Monday, May 26, 2008

लळा, जिव्हाळा शब्दच खोटे!

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रियातील एक बापाने आपल्या मुलीला २६ वर्षे घरात कोंडून तिच्याशी शरीरसंबंध जोडून संतती उत्पन्न केली होती, असे उघडकीस आले होते. त्यावेळी पाश्चात्य जगात घडलेला प्रकार म्हणून आपण त्याकडे काहीशा तटस्थ नजरेने त्याकडे पाहिले. मध्यंतरी एका व्यक्तीने इंटरनेटवर आपल्या व्यभिचारी पत्नीलाच विकायला ठेवण्याचीही बातमी आपण वाचली. त्यावेळीही असे प्रकार पाश्चात्य जगात घडतात. म्हणून आपण स्वस्थ बसलो. पण दिल्लीचे आरूषी हत्याकांड असो वा मुंबईत झालेली नीरज ग्रोव्हर या तरूणाची त्याच्या मैत्रिणीच्या प्रियकराने केलेली हत्या (त्यात केलेले मृतहेहाचे तीनशे तुकडे!) या बातम्या एकामागोमाग आपल्यासमोर येऊन आदळल्या आणि समाजमन ढवळून निघाले. हे का घडले असेल?

वर वर पाहून या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही. त्यासाठी या घटनांच्या तळाशी जायला हवे. वेगवान आणि चंगळवादी जीवनशैलीने जगण्याचे हेतू बदलले आहेत. जगायचं कशासाठी तर पैशांसाठी अशी एक नवी संकल्पना रूजली आहे. पैशांसाठी जगायचं असेल तर चांगलं करीयर हवं. त्यासाठी मेहनत घ्यायचीही या पिढीची तयारी आहे. पण या मेहनतीला नैतिकतेची कुंपणे मानवत नाही. म्हणूनच कुठली कर्नाटकातील मारिया सुशायराज ही अभिनेत्री काम मिळविण्यासाठी एकट्याच्या बळावर मुंबईत येते. काम मिळविण्याचा 'राजमार्ग' तिला माहिती आहे. तो सिनर्जी एडलॅब्जचा क्रिएटिव्ह हेड नीरज ग्रोव्हर याने दाखवून दिला होता. त्यामुळे आधी कुणा एकाशी प्रेमसंबंध असलेली मारीय पटकन काम मिळविण्यासाठी ग्रोव्हरबरोबर सर्रास रहायलाही तयार का झाली? हे अधःपतन कसे झाले असेल? किमान आपल्या अटींवर, मुल्यांवर करीयर करावे तिला कधीच वाटले नसेल का? पैसा, प्रतिष्ठा आणि यश तिला आपल्या शीलसंपन्न जगण्यापेक्षा महत्त्वाचे वाटले असेल का? तिच्यावरचे संस्कार त्यावेळी कुठे गेले असतील?

तीच गोष्ट नीरजची. एक यशस्वी व्यक्ती असलेल्या नीरजच्या आयुष्यात मुल्यांना, संस्कारांना काहीच स्थान नव्हते? 'स्ट्रगलर' म्हणून आलेल्या मुलीशी 'अफेअर' करून, तिच्याकडून हवे ते मिळवून घेऊन तिला करीयरमध्ये 'ब्रेक' मिळवून देताना आपण कुठेतरी मुल्यांशी प्रतारणा करतोय असे त्याला वाटले नसेल? शरीरसुख हेच ध्येय त्याने समोर ठेवले असेल?

मारियाचा प्रियकर एलिम जेरॉम मॅथ्यू हा तर नौदलातला अधिकारी. पण आपली प्रेयसी ही आपलीच असेल दुसर्‍या कुणाचीही नाही, ही मालिका भावना अगदी मनात घट्ट रूजलेला हा तरूण. मारीयाशी आदल्या रात्री बोलणे झाल्यानंतर संशय येऊन तो तातडीने मुंबईत आला सकाळी मारियाच्या घरी जाऊन त्याने नीरजचा खून केला. केवळ मारीयावरील मालकी हक्क त्याच्यातील हिंसेला एवढी उत्तेजना देऊ शकतो? त्याच्यातला पुरूषप्रधान संस्कृतीच्या वर्चस्वाचा प्रतिनिधी आपल्या प्रेयसीच्या दुसर्‍या एका प्रियकराला संपवून टाकण्यापर्यंत जातो. हे असे कसे घडते? आणि त्याचवेळी मारीया शांतपणे काहीही विरोध न करता त्याच्याकडे पहात असते. त्याला मृतदेहाचे तीनशे तुकडे करायलाही मदत करते. हे सगळे अनाकलनीय आहे.

