Tuesday, September 22, 2009

पाणीपुरी


पाणीपुरी हा काय पदार्थ आहे? 'पाणीपुरी' आणि तीही 'खायची'? छ्या. पुरीत भरलेलं पाणी प्यायचं की खायचं? आणि त्यातलं पाणी महत्त्वाचं की पुरी? त्या क्षुद्र पातळ पुरीला खायचं काय? (आणि त्या पुरीतल्या पाण्यात असतं तरी काय? नुस्तं आंबटगोडपणा. उगाचच, दिवस गेलेल्या बाईसारखं वाटतं.) खाणं म्हणजे कसं असावं, ज्यातून आत्मानंद, परमात्मानंद मिळाला पाहिजे. एकेक घास खाता खाता परमोच्च आनंदाची प्राप्ती झाल्याचा फील आला नाही तर ते खाणं कसलं? त्यामुळे आंबटगोड पाणीपुरीविषयी अस्मादिकांची मतं अशी 'तिखट' होती.

पण इंदूरला आलो नि पुदिन्याचं पाणी पिऊन दुसर्‍या दिवशी पोटाचं जे होतं, तसे सगळे समज-गैरसमज 'स्वच्छ' झालेत. अरे पाणी पुरी काय खायची गोष्ट आहे? या आता इतर कुणाच्याही आक्षेपाला 'होय, पाणीपुरी खायचीच गोष्ट आहे, या आग्रहापर्यंत अस्मादिकांचा प्रवास झालाय. आता महाराष्ट्रात राहून भय्यांच्या हातची पाणीपुरी खाणार्‍यांना कदाचित माझ्या बोलण्यातलं इंगित कळायचं नाही, त्यासाठी राजे हो, इंदूरलाच यावं लागेल.

इकडे पाणीपुरी (इथल्या भाषेत पानी-पतासे) तुम्हाला कुठंही मिळेल. अगदी पाच रूपयात दहा-पंधरा पुर्‍या देणार्‍यापासून ते अगदी पाच रूपयांत पाच पुर्‍यांपर्यंतची रेंज इथे आहे. पण मुळात पाणीपुरी म्हणजे काय ते तुम्हाला आधी कळलं पाहिजे. त्यात पुदिन्याचं पाणी तर हवंच. त्याला मस्तपैकी हिरवा रंगही यायला हवा. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्याला मस्तपैकी 'चरका' म्हणजे तिखट स्वादही हवा. आता हा तिखट स्वाद म्हणजे लागलीच 'हाशहुश्श' करायला लावणारा नव्हे. आणि हा स्वादही दोन-चार पुर्‍या खाल्ल्यानंतर यायला हवा. तरच पाणीपुरी जमली महाराजा. आणि हो, ते महाराष्ट्रात मिळतं, तसं आंबटगोड पाणीही इथं असतं, पण ते स्पेशल मागणीनुसारच. ज्यांना ज्जहाल पाणीपुरी पचत, परवडत (पोटाच्या दृष्टीने) नाही, त्यांनी बापडं हे पाणी घालून घ्यावं. पण अशी आंबटगोड 'कोकणस्थी' पाणीपुरी खाण्यात ती काय मजा? पाणीपुरी खायची ती तिखट पाण्याचीच. आंबटगोडची बातच नच्छो. पाणीपुरीत बुंदी घालतात महाराष्ट्रात. तशी ती इथेही असते, पण त्यात बटाट्याचं मस्तपैकी सारणही असतं. पाणीपुरीची चव अप्रतिम करण्यात यांचाही वाटा नक्कीच मोठाय. पण या सगळ्या घटकाचं गणित तेवढं त्या पाणीपुरीवाल्याला जमलं पाहिजे. नाही तर काही तरी 'बाकी' राहून चव मात्र शून्य होते.

