीपर 'छायाचित्रण छान होते नाही? आणि अभिनयही वाखाणण्याजोगा होता', या अस्मादिकांच्या स्तुतीसुमनांबरोबर एक जोरदार धपाटा पाठीत पडला आणि वर 'छापखान्याचे खिळे तोंडात बसविल्यासारखा पुस्तकी बोलू नकोस', असा 'गटणे' टोलाही भगिनीभावाने हाणला. लोक शिव्या घालतात तेव्हा त्यांच्यावर संस्कार नाही असे बोलले जाते, इथे वाचनसंस्कार बोलण्यातून येऊनही शेवटी आम्ही धपाट्याचेच धनी ठरलो. अर्थात, पुढील आयुष्यात असेच शाब्दिक धपाटे पाठीत बसत गेले नि त्याचीही सवय झाली.
वाचनाने शब्द जिभेपुढे आणून ठेवले नि त्यांना उच्चारण्याचा आगाऊपणाही देऊ केला. त्यामुळे आगीतून फुफाट्यात, उचलली जीभ लावली टाळ्याला, भोगा कर्माची फळे वगैरे वाक्प्रचारांचा नेमका अर्थ काय याचीही जाणीव झाली. एकदा कुठल्याशा धार्मिक कर्मकांडाप्रसंगी 'यात काही 'राम' नाही, असे वाक्य उच्चारले नि त्या समर्थनार्थ कुठल्याशा पुस्तकातला संदर्भ दिला. त्यावर जमलेल्या ज्येष्ठांनी एकमताने याला फार शिंगे फुटली आहेत, असे जाहिर करून टाकले. जिभेच्या या आगाऊपणापायी 'अतिशहाणा, दीडशहाणा, विद्वान, पंडित, साडेतीन शहाणे आदी विशेषणे जोडली गेली आहेत. बरं यातून पापक्षालनासाठी जिभेला आवर घातला की हा पहा 'माणूसघाणा', घुम्या आदी नवी विशेषणे न बोलता लागली गेली. या विशेषणांचे ध्वनी पाठमोर्या अवस्थेतच आजही अगदी विशेषत्वाने ऐकू येतात.
तिकडे घरच्यांनाही आपला तो बाब्या वाटण्याऐवजी 'कारटे' वाटावे ही या वाचनवेडाचीच परिणती म्हणावी. कारण कुठलेही काम सांगितल्यानंतर पुस्तकातून मान वर काढून ते होणार याची कोणतीही स्पष्ट ग्यॉरंटी त्यांना कधीच मिळाली नाही. शिवाय ते काम लादल्यानंतर त्याचे झालेले परिणामही 'एक गोष्ट सांगितली की भलतीच आणणे, यात व्हायला लागल्याने ते करणेही त्यांनी टाळले. अशा या मोकळीकीने आमचे वाचनाचे वारू बेफाम वेगाने दौडू लागले यात काय नवल. किमान पोरगा उगाचच उंडारत बसत नाही, वाचतच बसतो, यातच आमच्या मायबापाने समाधान शोधले. वाचनात मान खाली बसल्याच्या या सवयीमुळे अनेकांना अस्मादिकांची मानच तशी आहे की काय असा प्रश्न पडायचा, पण अतिताणामुळे डोळे वर करून पाहण्याच्या नादात नजर गुंतवून टाकणार्या कुण्या आकृतीत नजर अडकल्यावर त्यांचा हा समजही आपोआपच फोल ठरायचा.
'वाचेल तोच वाचेल' या उक्तीवर असलेल्या ठाम विश्वासापायी पुढे 'कलमी मनसबदारी' मिळाली. ही मनसबदारी निभावण्यापोटी अनेक रात्री जागवाव्या लागल्या. त्यातूनच रात्री 'वाचनाचे प्रयोग' सुरू झाले. मध्यरात्र ते कधी कधी पहाटेपर्यंत वाचन सुरू राहिल्याने या संबंध काळात सकाळचा सूर्य 'कसा दिसतो तो आननी' हे कधीच कळले नाही. परंतु, दुपारच्या प्रकाशावरून सूर्य हा पीतरंगी आहे हा ठाम समज रूढ झाला. शिवाय तांबारलेले आणि सुजलेले डोळे घेऊन ऑफिसात जाऊ लागल्यामुळे 'जागत्या' पत्रकाराच्या जातीत नांदणारा अशी ओळख दृढ झाली आहे ती वेगळीच.