या तिघांच्याही आयु्ष्याला वेगळे वाटणारे परंतु, कुठेतरी एकमेकांशी जोडले गेलेले पैलू आहेत. मारीयाला यश, कीर्ति आणि पैसा कमवायचा होता. त्यासाठी तिने नीरज ग्रोव्हरची शिडी केली. ग्रोव्हरला शरीरसुख हवे होते. पैसा त्याच्याकडे होता. त्याने मारीयाचा त्याच दृष्टिकोनातून उपयोग केला. मॅथ्यूला मारीया सशरीर हवी होती. त्यामुळेच तिचे दुसर्‍याशी असलेले संबंधही त्याला सहन करता आले नाहीत. हे तिघेही अतिशय फसव्या, वरवरच्या दुनियेत वावरत असल्याचेही दिसते. या तिघांच्याही हेतूत ठोस काहीही नाही. कोणतीच गोष्ट दीर्घकाळ टिकणारी नाही. तरीही त्यांना त्याची भूल पडली आणि हे घडले.


पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमण हा घासून गुळगुळीत झालेला शब्द आहे. आरूषी आणि नीरज यांच्या हत्येबाबत बोलणार्‍या माध्यमांमधून वा त्यांच्या भाईबंद चॅनेल्समधूनच ती घराघरांत जाऊन पोहोचली आहे. विविध मालिकांतून परस्त्रीशी असलेले संबंध ही आता 'एक्स्ट्रा मॅरीटल अफेअर्स' म्हणून जणू काही सन्मानानं मिरवण्याची किंवा राजरोस चर्चेची गोष्ट झालीय, असे वाटते. विवाहबाह्य संबंधांचे चित्रण केले गेलेले नाही, अशी एकही मालिका दाखविणे मुश्किल आहे. हाच समाज या मालिका अतिशय चवीने पाहतो, त्यावर गॉसिपंगही होते. मग या सगळ्याचा परिणाम लहान मुलांवर आणि एकुणात समाजावरही पडणार नाही काय?

एकुणात जगण्याची मुल्ये बदलली आहेत. मुल्य शिक्षणाला आज काय किंमत राहिली आहे? फक्त शाळेतल्या मार्कांपुरती. आयुष्यात मुल्यांचा संबंधही कधी येत नाही. थिल्लर, उथळ गोष्टींना अनावश्यक महत्त्व जास्त आले आहे. पाश्चात्य संस्कृतीविरोधात आक्रंदन करणारी माध्यमे तरी काय प्रसवतात? बॉलीवूड आणि फॅशनच्या क्षेत्रात काय घडलेय याची 'सचित्र' माहिती शेतकर्‍यांच्या आत्महत्येपेक्षा महत्त्वाची ठरली आहे. विधायक गोष्टींपेक्षा विघातक गोष्टींची प्रसिद्धी ही हमखास खपाचा 'फॉर्म्युला' ठरली आहे. जगण्याची तीव्र स्पर्धा, पैसा मिळविण्याची निकड त्यासाठी मुल्यांचा बळी देण्याची वृत्ती हाच आजच्या जगाचा भाग आहे. म्हणूनच अशा बातम्या ऐकू येणे ही सहज बाब बनली आहे.

या सगळ्या गदारोळातच नाती हरवत चालली आहेत. नात्यांमधले प्रेम, आपुलकी हरवली आहे. आई, वडिल, मुलगा यांच्यातील निखळ जिव्हाळा पुसत चालला हे. प्रियकर- प्रेयसीच्या नात्यातील हळवेपणा, त्यागही मिटत चालला आहे. बाजारूपणाने नात्याचा अगदी खून केला आहे. गदिमांनाही ही स्थिती कदाचित आधीच ठाऊक असावी की काय? कारण त्यांनीच लिहून ठेवलंय.

लळा-जिव्हाळा शब्दच खोटे, मासा माशा खाई
कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही

रक्तहि जेथे सूड साधते, तेथे कसली माया?
कोण कुणाची बहीण, भाऊ, पती, पुत्र वा जाया
सांगायाची नाती सगळी, जो तो अपुले पाही

4 comments:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

अशा गोष्टी पूर्वीही होत होत्या पण आता त्यांना जास्त प्रसिद्धी मिळू लागली आहे. किंबहूना अशा बातम्यांना प्रसिद्धी मिळाल्यामुळेच समाज जास्त सवंग बनत चालला आहे असं वाटतं. पाश्चात्यांना प्रत्येक वेळी दोष देऊन असे अशा कृत्याचं समर्थन होऊच शकत नाही.

loukika raste said...

ya post madhe lihileli aarushi hatyakand prakaranatil mahiti hi news papaer ani news channel chya news war aadharit ahe ki apan kharach ya prakaranatil satya kai ahe he janun lihaycha prayatna kelela ahe? krupaya khulasa karawa.

अभिनय कुलकर्णी said...

लौकीका,
प्रसारमाध्यमातून प्रसारीत झालेल्या वृत्तावर आधारीतच हा लेख त्यावेळी लिहिला होता. त्यातले बरेचशे तपशील आजही स्पष्ट झालेले नाहीत. त्यामुळे अपुर्‍या नि कदाचित चुकीच्या माहितीवरही हा लेख आधारीत असावा असे मलाही वाटते. शिवाय हे प्रकरण आता न्यायप्रविष्टही आहे. त्यामुळे यातला आरूषीसंदर्भातील भाग मी वगळतो आहे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

loukika raste said...

thaks mazya comment cha wichar kelyabaddal.by the way chan lihita tumhi blogs.