आणि हो, पाणीपुरी खायचंही टेक्निक आहे, बरं का महाराजा. भय्यानं पाणी भरून पुरी देणं आणि ती 'गिळंकृत' करणं यात एकतानता निर्माण व्हायला हवी नि ती पाच-सहा पुर्‍यांनी होत नाही. त्यासाठी एकामागोमाग एक पुर्‍यांची अशी लड लागली पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या पुर्‍यांची बरोबरी इथल्या पुर्‍यांशी करू नका. तिथल्या भय्यांसारखी पोटं खपाटीला गेलेली पुरी इथे मिळत नाही. इथल्या लोकांसारखीच नि त्यांच्या प्रेमासारखीच गोलगरगरीत पुरी इथं असते. त्यातलं पाणी ओरपल्याशिवाय पुरी खाल्ल्याचं समाधान नाही, मिळणार महाराजा.

महत्त्वाचं म्हणजे, पाणीपुरी कुठे खायची हेच कळलं नाही तर मग तुमची इंदूरवारी व्यर्थ. म्हणूनच इंदूरला आलात तर सराफ्यात जालच. तिथे गेल्यानंतर सराफा पोलिस चौकीच्या कॉर्नरला दोन पाणीपुरीवाले बसतात. पण अहं, त्यातल्या पोलिस चौकीच्या बाजूने बसतो, त्याची खाऊ नका. तशी तीही चांगलीच असते. पण अलीकडच्याची खाल्लीत ना तर 'दिल बाग बाग हो गया' की कायसं हिंदीत म्हणतात ना तसं होतं. नाही तर मग सिख मोहल्ल्यात या. इथे लोक फक्त पाणीपुरी खायला येतात. ( याच गल्लीत गानसम्राज्ञ लता मंगेशकरांचा जन्म झालाय. या 'मधुर' स्वराच्या गायिकेची ही गल्ली त्याच्या 'तिखट' स्वादासाठी प्रसिद्ध आहे!) तिथेही नाही जमलं तर मग छावणीत जाऊन मथुरावाल्याची पाणीपुरी खायला विसरू नका. छप्पनलाही पाणीपुरी मिळते चांगली, पण त्याहीपेक्षा मथुरावाल्याची चव काही औरच. त्याची पाणीपुरीही अप्रतिम. तिथली पाणीपुरी खाता खाता मरण आलं तरी बेहत्तर.

त्यानंतर मग तिकडे बंगाली चौराह्याला जातानाही एक पाणीपुरीवाला आहे. तिथेही पाणीपुरी छान मिळते. बाकी इंदुरात कुठेही गेलात तरी पाणीपुरी किमान एका 'एव्हरेज' दर्जाची तरी मिळतेच. पण वरच्या ठिकाणी ती खाल्लीत तर मग तुम्ही स्वर्गसुख अनुभवून आलात, असं म्हणायला काहीच हरकत नाही, काय?

ता. क. आणि हो, इंदूरच्या पाणीपुरीशी महाराष्ट्रातल्या पाणीपुरीशी तुलना करू जाल, तर जरा थांबा. कारण इथली पाणीपुरी ही साक्षात अनुभवायचीच गोष्ट आहे, महाराजा. अक्षरांमध्ये तिची चव मावत नाही, त्यामुळे तुलनेची बातच नच्छो काय?

2 comments:

Mahendra said...

हं.. इंदौरचा सराफा म्हणजे माझं पण आवडीचं ठिकाण. पण सराफ्याला गेल्यावर मस्त पैकी मिठाई खाणं हा आवडता उद्योग. तिथे जाउन पाणिपुरी शक्यतो खाणं टाळतो.( उगिच पोटातली रिकामी जागा कशाला भरायची पाणिपुरिने, त्या पेक्षा मस्त पैकी रबडी +गुलाबजाम किंवा जिलेबी खाणं प्रिफर करतो मी.
:)

vrajeb91 said...

मिपावरील हा लेख व त्यावरील प्रतिसाद वाचतांना अधिक मौज येते. तो धागा इथेही चिटकवला तर आणखी बहार येईल.