वाचनाने 'फुटलेल्या शिंगांनी' इतरांना अंगावर घेतले नि स्वतःलाही जखमी करवून घेतले. त्यातल्या काही तर सुगंधी जखमा होत्या. या जखमेवर फुंकर घालता घालता 'तिने लाजून हो म्हटले नि मनात गाणे नाचत सुटले' हा साक्षात अनुभवही आला. 'व्यसनी नवर्यापेक्षा 'वाचनी' नवरा केव्हाही चांगला, हा वाक्प्रचारही तिने त्याच भरात जन्माला घातला असावा. पण हे विधान करण्याची वेळ कोणती होती, याचा आजही ती शोध घेते आहे. कारण जळालेली दुधाची भांडी, करपलेल्या भाज्या, उतू गेलेला चहा, कुकरचे झाकण उडून छताला लागलेले अन्न या सार्या माझ्या वाचनानंदी लागलेल्या समाधीतून घडलेल्या बायप्रॉडक्टच्या जिवंत खाणाखुणा आजही घरात नांदत आहेत. शिवाय पुस्तके वाचता वाचता टळून गेलेली अनुक्रमे, फिरायला जाण्याची, शॉपिंगची, चित्रपटाची, कुठल्याशा कार्यक्रमाची नि हो तिच्या बहिणीच्या साखरपुड्याची वेळ याची भरपाई मी अजूनही करू शकलेलो नाही. त्यामुळे दर नव्या पुस्तकामागे यातली प्रत्येक वाक्य अदलाबदलीने वापरण्याची वेळ काही चुकत नाही. आता तर आईचीच मुलगी असलेल्या कन्येनेही हा धडा गिरवायला घेतला आहे. तिच्या कोणत्याही कामात मदत करण्याचे धुत्कारल्यानंतर 'बाबा वाचत बसलाय' हे एकच ब्लॅकमेलिंगचे वाक्य फेकून ती मला काहीही करायला भाग पाडू शकते. कारण ती मदत अव्हेरल्यानंतर घरात किती प्रकारचे आवाज ऐकू येऊ शकतात, याची कल्पना नुसत्या वाचनातून येणार नाही. तो अनुभवाचा भाग आहे.
समृद्ध झालेल्या वाचनाने या सगळ्या अनुभवाकडे पाहण्याचा विशिष्ट डोळा दिला आहे. कुठल्याही घटनेकडे त्रयस्थपणे पाहण्याची नवी दृष्टी विकसित झाली आहे. पण त्याचवेळी लौकीकापलीकडे जाऊन सहवेदना अनुभवण्याची संवेदनशीलताही दिली आहे. म्हणूनच या सांसारीक अनुभवानंतरही अस्मादिकांचे वाचन काही सुटलेले नाही. रात्री अंथरूणात पडल्या पडल्या, बाथरूमात विधी करत असताना, बसमध्ये प्रवास करत असताना किंवा कुठे फिरायला गेल्यानंतर हळूचकन पुस्तक बाहेर निघते नि शब्दांचे ते अद्भुत विश्व माझ्यापुढे उभे ठाकते. आजूबाजूचे विश्व हरपून टाकण्याचे 'भान' ती पुस्तकेच मला देतात. फक्त 'बाबा पुस्तक वाचतोय' या तेवढ्या हाकेकडे माझी नजर असते, बस्स!
साहित्य संमेलनानिमित्त लोकमतच्या मैत्र व ऑक्सिजन या पुरवण्यात हा लेख पूर्वप्रकाशित झाला आहे. छायाचित्रही त्याच पुरवणीतून साभार.