Thursday, April 17, 2008

वर्तुळ पूर्ण झालं

नाशिकजवळ सिन्नरच्या कुशीत बिलगलेलं डुबेरे नावाचं गाव आहे. अगदी छोटसं गाव. हे दोन गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. एक इथं भोपळ्याचा वेल आहे म्हणून आणि मराठी साम्राज्याचा उत्तर दिग्विजय घडवून आणणारा महापराक्रमी पहिला बाजीराव पेशवा इथे जन्माला आला म्हणून. या गावातच साठेंचं घर आहे. एके दिवशी गाडी काढली आणि बायकोला मागे टाकून थेट डुबेरे गाठलं. साठेंचं घर शोधून काढलं आणि 'त्या' खोलीत प्रवेश केला. जिथे मराठी साम्राज्याचा पराक्रमी सूर्य जन्माला आला होता. अगदी थरारून गेलो होतो आम्ही. या छोट्याशा खोलीत बाजीरावाचा फोटो होता. एक तलवार होती. फार काही नव्हतं. पण त्या खोलीत गेल्यानंतरचा थरार खूप काळ कायम होता.
----------

इंदूरला आल्यानंतर बाजीरावासंदर्भातील निनाद बेडेकर यांनी लिहिलेला लेख वाचनात आला. बाजीरावाने मराठी सत्तेचा प्रचंड साम्राज्यविस्तार केला. नर्मदा ओलांडणारा हा पहिला मराठी वीर. त्याच्या पराक्रमाला तोड नव्हती. इंग्रजी इतिहासकारांनाही त्याचं कौतुक करण्याचा मोह आवरला नाही. शाहू महाराज तर एकदा म्हणाले होते ''दहा हजार सैन्य आणि बाजीराव यांच्यातलं काही निवडायला सांगितलं तर मी बाजीरावाला निवडेन.'' उत्तर भारत आजही महाराष्ट्रापासून इतका लांब आणि 'परप्रांत' वाटतो, तर त्यावेळी कुठलीही साधने नसताना हा भाग कसा वाटत असेल? मग बाजीरावाने उत्तर भारतात विस्ताराचं धैर्य कसं दाखवलं असेल? माळव्यापासून बुंदेलखंडापासून त्याने मराठी जरीपटका डौलाने फडकावला. त्याच्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात ३५-४० लढाया त्याने खेळल्या. पण एकही तो हरला नाही. तो हाडाचा सैनिक होता आणि लढाई कशी जिंकावी याचे शास्त्र त्याला अतिशय चांगले अवगत होते. बाजीरावाच्या मातोश्री राधाबाईंनी एकदा काशीयात्रेची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी वाटेतल्या सर्व राजांनी बिनधोकपणे त्यांना जाऊ दिले. पण त्यांचा विशेष आदरसत्कार केला. बाजीरावाने या भागात गाजवलेल्या पराक्रमामुळेच हे घडू शकलं.
बाजीरावाच्या तत्कालीन पराक्रमाचा एक किस्सा बेडेकरांनी नोंदवला आहे. त्यावेळी उदयपूरच्या राण्यानेबाजीरावाला बोलवलं. खास त्याच्यासाठी तिथली बाग सुशोभित केलं. त्याच्यासाठी सुवर्णाचं सिंहासन ठेवलं होतं. एक चांदीचं सिंहासन स्वतःसाठी ठेवलं होतं. बाजीरावाला त्याने सुवर्णसिंहासनावर बसण्याची विनंती केली. रायाने त्या सिंहासनाकडे एकदा पाहिलं आणि तो पटकन चांदीच्या सिंहासनावर बसला. सगळेच आश्चर्यचकीत झाले. मग रायाने खुलासा केला. ज्या सिंहासनावर 'राणा प्रताप बसले, त्यावर बसण्याची माझी लायकी नाही.' तेवढ्या एका वाक्याने राजपूत समाजाला रायाने जिंकून घेतलं. पुढे जयपूरच्या जयसिंहाने देखील उदयपूरच्या राजासारखेच सुवर्णसिंहान केले. तिथे मात्र राया सुवर्णसिंहासनावरच बसला आणि उदयपूर आणि जयपूर या दोन्ही गाद्यातील भेदही दाखवून दिला. मराठी साम्राज्यविस्तार करणारा हा बाजीराव अवघ्या चाळीसाव्या वर्षी नर्मदेजवळ रावेरखेडी येथे अतिश्रमाने मरण पावला.

-----------------------

नुकतेच इंदूरजवळ धार या गावाला गेलो होतो. या गावाला मोठा इतिहास आहे. परमार वंशातील प्रसिद्ध राजा भोज दहाव्याशतकांत इथेच राज्य करत होता. नंतर इस्लामी आक्रमणानंतर राज्य अल्लाउद्दीन खिलजीने गिळंकृत केलं. पुढे मुसलमानीराज्यानंतर बाजीरावाने या प्रांतात मराठी अंमल प्रस्थापित केला. मराठी सुभेदारीच्या वाटण्या झाल्यानंतर धार पवारांकडे गेले. आनंदराव पवार या पवारांच्या राज्यसत्तेतील पहिले राजे. धारच्या किल्ल्यावर मुसलमानांनंतर मराठ्यांनीही आपले वर्चस्व प्रस्थापित केले. पण या किल्ल्याशी निगडीत आणखी एक इतिहास निगडीत आहे. या किल्ल्यावर बघण्यासारखे काहीच नाही, असे आम्हाला (मी आणि बायको) तिथे घेऊन जाणार्‍या रिक्षावाल्याने सांगितले. पण आम्हाला किल्ला आवडला. नंतर तिथे गेल्यानंतर एक महत्त्वाची बाब समजली. मराठी साम्राज्याचा अस्त ज्याच्या काळात झाला तो दुसरा (पळपुटा) बाजीराव याच किल्ल्यात जन्माला आला होता.

माधवराव पेशव्यांशी झगडा मोडून घेतलेला राघोबादादा नंतर धारला आला होता. आनंदीबाईला इथेच ठेवलं होतं. आणि इथेच तिने दुसर्‍या बाजीरावाला जन्म दिला होता. पुढे घडलेला इतिहास तर सर्वांनाच माहिती आहे. बाजीरावाच्या कितीही बाजूने आणि विरोधात लिहिलं तर त्याच्या कारकिर्दीतच मराठी राज्य संपलं हेही तितकंच खरं.

पुरातत्व खात्याच्या एका कर्मचार्‍याने नियम डावलून आम्हाला ती खोली दाखवली, ज्यात दुसर्‍या बाजीरावाचा जन्म झाला होता. पुरातत्व खात्याने ठेवलेल्या जुन्या मूर्तींखेरीज तिथं काहीही नव्हतं. एका भिंतीवर पेशवाईतील वाटावं असं चित्र ठेवलं होतं. बस्स. मराठी साम्राज्याचा विस्तार करणारा एक बाजीराव आणि ज्याच्या काळात मराठी राज्य लयाला गेलं असा दुसरा बाजीराव.दोघांच्या जन्माचा माझ्याशी जोडला गेलेला हा दुवा. यानिमित्ताने एक वर्तुळ पूर्ण झालं.

2 comments:

Anonymous said...

ऐतिहासीक वाचनाला पुरावे शोधुन पाहाण्यात एक वेगळी मजा असते. ती तुमच्यात आहे, असे दिसले. छान.

कोहम said...

mahiti avadali.....aitihasi sthaLi svataha jaun te anubhavaNyacha tharar vegaLach